20 September 2020

News Flash

आयुष्यानं विभागलेली घरं

प्रभाकरपंत मिटल्या डोळय़ांनी त्यांच्या बालपणीच्या चंद्रमौळी घरात पोचले. शेतावरचं ते शाकारलेलं छोटंसं घर. घर कुठलं? केवळ आसरा. सारवलेली जमीन, मध्ये दोन लाकडी खांब,

| February 8, 2014 06:07 am

‘चला.. आता शवासन..’ योगशिक्षिका म्हणाली. योगासनं, प्राणायाम झाल्यावर शवासन करायची वेळ झाली आणि सर्व ज्येष्ठ नागरिक खूश झाले. एकेक जण उताणे झोपले. सखारामबापूंना तर शवासनात चक्क झोपच लागते. त्यालाच ते, ‘समाधी अवस्था’ म्हणतात! वत्सलाकाकू तर घोरू लागतात! प्रभाकरपंत मात्र फारच गंभीर असतात शवासनातही. तर सरस्वतीबाईंना सारखं हसूच येत असतं- कशाचंही!
शवासनाची एकेक पायरी सांगत योगशिक्षिका अखेर म्हणाली, ‘आता असेच डोळे मिटा आणि आपल्या आवडत्या गोष्टीचं स्मरण करा.. एखादी कृष्णाची किंवा गणपतीची मूर्ती.. नाहीतर सुंदर-नितळ तळे, नाहीतर प्रसन्न सूर्योदय.. असं काहीतरी मिटल्या डोळय़ांनी बघा..’ सर्व जण तसा प्रयत्न करू लागले. पाश्र्वभूमीवर मंद स्वरात जलतरंगाची सी.डी.नं वातावरणनिर्मिती झालेलीच होती. ‘त्या दृश्यातच जा. त्यात एकरूप व्हा. तिथलेच व्हा..’ तिचं निवेदन चालूच.
प्रभाकरपंत मिटल्या डोळय़ांनी त्यांच्या बालपणीच्या चंद्रमौळी घरात पोचले. शेतावरचं ते शाकारलेलं छोटंसं घर. घर कुठलं? केवळ आसरा. सारवलेली जमीन, मध्ये दोन लाकडी खांब, आडवे वासे, त्यावर घोंगडं, आईचं लुगडं नि बापाचं धोतर. झावळय़ांच्या छपरातून चंद्र-सूर्य आत डोकावायचे नि पाऊस-ऊन-वारा यांनाही मज्जाव नव्हताच. कंदिलाच्या मंद प्रकाशात चुलीवर भाकऱ्या करणारी आई आणि अंगणात लाकडं फोडणारा बाप! त्या घराला एकच खिडकी होती-चुलीच्या वर. धुरानं काळवंडलेली, लाकडी फळकुटांनी बनवलेलं दार, बाकी छपराला बरीच छिद्रं असल्यानं त्यातून प्रकाश डोकावत राहायचा. दिवसा घडीभर आराम आणि रात्री वेळी वाघा-लांडग्यांपासून रक्षण व्हावं, हे घराचं काम! पण त्याच घरात पाच-सहा भावंडांचा जन्म झाला. पै-पाहुणा आला गेला. सणवार साजरे झाले आणि डोंगराच्या पलीकडे आठ मैल दूर असणाऱ्या वस्तीतल्या शाळेत पोरांचं चौथी-पाचवीपर्यंतचं शिक्षणही झालं.. प्रभाकरपंत मिटल्या डोळय़ांनी त्यांच्या शाळेत पोहोचले.. तर इकडे योगशिक्षिका सर्वाना हलकेच उठवू लागली..
प्रभाकरपंतांना खूपच फ्रेश वाटत होतं. शवासनात ते सत्तर वर्षांपूर्वीच्या त्यांच्या घरी जाऊन आले होते ना! दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. शवासनाची वेळ झाली आणि प्रभाकरपंत तत्काळ उताणे झोपले आणि समाधी अवस्थेत पोचले.. शाळेत असतानाच गुरुजींनी छोटय़ा प्रभाकरला पुढच्या शिक्षणासाठी मोठय़ा गावात जाण्यास सांगितले. मग मामाच्या गावाला राहायचं ठरलं. नवीनच लग्न झालेल्या मामाच्या घरी ते दोन र्वष राहिले. मामाचं घर होतं विटांचं, पत्र्याचं छप्पर. पत्र्याच्याच दोन खिडक्या. खाली शहाबादी फरशी. शिवाय दोन खोल्या. घरात चूल होती. स्टोव्हसुद्धा होता. मामाची बायको सुगरण होती. प्रभाकर अभ्यासात हुशार म्हणून त्याला काहीबाही खाऊ करून द्यायची. विटांच्या चिराचिरांवर पाढे लिहून केलेली घोकंपट्टी त्याला आठवली. सातवीला चांगले गुण मिळाले म्हणून मामानं शाईचा पेन आणला होता, ते आठवून पंतांचा गळा दाटून आला.. ‘चला, आता हातावर हात चोळा, हात डोळय़ांवर ठेवा आणि सावकाश डोळे उघडा..’ योगशिक्षिका म्हणाली. सर्व जागे झाले. हसत हसत सरस्वतीबाईंनी विचारलं, ‘तुम्ही काय आणता हो डोळय़ांसमोर? नाही म्हणजे, खूप फ्रेश दिसताय तुम्ही?’ पंत हसले नि म्हणाले, ‘घर, बालपणीचं घर पाहतो मी.’
पुन्हा नवा दिवस आणि जुनाच खेळ नव्यानं खेळायची वेळ जवळ आली. शवासनात जातानाच पंच पोचले त्यांच्या पौगंडावस्थेतल्या भूतकाळात. सातवीला स्कॉलरशिपला बसायचं म्हणून गुरुजींनी त्याला तालुक्याच्या गावाला जाण्यास फर्मावलं. त्यांची चिठ्ठी घेऊन प्रभाकर गेला एका वकिलाच्या घरी. त्यांच्याच घरी-आऊट हाऊसमध्ये त्यांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आसरा दिला होता. आऊट हाऊस उत्तम होतं. सिमेंट काँक्रिटचं. खाली सुंदर फरशी होती. भिंतीवर एक फळा होता. त्यावर गणितं सोडवण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची. सकाळचं जेवण वकिलांकडे तर रात्रीचं जेवण माधुकरीवर होतं. कितीतरी घरांनी, त्यातील माणसांनी आपल्याला घडवलं.. प्रभाकरला वाटलं. वीज असल्यानं रात्रीही अभ्यास करता येत होता आणि रात्री आईची आठवण आली की आपण खिडकीत बसून तिला पत्र लिहीत असू..
शवासनातून जागे झाल्यावर सरस्वतीबाई हसत हसत पंतांना म्हणाल्या, ‘मी पण आज डोळे मिटून बालपणातल्या घरी जाऊन आले. आमच्या भल्याथोरल्या चिरेबंदी वाडय़ात. पंचवीस माणसांचं घर ते. ओसरीवरच्या झोपाळय़ावर परवचा म्हटला मी आजोबांसोबत! मधल्या चौकात मी फुगडीही खेळले मैत्रिणीसोबत. परसातल्या आडाचं पाणीही शेंदलं मी. मग माजघरात पानं मांडून आईनं आणि मी माधुकरीवाल्या पोरांना जेवण वाढलं..! पंतांनी चमकून पाहिलं आणि तत्क्षणी विचारलं, ‘तू कुलकण्र्याची विमल का?’ सरस्वतीबाई ओळखीचं हसल्या. मग जुन्या आठवणीत दोघंही रंगून गेले. पंतांनी कबूल केलं की त्यांना ती भारी आवडायची.. पण तसं म्हणायची छाती काही झाली नाही.
आता पंत आणि सरस्वतीबाई दोघंही रोजच शवासनात डोळे मिटून आपली वेगवेगळी घरं पाहू लागले. त्या दिवशी योगशिक्षिका काही म्हणायचा अवकाश, पंत पुण्यातल्या त्यांच्या मावशीच्या घरी पोचले. कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी ते मावशीच्या आसऱ्याला आले होते. जुनी चाळ, दोनच खोल्या, सार्वजनिक नळ-संडास आणि पंधरा भाडेकरूंना एकच लाकडी जिना..! खोल्या अंधाऱ्या आणि छोटय़ा. मध्येच लाकडी खांब आणि आडवे वासे, एक छोटा माळा. मावशीची तीन पोरं खूप वांड होती.
आलटून पालटून माळय़ावर दोन पोरांनी झोपायचं आणि दोघांनी गॅलरीत, अशी तडजोड होती. अडचण होती, पण मजा असायची. भांडणं व्हायची, पण जीवही होता भावंडांवर. मावशी प्रेमळ, पण काका कडक होते. मावशीचा ओढगस्तीचा संसार. कष्ट केले, पण कॉलेजचं शिक्षण निभावलं आणि आपण पदवीधर झालो..!! पंतांनी मिटल्या डोळय़ांनी पुन्हा चित्रपट पाहिला..
दुसऱ्या दिवशी पुढच्या घरात भ्रमंती करायची हे ओघानं आलंच. शवासनाचा उच्चार झाला मात्र, पंच पोचले मुंबईला. एका कारखान्यात क्लार्कची नोकरी मिळाली आणि ते एका पारशी बाबाकडे पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले. मुंबईत त्या काळी बऱ्यापैकी शांतता होती. पारशी बाबाचं घर म्हणजे मोठा चौसोपी वाडाच होता- दगडी भक्कम. प्रत्येकाला स्वतंत्र कॉट आणि एक छोटे कपाट. छतावर पंखा म्हणजे तर ऐषच होती. पंतांसोबत सात-आठ चाकरमाने तिथं राहात होते. पारशी बाबा विक्षिप्त होता, पण वेळप्रसंगी मायाही करायचा. पंत थोडे पैसे मनिऑर्डरनं गावी पाठवायचे, त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडे पैसेच नसायचे भाडं द्यायला. मग माफ करायचा आणि एकटाच मद्य पीत बसायचा..!
पुढच्या दिवशी अर्थातच पंत त्यांच्या स्वत:च्या घरात मनानं पोचले. नोकरीत जम बसल्यावर लग्न झालं. दोन मुलं झाली. पै पै साठवून मुंबईतच त्यांनी चार खोल्यांचा फ्लॅट घेतला. घराचं स्वप्न साकार झालं. मुंबईत चार खोल्या म्हणजे चैनच. मोठ्ठा हॉल, स्वयंपाकघर, दोन स्वतंत्र बेडरूम्स.. भरपूर उजेड आणि मोकळी हवा..! सुखी चौकोनी कुटुंब. पण पंत आपल्या म्हताऱ्या आईला गावी नेमानं पैसे पाठवत राहिले. नंतर तर आग्रहानं आईला घरीच घेऊन आले. तिची शेवटपर्यंत सेवा केली. पंचवीस र्वष राहिले ते त्या घरात. पुढे मुलगी लग्न झाल्यानं सासरी नाशिकला गेली आणि मुलगा अमेरिकेत!
‘‘आठ कुठे?’’ दुसऱ्या दिवशी सरस्वतीबाईंनी मिस्कीलपणे विचारलं तर पंत तोऱ्यात म्हणाले, ‘आज अमेरिकेत. लेकाच्या घरी.’ योगशिक्षिकेनं जलतरंगाची सी.डी. लावली आणि पंत डोळे मिटून बर्फानं लपेटलेल्या अमेरिकन घरात पोचले. अत्याधुनिक यंत्रतंत्रानं सजवलेलं सुंदर घर. होम थिएटरवर कुठलासा सिनेमा पाहणारी सून.. नातवंडं इंटरनेटवर व्यस्त. प्रचंड थंडी. साधनांची विपुलता, विज्ञानानं आणलेली सुखं भरपूर, पण माणसामाणसातला संवाद कमी.
पंत जागे झाले आणि त्यांना जाणवलं, की सरस्वती खी खी करून हसतेय..! ‘काय झालं?’ विचारताच ती हसत म्हणाली, ‘अमेरिकेचं विमान उतरलं की नाही भारतात?’ पंत आणि सरस्वतीबाई गप्पा मारत मारत चालू लागले. ‘चल, माझ्या घरी चल, मस्त चहा करतो तुझ्यासाठी.’ सरस्वतीनं सहज होकार दिला.
लिफ्टमध्ये पाऊल टाकताना पंत म्हणाले, ‘अमेरिकन लेकानं इंडियात इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून हा आलिशान फ्लॅट घेतलाय- बाराव्या मजल्यावर. मी एकटाच असतो इथं. पत्नी गेली गेल्या वर्षी..’
चहा पीत पीत दोघांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. पंतांचा आवाज एकाएकी कातर झाला, ‘काळ भाग करतो आपल्या आयुष्याचे. काळानं विभागलेली ही घरं असतात आपली. तक्रार नाही. वस्तुस्थिती आहे. प्रत्येक घराचं अमूल्य देणं असतं आपल्याला. आपण घडतो वास्तूमुळे. ती पाया असते आपल्या अस्तित्वाचा. आपण कृतज्ञ असायला हवं त्या पायाभूत भूमीबद्दल..’
वास्तूनीच म्हणावं तसं सरस्वती वरदहस्त वर करत हसून म्हणाली, ‘‘तथास्तु।’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 6:07 am

Web Title: home divided life
टॅग Life
Next Stories
1 पार्लरची ब्युटी
2 टेम्स नदीकाठचा रम्य परिसर
3 सुधारीत नियमावलीन्वये म्हाडाच्या वसाहतींचे पुनर्वसन
Just Now!
X