विसावा देणारे, अगत्याची शिंपण करणारे, दुसऱ्यांच्या सेवेत स्वर्गसुख मानणारे, समत्वभान जपणारे, जिवाचे रान करण्यात धन्यता मानणारे, दु:खावरती फुंकर घालणारे, सहजीवनाचे सुरेल सूर आळवणारे, निढळांच्या घामावर उभे राहणारे, आदर्श जीवनमूल्ये जपणारे असे हे घराचे रूप.. वेगवेगळे..

घर.. मोकळ्या अवकाशात चार भिंतींचं कुंपण घालून मी- माझं-मला-माझ्याकडे अशा सगळ्या ‘विभक्तींसाठी’ केलेली हक्काची जागा. कधी ‘सहकारा’च्या भक्कम पायावर उभी राहणारी, तर कधी स्वतंत्र विचारांचा पाया घालणारी. टप्प्याटप्प्याने मजल्यावर मजले चढत ते आकाराला येतं. स्वतंत्र बंगल्याचा अपवाद सोडता बाहेरून बघताना प्रथमदर्शनी एका सहनिवासातील सगळी घरं एकसारखीच.. साच्यातून काढल्यासारखी. पण अंतरंग, ते मात्र प्रत्येकाचं वेगळं अगदी ‘निजखूण’ जपणारं.
सर्वसाधारणपणे प्रत्येक घर, त्याचं रूप म्हणजे यजमानांच्या (आता यजमानीण बाईसुद्धा) कर्तृत्वाचा आरसा. ‘अर्था’अर्थी ते खरंच आहे. खिशाच्या आकारमानानुसार गरजांना, आवडींना, सोयींना, आवश्यकतेला, रसिकतेला ‘वाव’ देत घर सजत जातं, रंगत जातं. ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ अशी किमया घडून येते. परंतु ‘ही’ सजावट म्हणजेच घर का? नक्कीच नाही. तसं असतं तर पंचतारांकित हॉटेलमधल्या वास्तव्याला दोनचार दिवसांत आपण कंटाळलो नसतो. ह्य़ा दृश्य रूपाच्या पलीकडे अदृश्य स्वरूपात घराचा स्व‘भाव’ असतो. घरांत पाऊल टाकताक्षणी तो जाणवतो. किंबहुना तेच घराचं खरं स्वरूप असतं. भावभावनांचं अस्तर लावलेलं ‘घर’पण असतं. ह्य़ाच कारणास्तव आलिशान महालाप्रमाणे चंद्रमौळी झोपडीतही समाधानाची सुखाची कारंजी उडत असतात. खरं तर ही अदृश्य ओळख, हा भाव, हा चेहरा हा संस्काराच्या मुशीतून घडलेल्या घरातल्या सदस्यांच्या आपापसातील नात्यांचा परिपाक असतो. चांगल्या-वाईट वर्तनाचं आरस्पानी प्रतिबिंब असते आणि म्हणूनच घराघराचे रूप आगळे भासत राहते. नमनाला घडाभर तेल घालून झालं. आता ‘नव्या जाणिवे’सह घराचे रूप बघण्यासाठी घराघरांत डोकावण्याचा मोह होतोय.
बेल वाजवताच एखाद्या घराचे दार सुहास्यवदनाने उघडले जाते. पीपहोलमधून बघण्याचा रिवाज तिथे नसतोच. ‘याऽऽऽ’ असं तोंड भरून स्वागत झेलतच येणाऱ्याचा आत प्रवेश होतो. वागण्याबोलण्यातला मोकळेपणा ठायी ठायी दिसून येतो. आपलं ‘येणं’ तिथल्या प्रत्येक घटकाला आवडलंय याची पावती नजरेतून मिळतेच. ‘पाहुणे आत, काम बंद’ असं होत नाही. प्रत्येकाच्या हातातली कामं चालूच राहतात. उलट पाहुणाही त्यात हलकेच डोकावू शकतो. तो दखलपात्र गुन्हा होत नाही किंवा घराच्या प्रायव्हसीवर गदा येत नाही. आजकालच्या प्रथेनुसार बाहेरच्या खोलीत सगळ्यांची पोटपूजा चालली असेल तर हातावर काहीतरी ठेवलं जातं. ‘बघा तुमचा भाग होता यात’ अशी टिपण्णीही होते. आवड ही लक्षात ठेवली जाते. चट्टामट्टा झाला असला तर खुलेआम घोषित केलं जातं. परकेपणा वाटत नाही. पाहुणा ‘घरातलाच’ होतो. औपचारिकतेचे बंधन गळून पडलेले असते.
एखादे ‘दार’ पटकन् उघडत नाही. ‘सगळ्या प्रकारची’ आवराआवर होते. ‘कोण आलं यावेळी? पोस्टमन, पेपर, कचरेवाली, सगळ्यांचे तर नंबर लागून गेले. मग आता कोण?’ पीपहोलमधून आरपार बघत, अंदाज घेत, प्रश्नांकित चेहरा समोर येतो. खूप कामात असून व्यत्यय आल्याचा भाव दाखवताना ‘याऽ’ टाळलाच जातो. ‘आता आलाच आहात तर या’ मनातच जप होतो. येणारा कोरडेपणाने कामाचे स्वरूप उलगडतो आणि शांततेचा भंग न करता काढता पाय घेतो. दार आपटल्याचा आवाज आल्याची खात्री करत त्या बंद दरवाजाकडे बघत तोंड वाकडे करतच पाहुणा मार्गस्थ होतो.
‘वेळीअवेळी कसले दत्त होतात. आधी कळवून यायच्या मॅनर्स पाळता येत नाहीत’.. यजमान मनात उवाच. वरवर हसून ‘बसा’ म्हटलं जातं. पण ‘सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला’, असा पवित्रा देहबोली सांगून जाते. रसिक मनाच्या पाहुण्याच्या अवचित भेटीने आनंद देण्याच्या कल्पनेवर पाणी फिरते. समोर खाण्याचे दहा प्रकार येतात जणू शोभेसाठी. ‘खाल्लत तर खा’ हे न सांगता सुचवणारे. पण हात लावावासा वाटत नाही. अखेर उपस्थिती गोड मानून घेतली जाते आणि वेळ साजरी होते.
एखाद्या घराच्या करडय़ा शिस्तीचा आणि टापटिपीचा धाक आत प्रवेश करतानाच दडपण आणतो. आल्याआल्या नियमांच्या जाणिवेने मन धास्तावते. कडक इस्त्रीसारख्या नियमांच्या चौकटीने घर, घर राहत नाही, तुरुंगच होतो. स्टार्च केलेला कपडा अंगावर चढताना जसा कुरकुरतो तशी शिस्त मोडलेली तिथे खपवून घेतली जात नाही. शब्दाचा, वयाचा मान राखत नाती वरवर टिकवली जातात. पण आपुलकीचे धागे तुटून मन उडालेलंच असतं. मागचे पुढचे मानापमानाचे भलेबुरे हिशोब चुकते करण्याकडे घराचा कल असतो.
याउलट एखादं घर नीटनेटकेपणा, स्वच्छता याबरोबर स्नेहाचे सामंजस्याचे धागे गुंफून ऊबदार मायेचं वस्त्र विणत राहते. येणाऱ्याला त्या उबेत पुन: पुन्हा यावेसे वाटते. ‘कुठून बुवा आलो’ हा विचार मनाला शिवत नाही. आग्रहाने, आवडीने, येणाऱ्याला खाऊपिऊ घालत घर वर्तमानात हास्यरंगात रंगून जातं. नात्याच्या रेशीमगाठी पक्क्य़ा होतात.
एखादं घर पुस्तकांनी सजण्यात धन्यता मानतं. वाचन संस्कार तिथे रुजलेला असतो. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या चार पिढय़ा एकत्र जेवणाबरोबरच रोज रात्री आध्यात्मिक ग्रंथाचे नियमाने वाचन करतात. पुस्तकं सहज हाताशी येतील, डोळ्यांसमोर राहातील अशीच ठेवल्यामुळे अगदी लिंबूटिंबूलासुद्धा नकळत रामाचं पुस्तक, कृष्णाचं पुस्तक अशी ओळख झालेली असते. संस्काराच्या ह्य़ा सुंदर साजाने नटलेलं असं घर अभिमानाने ‘ताठ’ न होता आपल्याच आनंदात असत. उंची इंटिरियर किंवा अति शिस्तीचा बागुलबुवा तिथे नसेल, पण शांतिरसाचा आविष्कार मन प्रसन्न करून टाकत असतो.
एखाद्या घरी, वादविवाद, धुसफुस, रागवारागवी, चढलेले स्वर अशी ‘आवाज की दुनिया’ असते. येणारा कानकोंडा होतो. एखादं घर पसारा करत अस्ताव्यस्तपणे पहुडलेलं असतं. भिंतीच्या ‘फळ्यावर’ मुक्तहस्ताने सुलेखन होत ‘शाळा’ भरलेल्या असतात. आपल्याच नादांत घरातली माणसं ह्य़ा गर्दीतून वाट काढत असतात. सगळ्या गोष्टी अगदी ‘हाताशी’ असल्यामुळे शोधाशोध करण्यात वेळ जायचा प्रश्नच येत नाही. मुखवटा, छक्केपंजे यांचा मागमूसही नसतो. ऋणानुबंधाच्या गाठी जपताना दारं सताड उघडी आणि दारांत चपलांची गर्दी.
‘संघे शक्ती: कलौ युगे’ म्हणत एखादं घर सत्संगाने सतत गजबजलेलं असतं. पवित्र वातावरणाने घराचं जणू मंदिर होतं. येणाऱ्यांसाठी ‘द्रौपदीची थाळी’ सुसज्ज असते. एखादं घर ‘छंदात’ रममाण होत आपल्याबरोबर इतरांनाही आनंद वाटत राहतं. दुसऱ्याच्या हाकेला ‘ओ’ म्हणणं हा काही घरांचा धर्मच असतो. परोपकार, त्याग, देशप्रेमाचे वारे तिथे वाहत असतात. कलावंताला, साहित्यिकाला, लोकनेत्याला घडविण्याचं अवघड काम ‘थोडी हटके’ अशी घरं करतात. प्रवासाची साक्षीदार असलेली ही घरं त्या व्यक्तीच्या पश्चातही ‘त्या’ आठवणी जपत राहतात. म्हणून प्रेक्षणीय वंदनीय, स्मरणीय असतात. केशवसुतांचं मालगुंडचे स्मारक किंवा लो. टिळकांचे रत्नागिरीतील घर आजही स्फूर्तिदायक वाटतं. ‘पादस्र्पश क्षमस्व मे’ म्हणत तिथे विनम्र व्हावंसं वाटतं.
तर असे हे अदृश्य स्व-भाव जपणारे घर. नुकत्याच जन्मलेल्या दोन अडीच महिन्याच्या बाळाशीही ते न बोलता नाते जपते. त्यामुळे परक्या घरांत पाऊल टाकल्यावर भिरभिरत्या, कावऱ्याबावऱ्या नजरेने बघत बाळ वाजंत्री लावते. बाहेरगावी जाऊन आल्यावर टपालाच्या ढिगाशिवाय घरांत काहीही बदल झालेला नसतो, पण तरीसुद्धा क्षणभर ते नवीन वाटते. अर्थात काही क्षणच, सगळ्या खोल्यांतून फिरल्यावर जुनी ओळख दृढ होते. उभं आयुष्य खर्ची घालूनही एखाद्याला आयुष्याच्या संध्याकाळी ‘घर देता का घर’ अशी याचना करत दारोदारी भटकताना घराची ‘खरी किंमत’ कळते.
विसावा देणारे, अगत्याची शिंपण करणारे, दुसऱ्यांच्या सेवेत स्वर्गसुख मानणारे, समत्वभान जपणारे, जिवाचे रान करण्यात धन्यता मानणारे, दु:खावरती फुंकर घालणारे, सहजीवनाचे सुरेल सूर आळवणारे, निढळांच्या घामावर उभे राहणारे, आदर्श जीवनमूल्ये जपणारे असे हे घराचे रूप.
वास्तुरचनाकार, अंतर्गत सजावटकार, फेंगशुई यांनी केलेला घराचा मेकप म्हणजे घराचा मुखवटा. त्याच्या मागे दडलेले असते घराचे खरे रूप, त्याची चांगली-वाईट ओळख. ही ओळख कशी हवी हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे, नाही का?
सुचित्रा साठे

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…