21 March 2019

News Flash

भूमिगत टाक्या व गटारे यांसाठी मार्गदर्शक सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिगत मलनि:सारण वाहिन्यांना जोडून वाहून नेण्यात येते.

घर, इमारत अथवा गृहसंकुल म्हटले की, पाणी साठविण्यासाठी भूमिगत व बंदिस्त पाण्याची टाकी तसेच घर / इमारतींच्या गच्चीत पाणी साठविण्यासाठी बंदिस्त टाकी त्याचबरोबर सेप्टिक टँक आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत व बंदिस्त गटारांची सोय करणे अनिवार्य आहे. सेप्टिक टँक भरून वाहू लागल्यावर वाहणारे अतिरिक्त पाणी तसेच वैयक्तिक घर, इमारत व गृहसंकुलातील सांडपाणी भूमिगत व बंदिस्त गटाराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिगत मलनि:सारण वाहिन्यांना जोडून वाहून नेण्यात येते. जसजशी एकाद्या शहराची लोकसंख्या वाढत जाते, त्या प्रमाणात भूमिगत व बंदिस्त पाण्याच्या टाक्या, सेप्टिक टँक्स आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांचे आकारमान वाढत जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात मोठय़ा शहरातील भूमिगत मलनि:सारण वाहिन्यांचे आकारमान खूपच मोठे असते. बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तींमुळे किंवा मानवनिर्मित कारणांमुळे अशी भूमिगत गटारे तुंबतात व त्यामुळे सर्वत्र घाण पाणी पसरून दुर्गंधीचे साम्राज्य पसरते आणि नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. भूमिगत गटारांची साफसफाई करताना चेंबरचे / गटाराचे झाकण (मॅन होल कव्हर) उघडून गटारात उतरून आवश्यक ती साफसफाई करणे गरजेचे असते. येथेदेखील पारंपरिक पद्धतीचा अवलंब अजूनही सुरू आहे. या पद्धतीत गटाराच्या मॅन होलचे कव्हर / चेंबरचे कव्हर उघडून मजुराच्या कंबरेला दोरखंड बांधून भूमिगत गटारात उतरविण्यात येते. गटारात उतरण्यासाठी तसेच संकटप्रसंगी त्वरित वर येण्यासाठी घडीच्या शिडीची सोय नसते. गटारात प्रकाशाची देखील सोय नसते.

गटारात काम करताना आणीबाणीच्या अथवा आपत्कालीन परिस्थितीत गटाराबाहेरील सहकारी वर्गाशी संपर्क करण्यासाठी वॉकी-टॉकीसारख्या अत्याधुनिक सुविधांची उपलब्धतता नसते. गटारात निर्माण झालेल्या विषारी वायू अथवा ज्वालाग्राही वायू यापासून होणारा धोका टाळण्यासाठी आणि श्वसनव्यवस्था व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी प्राणवायूची नळकांडी अथवा कृत्रिम श्वसनव्यवस्था उपलब्ध नसते.

अशा परिस्थितीत भूमिगत गटारात उतरून काही तास सतत साफसफाईचे काम करताना उपरोक्त गैरसोयीमुळे व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे आत्तापर्यंत हजारो साफसफाई मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भूमिगत गटारात अथवा बंदिस्त जागेत काम करताना अपघात झाल्यास अथवा योग्य ते उपचार न झाल्यामुळे मृत्यू ओढवल्यास नुकसानभरपाईपोटी मिळणारी कायदेशीर रक्कम संबंधित कंत्राटदार देत नसल्याची माहिती पुढे येत आहे. जगातील प्रगत देशात अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या मदतीने बंदिस्त जागा आणि भूमिगत गटारे साफसफाई करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात येत असून, लवकरच यंत्र-मानवाच्या (रोबोच्या) मदतीने साफसफाई करण्याचे दिवस फार दूर नसताना आपण मात्र अजूनही पारंपरिक पद्धतीचा वापर करतो, हे नक्कीच भूषणावह नाही.

(ब) त्याचप्रमाणे भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची वर्षांतून किमान तीन ते चार वेळा साफसफाई करणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. येथेदेखील पारंपरिक पद्धतीचा अवलंब अजूनही सुरू आहे. या पद्धतीत भूमिगत पाण्याच्या टाकीचे झाकण उघडून दोरखंडाच्या साहाय्याने सफाई कामगारास टाकीत उतरवून साफसफाई केली जाते. टाकीतील गाळ / घाण काढताना, आतील दुर्गंधीमुळे अस्वस्थ वाटल्यास अथवा आतील शेवाळ्यामुळे पाय घसरून पडल्यास किंवा चक्कर येऊन पडल्यास अपघात / जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. तीच गोष्ट गच्चीतील पाण्याची टाकी साफसफाई करताना लागू पाडते.

(क) सेप्टिक टँकची नियमित साफसफाई आणि योग्य ती काळजी न घेतल्यामुळे टाकीतील विषारी वायूचा स्फोट होऊन आत्तापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत अनुराधा इंडस्ट्रियल एस्टेट, काशिमीरा, घोडबंदर, ठाणे, येथे मलनि:सारण कुंड साफ करताना तीन व्यक्ती मृत झाल्याबाबत राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरप्रकरणी आयोगाच्या निर्देशानुसार अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत म्हणून बंदिस्त जागा उदाहरणार्थ सेप्टिक टँक्स, भूमिगत गटारे, इत्यादीमध्ये काम करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सदर सूचनांचे संनियंत्रण करण्यास्तव शासनाच्या नगर विकास विभागाने क्रमांक — स्वमअ / प्र. क्र.१०८/ नवि-३४  — दिनांक ५ मार्च २०१८ रोजी खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

 • बंदिस्त जागांचे साफसफाई प्राधान्याने यांत्रिक पद्धतीने अथवा मशीनद्वारे करण्यात यावी आणि केवळ अपरिहार्य परिस्थितीतच मानवामार्फत साफसफाई करण्यात यावी.
 • बंदिस्त जागांची मानवामार्फत साफसफाई करण्यापूर्वी बंदिस्त जागेची खोली, रुंदी व तेथील घटक, इत्यादींची मोजणी करण्यात यावी आणि जीविताच्या सुरक्षिततेची सुयोग्य खबरदारी घेण्यात यावी.
 • बंदिस्त जागांमध्ये काम करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यात यावे आणि असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबाबत संबंधित कामगारास प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच अशा प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या कामगारांनाच बंदिस्त जागांमध्ये काम करण्यास परवानगी देण्यात यावी.
 • बंदिस्त जागेमधील हवा विषारी आणि ज्वालाग्राही वायू, धूळ यांपासून मुक्त असल्याबाबत तसेच त्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त हवेची कमतरता नसल्याबाबत तपासणी करणे अत्यावश्यक आहे. सदर तपासणी सुयोग्य गॅस डिटेक्टर वापरून सक्षम व्यक्तीने करून त्याबाबतचे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
 • योग्य व ताज्या हवेच्या पुरेशा पुरवठय़ाची खातरजमा करण्यासाठी यांत्रिक वायुविजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. बंदिस्त जागेत थेट ऑक्सिजन वायूचा वापर केल्याने आग किंवा स्फोटाचा धोका वाढत असल्याने, त्या ठिकाणी थेट ऑक्सिजन वायूचा वापर करू नये.
 • बंदिस्त जागांमध्ये कामगारांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यापूर्वी अथवा त्या ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षिततेबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आल्याबाबतचा सुरक्षितता परवाना साइट मॅनेजरने देणे आवश्यक राहील.
 • बंदिस्त जागेच्या बाहेरील बाजूस उपस्थित राहण्यासाठी प्रशिक्षित कामगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बंदिस्त जागेत प्रवेश केलेले सर्व कामगार बाहेर येईपर्यंत अथवा त्याच्या जागी अन्य प्रशिक्षित कामगार येईपर्यंत बाहेरील उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षित कामगारास कोणत्याही परिस्थितीत त्याची जागा सोडण्यास परवानगी देऊ नये.
 • बंदिस्त जागेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक कामगाराने संपूर्ण शरीरभर वेश आणि सुरक्षित चष्मा परिधान करावा, तसेच सुयोग्य श्वासोच्छ्वास उपकरण सोबत असणे व आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास कामगारास ओढून बाहेर काढता येईल अशा पुरेशा मजबूत दोरखंडास सुरक्षितपणे जोडलेला पट्टा असणे आवश्यक आहे.
 • बंदिस्त जागेत काम करणाऱ्या कामगारास अस्वस्थ वाटल्यास तो अर्ध्यातून बाहेर येऊ शकेल.
 • बचावकार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी ठरावीक कालांतराने मॉक ड्रिल्स आयोजित करण्यात यावेत आणि संबंधित कामगारांना बचावकार्याच्या कार्यपद्धतीचे ज्ञान असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
 • बंदिस्त जागेतील पदार्थातून होणारे संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी कामगारांचे आवश्यक लसीकरण करण्यात यावे.
 • सक्षम व्यक्ती (बंदिस्त जागेची तपासणी करून प्रमाणपत्र देणारी) आणि प्रशिक्षण संस्थांची (कामगारांना प्रशिक्षण देणाऱ्या) नोंदणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात यावी.
 • कामगार नुकसानभरपाई अधिनियम, १९२३ मधील तरतुदीनुसार मृत अथवा जखमी कामगारास देय असणारी नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार व प्रमुख नियोक्त्याची असल्याबाबत तरतूद करण्यात यावी. बंदिस्त जागा उदाहरणार्थ सेप्टिक टँक, भूमिगत गटारे, इत्यादीमध्ये काम करताना उपरोक्त नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त संभाव्य दुर्दैवी घटना टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात.

– विश्वासराव सकपाळ

vish26rao@yahoo.co.in

First Published on March 31, 2018 12:45 am

Web Title: guidelines for underground tanks and drainage