चाळींच्या वास्तुरचनेचा अविभाज्य घटक असणारी गॅलरी प्रत्येक चाळकऱ्याच्या आठवणीतील एक कप्पा नक्कीच व्यापून राहिली असेल. दिवाळीत प्रत्येक बिऱ्हाडापुढील सुंदर रांगोळीने, पणत्यांनी आणि विविध प्रकारच्या आकाशकंदिलांनी गॅलरी रंगीबेरंगी आणि प्रकाशमय होई.
मध्यंतरी मुंबईच्या चाळींचा इतिहास सांगणारे पुस्तक वाचनात आले. त्यातील चाळींची खासियत दाखवणाऱ्या विविध प्रकारच्या गॅलरींच्या छायाचित्रांनी विशेष लक्ष वेधून घेतले. चाळींच्या वास्तुरचनेचा अविभाज्य घटक असणारी गॅलरी प्रत्येक चाळकऱ्याच्या आठवणीतील एक कप्पा नक्कीच व्यापून राहिली असेल. काही चाळींत बिऱ्हाडाच्या मागील आणि पुढील बाजूस अशा दोन तर काही ठिकाणी एकच बाजूस, पण  सार्वजनिक गॅलरीशिवाय चाळीची वास्तुरचना केवळ अशक्य.
जिन्यापासून शेवटच्या बिऱ्हाडापर्यंत जाणारा लोखंडी, लाकडी किंवा सिमेंटचा कठडा असणारा लांबच लांब रस्ता म्हणजेच गॅलरी नामक प्रकार म्हटले, तर प्रत्येक बिऱ्हाडाची खाजगी अणि म्हटले तर सार्वजनिक जागा. खाजगी अशासाठी की प्रत्येक बिऱ्हाडकरूच्या समोरचा गॅलरीच्या भागाचा वापर त्याचे सामान ठेवण्यासाठी होई. बरेचदा गॅलरी त्यांच्या २ किंवा ३ खोल्यांचे एक्स्टेंशन बनून जाई. म्हणूनच पाण्याचे िपप,चप्पल-बुटांचा स्टँड, एखादी खुर्ची, आरामखुर्ची, अडगळीचे िपप किंवा कुणी हौसेने छोटेसे बाकडेही गॅलरीत बनवून ठेवी. कठडय़ापुढे कुंडय़ा ठेवून फुलझाडांची हौसही केली जाई. शिवाय वर्षभराचे साठवणींचे पदार्थ वाळवण्यासाठी कठडय़ाच्या पुढे बऱ्याच ठिकाणी काढता-लावता येणारी चौकोनी लाकडी फळी(बोर्ड) पावसाळा वगळता लावलेली असे. गुढीपाडव्याला कठडय़ापुढील दिमाखदार गुढीने गॅलरी भरजरी वस्त्रांकित दिसे तर दिवाळीत प्रत्येक बिऱ्हाडापुढील सुंदर रांगोळीने, पण त्यांनी आणि विविध प्रकारच्या आकाशकंदिलांनी गॅलरी रंगीबेरंगी आणि प्रकाशमय होई. दुपारच्या निवांत वेळी निवडण टिपण करता करता महिला वर्गाचे आपसात गप्पाष्टक चाले. इथल्या तिथल्या बातम्यांची देवाण-घेवाण चाले. चाळ आणि खाजगीपण हे विरुद्धार्थी शब्द असल्याने किंवा घरातील अपुऱ्या जागेमुळेही असेल गॅलरीत बाकडय़ावर बसून दाढी करणे, दात घासणे किंवा न्हाव्याकडून हजामत करून घेणे यासाठीसुद्धा गॅलरीचा सर्रास वापर होई. रात्री जेवणानंतर लांबलचक शतपावली घालण्यासाठी गॅलरीइतकी योग्य जागा कुठून मिळणार? तिथली िपपे म्हणजे लपंडाव खेळणाऱ्या लहान मुलांना लपण्याची हक्काची जागा. शिवाय सर्व बिऱ्हाडांची दारे उघडी असल्याने खुशाल कुणाच्याही घरात घुसून दुसऱ्या गॅलरीतून बाहेर पडायला कुणाचा मज्जाव नसे. कित्येक घरातील वृद्धांसाठी तासन् तास गॅलरीत बसून आजूबाजूच्या रस्त्यावरच्या घडामोडी न्याहाळणे किंवा मोठेपणाने येणाऱ्या-जाणाऱ्याची विचारपूस करणे हा त्यांचा विरंगुळा असे. कदाचित गॅलरी त्यांना त्यांचे एकटेपण, थकलेपण विसरायला लावत असावी. चाळीतील तरुण-तरुणींनाही मोठय़ांच्या नकळत नेत्रपल्लवीसाठी गॅलरीचा मोठाच उपयोग होई; ज्याचे पुढे अनेकदा लग्नगाठीत रूपांतर होत असे. आजकाल २ बेड-हॉल-किचनमध्ये कुणी पाहुणे येणार असले की त्यांना झोपायला जागा कुठे असा प्रश्न पडतो. पण एकेकाळी या २-३ खोल्यांच्या बिऱ्हाडात कितीही पाहुणे मंडळी, गावाकडचे विद्यार्थी शिकायला नोकरीला आले तरी कित्येकांची झोपण्याची सोय स्वत:च्या आणि इतरांच्याही गॅलरीत अंथरूणे घालून केली जाई. त्यात न यजमानाला कमीपणा वाटे न पाहुण्यांचा अपमान होई. यात गमतीचा भाग म्हणजे आजकाल जसे घराबाहेरच्या जिन्याच्या जागेचे, पॅसेजचे, पाìकगचे पसे बिल्डर मोजून घेतात तसे चाळमालक गॅलरीच्या या मनसोक्त वापरासाठी बिऱ्हाडकरूंकडून एक पचेही भाडे घेत नसे.

ब्लॉकसंस्कृती रुजण्यास सुरुवात झाली आणि गॅलरीची जागा अर्थातच बाल्कनीने घेतली. तीन किंवा चार खोल्यांच्या शक्यतर बठकीच्या खोलीपुढची १० बाय ६ किंवा तत्सम एरियाची छोटय़ा कठडय़ाची मोकळी जागा म्हणजे बाल्कनी! जिथून शेजाऱ्यांना हसून हात दाखवता येतो, पण त्यांचा हात हातात घेता येत नाही अशी खरीखुरी खाजगीपण जपणारी जागा!

कालांतराने ब्लॉकसंस्कृती रुजण्यास सुरुवात झाली आणि गॅलरीची जागा अर्थातच बाल्कनीने घेतली. तीन किंवा चार खोल्यांच्या शक्यतर बठकीच्या खोलीपुढची १० बाय ६ किंवा तत्सम एरियाची छोटय़ा कठडय़ाची मोकळी जागा म्हणजे बाल्कनी जिथून शेजाऱ्यांना हसून हात दाखवता येतो, पण त्यांचा हात हातात घेता येत नाही अशी खरीखुरी खाजगीपण जपणारी जागा! असो. सुरुवातीला बाल्कनी फुलझाडांनी सजली. एखाद्या झोपाळ्याने, आरामखुर्चीने तिथे विरंगुळा मिळू लागला. पण हळूहळू जागेअभावी बाल्कनीसुद्धा ब्लॉकचे एक्स्टेंशन बनत चालली. आधी छोटेसे कपाट, मग टेबल-खुर्ची, जागा असल्यास छोटासा दीवाणही तिथे विराजमान झाला. मुलांची अभ्यासाची खोली बनलेल्या त्या बाल्कनीला सुरक्षेच्या कारणास्तव काचेच्या सरकत्या खिडक्या बसल्या आणि भरपूर उजेडाला आणि वाऱ्याला परवानगीशिवाय एन्ट्री मिळेनाशी झाली. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे घराच्या कडेकोट बंदोबस्तासाठी बाहेरून बसवलेल्या लोखंडी बॉक्स ग्रिलमुळे प्रत्येक बाहेरून एक तुरुंग भासू लागली. अभ्यासाची खोली तरी एकवेळ ठीक, परंतु अगदीच तुटपुंजा एरिआ असलेल्या १ रूम किचनचे रूपांतर २ रूम किचनमध्ये करताना बाल्कनीचे रूपांतर स्वयंपाकघरात झाले. त्याहीपुढे बिल्डर जमातीने शक्कल लढवली आणि एकेकाळी आवश्यक असणारी बाल्कनीची संकल्पना त्यांनी रद्दच केली. बाल्कनीचा एरिआ बठकीच्या खोलीत सामावून मोठय़ा हॉलचा आभास निर्माण केला आणि त्यालाच मोठमोठय़ा सरकत्या खिडक्या लावून ऐसपस लूक द्यायचा प्रयत्न केला.
आताशा नव्या गृहसंकुलात मोठमोठय़ा टॉवर्समध्ये बाल्कनीची जागा बरेचदा ओपन टेरेसनी घेतली आहे. हे मोकळे टेरेस खूप ऐसपस, छान हवेशीर, पण काहीसे एकांडे माणसांपासून अलिप्त वाटतात. मुळातच भरपूर एरिआ असणाऱ्या या फ्लॅटचे हे टेरेस कधी एक्स्टेंशन बनणार नाहीत याची खात्री वाटतेय. कारण आजकाल निदान मध्यमवर्गीयांत तरी घरातील माणसांचे आणि खोल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त होताना दिसतेय.
प्रख्यात लेखिका अमृता प्रीतम यांच्या ‘चौथा कमरा’ या कथेतील संकल्पनेनुसार ४ िभतींच्या बंदिस्त घराला जोडूनच असलेल्या गॅलरीने, बाल्कनीने किंवा टेरेसने प्रत्येकाला जीवनातील कुठल्या न कुठल्या हळव्या क्षणी स्वत:ची अशी स्पेस देऊन आधार दिला असेल, हे मान्य करावे लागेल.