मस्त प्रसन्न सकाळी व्यायाम करून आल्यावर दोघांनाही ऑफिसला जायची लगबग सुरू झाली. ती किचनमध्ये नाश्त्याच्या तयारीला लागली. खरं तर फारच झटपट होतील असे पदार्थ ती बनवत होती, पण आज तिची फारच चिडचिड झाली. नीट डबे सापडत नव्हते, अचानक टिशू पेपरचा रोल संपला, नवीन सापडला नाही. गडबडीत; त्यापेक्षाही चिडचिड करत सगळा नाश्ता तिने बनवला. ती विचार करत होती की, आताच नवीन किचन करून घेतलंय, आपल्याला पाहिजे तशा जागा आणि रंगकाम करून घेतलंय, तरीपण गोंधळ होतोच आहे. या सगळ्यामध्ये प्रसन्न मनाचे परिवर्तन त्राग्यात झाले. पर्यायानं नाश्त्याच्या चवीत फरक पडला आणि एका प्रसन्न दिवसाची सरुवात चुकीची झाली.

संध्याकाळी प्रचंड ट्रॅफिकमधून गाडी चालवत तो घरी आला, पार्किंगमध्ये शिरता शिरता मनात विचार आला की आता मस्त मूड लाइट लावू आणि सोफ्यावर लोळून टीव्ही बघू. घरात आल्यावर मूड लाइट लावले, सोफ्यावर आडवा झाला, पण घर कंटाळवाणंच वाटत होतं. मग मनात विचार आला, की  घर अगदी नीटनेटकं आहे, आताच सगळं इंटिरिअर करून घेतलं आहे. दोन वर्षांपूर्वी सगळं पाहिजे तसं बनवून दिलं आहे, तरीपण इतकं उदास का वाटतंय आजकाल घरात..

दोन्ही प्रसंग अगदी ओळखीचे वाटतात, आपलेसे वाटतात. असं का होतं, याचा विचार मात्र आपण करत नाही. छोटीशी गोष्ट आपला दिवस बिघडवतो, चिडचिड होते. अशाच छोटय़ा गोष्टी आपलंमानसिक स्वास्थ्य बिघडवतात. त्याचाच परिणाम नकळत आपल्या शरीरावरही होत असतो.

असं का होतं? दोन्ही प्रसंगांत घर अतिशय छान, त्यांच्या आवडीनिवडीनुसार सजवलं आहे, तरीपण असं का होतं? आपण आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी फारच धडपडत असतो, पण लक्षात येतच नाही की जिथे आपण आपला वेळ आरामासाठी घालवतो, जिथे आपले अन्न तयार होते.. जिथे आपण आपलेच असतो ते घर आपण निरोगी आणि आनंदी ठेवतोय का?

आता घर निरोगी आणि आनंदी ठेवायचं म्हणजे काय करायचं, हापण प्रश्न असतो. घरात छान फर्निचर असणं, आणि ते नीटनेटकं ठेवणं म्हणजे ते निरोगी आणि आनंदी झालं का? तर नाही. आपण जशी आपली काळजी घेतो तशीच घराचीही काळजी घ्यायला लागते. बऱ्याच घरांत फर्निचर साफ करायला बाई असते. त्या फक्त साफसफाई करतात म्हणजे घर स्वच्छ ठेवतात, पण घरात त्या फ्रेशनेस आणू शकत नाहीत. घरात फ्रेशनेस, सकारात्मक ऊर्जा आणायची असेल तर आपले मनही प्रसन्न असावं लागतं. आपण प्रसन्न असलो की आपोआपच सगळंच व्यवस्थित होत जातं. घरात सुंदर फर्निचर असलं तरी किंवा संपूर्णपणे इंटिरिअर केलेलं घर असलं तरी त्याचा टवटवीतपणा कायम ठेवावा लागतो. घराच्या टवटवीत असण्याचा थेट परिणाम हा आपल्या शरीराबरोबरच मनावरही होत असतो. ऐकून वेगळं आणि विचित्र वाटेल, पण तसंच आहे. जसं की, पूर्वी आपल्या घरात आई, बाबा आणि मुले यांना एकच कपाट असायचं आणि ते तिघांना पुरायचेही.. नंतर मुलांचे एक आणि पालकांचे एक कपाट.. असे चित्र झाले. आता तर सहा महिन्यांच्या बाळालाही वेगळं कपाट असतं. वेगळं कपाट असूनही पुरत नाही म्हणून आपण कुरकुरतो आणि फक्त कंटाळा आला म्हणून बरेच कपडे बोहारणीला देऊन टाकतो. जसा काळ बदलला तसा आपल्या गरजाही आपण बदलवल्या. यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याच त्याच कपडय़ांचा कंटाळा येणं.. जसा कपडय़ांचा आपल्याला कंटाळा येतो ना, तसाच एकसारख्या दिसणाऱ्या घराचाही आपल्याला कंटाळा येतो. फक्त त्यावर केलेला खर्च फार मोठा असतो म्हणून आपण वस्तू टाकून देऊ शकत नाही. आणि घरातील एकसुरीपणा आपली चिडचिड, कंटाळा वाढवतो. पण यातूनसुद्धा आपण काही नवीन करू शकतो. अगदी सोपे आणि स्वस्त- जेणेकरून आपले घर प्रसन्न आणि टवटवीत राहील.

ताणतणाव, त्यामुळे होणारी चिडचिड आणि मग तयार होते नकारात्मक वातावरण. पण हे सगळे कमी करणे, घरात कायम प्रसन्नता राखणे हे सहज शक्य आहे. थोडी मेहनत घ्यायला लागेल, पण आपलं घर जर का निरोगी अणि आनंदी ठेवलं तर आपणही निरोगी अणि आनंदी राहू.

अगदी थोडय़ा, पण आवश्यक अशा बदलांनी घर हे सुंदर अणि नीटनेटके होते.

  • वस्तूंचे आणि जागेचे नियोजन

अतिशय सुंदर इंटिरिअर केलेल्या घरातही फार पसरा असतो, वस्तू जागेवर आणि वेळच्या वेळी सापडतच नाहीत. तर कधी भरपूर कपाटं असूनही वस्तूंना जागा नसते. असं का होतं? कारण आपण बऱ्याचदा खूप वस्तू जमा करून ठेवतो. नेहमी लागणाऱ्या वस्तूंबरोबरच कधीतरी लागतील म्हणूनही फार गोष्टी जमा केलेल्या असतात. प्रथम नेहमी लागणाऱ्या वस्तू त्या किती वेळा आपल्याला लागतात यानुसार त्यांची यादी करा आणि मग त्यांची जागा ठरवा. ही यादी करतानाच लक्षात येईल, की कधीतरी लागतील म्हणून आपण कितीतरी अशा वस्तू जमा केल्या आहेत- ज्या मागचे २-३ वर्षे आपण वापरलेल्याही नाहीत. अशा वस्तू ताबडतोब बाद करा. म्हणजे नेहमी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना जागा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कोणती वस्तू कोण वापरणार त्यानुसार त्याची जागा ठरवणं आणि त्या व्यक्तीच्या हाताला लागतील अशाच उंचीवर ठेवणे. नाहीतर पुन्हा फक्त दुसऱ्याचं काम वाढणार अणि पर्यायनं चिडचिडही! तसेच घरात सतत स्वच्छता राखणंही गरजेचं आहे.

  • रंगांचा योग्य वापर करा- आपल्याला आवडतो म्हणून किंवा घर लहान आहे, ते मोठं दिसावं म्हणून जर का सफेद रंग सगळ्या घराला लावला असेल तर घर फारच एकसुरी होतं. मग तेच घर थोडय़ा दिवसांनी कंटाळवाणं वाटायला लागतं. हा एकसुरीपणा कमी करण्यासाठी मस्त ब्राइट रंगांनी घर रंगवले की घर प्रसन्न दिसतं. आपण घरातील एखादी भिंत, पिलो कव्हर्स, पडदे, फ्लॉवरपॉट असे काही रंगीत वस्तूंचा वापर करून घरात चैतन्य आणता येते.
  • हवा आणि उजेड- उजेडामुळे घर प्रसन्न वाटतं आणि राहतंसुद्धा! भरपूर प्रकाश हा आरोग्याला जितका आवश्यक तितकाच घरालाही! खेळती हवा, त्यामुळे उडणारे पडदे अणि त्यामधून येणारा उजेड यामुळे एक वेगळीच ऊर्जा तयार होते. या प्रसन्नतेमुळे आपल्या मनावरील ताणही कमी होतो.
  • सतत बदल- एकसारखी एकच गोष्ट बघून कंटाळा येतो, हा मनुष्यस्वभाव आहे. त्यानुसार घरातील फर्निचरची एकसारखी रचनाही कंटाळवाणी होते. म्हणून सहज सरकवता येईल असं हलकं फर्निचर बनवावं. जर का फर्निचर बदलणं शक्य नसेल तर शोभेच्या वस्तू, गालिचे अशा वस्तू बदलत रहाव्यात.
  • निसर्गाच्या सान्निध्यात- एक छोटंसं फूलही तुमचं मन प्रफुल्लित करतं. तेव्हा सहज श्क्य असेल तर घरात फ्लॉवरपॉटमध्ये सुंदर फुले ठेवावीत, घरात लावण्याजोगी झाडे घरात ठेवावीत. हिरवा रंग फारच उत्साह देणारा असतो, त्याकडे बघताना शांत वाटतं. आणि निसर्गाच्या जितक्या जवळ जाता येईत तितकं छान वाटतं.
  • सुगंधी अणि शांत वातावरण- आपलं घर हे आपल्याला एक वेगळ्या मन:शांतीसाठी हवं असतं. जिथे स्वस्थ बसावं, शांतपणे पडावं यासाठी आपण सुगंधी मेणबत्त्या, तसंच अरोमा कँडल्स ठेवाव्यात. लाइट्सची रचना तशी करावी.
  • योग्य गोष्टींची निवड- आपण सगळेच कपडे घेताना साइज, कपडय़ाचा पोत आणि महत्त्वाचे म्हणजे ब्रॅण्ड बघत असतो, मग आपण ज्या घरात राहतो, जिथे थकून निवांत होण्यासाठी येतो, आपल्या माणसांबरोबर वेळ व्यतीत करतो तिथेच आणि तिथल्याच वस्तू निवडण्याच्या वेळी आपण योग्य ती काळजी का घेत नाही? मी अशी अनेक घरं बघितली आहेत जिथे स्वत:साठी म्हणून बसायला एक कोपरासुद्धा नसतो. आपल्या आवडीनिवडींसाठी जागा बनवलेली नसते. आणि सगळ्यात कहर म्हणजे बेडवरील गाद्या तर फारच वाईट असतात. मग काय, झोपेच्या तक्रारी सुरू होणारच! आपली झोप नीट न झाल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी जास्तच वाढतात. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या वस्तूही खरेदी करताना तडजोड करू नये.

घर हे जसे वस्तूंनी सुंदर दिसलं पाहिजे तसंच घरातील माणसं, त्यांची नाती यांनीही निरोगी असणं आवश्यक आहे. पण घरातील अव्यवस्थितपणा जर का चिडचिडीला कारणीभूत होत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे सगळं टाळणं सहज शक्य आहे.

आपल्याला घराचं प्लानिंग, डिझायनिंग, त्यातील उत्तम ब्रॅण्ड तसंच आपल्या जागेचा सुयोग्य वापर यातील माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याच प्रकारच्या लहानशा तर कधी मोठय़ा समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे घराचं डिझाइन करताना जर का तज्ज्ञाची मदत घेतली तर आपल्या मनावरील ताण खूपच कमी होतो.

खूप साध्या अणि सोप्या गोष्टींनी निरोगी अणि आनंदी घर तयार होतं; परिणामी आपणही आनंदी राहतो. तुमचं घर हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे, त्यामुळे ते सुंदर असणे आवश्यक आहे.

कविता भालेराव (इंटिरिअर डिझायनर )

kavita@kavitabhalerao.com