मंदार जाधव

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या लोकप्रिय कौटुंबिक मालिकेमधील गौरी आणि  जयदीप यांनी शब्दबद्ध केलेलं ‘नंदनवन’ हे घर..

‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेचा अर्थात ‘नंदनवन’ या वाडय़ाचा भव्यदिव्य सेट पाहून सुरुवातीला माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. हिंदी मालिकांच्या तोडीस तोड असा हा आमचा हा सेट अर्थात या वाडय़ाची सजावट करण्यात आली आहे. मालिकेच्या प्रत्येक भागात या घरातली भव्यता दिसून येते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेचं कथानक कोल्हापूरमध्ये घडतं, त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमी आवश्यक होती. कोल्हापूरचा हा श्रीमंत वाडा मुंबईतल्या चित्रनगरीत उभारण्यात आला आहे, हे कोणाला खरं वाटणार नाही. अर्थात याचं सर्व श्रेय आमचे कला दिग्दर्शक अजित दांडेकर यांचं!

सेटवर येताक्षणीच तुम्हाला खरंच कोल्हापुरात असल्यासारखं वाटतं.  इथली साधी मराठमोळी ग्रामीण धाटणीची सजावट एक आपलेपणा निर्माण करते.

या सेटवरच्या घरातील माझ्या आवडत्या जागा खूप आहेत; पण आमच्या सेटवरचं देवघर- जिथे अंबाबाईची सुंदर मूर्ती विराजमान आहे- ही माझी विशेष आवडती जागा. या देवघराचं वैशिष्टय़ म्हणजे या जागेत खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. अंबाबाईची मूर्ती इतकी सुंदर आहे की, तिच्या दर्शनानेच मन प्रसन्न होतं.

‘नंदनवन’मधली  दुसरी आवडती जागा म्हणजे माझी अर्थात जयदीपची खोली. मी या जागेत इतका रुळलो आहे की, ती मला माझी हक्काची जागा वाटते. ही खोली माझ्या छायाचित्रांनी सजवण्यात आली आहे. या खोलीला लागूनच एक छोटी बाल्कनी आहे. या खोलीच्या विशिष्ट सजावटींमुळे ती मला जास्त भावते. घराशेजारची बाग आणि हिरवळ पाहून खूप ताजंतवानं वाटतं. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनात असा विसावा मिळणं, हे मी माझं भाग्य समजतो.

आमच्या या घराला सुंदर ‘कोल्हापुरी टच’ आहे. विशेष सांगायचं तर आमच्या खोल्या खूप विचारपूर्वक डिझाईन करण्यात आल्या आहेत. माझ्या खोलीला आधुनिक लुक देण्यात आला आहे. मी परदेशी शिकून आलो आहे  हे लक्षात घेऊन ही खोली डिझाईन केली आहे.

आमच्या मालिकेतलं ‘नंदनवन’ आणि माझ्या स्वप्नातलं घर यात खूप साधर्म्य आहे. आपण जेव्हा आपल्या घराचा विचार करतो तेव्हा ते ऐसपैस असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आमचं ‘नंदनवन’ हे असंच आहे. अगदी स्वप्नातलं- हवंहवंसं वाटणारं.. त्यामुळे माझं घरही अगदी या घरासारखं असावं असं मला वाटतं.

दिवसातले अनेक तास आम्ही या घरात वावरत असतो. माझ्यासाठी हे माझं दुसरं घरच झालं आहे. सेटवरच्या वातावरणात मी इतका रुळलो आहे की, शूटिंगनिमित्त सेटवर असल्याची भावनाच येत नाही. माझे सर्वच सहकलाकार मला माझ्या घरच्या कुटुंबाप्रमाणेच आहेत. खरं तर ही घराची अर्थात या वास्तूची जादू म्हणायला हवी. आम्ही इथे येताच विसरून जातो की, आम्ही एकमेकांचे सहकलाकार आहोत. कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणेच आम्ही इथे गुण्यागोविंद्याने नांदतो. मी घरी असताना मालिकेतल्या ‘नंदनवन’ला खूप मिस करतो.