News Flash

रंग वास्तूचे- री-‘टायर्ड’

आज जरा जड पावलांनीच अतुल घरी आले. आपलंच घर असूनही त्यांना परक्यासारखं वाटत होतं. आणि त्याहीपेक्षा घर खायला उठल्यासारखं वाटत होतं. घरातला एकटेपणा आज जास्तच

| February 14, 2015 02:18 am

आज जरा जड पावलांनीच अतुल घरी आले. आपलंच घर असूनही त्यांना परक्यासारखं वाटत होतं. आणि त्याहीपेक्षा घर खायला उठल्यासारखं वाटत होतं. घरातला एकटेपणा आज जास्तच गडदपणे जाणवत होता. कारण रोज संध्याकाळी घरी आल्यावर घरातलं हे एकटेपण सकाळपर्यंतच असल्याचं मनाला समजावता येत होतं. पण आज निवृत्त होऊन घरी येताना पुन्हा उद्यापासून ऑफिसच्या इमारतीची पायरी चढायची नाही; आणि ऑफिसला गेलं तरी सगळे आपापल्या कामात, व्यापात असणार. त्यामुळे किती काळ ऑफिसमध्ये रेंगाळणार? या कल्पनेने ज्या ऑफिसच्या वास्तूने आजपर्यंत आपली साथसोबत केली, मानसिक आधार दिला, तीच हवीहवीशी वाटणारी वास्तू आता आपल्यापासून लांब जाणार म्हणून पोरकं झाल्यासारखं वाटत होतं. काय गंमत असते नाही? केवळ माणसंच माणसांना जीव लावतात असं नाही, तर एखादी वास्तूही ‘मत्र जीवा’ची होऊन जाते. विचार करता करता घर कधी आलं ते कळलंच नाही. दरवाजा उघडला. चप्पल काढली. पण आत जावंसंच वाटत नव्हतं. म्हणून लिव्हिंग रूममधल्या दिवाणावर अतुल भिंतीला टेकून बसले. पहिल्यांदाच घरी आलेल्या पाहुण्याने बघावं, तसं ते आपल्याच घराकडे वरपासून खालपर्यंत नीट निरखून बघायला लागले. बघता बघता मनाच्या सांदीकोपऱ्यातून काळाची जळमटं दूर करत घराचा एकएक कोपरा, घरातल्या वेगवेगळ्या वस्तू जिवंत होऊन अतुलशी संवाद साधू पाहत होत्या. आणि मग कुठे तरी एकदम लख्ख प्रकाश पडावा तसं अतुलना आठवलं, अरे हेच ते घर, ज्याचा आपल्याला एक काळ खूप आधार वाटत होता. आपल्या संकटाच्या काळात आपल्या डोक्यावर असलेल्या या छपरानेच तर आपण अजून रस्त्यावर आलेलो नाही, हा विश्वास आपल्याला दिला होता. विचार करता करता नकळत त्यांचा हात दिवाणावरच्या चादरीवरून फिरत होता आणि इतक्यातच त्यांचं लक्ष दिवाणाला लागूनच असलेल्या शिवणाच्या मशीनच्या लाकडी केसवर ठेवलेल्या तांब्या-भांडय़ाकडे गेलं. तेव्हा आठवणींबरोबर डोळ्यांत टचकन पाणीही आलं.
याच दिवाणावर त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून त्यांची पत्नी सविता शेवटचे श्वास घेत होती. तिने पाणी मागितलं म्हणून केवळ काही क्षण तिचं डोकं खाली ठेवून याच तांब्यातलं पाणी घेऊन येईपर्यंत तिने प्राण सोडले
होते. वयाच्या पंचेचाळिशीला अतुलची कंपनी बंद होऊन नोकरी गेल्यानंतर
त्यांच्या संसाराला टेकू देण्यासाठी दिवाणाशेजारच्या याच मशीनवर दिवसरात्र बसून शिवणकाम करणारी सविता डोळ्यांसमोर आली. नंतर नंतर अगदी कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊनही जमेल तसं तिचं काम अधूनमधून सुरूच होतं. पण इतकं सगळं असूनही कोणी विचारलं, कसं काय चाललंय?  तेव्हा चेहऱ्यावर सुकलेलं हसू का होईना, पण तशातही हसऱ्या चेहऱ्याने ती सांगायची-‘अगदी उत्तम!’ अगदी आत्ताही मशीनच्या मागच्या िभतीवर लावलेल्या
तिच्या फोटोतल्या हसऱ्या चेहऱ्याने ती
जणू अतुलना हेच सांगत होती की, निराश व्हायला काय झालंय? सगळं उत्तम तर आहे. अतुलना तिच्या फोटोकडे बघून तिचं ते नेहमीचं मनाला उभारी देणं आठवलं आणि मग जाणवलं, खरंच की, आपली नोकरी जाणं, बायकोचं मरण, तिच्याही आधी झालेला मुलाचा- विजयचा वियोग इतक्या मोठमोठय़ा गोष्टी आपण पचवल्या आहेत, तिथे निवृत्तीची काय तमा? विजयची आठवण होताच समोरच्या खिडकीकडे अतुलचं लक्ष गेलं. पंधरा वर्षांचा होऊन विजय गेला होता. त्या मुलाचं आणि खोलीच्या कोपऱ्यातल्या त्या खिडकीचं नातं अगदी सुरुवातीपासूनच अतूट होतं. जन्मल्यानंतर त्याचा पाळणा याच खिडकीखाली ठेवला होता. जरा दोन-तीन महिन्यांचा झाल्यानंतर खिडकीच्या दरवाज्यावर बसणारा कावळा बघून उ..उ. असा आवाज करत त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करणारा विजय आठवला आणि अतुलचा चेहरा फुलला. मग उभं राहता यायला लागल्यावर खिडकीतून खाली दिसणारा सोसायटीतला रस्ता, त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांची वर्दळ, या रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत खेळणारी मुलं हे सगळं त्याला पाहायचं असायचं. म्हणून येणाऱ्या पाहुण्यांसाठी बसायला, विजयला खालची गंमत बघायला उभं राहता यावं याकरता आणि खेळून दमल्यावर दुपारी झोपायला छोटा बेड याच खिडकीखाली केला होता. आकडी येऊन ताप आल्यानंतर विजय याच बेडवर झोपून असायचा. काही दिवसांनी ताप निघाला. पण मेंदूत ताप गेल्यामुळे नंतरच्या काळात शरीराने वाढणाऱ्या विजयची मानसिक वाढ मात्र खुंटली. त्यानंतर डॉक्टरांकडून कळलेली विजयच्या मतिमंदत्वाबद्दलची माहिती जेव्हा काळजावर दगड ठेवून अतुलने विजयाला सांगितली, तेव्हा मनाने कोसळलेल्या अतुलला उभारी देऊन सर्व ठीक होईल अशी आशा दाखवून ती स्वयंपाकघरात गेली खरी, पण काही क्षणांनी अतुलही स्वयंपाकघरात गेल्यावर ओटय़ाला टेकून जमिनीवर बसून आवाज बाहेर येऊ नये म्हणून तोंडातल्या तोंडात रडू दाबून हमसून हमसून हुंदके देणारी सविता अतुलना आठवली. स्वयंपाकघरात ओटय़ाकडे नेहमी चटपटीतपणे वावरणाऱ्या सविताचं हे रूप अतुलना नवीन होतं. पण या वेळी सगळं काही ठीक होईल असं सांगून अतुलने तिला सावरलं होतं. तासन्तास वेगाने पुढे जाणाऱ्या बाहेरच्या जगाकडे एकटक लावून पाहणारा विजय अतुलला आठवला. ती खिडकी हेच त्याचं जग झालं होतं. आपल्यामागे या पोराचं कसं होणार म्हणून अतुलचं काळीज धडधडायचं. पण नियतीने हाही प्रश्न सोडवला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी अतुल गेल्यावर ती खिडकी कायमचीच पोरकी झाली.
एकामागून एक अशी संकटं कोसळत गेली आणि माणसांच्या जाण्याने घर रिकामं झालं. एकदा अतुलच्या एका मित्राने त्याला सांगितलं की, तुझ्या घराच्या वास्तूतच दोष असणार, तू घर विकून टाक. पण अतुलचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. असेल त्या परिस्थितीत मजेत आहोत, असं सांगत आणि खरोखरच आहे त्यात आनंद शोधून कसं जगावं, हे सविताबरोबरच्या सहचर्यात अतुलला कळलं होतं. त्यातच नोकरीही नव्हती. अशा वेळी किमान राहायला घर तरी आहे, हा आधार घराच्या याच वास्तूने पुरवला होता. बरी किंवा वाईट कोणतीही परिस्थिती कायम राहत नसते. या गोष्टीवर अतुलचा ठाम विश्वास होता.  नियतीने सगळे दरवाजे बंद केलेत, तरी कोणता ना कोणता नवीन दरवाजा ती उघडतच असते, याच विश्वासाच्या बळावर नोकरी शोधणं सुरू असताना कोणीतरी सुचवलं की, फोर्ट परिसरात बेहरामभॉयचं ‘वाच्छा क्लिअिरग फॉर्वìडग सíव्हसेस’ हे ऑफिस आहे. त्याला सध्या अकाऊंटंटची गरज आहे, त्याला जाऊन भेट. त्या प्रसंगाची आणि आता ऑफिसला दिलेल्या पहिल्याच भेटीची अतुलना आठवण झाली आणि ऑफिसच्या आठवणींची मालिका अतुलच्या मनात सुरू झाली.
अतुल बेहरामभॉयला भेटायला गेले. इमारतीच्या आत शिरताना त्यावर नजर टाकली. फिके चॉकलेटी गुलाबसर दगड सरळ रेषेत एकावर एक शिस्तीत रचलेली आणि शिस्तशीर ब्रिटिश साहेबाच्या काळातलं बांधकाम असलेली ती पाचमजली दगडी इमारत पहिल्यांदाच बघताना त्या वास्तूचं दडपण अतुलच्या मनावर आलं होतं. रुंदीला तसे फारसे मोठे नसलेले काळोखी जिने. त्याच्या लाकडी पायऱ्यांवरून चढताना कर्रकर्र असा होणारा आवाज, अशा सगळ्या वातावरणातून वर चढताना मनावर उगाचच कसलं तरी एक अनामिक दडपण जाणवत होतं, ते अतुलला आठवलं आणि नंतर याच इमारतीशी जमलेली गट्टीही आठवल्यावर त्याआधीच्या दडपणाचं हसू आलं. पहिल्या मजल्यावर चढून गेल्यावर अमुकअमुक ऑफिस कुठे असं विचारल्यावर कोणीतरी जड पितळी कडय़ाकोयंडे असलेल्या जुन्या बर्माटिक वुडच्या एका उंच मजबूत लाकडी दरवाज्याकडे बोट दाखवलं. त्यातून आत गेल्यावर दृष्टीला पडली ती पंधरा बाय वीस फुटांची खोली. त्यातून आत गेल्यावर शेवटी बाल्कनीच्या दरवाज्याजवळ बेहरामभॉयची केबिन. खालचा अर्धा भाग लाकडी आणि वरच्या अध्र्या भागाला काचा आणि केबिनचा दरवाजा उघडाच होता. त्यावरून बेहरामभॉयच्या मोकळ्याढाकळ्या आणि पारदर्शक स्वभावाची अतुलना थोडीशी कल्पना आली. डोक्यावर गोल उभट काळ्या रंगाची पारशी टोपी, डोळ्याला जाड फ्रेमचा आणि जाड काचांचा चष्मा, पांढरा अंगरखा आणि या सगळ्या जाम्यानिम्याला शोभेल असा धिप्पाड देह! अशा थाटात मान खाली घालून कसले तरी हिशेब तपासणाऱ्या बेहरामभॉयना अतुलनी जरा बिचकतच विचारलं, ‘‘मी येऊ का आत? सावंतांनी मला अकाऊंटंटच्या पोस्टसाठी..’’ त्याला मध्येच अडवत बेहरामभॉयनी सांगितलं, ‘‘अरे अतुल डिकरा, ये ये, सावंत बोलला होता मला.’’ मग त्यानंतर औपचारिकता म्हणून झालेली मुलाखतही अतुलना आठवली.
या ऑफिसमध्ये आत शिरताना दरवाज्याजवळ उजव्या कोपऱ्यात एका बाजूला अतुलचं टेबल होतं. म्हणूनच दरवाज्याजवळच्या या जागेला ऑफिसमधल्या लोकांनी त्यांची ‘देवडी’ असं नाव दिलं होतं. तिथेच बसून त्यांनी कोणाला वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणीत मानसिक आधार दिला, तर कधी बोटीने आलेला माल वेळेत न मिळाल्यामुळे संतापून ऑफिसमध्ये रुद्रावतार धारण करून भांडायला आलेल्या क्लायंटचं समाधान होईल, असा पर्याय देऊन त्याला शांत करून पाठवलं आणि बेहरामभॉयवरचं संकट थोपवलं. कधी नव्याने ऑफिसात रुजू झालेल्या एखाद्या सहकाऱ्याला कामात येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, याचं प्रशिक्षणही अतुलनी याच ‘देवडी’वर दिलं होतं. हळूहळू त्या ऑफिसमधल्या वातावरणात त्या ऑफिसला आणि त्यात काम करणाऱ्या माणसांना अतुलनी आपुलकीच्या नात्याच्या एका धाग्याने बांधल्यामुळे ऑफिसला एखाद्या कुटुंबासारखं स्वरूप आलं होतं. ऑफिसमधून घरी यायचं ते झोपण्यापुरतं आणि बाकीचा वेळ ऑफिससाठी किंवा कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात घालवायचा, असा परिपाठच झाला होता. घरातल्या एकटेपणावर हा जणू उपायच सापडला होता. म्हणूनच आज ऑफिसमधून घरी येताना पावलं जड झाली होती. पण इतक्या वर्षांमधले हे सगळे प्रसंग आणि आज निवृत्तीच्या दिवशी संध्याकाळी झालेला निरोप समारंभ, अगदी आत्ताच घडलं आहे असं डोळ्यांपुढून तरळून गेलं. ऑफिसातून निघताना त्यांनी स्वत:च्या रिकाम्या खुर्चीकडे पाहिलं. एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे ती खुर्ची उद्यापासून दुसऱ्या कोणाची तरी होणार होती. ऑफिसमध्ये आता कधीतरी भेटायला जायचं. कारण त्यातच खरी गोडी आहे, हे एव्हाना मनाला समजवण्यात अतुलना यश आलं होतं.
मग अतुलच्या मनात एकच विचार चमकून गेला की, अरे आयुष्यात आधी घराच्या वास्तूने साथ दिली, मग ऑफिसच्या वास्तूने साथ दिली. तेव्हा आता निवृत्ती म्हणजे retired  असा अर्थ नसून
‘Re-tyred’ असा, म्हणजे आयुष्याच्या रथाची चाकं नवीन झाली आहेत, असा अर्थ आहे. तेव्हा या नव्या अर्थानुसार अनेक वर्षे मनात रेंगाळत असलेली कल्पना साकारायला आता वेळ मिळाला आहे. आपल्या मुलाबद्दल जी काळजी आपल्याला होती, तशी काळजी अशाच प्रकारच्या भिन्नमती मुलांच्या पालकांनाही असणार. तेव्हा
हे घर विकून मुंबईबाहेर, पण मुंबईजवळ भिन्नमती मुलांसाठी आश्रम सुरू केला
तर अशा मुलांना आधार मिळेल आणि आपला वेळही जाईल आणि सोबतही मिळेल, असा विचार करून अतुलने
पुन्हा एकदा आश्रमाच्या रूपाने एका नव्या वास्तूशी सलगी करायचे बेत आखलेत. ती वास्तूच आता अतुलचा यापुढला आधार असेल..                                  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 2:18 am

Web Title: home after retirement
Next Stories
1 वास्तुदर्पण – सौंदर्याच्या साक्षात्कारासाठी..
2 वास्तुमार्गदर्शन
3 सदनिकेची मोजणी आणि विकासकांची फसवेगिरी
Just Now!
X