१९५३ च्या मे महिन्यात अक्षय तृतीयेला माडगूळकर कुटुंब पुण्यातील ‘पंचवटी’मध्ये राहायला आले, त्याला अलीकडेच ६० वर्षे पूर्ण झाली. आज ‘गदिमा’ हयात नाहीत, तरीही ‘पंचवटी’त त्यांच्या स्मृती कायम आहेत.
सुरुवातीला कुळकर्णपण करणारे म्हणून ‘कुलकर्णी’, नंतर औंधकर नावाने चित्रपटसृष्टीत परिचित असणारे ‘गजानन दिगंबर’ यांनी कुठल्याही तऱ्हेची श्रीमंती नसणाऱ्या ‘माडगूळ’ गावाला वैभव प्राप्त करून दिलं. पु. ल. देशपांडे म्हणतात, ‘‘आपल्या हिंदू संस्कृतीत अणिमा, गरिमा इ. अष्टसिद्धी आहेत. मराठी माणसाच्या सौभाग्याने त्याला ‘गदिमा’ ही विशेष सिद्धी लाभली आहे.’’
ही सिद्धी प्राप्त करीत असताना त्यांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. तो त्यांच्या लहान-मोठय़ा घरकुलांतून जाणवतो; पण एक नक्की, यशाची कमान नेहमीच चढती राहिली. अशी छोटी-मोठी घरं प्रसंगानुरूप घेतली तर माडगूळचं घर, तिथला ‘बामणाचा पत्रा’ आणि पुण्याचं ‘पंचवटी’ म्हणजे कायमच्या वास्तव्याचं ठिकाण.
या वास्तूचं भाग्य तर फारच थोर! वास्तू कसली, खरं तर गोठाच! १९४८ च्या जळीतात जळलेल्या वाडय़ाची पुन्हा उभारणी करताना उरल्यासुरल्या सामानातून बांधलेला. आता कौलं, फरशी वगैरे असली तरी एक लहानशी लांबट १५ बाय २५ फुटांची झोपडी आणि तिच्यावर पत्रा टाकलेला. खंडोबाच्या देवळाला सामोरी. इथे ‘गदिमां’ना अप्रतिम कविता सुचली. त्यांना वाटलं, हा वास्तूचा गुण आणि वास्तूला वाटलं, हा अण्णांचा परीसस्पर्श की ज्यामुळे माझं नाव झालं. घरापासून जवळच ‘पाव’ नावाचे नऊ एकराचे शेत. खंडोबाच्या माळाकडे तोंड केलं की उन्हाच्या रखरखाटात पाण्याचा अक्षरश: धावता प्रवाह दिसायचा. या मृगजळाला भुललेले हरणांचे कळप लांडग्यांच्या मुखात अलगद जायचे. अशा या रखरखीत ओसाड माळरानाचं ‘गदिमां’नी हिरवाईत रूपांतर करून निवांत केलं. शेजारी आणखी एक १० एकरांचं शेत घेतलं. दोन्हींकडे विहिरी बांधल्या. बामणाचा पत्रा फुलांप्रमाणेच वेगवेगळ्या माणसांनीही मोहरला. जेवणाचा खास गावरान बेत! मळ्यातल्या वांग्याचं भरीत, मीर्चीचा ठेचा, सायीचं दही, कधी पुरणपोळ्यांचा बेत, तर कधी हुर्डा पार्टी.
कधी खोडकर मुलाप्रमाणे विहिरीत मुटका मारणं, तर कधी कुस्ती खेळणं. विद्या वहिनींना पोहायला शिकवायच्या निमित्ताने विहिरीत ढकलून देऊन गटांगळ्या खायला लावायच्या (त्यांची पुरेशी काळजी घेतलेली असे) आणि घाबरवायचं आणि त्यांना पोहायला यायला लागल्यावर ‘भोपळ्याला तरंगायला काय खटपट करावी लागते होय?’ असं म्हणून चेष्टा करायची. समोरच्या दगडावर बसून स्नान करायचं, दुपारी जेवल्यावर झाडाखाली जमिनीवरच आडवं व्हायचं. कधी आत व्यवस्थित बैठक घालून उतरत्या डेस्कवर लिहीत बसायचं. गावातल्या व्हरल, रामोशी, धनगर यांना त्यांच्याबद्दल खूप जिव्हाळा! ‘आन्ना लिवत्यात’ असं म्हणून कोणी त्यांची लेखनसमाधी मोडू नये याची ते काळजी घेत. ‘आपला अन्ना’ काहीतरी थोर करतोय, ही त्यांना पक्की जाणीव. प्रत्येकाला वाटे, आपलं हुन्नर ‘अन्ना’ला दाखवावं. काही लोक मस्त कथा-अनुभव सांगत, कोणी क्लॅरोनेटवर गाणं वाजवी, कोणी पारंपरिक वा स्वरचित लावण्या गात, डवरी, मंजिरी वाजविणारा, नाचणारा वासुदेव, गोंधळी आपली कला दाखवीत. असा हा जनलोक आपणहून येई. ‘अन्ना ऐकतूया’ याचंच त्याला मोठं अप्रुप. अण्णापण ही मोठी समृद्धी जाणत होते. त्यांनी उराशी घेतलं की, यांना भरून यायचं. आवडायचं, पण बिचकायचंही, ‘जी, उगाच विटाल व्हईल.’ मग अण्णा शेजारी बसवून घेऊन म्हणत, ‘आरे, कलावंताला जात नसतीय. महा ब्राह्मण असतोय त्यो.’ बामणाचा पत्रा ही मनोमन समाधानानं डवरून जात होता, ही वेगवेगळी श्रीमंत माणसं बघून, त्यांची कला बघून. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’ या कथांचे स्फूर्तीस्थान. ती अक्षरं कागदावर उमटताना बघून ‘बामणाचा पत्रा’ धन्य व्हायचा! ‘गदिमा’ वर्षांतून १५ दिवस वडिलांच्या श्राद्धतिथीनिमित्त यायचेच तेव्हा ‘बामणाचा पत्रा’ आणि परिसर बहरून जायचा.
या घराच्या भिंतीपाठीमागे एक उभा चिरा बसवला होता. घराण्यातल्या पराक्रमी पुरुषाचे स्मारक! त्याला ‘विरगळ’ म्हणतात, पण आज ‘गदिमा’, ‘व्यंकटेश’ यांच्या रूपाने दोन नवे ‘विरगळ’ उभे राहिले आहेत. ते फक्त त्यांच्या घराण्यातल्या लोकांचेच नव्हे तर समस्त मराठी रसिकजनांचे श्रद्धास्थान बनले आहेत.
पंचवटीवर आजवर भरपूर लिहिलं गेलंय. इथे येणार म्हणजे हरतऱ्हेचा कलावंत वा रसिक माणूस त्याला ‘पंचवटी’बद्दल बोलावंसं वाटतंच. खरं तर पंचवटी आता बरंच भोगलेल्या, अनुभवलेल्या परिपक्व गृहिणीसारखी झालीय. आधी पतिहाळांकडे असणारी आणि मग ‘गदिमां’कडे आलेली. सुरुवातीला नवतरुणींकडे असणारी हुरहूर तिला होती. हा नवा मालक कसा असेल? कारण हा बंगला घेताना तो कचवचत होता. एक साधासुधा लेखक एवढे पैसे गोळा करू शकेल का? पण त्याने पैशाची जोडणी केलीच. कारण ‘पंचवटी’च्या प्रेमातच पडला होता ना तो! भोवताली छान भरगच्च झाडी, प्रवेशद्वाराशी प्रशस्त व्हरांडा, देखणे हॉल, भरपूर बेडरूम्स, प्रकाशमान खोल्या, स्वयंपाकघराला लागूनच ऐसपैस जेवणघर, मागल्या बाजूला छानसं तुळशी वृंदावन, वेगळी आणि अनोखी गोष्ट म्हणजे वरच्या मजल्यावर कपाटाच्या मागे दोन-तीन पायऱ्या गुप्तपणे उतरून एक शांत-निवांत ध्यानधारणा करावीशी वाटेल, अशी खोली होती. एकदा काचेच्या कपाटाचं दार लावलं की बाहेरून कळणारही नाही अशी. शिवाय स्वतंत्र गॅरेज आणि नोकराचाकरांसाठी बाहेर चार-पाच खोल्या. वाटलंच तर भाडय़ाने देता येतील अशा. एकात एक गुंफलेली वडाची पाच झाडं पाहून त्या सिद्धहस्त कलावंतानं तिचं ‘श्री पंतनिवास’ हे नाव बदलून १९५३ च्या मे महिन्यात ‘पंचवटी’ हे नवं नाव ठेवलं आणि १९ एप्रिल १९५५ ला ‘गीतरामायण’ या अलौकिक रचनेची सुरुवात झाली हा सुखद योगायोग.
अंगणात मुलाला मूल होऊन खेळणारे गदिमा खिडकीची काच फुटली वा विद्या वहिनींना शिंक जरी आली तरी म्हणत ‘घे, बंगला पाहिजे होता ना तुला? मग लाव काचा आणि काढ शिंका.’ अंगणात लावलेल्या शेंगा-वांगाची भाजी केली वा दारच्या फुलांचे गजरे केले की म्हणत, ‘खा ६० हजार रुपयांची भाजी आणि घ्या वास फुलांचा.’ कारण बंगल्याची किंमत होती ती.
पोरात पोर होणारे, चिडवणारे हे मिस्किल मालक तिला एकदम आवडून गेले. आपल्या मुलांना ते ‘भारत सेना’ म्हणत. अण्णांच्या रागाला घाबरून त्यांच्या भारत सेनेला घराबाहेर जाण्या-येण्यासाठी खूप दारं आहेत आणि त्यांना लपून बसण्यासाठी झाडं आहेत, याचा तिला आनंद होतो. तुळशी वृंदावनाजवळ बैठक घालून तिथेही ते कधी कधी लिहीत. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ या गाण्याच्या जन्माच्या वेणा इथल्याच.
२८ मे १९५८ ला श्रीधर आणि आनंदची मुंज. या शुभ-समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज लेखक, कलाकार या वास्तूने पाहिले. आपल्या भाग्याने ती मनोमन हरखून गेली, पण खरं भाग्य पुढेच होतं. रात्री ‘गीतरामायण’चा कार्यक्रम झाला. खुद्द गीतकार निवेदन म्हणून सामोर- ज्यांनी चाल लावली ते सुधीर फडके गायला आणि हा कार्यक्रम निमंत्रितांपुरताच न राहता आसपासची तमाम जनता या कार्यक्रमाला आलेली तिला दिसते. पुणे-मुंबई रस्त्यावरची बंद पडलेली रहदारी, मनापासून दाद देणारे अशा या मैफिलीचे आपण साक्षीदार आहोत. या भाग्यामुळे डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू वाहू देणारे रसिक तिला आठवतात आणि ती धन्य होते.
कोजागिरीही अशीच खास साजरी व्हायची. पंचवटीच्या अंगणाला उत्सवमूर्तीचं महत्त्व यायचं. निळ्या जाजमावर गाद्या, लोड, तक्के अशी भारतीय बैठक. राजा मंगळवेढेकर, द. मा. मिरासदार, सुधीर फडके, पु. भा. भावे अशी लेखक कलावंत मंडळी त्यांच्या कविता, गप्पा-गोष्टी-किस्से यांनी चढत जाणारी रात्र, केशर-पिस्ते लावलेलं मसाला दूध जोडीला खमंग सुग्रास पदार्थ आणि रातराणीच्या घमघमाटानं सुगंधी झालेली मैफल.
१२ जुलै १९६१ पुणेकर कसा विसरेल? पंचवटीच्याही स्मरणात आहे. ‘पंचवटी’ उंचावर म्हणून १००-१५० माणसं निवाऱ्याला आली. पाणी आणखी वाढू लागलं म्हणून आणखी उंचावर असणाऱ्या शेतकी कॉलेजमध्ये बायका-मुलांना होडक्यातून सोडायचं ठरतं. एकावेळी फक्त ६-७ जण अशा १५-२० खेपा झाल्या आणि हे होडकं ढकलायला होते ‘गदिमा’, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे, हिंदी लेखक हरी नारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ अशी तालेवार मंडळी. हे ‘पंचवटी’नं डोळे भरून अगदी नीटच पाहिलं. सर्वत्र प्रचंड हानी झाली याचं तिला दु:ख झालं. पण काही मंडळींना आपण आसरा देऊ शकलो आणि आपल्या अंगावर एकही ओरखडा आला नाही याचा तिला अभिमान वाटला.
त्यावेळी पंचवटीवर थांबलेल्या बाळ चितळ्यांचं घर तर नदीकाठीच होतं आणि त्यांच्याकडे होती ‘वरदक्षिणा’ चित्रपटाची ‘गदिमां’नी नुकतीच लिहिलेली संहिता. म्हणून पाणी उतरताक्षणीच ते आपल्या घराकडे धावले. घराची अवस्था अगदी वाईट होती. सर्वत्र चिखल, राड. वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या. भिंतींवर दोन फुटांवर पाणी चढल्याच्या खुणा. धडधडत्या हृदयावर हात ठेवून ते आतल्या खोलीत गेले. तर काय नवल? टेबलावरचे स्क्रिप्ट पूर्ण कोरडे होते. पाणी जसजसे भरत गेले तसतसे टेबल वरवर तरंगू लागले आणि पाणी उतरताच ते हळूहळू खाली आले असावे. ही अजब लीलाच म्हणावी लागेल. पण चमत्कार वाटावा असा योगायोग म्हणजे, त्याच चित्रपटातलं खूप गाजलेलं आणि आजही लोकप्रिय असं गीत ‘‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’’ अगदी वरच्या पानावर लिहिलं होतं.
इटालियन संगमरवराची फरशी, वर कौलारू छत, भोवताली भरपूर झाडी, त्यामुळे भर मे महिन्यातही आलेला गारवा! मग फक्त सतरंजी अंथरून हॉलमध्ये जमिनीवरच निवांत वामकुक्षी घेणारे ‘गदिमा’ तिला आठवतात. तिचा अभिमान अधिकच दृढ होतो. केवळ सौंदर्य नाही तर आपल्यात हे असे गुण आहेत याचा. तिच्या रखवालीसाठी माडगूळहून आलेला बापू रामोशी असतो; कुंडलचा नेमिनाथ सदैव बरोबर, आटपाडीचे म. गो. पाठक लेखनिक म्हणून, चित्रपटाशी निगडित कामासाठी म्हणून साथीला असतात. माण नदीच्या काठावरच्या दुष्काळी प्रदेशातले हे मोती आणून ते सगळा माणदेश आपल्यात सामावून घेतात.
वरच्या मजल्यावर भारतीय बैठक तयार केलेली, गादी घालून त्यावर पांढऱ्याशुभ्र चादरी, पाठीमागे लोड-तक्के, बदकाच्या आकाराचा पान-सुपारीचा डबा, सुगंधी फुलांचे गुच्छ, चंदनी उदबत्त्या, पार्कर पेन, मोहरेदार शुभ्र कागद असा सर्व सरंजाम हा असाच ‘बामणाच्या पत्र्या’वर किंवा तुळशी वृंदावनापाशीसुद्धा! किंवा दुसरी बैठक म्हणजे त्यांचा आवडता निळा कोच! व्हरांडय़ातला प्रशस्त, रात्री-अपरात्रीही त्याच्यावर बसून लिहिणारे. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ ही ओळ इथेच सुचली.
या अशा बैठकांवर बसून अनेक चित्रपट-कथा, गीतं, नाटकं, व्यक्तिचित्रं, गीत-रामायण, गीत-गोपाल, लावण्या असे वेगवेगळे प्रकार ‘बोप्या भगवान’, ‘शाहीर अमर’, ‘शाहीर वैश्वानर’ अशा विविध टोपण नावांनी लिहिले.
श्रीधरला ‘शिरगुण राजा’ ‘शिरोबा’ राम गबालेंना ‘राम गैबल’, ‘सिताकान्त लाड’ना लाडय़ा, माडय़ा, पांडय़ा कंपनी (लाड, माडगूळकर, पु. ल. देशपांडे), पु. भा. भावेंना ‘डेंगरू’ ‘बांडुंग अली’ अशा चित्र-विचित्र नावांनी हाकारणारे ‘गदिमा’ तिला आठवतात.
त्यांच्यामुळेच अनेकांचं स्वागत तिने केलंय. ‘मधुसूदन वैराळे’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘स. गो. बर्वे’, ‘वसंतराव नाईक’, ‘पतंगराव कदम’ असे धुरंदर राजकारणी असोत वा द. मा. मिरासदार, बा. भ. बोरकर, शंकर पाटील, पु. भा. भावे असे लेखक वा राजा परांजपे, ग. रा. कामत, राजा ठाकूर, गोविंद घाणेकर असे चित्रपटसृष्टीतले नामवंत असोत. या सर्वानाच तिने आपलं मानलं.
अगदी तरुणपणचे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ऑफिसच्या चढत जाणाऱ्या सुंदर रॅम्पवरून जाताना तिला दिसतात.
गदिमांच्या लेखनामागची अविस्मरणीय किस्सा-कहाणी तिला ठाऊक आहे. त्यांचा टोकाचा संताप आणि तितकाच प्रेमळपणा तिने अनुभवलाय. मुलींच्या थाटाच्या लग्नांच्या आठवणीने ती जशी सुखावते तशी जावयाच्या अपघाती मृत्यूने, अण्णांच्या आजाराने ती कळवळते आणि त्यांची आई आदर्श मातेचा पुरस्कार स्वीकारत असतानाच तिच्या मुलाची-गदिमांची प्राणज्योत मालवावी या दैवाच्या विलक्षण लिलेने
ती हतबुद्ध होते. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या त्यांनीच लिहिलेल्या गीताचा अर्थ आपल्याला अशारीतीने समजावा हेही ती सोसते.
पण तरीही मनोमन एक मोठंच समाधान तिला आहे. निष्कांचन, अनिकेत अवस्थेत उघडय़ा जगात फेकल्या गेलेल्या एका १६-१७ वर्षांच्या मुलाने प्रतिभेच्या जोरावर विलक्षण झेप घेतली, पंचवटीसारख्या वास्तूचा स्वामी झाला, अनेकांचं प्रेम मिळवलं, मैत्र जोपासलं. मानसन्मान मिळविले. एका मोठय़ा कुटुंबाचा ‘कर्ता’ ही भूमिका उत्तम निभावली. एका छताखाली चार पिढय़ा या वास्तूनं पाहिल्या. अनेक सृजनांच्या क्षणांचे उत्सव पाहिले.
मुलांचे व्यवसाय वाढताना, संसार फुलताना पाहिले. म्हणूनच पुढच्या पिढीला (श्रीधर माडगूळकर) ‘लाभलेली वास्तू’ असं पुस्तक पंचवटीवर
लिहावंसं वाटलं. ती कृतज्ञ आहे. तिला कृतार्थ वाटतंय!
(पूर्वार्ध)
meenagurjar1945@gmail.com
संदर्भ- गदिमांच्या सहवासात – म. गो. पाठक, ‘गादिमा’ – वि. र. काळे,
मंतरलेल्या आठवणी – श्रीधर माडगूळकर, वाटेवरल्या सावल्या – ग. दि. माडगूळकर,  आकाशाशी जडले नाते – विद्या माडगूळकर

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक