28 November 2020

News Flash

नकोत नुसत्या भिंती – आरोग्यदायी घर

आपलं जगणं अधिक सुखकारक आणि निसर्गस्नेही करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारं सदर

| January 10, 2015 01:03 am

आपलं जगणं अधिक सुखकारक आणि निसर्गस्नेही करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारं सदर
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती
ज्येष्ठ कवयित्री विमल लिमये यांची ही कविता अतिशय हृद्य तर आहेच, त्याशिवाय अनेक दृष्टींनी अर्थपूर्णदेखील आहे. घर म्हणजे निवारा, घर म्हणजे हक्काची जागा, घर म्हणजे आपल्या माणसांच्या प्रेमाने ओथंबणारी वास्तू! घर घेणे किती अवघड आहे हे सर्वसामान्य माणसाला चांगलेच माहीत असते. ‘घर पाहावे बांधून’ या म्हणीत घर घेताना येणाऱ्या अनेक अडचणींचे शब्दातीत वर्णन केले आहे
काही दशकांपूर्वी घर घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. आयुष्यभर वणवण करून वृद्धापकाळी निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या पुंजीत ‘आपले घर’ हे स्वप्न साकार होईपर्यंत उमेदीची सारी वर्षे हातची निघून गेल्यामुळे त्या घराचा निर्भेळ आनंद मिळणेदेखील शक्य होईल याची खात्री नसायची; पण आता परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे व स्वत:चे घर घेता येणे आता समाजातील एका मोठय़ा वर्गाला शक्य झाले आहे. त्यामुळेच गृहनिर्माण या व्यवसायाला सध्या तरी खूपच तेजी आहे. शहरे अस्ताव्यस्त वाढत चाललीत, तर छोटय़ा छोटय़ा गावांनीदेखील सीमोल्लंघन करीत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली, कारण लोकसंख्येचा होत असलेला स्फोट!
हे होत असताना बांधकामाचे साधे साधे नियमदेखील पाळले जात नाहीत. आपल्या देशात इमारती कोसळण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत बरेच जास्त आहे. कायदे असले तरी ते पाळले जातीलच याची खात्री नसते, कारण कायदा मोडणाऱ्यांच्या हातीच सत्तेच्या चाव्यादेखील बऱ्याच वेळी असतात. बांधकाम व्यावसायिक सचोटीने आपले कार्य करतीलच ही खात्री वाटत नाही. त्याचे एक महत्त्वाचे कारण सदनिकाधारक संघटित नाहीत हे आहे. शिवाय घर घेताना आपल्याला नेमके काय काय करावे लागते याची जुजबी म्हणावी एवढीदेखील माहिती बहुतेकांना नसते. वास्तविक शासनाने आता अनेक माध्यमांतून घर घेताना कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची विस्तृत माहिती करून दिली आहे; पण या मालिकेचा हेतू कायदा सांगण्याचा नाही.
घर घेतल्यानंतर आपण ते चांगले कसे ठेवू शकतो, निसर्गाशी समतोल साधत कमीत कमी ऊर्जेत घरातील सर्व व्यवहार आपण कसे करू शकतो व घरातील संपूर्ण जागेचा योग्य उपयोग कसा करू शकतो याविषयी आपल्याला माहिती घ्यावयाची आहे. घरात आपल्याला आवश्यक काय आहे व त्याची सुबक आणि सुंदर मांडणी कशी करता येईल याची माहितीदेखील आपण या मालिकेतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऊर्जेची बचत कशी करता येईल, वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद कसा घेता येईल, घराचे आरोग्य व परिसराचे आरोग्य चांगले कसे राखता येईल, घरातील उपद्रवी कीटकांवर मात कशी करता येईल याही बाबी आपण सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. घरातील वातावरण नेहमीच आल्हाददायक कसे राहील, विशेषत: पावसाळ्यात ठेवणीतल्या वस्तूंची, कपडय़ांची आणि लाकडी सामानाची काळजी कशी घ्यावी याचे सोपे व सहज करता येण्यासारख्या उपायांचीदेखील चर्चा आपल्याला करावयाची आहे. जमल्यास आपण घरातल्या घरात बाग कशी फुलवू शकतो व यासाठी आपल्याला काय करावे लागेल याचीदेखील आवश्यक तेवढी माहिती मिळविणार आहोत. घरातील काही उपकरणांचा पूर्ण क्षमतेने कसा वापर करता येईल हेदेखील आपल्याला शिकावयाचे आहे. घरातील साठविण्यात आलेल्या अन्नपदार्थाची नासधूस कशी टाळता येईल व त्या साठवणीचा आपल्याला खरोखरच फायदा होईल या दृष्टीने काय केले पाहिजे तेही आपण या मालिकेतून अभ्यासणार आहोत. आपले घर छोटे आहे, असा न्यूनगंड मनामध्ये न ठेवता आमचे छोटेखानी घर म्हणजे आम्हाला राजमहालासारखेच आहे व आम्ही ते तसे ठेवणार आहोत या जिद्दीने आपल्याला पुढे जावयाचे आहे हे सतत मनात ठेवून तसे अखंड प्रयत्न आपण करीत राहिलो, तर त्यात अवघड असे काही नाही हे आपल्याला जाणवू लागेल व त्यामुळे आपली उमेददेखील वाढेल.
घरात पुरेसा उजेड असला पाहिजे आणि वारा खेळता राहिला पाहिजे याबाबतीत पूर्वी फारशी तडजोड केली जात नसे. उंच इमारतींचा जमाना सुरू होण्यापूर्वी घरे बैठी, पण उंच छतांची असायची. ऐतिहासिक इमारती किंवा ब्रिटिशकालीन इमारती पाहिल्या, की आपल्या लक्षात येते की, त्यांची छते किती उंच असायची ते. अशा उंच छतांच्या खोल्यांमध्ये वरच्या बाजूला असलेल्या झरोक्यांमुळे हवा तर खेळती राहायचीच; पण त्याचबरोबर त्यात राहणाऱ्या माणसांना भरपूर प्रमाणात ती मिळतही राहत असे. हवेचे प्रमाण जेवढे अधिक तेवढे त्यातील ऑक्सिजनचे प्रमाणदेखील अधिक असल्यामुळे या खोल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच चांगल्या होत्या; पण आजकालच्या सुपर बिल्ट अपच्या जमान्यात अशा उंच छतांच्या खोल्या हद्दपार झाल्या आहेत. खोलीच्या भिंतींची उंची १० फुटांच्या वर नसतेच. त्यामुळे पंख्याला सहजपणे हात लागू शकतो व फिरत्या पंख्याचा धोका वाढतो! कमी उंचीच्या खोलीत अधिक माणसे झोपणार असली, तर त्याचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ  शकतो. अशा खोल्यांमधील हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण रात्रीच्या वेळी दारे-खिडक्या बंद असल्यामुळे घटते व त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागतात. कमी ऑक्सिजन मिळाला तर चिडचिड वाढते व झोपही नीट लागत नाही.
१२’  १०’  १०’ ची खोली असेल तर तिचे आकारमान १२०० घनफूट एवढे असते. म्हणजे ही खोली जर रिकामी असेल, तर त्यात ३२४०० लिटर हवा मावेल. अशा बंद खोलीत जर ४ माणसे झोपणार असतील, तर ते आरोग्याला मानवणारे नसते हे लक्षात ठेवायचे आहे, कारण या चार लोकांना या आकारमानाच्या दुप्पट हवा रात्रभरात लागणार असते. जर हवा खेळती नसेल तर या माणसांच्या श्वासोच्छ्वासामुळे बंद खोलीत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते व ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. शिवाय जर डासांचा त्रास वाचविण्यासाठी तुम्ही या खोलीत बाजारात मिळणाऱ्या डासनिवारक उदबत्त्या वापरत असलात, तर ते आणखी अपायकारक होऊ  शकते.
अशा खोलीत पंखा फिरत असला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही, कारण पंखा आहे तीच हवा फिरवीत राहतो. समोरासमोर दोन मोठय़ा उघडय़ा खिडक्या असतील, तरच हवा खेळती राहील आणि मग पंख्याचा उपयोग उकाडा कमी करण्यासाठी व वायुविजन वाढविण्यासाठी होऊ  शकेल; परंतु उघडय़ा खिडक्या सुरक्षित असायला हव्यात व त्यांना चांगले पडदेदेखील हवेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये उघडय़ा खिडक्यांची चैन अनेक कारणांमुळे परवडण्यासारखी नसते! उंदीर, घुशी, मांजरे व काही ठिकाणी माकडे एवढा उच्छाद मांडतात की, लोक म्हणतात, कमी ऑक्सिजन परवडला, पण हा त्रास नको! झोपण्याच्या खोलीत कमीत कमी सामान असणेदेखील महत्त्वाचे असते, कारण सामानामुळे खोलीचे हवेसाठी उपलब्ध असलेले आकारमान कमी होते. यावरून आपल्या असे लक्षात येईल, की अनेक साध्या साध्या गोष्टी माहीत नसल्यामुळे किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घरातील कुटुंबीयांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. हा वास्तुदोष नसून आमचे अज्ञान त्यासाठी कारणीभूत असते.                
शरद काळे -sharadkale@gmail.com
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग,
भाभा अणुशक्ती केंद्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:03 am

Web Title: healthy atmosphere home
Next Stories
1 वास्तुमार्गदर्शन
2 वास्तु प्रतिसाद : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती हवी
3 सदनिकेची मोजणी
Just Now!
X