News Flash

घर आणि अंगण

एका गजबजलेल्या रस्त्यावरून जाताना एक सुंदर पाटी दिसली- ‘मित्रांगण’. उत्सुकता वाटली म्हणून चौकशी केली, तर कळले की तो तरुण रसिक

| January 11, 2014 05:31 am

एका गजबजलेल्या रस्त्यावरून जाताना एक सुंदर पाटी दिसली- ‘मित्रांगण’. उत्सुकता वाटली म्हणून चौकशी केली, तर कळले की तो तरुण रसिक पुरुषांचा कसलासा क्लब आहे. मला गंमत वाटली ती नाव ठेवण्यातल्या त्या तरुणांच्या रसिकतेची. शब्दांना उ्रल्ल करण्यातली त्यांची भाषिक जाण खूपच भावली. मग मात्र अंगणाभोवती माझं मन पिंगा घालू लागलं.
अंगण हय़ा शब्दानं माझा ताबाच घेतला. तो शब्द घेऊन गेला बालपणातल्या त्या सुंदर अंगणापाशी. खेडेगावातलं साधंच चाळीतलं घर होतं ते. पण घरासमोरचं अंगण खूपच ऐश्वर्यसंपन्न होतं. फरसबंद नव्हतं म्हणूनच मातीचा आणि दगडगोटय़ांचा स्पर्श पायांना सहज होत असे. अंगणाशेजारूनच वाहायचं पाटाचं पाणी. पुढे एका शेतात जाणारं. त्या अंगणात होता केवढा तरी हिरवा पसारा. काही भलीथोरली झाडं. सतत चवरी ढाळणारा विरळ सावलीचा कडुलिंब आणि त्यावर दंगा करणारा विविध पक्ष्यांचा तळ! डाळिंबाच्या चिवट आणि जिवट झाडावरच्या त्या सुंदर केशरी कळय़ा आणि लगडलेली अतोनात फळं. किती नंतर मला कळलं की त्या कळीलाच म्हणतात ‘अनारकली’. त्या साध्याशाच अंगणात होतं एक प्राजक्ताचं झाड. श्रावण महिना येण्यापूर्वीच तो इतका मोहरायचा की जणूकाही तो त्याच्या बहराची नांदीच गायचा. त्याच्या मोत्यापोवळय़ाच्या सुकुमार पाकळय़ांचा सुगंध असा काही दरवळत राहायचा की संपूर्ण अंगणच नव्हेतर पंचक्रोशीतला अवघा परिसर गंधाळून उठायचा. अंगणातला तो प्राजक्ताचा पसारा अचंबित करायचा. किती हा भरभरून बहरत राहतो आणि हय़ा अंगणावर सुकोमल अल्पजीवी फुलांचा गालिचा पसरतो.. प्रश्न पडायचा. अंगण फुलांनी भरून गेल्यावर समजायचंच नाही- कसं चालायचं हय़ा फुलांमधून? हय़ा प्रश्नालाच सापडले काही शब्द- ते मी त्या अंगणातल्या प्राजक्ताला म्हटले-
‘तिथे अंगणात पहा.. तुझ्या फुलांची आरास
वारा गंधात नाहला.. शहारला माझा श्वास
वाट दिसेना दिसेना.. कुठे जमीन दिसेना
कुठे टेकवू पाऊल.. कोडे नाजूक सुटेना..’
अंगणातल्या प्राजक्तानं मोत्यापोवळय़ाचं हसू आवरत पुन्हा वर्षांव केला त्याच्या त्या अलवार फुलांचा. नुसता कहर- फुलांचा.
‘मुक्तांगण’ हा एक खूप सुंदर शब्द. जिथे सर्वाना मुक्त प्रवेश असतो असं बागडण्याचं, हुंदडण्याचं ठिकाण म्हणजे मुक्तांगण. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या देणगीतून त्यांच्याच कल्पनेतला उघडा-बिन छपराचा रंगमंच पुण्यात सहकारनगर भागात आहे. त्याचं नाव ‘मुक्तांगण’. अनेक कार्यक्रम तिथे होतात तेच मुळी उन्हा-वाऱ्याच्या सोबतीनं. असं हे ‘मुक्तांगण’ जणू विविध अभिव्यक्तीचं प्रतिभेचं अंगणच! शाळेतही मुक्तपणे बागडण्याचा काळ असतोच. क्रीडांगण किंवा पटांगण ही तर बालपणीची हिरवळच. मनसोक्त दमण्यात काय बहार असते, हे शिकवणारी ही क्रीडापीठेच असतात. तनामनाची जडणघडण करणारी ही सारीच ठिकाणं आपल्या आयुष्यात फार मोलाची असतात.
एकदा मी माझ्या एका मैत्रिणीच्या गगनचुंबी इमारतीतल्या बाराव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेले होते. बालपणीच्या गप्पा मारताना आम्ही दोघी स्मरणरंजनात रंगून गेलो. बालपणीच्या त्या सुंदर अंगणाविषयी आम्ही हरवून हरवून बोलत होतो. तेव्हा तिथे तिची मुलगी आली. तिला कळेचना आम्ही काय बोलत होतो. तिला ते ‘अंगण प्रकरण’ समजावून सांगताना मी म्हणाले, ‘‘घराच्या पुढच्या बाजूला जी मोकळी जागा असते, त्याला आपण अंगण म्हणतो. त्या अंगणात असतात काही झाडं, वेली, काही कुंडय़ा-फुलझाडांनी डवरलेल्या. अंगणात रुंजी घालत येतात ऋतू. तिथे वाऱ्यावर हिंदोळत असतो झोका. तिथे जमतो मित्रमैत्रिणींचा मेळा. तिथे ठरतात वेगवेगळे रम्य बेत. क्वचित त्या झोपाळय़ावर फुलतं तरुणाईचं प्रेम. झोपाळय़ावर झुलत राहतात गळय़ातली गोड गाणी किंवा संध्याकाळी त्याच झोपाळय़ावर घुमत राहतात विविध स्तोत्रं. हय़ाच अंगणात थरथरत्या हातांनी कुरवाळले जाते शैषव आणि वडीलधाऱ्यांचं लक्ष असतं- घारीसारखं आपल्या झेप घेणाऱ्या पाखरांकडे.. तिथे कधीकधी पाठ केली जातात शाळेतल्या स्पर्धेतली भाषणं- तोंडपाठ. तिथे बागडत असतं लहान निरागसपण. तिथे असतं सुंदरसं तुळशीवृंदावन.. सकाळी फुलं-उदबत्तीनं दरवळणारे आणि संध्याकाळी निरांजनानं उजळणारे..! इथंच साजरी व्हायची कोजागरी अन् इथंच दरवर्षी पार पडायचं हय़ा तुळशीचं लग्न. इथंच वाळत घातलं जायचं वर्षभराचं वाळवण. अनेक पिढय़ांना सुखदु:खाच्या प्रसंगी सामावून घेणारं हे अंगण म्हणजे घराचंच विस्तारित रूप.. मोकळा पैस. माती, वारा-ऊन-पाऊस-आकाश साऱ्यांना कवेत घेणारं एक स्थान.’’
मी कितीतरी बोलत राहिले अंगणाबद्दल.. घराबद्दल.. घरातल्या नात्यांबद्दल..! आणि मैत्रिणीची कन्या ऐकतच राहिली. स्वप्नातला प्रसंग अनुभवत असल्यासारखी. हसून मला म्हणाली, ‘‘मावशी, तू बोलत होतीस ना त्या सुंदर अंगणाबद्दल, तेव्हा मला वाटलं, मी कुठलातरी ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाच पाहतेय.’’ मला तिची प्रतिक्रिया सुखावूनही गेली आणि दुखावूनही गेली. सुख हय़ाचं की ती आधुनिक मॉड मुलगी आमच्या नॉस्टॅल्जिक गप्पांमध्ये सामील झाली नि तिला माझी भाषा थोडीफार समजली आणि दु:ख हय़ाचं की आता अशी घरं नि अंगण केवळ कृष्णधवल चित्रपटांतच उरली आहेत..
पण काळाच्या ओघात काही गोष्टी लुप्त होणारच. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो, काही हेतू असतो. कालांतरानं तो हेतूच शिल्लक राहिला नाही, तर त्या गोष्टीचं तरी काय करायचं? अंगणाच्या बाबतीतही तसंच होतंय. सिमेंटच्या जंगलात अंगणाला जागाच उरली नाही. अपार्टमेंटच्या संस्कृतीत अंगणात थबकायला कोणाकडे वेळच नाही. पण एकच गोष्ट नव्या स्वरूपात येणं हाही काळाचा सहेतुक महिमा असतो, नाही का? म्हणूनच अंगण गेलं तरी त्या जागी त्यासारखीच गॅलरी आली, गच्ची आली, टेरेस आली आणि त्यापाठोपाठ तिथंही आल्या कुंडय़ा, झाडं, झोपाळे, तुळशीवृंदावनसुद्धा! परंपरा आणि नवता यांचा मेळ घातला की जगण्याला समन्वयाचा आयाम मिळतो. मध्यंतरी तुळशीबागेतून एक छानसं रंगीत स्टिकर आणलं. त्यावर खूप बारकाईनं चितारलं होतं ‘चैत्रांगण’. माझी आजी फार पूर्वी असंच चैत्रांगण सणावाराला अंगणात चितारत असे. चित्रा नक्षत्रावर आकाशात- नभांगणात जे जे काही चमकत असतं तेच हे चैत्रांगण, अशी एक कल्पना आहे. तारांगणच म्हणू हवं तर त्याला! मी ते स्टिकर मोठय़ा उत्साहानं मुख्य दारासमोर जमिनीवर चिकटवलं. त्यावरील चंद्र, सूर्य, शंख, पद्म, गदा, पावलं, नाग, दीप इत्यादी चित्रं पाहून चिरंजीवांची चौकस बुद्धी जागृत झाली. मग त्याला सगळय़ा चिन्हांचे ससंदर्भ स्पष्टीकरण देता देता मला सगळय़ा पुराणकथा, प्रथा, परंपरांचा धांडोळा घ्यावा लागला. माणसानं अनेक प्रतिमांना कसं देवत्व दिलं, त्यात त्याची रसिकता कशी फुलून येते आणि आजही नव्या स्वरूपात स्टिकर डकवून आपण आपली सौंदर्यदृष्टी कशी खुलवतो वगैरे वगैरे मी सांगून टाकलं. चिरंजीवानं त्यातली काही चित्रं बघून त्याच्या वहीत काढली. ती पाहताना डोळे भरून आले. वाटलं, आजीचं ‘चैत्रांगण’ आज नव्या रूपात- नव्या पिढीकडून- पुन्हा माझ्या अंगणात साकारलं.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 5:31 am

Web Title: home and yard
Next Stories
1 सेकंड होमची डोकेदुखी
2 .. तर कार्यकारी मंडळ बरखास्त होईल
3 महाराष्ट्राचा गृहनिर्माण कायदा नक्की कोणाच्या हितासाठी?
Just Now!
X