18 January 2019

News Flash

दुर्गांचा देश!

सबंध हिंदुस्थानचा विचार केला तर इथे लष्करी बांधकामे अगणित आहेत.

|| डॉ. मिलिंद पराडकर

सबंध हिंदुस्थानचा विचार केला तर इथे लष्करी बांधकामे अगणित आहेत. किंबहुना जिथे जिथे पर्वतरांगा आहेत तेथील शिखरांवर दुर्ग रचलेले आहेत. जिथे जिथे घनदाट अरण्ये आहेत, तिथे तिथे त्या गहन अरण्यांची शाल पांघरून असलेले दुर्ग आहेत. जिथे सुपारी फोडायलाही दगड सापडत नाही अशा गंगा-यमुनेच्या सपाट मदानी प्रदेशातही भक्कम दुर्गाची उभारणी झालेली आहे. बंगालमध्ये गंगेच्या मुखापाशी निर्माण झालेल्या नसíगक बेटांवरही मुघल सम्राटांनी दुर्गाची उभारणी करून तो भाग व्यापाराच्या दृष्टीने सुरक्षित होईल याची काळजी घेतली आहे. कोकणची संपूर्ण किनारपट्टी शिवछत्रपतींच्या जलदुर्गानी गजबजलेली आहे. राजपुतान्यातील अरवलीच्या हरएक शिखरावर दुर्गाचे अस्तित्व आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक अन् तमिळनाडमध्येही दुर्गाचे वैपुल्य आहे. सभासदाच्या बखरीचा आधार घेऊन बोलायचे झाले तर राज्याभिषेकानंतर केलेल्या दक्षिण दिग्विजयानंतर शिवछत्रपतींच्या ताब्यात या प्रदेशांतील जवळजवळ ऐंशी दुर्ग होते. यातले काही भूदुर्ग तर काही गिरिदुर्ग होते. काही अगोदरच्या काळापासून होते, काही शिवछत्रपतींनी नव्याने रचले होते, तर काही त्यांनी जुने होते ते पाडून तेथे नव्याने बांधलेले होते.

अन् सख्या सह्यद्रीचे काय सांगावे? महाराष्ट्राला लाभलेल्या सहाशे-सातशे कि.मी.च्या सह्यद्रीच्या डोंगररांगांमध्ये जवळजवळ साडेतीनशे दुर्ग आहेत. ‘एषां ही बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ असे मनूने ज्या दुर्गाच्या बाबतीत म्हटले, असे जवळजवळ साडेतीनशे गिरिदुर्ग आपल्या या महाराष्ट्राच्या वाटय़ास आले आहेत! बांधकामासाठी लागणारे उत्तम प्रतीच्या दगडासारख्या वस्तूंचे वैपुल्य, अतिशय खडतर असा भौगोलिक प्रदेश अन् या प्रदेशासारखीच तिखट अन् चिवट मनाची माणसे- बहुधा या त्रिवेणीमुळेच मध्ययुगात सह्यद्रीच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये विपुल दुर्गनिर्मिती झाली असावी!

मदानी प्रदेशातील दुर्ग बहुधा नद्यांच्या व जलस्रोतांच्या काठी बांधले गेले, ज्यागुणे त्या दुर्गास निदान एका बाजूने तरी नसíगक खंदक लाभेल. उस्मानाबादजवळचा नळदुर्ग हे या प्रकारचे उत्तम उदाहरण आहे. नसíगकदृष्टय़ा हे न जमले तर मग एखादी छोटीशी टेकडी मधोमध घेऊन त्याभोवताली शहरे अन् त्यांना वेढून तटबंदी असे भूदुर्ग रचले गेले. गिरिदुर्ग रचण्याचे तर वेगळे शास्त्रच निर्माण झाले. मलोन् मल धावणारी वेगवेगळ्या पातळीवरली दुहेरी वा तिहेरी तटबंदी, त्याच्या रक्षणासाठी तयार केलेल्या खंदकांच्या तिहेरी रांगा, मारगिरीसाठी योजलेल्या तटबंदीतल्या जंग्यांचे वेगवेगळे प्रकार, विशाल महाद्वारे व त्यावरले अणकुचीदार खिळे, ही सारीच मध्ययुगीन दुर्गाची सांगता येण्याजोगी वैशिष्टय़े ठरली.

दुर्गाकडे जाणारा मार्ग कठीण असण्यावर भर दिला गेला. तो जर कठीण नसला तर तो कृत्रिमरीत्या तसा केला गेला. गिरिदुर्गाच्या बाबतीत तर कडे तासून हे मार्ग कठीण केल्याची अनेक उदाहरणे दाखवता येतात. सह्यद्रीच्या विक्राळ दुर्धर पर्वतराजींचा, विक्राळ कडय़ांचा अन् भयासुर दऱ्यादरकुटांचा अन् घनगर्द अरण्यांचा उपयोग मध्ययुगीन दुर्ग रचताना केला गेला आहे. हा वारसा नि:संशयपणे सातवाहनांकडून चालत आला आहे. जीवधन, रतनगड, ब्रह्मगिरी वा त्र्यंबकदुर्ग यांसारख्या दुर्गाची खडकातून कातून काढलेली रचना पाहिली तर अक्षरश: तोंडात बोटे जातात! ही कला अन् कल्पना मुळात सातवाहन सम्राटांची. त्यांनी प्रथम ती अमलात आणली अन् मध्ययुगीन कालखंडात तिचा मोठय़ा प्रमाणात विकास झाला.

खंदकावरील ओढून घेता येणारे पूल हेही मध्ययुगीन दुर्गाचे एक वैशिष्टय़. एकापाठोपाठ एक, दोन, तीन किंवा चार दारे बांधायची पद्धत या काळात रूढ झाली. ही महाद्वारे बाहेरच्या बाजूने दिसू नयेत म्हणून ती झाकण्यासाठी चिलखती भिंतींची योजना करण्यात आली. कधी अशी एक भिंत तर कधी दोन भिंती उभ्या करण्यात आल्या. बीदर, देवगिरी, गोवळकोंडा ही या प्रकारच्या बांधकामाची अतिशय उत्तम अशी उदाहरणे आहेत. पन्हाळ्याचे तीन दरवाजा व चार दरवाजा हीसुद्धा या संदर्भातील उत्तम अशी उदाहरणे आहेत. या महाद्वारांच्या माथ्यावर असलेले व रुंदीच्या थोडे बाहेर असलेले सज्जे हासुद्धा संरक्षणात्मक आक्रमणाचा एक उत्तम प्रकार होता. गोवळकोंडा व बीदर येथील महाद्वारे याच पद्धतीने बांधलेली आहेत. बीदरच्या मांडू दरवाजात जाण्यासाठी एका भुयारातून रस्ता आहे. नाशिकजवळच्या अजिंठा-सातमाळा रांगेतील रवळ्या-जवळ्या, इंद्राई, तर कर्जतजवळच्या कोथळीगड या चालुक्यकालीन दुर्गावर डोंगराच्या पोटातून माथ्यावर जाण्यासाठी उभे भुयार कोरून त्यात चक्राकार जिने ठेवलेले आहेत. मात्र पश्चिमी देशांमध्ये सर्रास आढळणाऱ्या, इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या, दोरांच्या आधाराने व कप्प्यांच्या साहाय्याने वरून खाली सोडता येणाऱ्या दरवाजांचा (पोर्टकलिस) पूर्णत: अभाव आहे ही खरे तर आश्चर्याची गोष्ट आहे.

येथे फिलो ऑफ बायझ्ॉन्टिअमच्या लिखित दुर्गशास्त्राचा विचार केल्याशिवाय राहवत नाही. कौटिल्याच्या आगेमागे होऊन गेलेला हा युरोपमधला बंदा त्याच्या दुर्गविषयक लिखाणात म्हणतो : ‘दुर्ग ज्या जागी बांधायचा, त्या जागेचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास करावा. कारण तटबंदीचा आकार, तिची वक्राकार बांधणी, तिचा कोन या साऱ्याच गोष्टी त्या ठिकाणच्या भूमीच्या समतलतेवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. या गोष्टीची पूर्ण पडताळणी झाल्यावरच त्या जागेची प्राथमिक निवड करावी.’ त्यानंतर तो निरनिराळ्या प्रकारच्या तटांचे वर्णन करतो. अंतर्वक्र असलेले तट, दुहेरी प्रकारची तटबंदी, इत्यादींचा उल्लेख त्याच्या लिखाणात आलेला आहे. तो पुढे म्हणतो: ‘तटाची रुंदी कमीतकमी पंधरा फूट हवी. बांधकाम चुनेगच्ची अन् भक्कम हवे. शिडय़ा लावून सहज चढता येऊ नये म्हणून तट कमीतकमी तीस फूट तरी उंच हवा. ज्या भागात हल्ला होण्याची सर्वात जास्त शक्यता, तिथे बारा ते सोळा फुटांच्या अंतरावर समांतर अशी तटबंदी हवी अन् हे दोन्ही तट माथ्यावर असलेल्या देवडीने किंवा लाकडी तक्तपोशीने जोडलेले हवेत. काही ठिकाणची तटबंदी बाहेरून दिसायला हुबेहूब, मात्र त्यावर चालण्यास जागा नसलेली हवी. कारण वेढय़ाच्या काळात या तटाला शिडय़ा लावून शत्रूसन्य आत आले, तर त्यांची पूर्णपणे फसगत व्हावी अन् अवघडलेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या सन्याचा पुरता विनाश व्हावा!

‘दुर्गामधल्या घरांपासून तटबंदी कमीतकमी नव्वद फूट दूर असायला हवी. कारण त्यामुळे शस्त्रास्त्रे, सन्य, गाडे यांची तटालगत ने-आण सुलभ होते अन् जर तशी वेळ आली वा गरज भासली तर त्या जागेत बचावासाठी खंदक खणणेही सोपे जाते, असा फिलोचा यामागचा दृष्टिकोन होता.

‘टेहळणीचे बुरूज बांधायचे; तेसुद्धा अशा कोनामध्ये की, होणारा मारा त्या बुरुजांच्या तिरक्या कोनांच्या भिंतीवर निसटता बसावा. या टेहळणीच्या बुरुजांचे बांधकाम तटबंदीमध्ये जोडू नये, कारण कमीजास्त उंची, वेगळा आकार व भिन्न वस्तुमान यांमुळे मारा झाला, तर तटात तडे जायचा संभव असतो व हे संरक्षणाच्या दृष्टीने वाईटच म्हणायला हवे. या बुरुजांना परकोट बांधून दुहेरी संरक्षण द्यायला हवे. जेणेकरून त्यांस सुरुंगांपासून संरक्षण लाभू शकेल. या तटांचा व टेहळणीच्या बुरुजांचा पाया अतिशय भक्कम हवा. त्यांचे सारे बांधकाम चुनखडी वापरून करायला हवे. त्यात मधेमधे लोखंडी पट्टय़ा घालायला हव्यात अन् सांध्यांमध्ये शिसेही भरायला हवे. ज्या जागा माऱ्याच्या असतील तिथे दगडांचं कवच हवे. हे दगडसुद्धा एकात एक गुंतवून भिंतीत खोलवर गेलेले असायला हवेत.

‘मुख्य द्वाराखेरीज इतर द्वारे मागच्या बाजूस किंवा मुख्य द्वाराच्या डावीउजवीकडे असावीत. ती बांधताना, वेढय़ातून फेकल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या आवाक्याच्या बाहेर किंवा बाहेरून दिसू नयेत अशा पद्धतीने बांधलेली असावीत.

‘दुर्गाच्या बाहेरचा कोट वा परकोट बांधताना अतिशय काळजीपूर्वक बांधावा. मुख्य तटबंदी अन् हा परकोट यांमध्ये खंदकांच्या कमीतकमी तीन रांगा तरी असाव्यात. या रांगांच्या पुढय़ात मोठमोठे रांजण जमिनीमध्ये पुरून ठेवावेत. त्यांवर पालापाचोळा व माती अंथरून ते न दिसतीलसे करावे. त्यामुळे होईल काय की, वेढा घालणाऱ्या सन्याच्या शस्त्रास्त्रांचे गाडे या खड्डय़ांमध्ये रुतून बसतील अन् त्यांच्या आक्रमणास आपसूकच खीळ बसेल. त्यामुळे पुढे सरकलेले त्यांचे सन्यही काहीसे असाहाय्य होईल.’

आपल्या पुराणकारांनीही दुर्ग या विषयाचा सखोल ऊहापोह केला आहे. त्यासंबंधीची पुराणकारांची मतेसुद्धा निश्चितच चिंतनीय आहेत. अग्निपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मांडपुराण अन् ब्रह्मवैवर्त पुराण या पुराणांमध्ये दुर्ग या विषयावर बरीच माहिती आढळते. अग्निपुराण म्हणते :

‘षण्णामेकतमं दरुग तत्र कृत्वा वसेद् बली।

धनुदरुग महीदरुग नरदरुग तथव च॥

वाक्र्षञ्चवाम्बुदुर्गञ्च गिरिदुर्गञ्च भार्गव।

सर्वोत्तमं शैलदुर्गमभेद्यं चान्यभेनम्॥’

इथेही महाभारत, मनुस्मृती आदींमध्ये दिलेले दुर्गाचे तेच सहा प्रकार आढळतात. पुराणकार म्हणतात : या सर्व दुर्गामध्ये गिरिदुर्ग हा सर्वोत्तम. तो अभेद्य. इतर सारे भेद करता येण्याजोगे. या पुराणात दुर्गाचे पाच दोषसुद्धा सांगितले आहेत. ते असे की, तटाभोवतीचा खंदक गाळाने भरून कोरडा होतो. तटबंदी व बुरुजांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते. वारंवार वापराने संरक्षणाची यंत्रे नादुरुस्त वा निकामी होतात. शस्त्रागाराकडे दुर्लक्ष होते आणि कधी युद्धसज्ज सन्याचा तुटवडा भासतो. म्हणून राजाने या पाच बाबींकडे वेळोवेळी लक्ष पुरवायला हवे, तरच वेढय़ाच्या काळात तो दुर्ग तग धरू शकेल.

मत्स्यपुराणसुद्धा दुर्गाची अशाच प्रकारची क्रमवारी देते व गिरिदुर्ग हाच उत्तम दुर्गप्रकार असे निक्षून सांगते. दुर्गाचे बांधकाम, तटबंदी व खंदक ही दुर्गाची प्रमुख अंगे, असे या पुराणकारांचे मत आहे. दुर्गातील सर्व महत्त्वाच्या इमारती दुर्गाच्या मध्यभागी हव्या, शस्त्रास्त्रांचा भरपूर साठा हवा, युद्धयंत्रे सज्ज हवीत असेही मत यात नोंदवलेले आहे. एक सूचना अजूनही आहे की, दुर्गाची द्वारे कलापूर्ण असावीत. दुर्गामध्ये वसलेले शहर कशा पद्धतीने रचलेले असावे याविषयीचे मार्गदर्शनही या पुराणात आढळून येते : राजवाडा कुठे, खजिना कुठे, गजशाळा, शस्त्रागार, स्वयंपाकघर कुठे, विप्रांची, मंत्र्यांची घरे कुठे असायला हवी, वेदाध्ययन करणारे व शिकवणारे यांनी कुठे राहावे, अश्वशाळा, गोशाळा कुठे असाव्यात, दुर्गाच्या संरक्षणासाठी कोणते उपाय योजावेत, कोणत्या वस्तूंचा भरणा दुर्गात करून ठेवावा यांविषयीची मुद्देसूद माहिती पुराणकारांनी दिली आहे.

देवीपुराणात चार भागांत दुर्गाची विभागणी केलेली आहे. औदक, पार्वत, धान्वन व वनज असे मूळ चार प्रकारचे दुर्ग. त्यांत औदकाचे  म्हणजे जलदुर्गाचे- आंतरद्वीप- म्हणजे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या बेटावरचा व स्थल- म्हणजे काही भाग जमिनीवर तर काही भाग पाण्यात असलेला- असे दोन प्रकार.

पार्वत दुर्गप्रकारात-गुहा- म्हणजे चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या खोऱ्याच्या मध्यभागी असलेला दुर्ग व पर्वतमाथ्यावर असलेला दुर्ग असे पार्वतदुर्गाचे दोन प्रकार. रायगड हा बहुधा या प्रकारापकी असावा.

धान्वनदुर्गाचेही दोन प्रकार : पहिला निरुदकस्तंभ म्हणजे आजूबाजूच्या परिसरात कुठेही जल वा वनस्पती नसलेला दुर्ग; तर दुसरा इरिणदुर्ग म्हणजे खारट पाणी अन् तेही अतिशय अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या मरुभूमीतला -वाळवंटातील-दुर्ग.

वनदुर्गाचेही दोन प्रकार पुराणकार सांगतात : वाहत्या पाण्याचे झरे-ओढे असलेल्या वनातला तो खांजन या प्रकारचा दुर्ग; तर उंच उंच वृक्षराजीने दाटलेल्या घनगर्द अरण्यातला तो स्तम्बगहन. असे हे आठ प्रकारचे दुर्ग. मात्र या पुराणात महीदुर्ग अन् नृदुर्ग यांचा उल्लेखही केलेला नाही.

कृत्रिम व अकृत्रिम अशा दोन प्रकारच्या तटबंदींचे उल्लेख देवीपुराणात आढळतात. सपाटीवर असलेल्या दुर्गाना वा शहरांना तटबंदी व खंदकांचे संरक्षण द्यावे लागे, कारण त्यांना नसíगक दुर्गमतेचे संरक्षण नसे. मग त्यांना तटबंदी, त्याबाहेर खंदक व खंदकापलीकडे मुद्दामहून लागवड करून जोपासलेले काटेरी वृक्षांचे रान असं तिहेरी कवच निर्माण करावे लागे. देवीपुराणकारांच्या मते, विटांची तटबंदी हे या प्रकारच्या दुर्गाच्या बाबतीत टाळता न येण्याजोगी बाब होती. या तटबंदीची उंची पंधरा ते तीस फुटांपेक्षा (नऊ हात ते वीस हात) जास्त असू नये असे मतसुद्धा हे पुराणकार नोंदवताना दिसतात. पुराणकालाचा एकंदरीत विचार केला तर असे अगदी स्पष्टपणे सांगता येते की, या काळात दुर्गबांधणीशास्त्रासंबंधी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चितपणे अस्तित्वात होती. अनादिकाळापासून चालत आलेला केवळ निखळ संरक्षणाचा विचार आता काहीसा दुय्यम ठरला होता. त्याची जागा घेतली होती राजकीय धोरणांनी. निरनिराळ्या प्रकारच्या दुर्गाचा उपयोग करून घेऊन राज्य कसे निर्माण करावे, ते कसे वाढवावे व कसे राखावे, हा विचार दृढ होऊ लागला होता. या विचाराला चालना देण्यासाठी समाजातील-विद्वान, विचारवंत पुढे येऊन आपापली मते मांडत होते. मार्गदर्शक सूत्रांच्या माध्यमातून आपापल्या ठाम भूमिका समाजापुढे ठेवत होते.

शांतिपर्वात राजधर्मावर बोलताना पितामह भीष्म युधिष्ठिराला दुर्गासंबंधी सांगतात :

‘षड्विधम् दुर्गमास्थाय पुराण्यथ निवेशयेत्।

सर्वसंपत् पराधानं यद बाहुल्यं वापि संभवेत्॥

धन्वदुर्गम्, महीदुर्गम् गिरिदुर्गम् तथव च।

मनुष्यदुर्गमब्दुर्गम् वनदुर्गम् च तानि षट्॥

यत पुरम् दुर्गसंपन्नं धान्यायुधसमन्वितम् ।

दृढप्राकारपरिखम् हस्त्यश्वरथसंकुलम् ॥’

सारांश असा की, दुर्ग सहा प्रकारचे आहेत. धन्वदुर्ग, महीदुर्ग, गिरिदुर्ग, मनुष्यदुर्ग, अब्दुर्ग व जलदुर्ग. या सहांपकी एका दुर्गाचा राजाने सारी संपत्ती व कर्मकार, सल्लागार यांसह आश्रय घ्यावा. वरील सहा प्रकारचे दुर्ग बहुधा सर्वच पुराणांनी व स्मृतिकारांनी वर्णन केले आहेत. फरक आहे तो कोणता दुर्ग उत्तम या संदर्भात. बहुतेकांचे गिरिदुर्ग यावर मतक्य आहे. मात्र पितामह भीष्म इथे काही वेगळे सांगतात. ते म्हणतात : युधिष्ठिरा! तुझ्यावर भक्ती व प्रेम असणारी माणसे, ब्राह्मण असा लोकसंग्रह केव्हाही चांगला. कोशापेक्षाही अधिक उत्तम. म्हणून शास्त्रांनी हे निश्चित केले आहे की, या सहाही प्रकारच्या दुर्गामध्ये महापराक्रमी वीरांनी रचलेला मनुष्यदुर्ग वा नृदुर्ग हा सर्वात दुस्तर मानला जातो. तेव्हा राजाने याच दुर्गाचा आश्रय घ्यावा. (बहुधा राजाने भौतिक दुर्गापेक्षा आपल्या सन्यबळावरच जास्त विश्वास ठेवावा, असे पितामहांना सुचवायचे असावे!)

‘दयिताश्च नरास्ते स्युíनत्यंपुरुषसत्तम।

न कोश परमोयोन्योराज्ञां पुरुषसंचय:॥

दुग्रेषु च महाराज षट्सु ये शास्त्रनिश्चिता:।

सर्वेषु तेषु मन्यन्ते नरदरुग सुदुस्तरम्॥’

अर्थ असा की, दुर्ग हा विषय कोणत्याही कालखंडातील राज्यकर्त्यांनी कधीही दृष्टीआड केला नव्हता. किंबहुना त्या अवघ्यांची विचारधारा राज्याच्या आणि प्रजेच्या क्षेमकल्याणाचा विचार करताना दुर्ग या विषयाच्या परिघातच घोटाळत राहिली. आक्रमणांपासून संरक्षणासाठी दुर्ग या संकल्पनेचा जन्म झाला. वाहत्या काळात या संकल्पनेला मग प्रजेचा प्रतिपाळ अन् राज्यविस्तार असे दोन पंख फुटले. अन् मग कल्पनेची अन् आकाक्षांची क्षितिजेही थिटी पडू लागली. दुर्ग या तर केवळ अबोल वास्तू. मग त्यांच्या स्वामींनी त्यांच्या स्वत:च्या स्वाभाविक मनोवृत्तीनुसार जे जे भलेबुरे केले, त्यानुरूप या दुर्गाना कीर्ती वा दुष्कीर्ती लाभली. मात्र यांचे इतिहासातले स्थान अढळच राहिले. या दुर्गानी हे राष्ट्र कलेकलेने वाढताना पाहिले. या राष्ट्राचा इतिहास घडताना पाहिला. भलीबुरी म्हणावी अशी सारीच स्थित्यंतरे अनुभविली. जेत्यांचे आनंदसोहळे तर जितांची आसवंसुद्धा यांनी स्थितप्रज्ञपणे पाहिली. मात्र तरीही या पत्थरदिलांचे िहदुस्थानच्या घडणीतले योगदान कुणाही अभ्यासकाला भुरळ घालील असेच आहे. दुर्गाचा हा असा वैभवशाली वारसा लाभलेला हा आपला देश तसा भाग्यवंतच म्हणायला हवा!

discover.horizon@gmail.com

First Published on May 19, 2018 12:03 am

Web Title: fort in india