सम्राट अशोकाच्या सोपाऱ्याच्या शिलाशासनापासून महाराष्ट्राचा इतिहासकाळ सुरू होतो असे मानले जाते. अशोकाने त्याच्या राजाज्ञा दगडावर कोरून देशभर उभ्या केल्या. त्यातली एक महाराष्ट्राच्या वाटय़ाला आली. इथल्या मातीत सापडलेले लिखित हे असे पहिलेच. त्यामुळे हा इतिहासकाळाचा प्रारंभ असे पुरातत्त्वशास्त्रानुसार मानले गेले. ख्रिस्तपूर्व तिसरे शतक असा साधारणपणे याचा काळ. या अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या पन्नासेक वर्षांत मौर्याचं विशाल साम्राज्य कोलमडून पडलं. पडल्यानंतर उडालेल्या असंतुष्ट तुकडय़ांनी त्या त्या ठिकाणी मूळ धरलं. नवी नवी राज्यं अन् नवी नवी राजघराणी उदयाला आली. शुंग सेनापती पुष्यमित्र याने मगधाची गादी बळकावली. किलग देशात खारवेलाच्या पूर्वजांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. महाराष्ट्रात राष्ट्रीक, भोजक, पेतेनिक, इत्यादी सरंजामदार सत्ता गाजवीत होते. त्यांचेही उठणे स्वाभाविकच होते. दक्षिणेतल्या अशाच अनेक सामंतांपकी सातवाहन नामक एका शूर व धोरणी पुरुषाने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वत:च्या नावाने तांब्याची व शिशाची नाणी पाडली. त्याची ही नाणी औरंगाबाद, हैदराबाद, नेवासे, कोंडापूर या ठिकाणी जमिनीवर अन् उत्खननात सापडली आहेत. त्यांच्या पुढील बाजूवर सोंड वर केलेला हत्ती असून सभोवताली ‘रञो सिरि-सातवाहनस’ म्हणजे हे नाणे राजा सातवाहनाचे, असा लेख अन् मागील बाजूस, दोन्ही टोकास फुगीरपणा असलेल्या दोन रेषा एकमेकींना काटकोनात छेदताना दाखवल्या आहेत. हा राजा या वंशाचा मूळ पुरुष. जसे गुप्त नामक राजावरून त्याच्या वंशाला गुप्त नाव पडले, तसे या राजाच्या नांवावरून त्याच्या कुलाला सातवाहन असे नाव पडले. कृष्ण सातवाहनाच्या नाशिक लेण्यातील अतिशय प्राचीन लेखात याचा उल्लेख असा आढळतो :

‘सादवाहनकुले कन्हे राजिनि नासिककेन

समणेन महामातेण लेण कारित.’

म्हणजे सातवाहन कुळातील कृष्ण राजा असताना नाशिक येथील महामात्र श्रमणाने हे लेणे कोरविलं. हा लेख महाराष्ट्रातील सातवाहनांच्या इतिहासातील सर्वात प्राचीन असा शिलालेख आहे- म्हणजे सातवाहनांचा लिखित इतिहास इथपासून सुरू होतो असं म्हटलं, तर ते वावगं अथवा अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. कृष्ण सातवाहनाचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व १७५ मानला जातो.

हा प्राचीन राजवंश पराक्रमाच्या, संस्कृतीच्या, सुबत्तेच्या पायऱ्या चढत्या क्रमाने पादाक्रांत करीत गेला. इ.स.च्या १२५ वर्षी या कुळातल्या गौतमीपुत्र सातकर्णी या अपरपराक्रमी राजानं आपल्या झंझावाती शौर्याने सौराष्ट्र, कुकुर (राजपुताना), आकरावंती (पूर्व व पश्चिम माळवा), अनूप (महेश्वर नगरजवळचा प्रदेश), अपरान्त (उत्तर कोकण), ऋषीक (खानदेश), अश्मक (अहमदनगर जिल्हा), मूलक (पठण परिसर) अन् विदर्भ असे अवघे देश जिंकून घेतले. त्याचा पुत्र वासिष्ठीपुत्र पुळुमावी यानं नाशिकच्या लेण्यातील, स्वत:च्या कारकीर्दीच्या एकोणिसाव्या वर्षांत कोरलेला शिलालेख यास साक्ष आहे. तो म्हणतो :

‘मंदरपवतसमसारस असिकअसकमुळकसुरठकुकुरापरंतअनुपविदभ –

आकरावंतिराजस विझछवतपरिचातसह्यकण्हगिरिमचसिरिटनमलय –

महिदसेटगिरिचकोरपवतपतिस..’

अर्थ असा की, तो विध्य, ऋक्षवत्, पारियात्र, सह्य, कृष्णगिरि, मंच, श्रीस्तन, मलय, महेन्द्र, श्वेतगिरि व चकोर या पर्वतांचा स्वामी होता. याच लेखात तो पूर्वोक्त उल्लेख आहे की, ज्याचे वदन सूर्याच्या किरणांनी उमललेल्या कमलाप्रमाणे विमल होते; ज्याच्या हत्ती, घोडे आदी वाहनांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.. तो (गौतमीपुत्र सातकर्णी) आपल्या सुखी मातेची शुश्रूषा करीत असे..

‘रविबोधितकमलविमलसदिसवदनस तिसमुदपीततोयवाहनस

.. अविपनमातुसुसूसाकरस..!’

असा हा मूळ लेख आहे.

हे असे राजकूळ जे जवळजवळ साडेचारशे-पाचशे वष्रे या महाराष्ट्रदेशी नांदले, ज्या कुळाने मोठय़ा दिमाखानं स्वत:ला ‘दक्षिणापथपति’ असे बिरूद लावून घेतले, ज्यांची युद्धोत्सुक जनावरे तीन समुद्रांचे पाणी पीत होती त्यांच्या त्या एकछत्री साम्राज्यात ज्ञान, कला, संस्कृती, व्यापार, सामान्य व राजकीय प्रशासन, व्यापारी श्रेणी, शिल्पकृत्ये, चित्रकला, स्थापत्य, साहित्य, आíथक समृद्धी, समाजव्यवस्था, धार्मिक व्यवस्था, हे सारेच परिपूर्ण असायला हवे असा साधार तर्क करता येतो.

या कुलातील हाल या सातवाहन राजाने देशभरातून लक्षावधी कविता गोळा केल्या. त्यांना म्हणायचे गाथा. तर अशा लक्षावधी गाथांमधून त्याने सातशे गाथा निवडून त्यांचा संग्रह प्रसिद्ध केला. ‘गाथासप्तशती’ असे या ग्रंथाचे नाव. त्यातील एका गाथेत कवी गोदावरी नदीला विचारतो :

‘सच्चं भण गोदावरी

तुव पुव्वसमुद्देणसंहिआ संती।

सालाहणकुलसरिसं जइ ते

कूले कुलं अत्थि’।

अर्थ असा की, ‘हे गोदावरी, तू  थेट पूर्वसमुद्रापर्यंत राहात जातेस, मात्र अगदी खरे सांग, (की या संबंध प्रवासात) सातवाहनकुलाऐसे कुल तुला कोठेतरी आढळले काय?’

‘गाथासप्तशती’ हे तत्कालिन साहित्याचे एकच उदाहरण नव्हे. गुणाढय़ाची ‘बृहत्कथा’, शर्ववम्र्याचे ‘कातन्त्र व्याकरण’, शूद्रकाचे नाटक ‘मृच्छकटिक’ अन् नागार्जुनाचे व आर्यदेवाचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ हे सारेच सातवाहनकाळाला समकालीन आहेत अन् महत्त्वाचे म्हणजे सातवाहनकाळातील संपन्नतेची प्रतिबिंबे त्यांत लखलखीतपणे उमटलेली आहेत. साहित्यातून समाजजीवन दिसते. शिलालेखांमधून दिसते राजकीय प्रगल्भता, शिल्पांमधून जाणवते सृजनशक्तीचे प्रवाहीपण, तर नाणकसंचयांमधून आíथक सबलता! मात्र दिसत नाही या साऱ्यांच्या मागे उभा असलेला दुर्गाचा भक्कम आधार! राज्याचे प्रशासन व व्यापार या दोन्ही नाडय़ा स्वत:च्या दणकट हातांमध्ये ठेवणारे दुर्ग हा या साऱ्याच संपन्नतेचा कणा आहे. सक्षम आधार आहे. किंबहुना संपन्नतेचा हा साराच डोलारा दुर्गाच्या साखळीच्या या भक्कम पायावर उभा असलेला आपल्यास जाणवल्याखेरीज राहत नाही. या ठिकाणी रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्राचे सहजच स्मरण होते. त्यातील दुर्गप्रकरणात ते म्हणतात : ‘गडकोटविरहित जे राज्य, त्या राज्याची स्थित म्हणजे अभ्रपटलन्याय आहे.’ अन् सातवाहन राज्यकर्त्यांना हे नेटकेपणी ठाऊक होते! याची साक्ष देताहेत, त्यांनी रचलेले सह्यद्रीतील अनेक दुर्ग!

सातवाहन राज्यकर्त्यांचे देशातील इतर भागांशीच नव्हे, तर अनेक परकीय देशांशीही दृढ व्यापारी संबंध होते. रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापारी संबंधांचा लिखित पुरावा आपल्याला ‘पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रिअन सी’ म्हणजे हिंदी महासागराचा मार्गदर्शक या ग्रंथात मिळतो. यात भडोच, अपरान्त, शक राजे, सुंदर सातकर्णी यांचे स्पष्ट उल्लेख आहेत. या ग्रंथातूनच आपल्याला कळते की, सातवाहनकाळी भडोच-भृगुकच्छ, कल्याण-कलियान, सोपारा-शूर्पारक या बंदरांतून मोठय़ा प्रमाणावर व्यापारी उलाढाल होत असे. इटली, इजिप्त, ग्रीस या मध्यपूर्व व युरोपातील संस्कृतींशी व्यापारी देवाणघेवाण या बंदरांच्या माध्यमातून होत असे. ही बंदरे खुष्कीच्या वाटांनी प्रतिष्ठान-पठण, तगर-तेर, जुण्णनगर-जुन्नर, करहाटक-करहाड, ब्रह्यपुरी-कोल्हापूर, वैजयंती-वनवासी या दक्षिणापथातल्या शहरांशीही जोडलेली होती. या बंदरांमध्ये उतरणारा हा सारा माल या बंदरांमध्ये बलांच्या पाठीवर लादला जाई अन् बलांचे ते प्रचंड तांडे कोकणातून अनेक घाटवाटांचा वापर करीत, सह्यद्रीचा दांड चढून वरघाटी पावते होत. या व्यापारी तांडय़ांच्या प्रमुखास ‘सार्थवाह’ ही संज्ञा होती. शूद्रकाने ‘मृच्छकटिका’त वर्णिलेला चारुदत्त हा एक अतिशय धनिक असा सार्थवाह आहे. या नाटकात सातवाहनकालीन संपन्नता अतिशय तरलतेने वर्णिलेली आहे. हे आíथक संपन्नतेचे अन् पर्यायाने समर्थ राजसत्तेचे गमक आहे. प्रख्यात रोमन ग्रंथकार प्लिनी याने, रोमचे नागरिक भारतातून येणाऱ्या चनींच्या वस्तूंवर पसा उधळतात याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे थांबले नाही तर रोमन साम्राज्य दिवाळखोरीत जाईल अशी सावधानतेची सूचनाही त्याने रोमन सम्राट नीरोला दिलेली आपल्याला आढळते. त्या कालखंडात होऊन गेलेल्या ऑगस्टस् ते निरो या रोमन सम्राटांची शेकडो नाणी दक्षिण भारतात सापडली आहेत. प्लिनीच्या म्हणण्याप्रमाणे दरवर्षी रोमकडून पाच कोटी सेस्टरसेस सोन्याची नाणी भारतात येत होती. हेसुद्धा सातवाहनांच्या आíथक सुबत्तेचं फलित म्हणायला हवं. प्लिनीच्या म्हणण्यानुसार, सातवाहनांच्या राज्यात तीस तटबंदीयुक्त शहरे होती. प्लिनीचा काळ पहिल्या शतकातला. त्या काळात सातवाहनांचे राज्य बहुधा महाराष्ट्रापुरते मर्यादित होते. त्यामुळे असाही तर्क करता येतो की, ही सारी शहरे महाराष्ट्रातच असायला हवीत.

पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रिअन सी’ या ग्रंथावरून असेही लक्षात येते की, त्या काळी भडोच, कल्याण, सोपारा या बंदरांमधून मोठा व्यापार चालत असे. ही बंदरे खुष्कीच्या मार्गाने महाराष्ट्रातील  मुख्य व्यापारी पेठांशी जोडलेली असत. या वाटा सह्यद्रीचा गगनभेदी दांड चढून घाटमाथ्यावर पावत्या होत अन मग दख्खनच्या पठारावर वसलेल्या नामांकित शहरांच्या दिशेला वळत. तेथून हा सारा माल देशभरात पसरत असे. कोरीव लेखांमध्येसुद्धा व्यापारी शहरे व गावांची अनेक नावे आली आहेत. त्यांत नाशिक-गोवर्धन, कल्याण, चौल, करहाटक, वनवासी, धेनुकाकट, काल्रे, शूर्पारक, प्रतिष्ठान, भोकरदन, धान्यकटक, भडोच, मंदसोर ही नावे आढळतात. मात्र यातील साऱ्याच घाटवाटा ही काही सातवाहन काळाची निर्मिती नव्हे. सातवाहनांच्या काळात राजसत्तेची केंद्रे राजधानी पठण, नाशिक व जुन्नर इथं निर्माण झाली. त्यामुळे त्यांच्या काळात शूर्पारक, कलियान व चौल ही बंदरं भरभराटली. कदंब हे त्यांचे दक्षिणेकडले सामंत. चौथ्या शतकातील त्यांच्या राजकीय कालखंडात ही समृद्धी अजून दक्षिणेकडल्या बंदरांत सरकली. नवी बंदरे निर्माण झाली. जुन्यांना ऊर्जतिावस्था आली. व्यापारी मार्गाची धाव ही नेहमी राजधान्यांकडेच असते. मग अर्थातच जेव्हाजेव्हा सत्ताकेंद्रे बदलली, तेव्हातेव्हा व्यापाराचे नवनवीन मार्ग निर्माण झाले. दुसरे असे की, ही संपन्नता अन् वैभव ज्या व्यापारी मार्गावरून वाहणार, ते मार्ग जर संरक्षिले गेले नाहीत तर मग नुसत्या शहरांना तटबंदी करून काय उपयोग? व्यापारी मार्ग, पशूंच्या, पुंडपाळेगारांच्या, दरोडेखोरांच्या जाचातून मुक्त झाले नाहीत तर व्यापारी समुदायास असुरक्षिततेची भावना घेरणार. अन् असुरक्षित मन:स्थितीत काय व्यापार होतो? व्यापारामुळे राष्ट्र समृद्ध होते, श्रीमंत होते. न मिळणारी वस्तुजात उपलब्ध होते. संकटसमयी राज्यकर्त्यांस धनाची चणचण भासत नाही. मग व्यापाराचे संरक्षण तेच राज्याचे व राजलक्ष्मीचे संरक्षण अशी भावना तत्कालीन राज्यकर्त्यांमध्ये दृढ असणे अतिशय संभवनीय ठरते.

ज्या काळात पूर्तकर्माना- म्हणजे तलाव, टाकी, खोदणे, धर्मशाळा बांधणे, उद्याने निर्माण करणे, नद्या ओलांडण्यासाठी धर्मार्थ तरींची सोय करणे, दात्यांच्या माध्यमातून लेणी कोरणे, त्यातून भिक्खूंखेरीज आल्यागेल्या पांथस्थांचीही सोय करणे याला- प्रचंड महत्त्व होते त्या काळातील प्रगल्भ राजसत्तेने पूर्तकर्मासोबत व्यापाराच्या, व्यापाऱ्यांच्या व व्यापारी मार्गाच्या योगक्षेमासाठी व संरक्षणासाठी तजवीज करणे अगदी अपरिहार्य होते. १५-२० हजार बलांचे तांडे त्यासोबत असलेला पाच सात हजार लोकांचा जमाव यांची सुरक्षितता ही केवळ फिरत्या सन्याच्या नियुक्तीने पार पाडली जाणे शक्य नव्हते. त्यासाठी या सन्याचे तळ स्थायी स्वरूपात असणे आवश्यक होते, जेथे राहून ही पथके या व्यापारी वाटा निर्वघ्निपणे वाहत्या ठेवू शकत.

हे असे असताना मग कठीण काहीच नव्हते. प्राचीन आचार्य परंपरेचा वारसा लाभलेला होता. त्या अवघ्यांनीच एकमुखाने विदित केले होते की, ‘एषांहि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’! अन् ज्या राज्यकर्त्यांनी तटबंदीयुक्त तीस शहरे रचली, त्यांच्यासाठी व्यापाराच्या व सरहद्दींच्या संरक्षणासाठी सह्यद्रीच्या दुर्गम प्रदेशात गिरिदुर्ग रचणे अवघड गेले नाही. सातवाहन राजकुळ हे सह्यद्रीच्या शिखरांवर दुर्गलेणी रचणारे आदिम राजकुळ याविषयी शंका घेण्यास नाही!

सह्यद्रीतील दुर्गाच्या कुळकथेला ही अशी सुरुवात होते!

– डॉ. मिलिंद पराडकर

discover.horizon@gmail.com