News Flash

फ्रेम्स  आणि  पेंटिंग

फ्रेम असूनसुद्धा बोजड दिसते तर कधी पाच वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्ससुद्धा एकमेकींशी सुसंगत वाटतात.

 

 

एखादी फ्रेम समतोल साधल्याने चांगली दिसत आहे, तर एखादी त्याच्या असमतोलपणामुळे लक्ष आकर्षित करते आहे. कधी पांढऱ्या भिंतीमुळे चित्र उठून येतंय तर कधी मोरपंखी रंगामुळे. कधी एकच फ्रेम असूनसुद्धा बोजड दिसते तर कधी पाच वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्ससुद्धा एकमेकींशी सुसंगत वाटतात.

आजकाल आपण घराच्या किमतीच्या कमीत कमी एकचतुर्थाश पैसा गृहसजावटीमध्ये खर्च करतो. बाजारातील चकचकीत मासिकांतील घरे पाहून आपल्या स्वप्नांचे घर आपल्या डोळ्यांसमोर तरळू लागते. भरभक्कम फी देऊन डिझायनर बोलावला जातो. त्याच्या बरोबरच्या मीटिंग्ज, शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या आराखडय़ांवर उलटसुलट चर्चा, रंगसंगती, फर्निचर या सगळ्याला ऊत येतो. पण शेवटी कुठल्याही घराला उठाव येतो तेथे वापरलेल्या सजावटीच्या गोष्टींमुळे (accessories). या गोष्टी आहेत फोटो फ्रेम्स, पेंटिंग्ज, तऱ्हेतऱ्हेची मडकी, फुलदाण्या, मूर्ती, पडदे, सुशोभित दिवे वगैरे वगैरे.

आज आपण या लेखामध्ये फ्रेम्स व पेंटिंग्जची सजावट कशी करता येईल ते बघू या. वरकरणी अगदी सोपी वाटणारी गोष्ट कधी कधी आपल्या नाकात दम आणते. मोठय़ा आवडीने, चोखंदळपणे व भरपूर पैसे खर्च करून आणलेले पेंटिंग आपल्या दिवाणखान्यात मात्र अगदीच विसंगत दिसते. परिणामी एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करूनसुद्धा इंटीरियर अगदीच बेढब दिसू लागते. आपला गोंधळ अजूनच वाढतो, कारण आपण बघतो एखादी फ्रेम समतोल साधल्याने चांगली दिसत आहे, तर एखादी त्याच्या असमतोलपणामुळे लक्ष आकर्षित करते आहे. कधी पांढऱ्या भिंतीमुळे चित्र उठून येतंय तर कधी मोरपंखी रंगामुळे. कधी एकच फ्रेम असूनसुद्धा बोजड दिसते तर कधी पाच वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्ससुद्धा एकमेकींशी सुसंगत वाटतात. हे असे का होते? त्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेणे जरुरी आहे-

खोलीचे आकारमान- पेंटिंग खरेदी करताना ज्या खोलीत ते लावणार आहोत त्या खोलीचा आकारमान विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे. व त्यानुसारच पेंटिंग छोटे किंवा मोठे खरेदी करावे. मग ते कितीही छान व खिशाला परवडणारे असो. मोठे पेंटिंग नीट कळायला थोडे दूर जावे लागते, जेणेकरून पूर्ण पेंटिंग डोळ्यांत भरेल. छोटय़ा खोलीत असे मोठे पेंटिंग कितीही चांगले असले तरी आजूबाजूच्या सामानात बोजड दिसायला लागते. कारण मागे / दूर जाऊन पेंटिंगचे रसग्रहण करण्यासाठी जागाच नसते. तेव्हा अशा छोटय़ा जागी बारीक फ्रेम्स, नाजूक कलाकुसरीचे काम, तपशीलवार (Detailing) केलेले पेंटिंग भिंतीवर लावावे. ज्याचा आनंद जवळ जाऊन घेता येईल. त्याचप्रमाणे प्रशस्त खोलीत छोटी फ्रेम, नाजूक कलाकुसरीचे काम कोणाच्या लक्षातही येणार नाही. तेथे एखाद्या भव्य निसर्गाचे चित्र, सूर्यास्त,  abstract पेंटिंग, व्यक्तिचित्रे लावावीत. खालील चित्रात आपल्याला लक्षात येईल की, या चित्रातील रंगसंगती व साधलेला समतोल दुरून बघितल्याशिवाय कळून येणार नाही

संकल्पना व रचना-  गृहसजावटीमध्ये आपल्या मनात येईल तशा गोष्टी मांडू नयेत. त्यामध्ये सुसंगती व समतोल साधण्यासाठी एखादी संकल्पना (concept) असणे जरुरी असते. उदाहरणार्थ, जर आपले घर पारंपरिक पद्धतीने सजवले असेल तर बाकीच्या फर्निचरबरोबर पेंटिंग्ससुद्धा त्याला साजेसेच घ्यावे. तिथे आधुनिक प्रकारचे पेंटिंग चालणार नाही. त्याचबरोबर पेंटिंग असे घ्यावे, ज्याची रंगसंगती आजूबाजूच्या सजावटीला अनुरूप आहे.

गृहसजावटीमध्ये कुठल्याही गोष्टीच्या रचनेला खूप महत्त्व असते. या लेखाच्या संदर्भात बोलायचे तर ती फ्रेम / पेंटिंग कसे ठेवले आहे, कुठल्या कोनात आहे, त्याची उंची काय आहे हे विचारात घ्यावे. सरासरी माणसाच्या डोळ्यांची पातळी ही ६०-६२ इंचावर येते. तेव्हा पेंटिंगचा मध्य हा जमिनीपासून ६०-६२ इंचावर येईल असा ठेवावा. यापेक्षा उंचावर किंवा खाली ठेवल्यास पेंटिंग नीट बघता येत नाही. त्याचप्रमाणे एकच मोठे पेंटिंग सोफा किंवा बेडमागे लावायचे असेल तर त्याची लांबी सोफ्याच्या दोन-त्रितीयांश तरी पाहिजे. म्हणजे ७ फूट लांबीच्या सोफ्यामागे कमीत कमी साडेचार फूट लांबीचे पेंटिंग पाहिजे. तरच तो समतोल साधला जाईल. ही लांबी मग तुम्ही एकाच पेंटिंगने भरू शकता किंवा ३-४ एकाच संकल्पनेच्या फ्रेम्स लावूनसुद्धा भरू शकता.

कुठल्याही कलेमध्ये visual balance  खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी लांबी-रुंदीचे गणित नीट पाळणे गरजेचे असते. त्याशिवाय संतुलन नीट साधले जात नाही.
-वैशाली आर्चिक -archik6@gmail.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:33 am

Web Title: frame and painting
Next Stories
1 हर घर कुछ कहता है..
2 वास्तुमार्गदर्शन
3 डीम्ड कन्व्हेअन्स एक अत्यावश्यक बाब
Just Now!
X