बऱ्याच मोठय़ा शहरांतील वस्तुसंग्रहालय हे पर्यटक अभ्यासकांबरोबर जिज्ञासू लोकांचंही एक आकर्षण असतं. पर्यटकांच्या स्थळदर्शनात तर याचा समावेश असणारच. दुर्मीळ पुरातन वस्तूंबरोबर इतिहास, संस्कृतीसह पुरातन लोकजीवनाचं दर्शन वस्तुसंग्रहालयातून घडत असतं. मात्र अशी वस्तुसंग्रहालयं उभारण्यापाठीमागची संकल्पना आणि त्यामागची पाश्र्वभूमी समजावून घेण्यात दर्शकांमध्ये उत्सुकता अभावानेच जाणवते.
शतकी वाटचाल करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयापेक्षाही जुने असलेल्या भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाबाबत पर्यटक तसा अनभिज्ञ आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ मिनिटांच्या अंतरावरील राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई उद्यानाकडे दिवसभर लोकांचा ओघ असतो. त्याच्या प्रवेशद्वारीच डावीकडे हे वस्तुसंग्रहालय आहे. या देखण्या इमारतीच्या प्रथमदर्शनीच ही इमारत ब्रिटिशकालीन असल्याचे जाणवते. या इमारतीचं बांधकाम इटालियन रेनेसान्स शैलीचं असून त्यात भव्यतेबरोबर कलात्मकताही जाणवते.
उद्देश- संकल्पना निश्चित झाल्यावर मूळ उभारलेल्या वस्तुसंग्रहालयाची पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या समितीत जॉर्ज बर्डवूड, जगन्नाथ शंकरशेठ आणि भाऊ दाजी लाड हे सदस्य होते. २ मे १८६२ रोजी या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होऊन १८७२ साली ती लोकांसाठी खुली करण्यात आली. ही वास्तू उभारण्यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अविश्रांत श्रम घेतले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर १९७५ ला  या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिले गेले. तत्पूर्वी राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेच्या कार्यकारिणीचे डॉ. भाऊ दाजी लाड हे सहसरचिटणीस होतेच. अनेक स्थित्यंतरांतून उभ्या राहिलेल्या या वस्तुसंग्रहालय इमारतीला इतिहास आहे. सामाजिक जाणिवेच्या कलासक्त माणसांचं पाठबळ आहे आणि कलेची उत्तम जाण असलेल्या ब्रिटिश प्रशासकांची स्थापत्य शास्त्राची दूरदृष्टीसह उत्तम जाणही आपल्या नजरेत भरते. या संस्कृतीरक्षक इमारतीचा आराखडा त्या वेळचे महापालिका अभियंता ट्रेसी यांनी तयार केला होता तर त्यात आवश्यकतेनुसार मेसर्स स्कॉट मॅक्ली लँड या वास्तुविशारद आस्थापनेनी काही सुधारणा करून त्याला अंतिम स्वरूप दिले.
वस्तुसंग्रहालय इमारत कोनशिला बसविताना गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ‘ही नियोजित संस्था म्हणजे केवळ गर्दी जमवून लोकांनी भकासपणे आश्चर्याने पाहण्याचा केवळ एक अजबखाना ठरू नये.’
वस्तुसंग्रहालय इमारतीच्या पायाचा दगड बसविताना त्या दगडाखाली एक मोठी तांब्याची पेटी ठेवण्यात आली होती. तिच्यामध्ये त्या वेळी प्रचलित असलेली नाणी, सकाळी प्रसिद्ध झालेल्या दैनिक वृत्तपत्रांचे अंक, स्थापनादिनाचे इतिवृत्त, समिती अध्यक्ष व सभासदांच्या नावाची यादी आणि राणीच्या जाहीरनाम्याची प्रत ठेवण्यात आली होती.
इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले आहे. मुंबईतील पहिले व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाला आहे. मुंबई इलाख्याच्या अखत्यारीतीतील गव्हर्न्मेंट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम असे त्याचे नाव प्रारंभी होते. कालांतराने मुंबई महापालिका आणि नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज यांच्यात अखेरीस करार होऊन वारसा वास्तुसंवर्धन मार्गदर्शक तत्त्व प्रणालीनुसार इमारत आणि परिसराची पुनर्रचना करण्यात आली.
राणी व्हिक्टोरियाला ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ हा किताब बहाल केल्याप्रीत्यर्थ सरकारने दिलेली देणगी आणि लोकवर्गणीतून ही इमारत पूर्ण झाली. कलाप्रेमी नागरिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयाचे कामकाज चालू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संस्था आहे. या इमारतीच्या बांधणीसाठी ४,३०,०००/- रुपये खर्च आला, त्यातील १,१०,०००/- रु. लोकांच्या वर्गणीतून दिले गेले तर उर्वरित रक्कम सरकारने उपलब्ध करून दिली.
आपण वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्रांगणात प्रवेश करताच चांगली देखभाल केलेला बगीचा नजरेत भरतो. छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयाची आठवण करून देणारं येथील वातावरण आहे. इमारतीत प्रवेश करण्याआधी सभोवतालच्या शिल्पाकृती पाहून घ्याव्यात. मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन मान्यवरांचे पुतळे येथे जतन करून ठेवले आहेत. त्यात मेट्रो चित्रपट गृहासमोरील फिल्झगेराल्डचा भलामोठा दिवा व कारंजेही आहेच. घारापुरी लेणी समूहातील प्रचंड दगडी हत्ती व एक तोफही आहे.
दहा दगडी पायऱ्या चढून आल्यावर तीन मोठी प्रवेशद्वारं लागतात. त्याला मोठय़ा आकाराचे शिसवी दरवाजे आहेत. बारा सुवर्ण वर्ख असलेल्या खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेले रंगीत छतही नजरेत भरते. तळमजल्यावरील भल्यामोठय़ा संग्रह दालनात आपण प्रवेश करतो तेव्हा प्रथम समोरील उंचावरचा अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससूनचे पुतळे लक्ष वेधतात. या वस्तुसंग्रहालयाची तीन भागांत विभागणी करण्यात आली आहे.
१) औद्योगिक कलादालन २) संस्थापकांचे दालन ३) कमलनयन बजाज दालन. तळमजल्याचे प्रचंड दालन म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय संस्थांनी वातावरणाची आठवण करून देणारे आहे. आकर्षक मांडणीतून विविध वस्तूंचे सादरीकरण व त्यासोबतची माहितीपत्रके यामुळे मार्गदर्शकाची जरुरीच भासत नाही. या औद्योगिक कलादालनात प्राण्यांच्या शिंगापासून तयार केलेल्या नक्षीयुक्त वस्तू, आकर्षक माती- धातूची भांडी, लाकूड शंख-शिंपल्यावरील कलाकुसर आणि अनेक धातूंच्या मूर्तीनी हे दालन सजलेले आहे. पक्षी-प्राण्यांच्या कातडय़ासाठी त्रावणकोर महाराजा आणि सावंतवाडी नरेशांकडून निधी मिळाला आहे.
दालनाच्या उजव्या अंगाला एक लहानसे सभागृह आहे. येथे १९ व्या शतकातील चित्राकृती आहेत. येथेच वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचे दृक्श्राव्य सादरीकरण मार्गदर्शक आहे. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मधोमध मोकळी जागा सोडून दोन्ही बाजूंनी ४० पायऱ्यांचा प्रशस्त दगडी जिना आहे. जिन्याच्या मध्यावर वस्तुसंग्रहालयाशी संबंधित त्याकाळच्या मान्यवरांची भलीमोठी तैलचित्रे पाहायला मिळतात. त्यात जमशेठजी जीजीभॉय, नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड या भारतीयांबरोबर काही ब्रिटिश अंमलदारांचीही तैलचित्रे आहेत. या कलादालनाला मधोमध मोकळी जागा असून, त्याला लोखंडी कठडे आहेत. या मजल्याच्या दोन्ही बाजूस ७-७ सुशोभित खांब छतापर्यंत पोहोचले असून, अखेरीस मजल्याचे छतही चित्राकृतीमुळे आकर्षक वाटते.
या दालनात दीड शतकापूर्वीपासूनच्या मुंबईतील लोकजीवनावर प्रकाश टाकला आहे. अनेक जात, धर्म, पंथाच्या लोकांच्या पारंपरिक पोशाखाचे अर्धपुतळे बघितल्यावर बहुढंगी मुंबईची कल्पना येते. मुंबईच्या विकासाला हातभार लावणाऱ्या जहाज व्यवसायाची स्थित्यंतरे पारसी बांधवांची दोख्या म्हणजे स्मशानभूमी, ग्रामीण जीवनासह घरगुती आणि भारतीय
खेळांचे प्रदर्शन, चिलखतधारी योद्धा, नृत्यासह वापरातील अनेक वाद्य, मातीचे नकाशे हे सारं पाहताना औद्योगिक क्रांतीपासूनचा मुंबईचा इतिहास आपल्या नजरेसमोर दृश्य स्वरूपात येतो. अखेरच्या टप्प्यावरील कमलनयन बजाज खास प्रदर्शन
दालनाला भेट दिल्यावर आपली स्थळ दर्शन यात्रा संपते. येथे कपडय़ावरील अप्रतिम कलाकुसर, मुंबईतील कापड गिरण्या व त्याचा परिसर, त्या काळचे लोअर परळ रेल्वेस्थानक आणि
आता दुर्मीळ वाटणारा बिडाचा जिना ही या दालनाची वैशिष्टय़े आहेत.
मुंबई महानगरीची शान ठरलेले हे वस्तुसंग्रहालय म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. तो इतिहास जाणून घेण्यासाठी या वस्तुसंग्रहालयाला अवश्य भेट द्या.
ब्रिटिश राजवटीत आपल्या कर्तृत्वाची मुद्रा मुंबई महानगरीवर उमटवणाऱ्या दूरदृष्टीच्या समाजधुरिणात भाऊ दाजी लाड म्हणजे शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक सुधारणा, संशोधन आणि संस्कृती संवर्धनात चौफेर काम करणारे एकांडी शिलेदार होते. दीडशे वर्षांपूर्वी स्वकीयांसाठी नि:स्वार्थ काम करताना परकीय ब्रिटिश प्रशासनावर भाऊंच्या विचारांसह कृतीचाही प्रभाव होता.
अल्पायुषी ठरलेल्या भाऊ दाजी लाड यांनी १८४५ मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. एक यशस्वी डॉक्टर म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक होताच. महारोगावरील, तसेच घारापुरीच्या लेण्यासंबंधातील त्यांचे संशोधनात्मक काम पुढच्या पिढय़ांना मार्गदर्शक ठरलंय. भाऊंच्या नावांनी ओळखले जाणारे आताचे हे वस्तुसंग्रहालय सुरुवातीस गव्हर्न्मेंट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियमनंतर राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जात असताना भाऊ दाजी लाड या वस्तुसंग्रहालयाच्या कार्यकारिणीचे सहसरचिटणीस होते.
कला आणि संस्कृती संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या भाऊ दाजी लाड यांनी लोकवर्गणीतून निधी उभारल्यानेच हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले. भाऊंच्या या अजोड कामगिरीची दखल घेऊन १९७५ साली या वस्तुसंग्रहालयाला त्यांचे नाव देऊन औचित्य साधले आहे.
बऱ्याच लोकांमध्ये एक समज आहे की, मुंबई बंदरावरील भाऊचा धक्का डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनीच उभारलाय, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. भाऊचा धक्का हा भाऊ अजिंक्य यांनी बांधून जलवाहतुकीवर आपली नाममुद्रा उमटवली आहे. त्यांचे खरे नाव लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य असे आहे. बंदर उभारणीतील बांधकामात गती असलेल्या भाऊ अजिंक्य यांनी मुंबई बंदरावरील भाऊचा धक्का हा त्यांच्याच नावांनी ओळखला जातोय. भाऊ अजिंक्य यांच्या समुद्रावर बंदरे बांधण्याच्या व्यवसायात रसेल नावाचा ब्रिटिश सहकारी होता त्याच्या नावाचा अपभ्रंश रसूल असा झाल्याने भाऊ रसूल या नावांनीही भाऊ अजिंक्य ओळखले जाताहेत.