|| डॉ. शरद काळे

कोणत्याही गोष्टीतील तंत्र अवगत करण्यासाठी त्या विषयाची मूलभूत ओळख असणे केव्हाही फायदेशीर ठरते. या अलिखित नियमानुसार घरातील किंवा गच्चीवर भाजीबाग फुलवायची असेल तर वनस्पतिशास्त्रातील काही जुजबी माहिती घेणे आवश्यक आहे. हौशी कलाकारांना अनेक वेळा अभ्यास म्हटले की कंटाळा येण्याची शक्यता असते. परंतु आपण इथे जो अभ्यास करणार आहोत त्यामुळे जर आपली बाग अधिक तजेलदार दिसणार असेल तर हा कंटाळा दूर करणे महत्त्वाचे आहे. याशिवाय या अभ्यासामुळे काही गैरसमज दूर होण्यास देखील मदत होणार आहे. कधी कधी नर्सरीमध्ये ज्या गुलाबावर मस्त फुले दिसतात, त्या रोपाला घरी आणल्यावर नंतर कधीच फुले येत नाहीत! इतर फुलझाडांच्या बाबतीत देखील असे प्रकार घडतात. हे का होते? हे समजण्यासाठी देखील या मूलभूत ज्ञानाचा आपल्याला उपयोग होऊ  शकेल.

काही वर्षांपूर्वी बी. बी. सी. वर एक बातमी ऐकली होती, की चीनमधील पूर्व भागात टरबूजाची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांना एक विचित्र अनुभवला सामोरे जावे लागले होते. त्या भागातील टरबूजे शेतातच एकामागून एक फुटू लागली होती! त्यापाठीमागची शास्त्रीय कारणमीमांसा शोधताना असे लक्षात आले की एका विशिष्ट रसायनाचा अतिवापर केल्यामुळे हा प्रकार घडला असावा. या वनस्पतीवर्धक रसायनाचे नाव होते फॉरक्लोरफेनुरॉन! हे कृत्रिम संवर्धक असून रासायनिक प्रयोगशाळेत बनविले जाते. चायनीज शेती विभागाने या रसायनामुळे टरबूज स्फोट झाला असा निश्चित निष्कर्ष त्यातून काढला नव्हता तरी त्यामुळे ही बाब कृषीक्षेत्रात उत्पादनवाढीसाठी जी विविध रसायने वापरली जातात ती योग्य की अयोग्य या चर्चेला गती देऊन गेली असे नक्कीच म्हणता येईल.

आजकाल सामाजिक माध्यमांमुळे समाजात अनेक अशास्त्रीय आणि चुकीच्या गोष्टी सहजपणे पसरविल्या जाऊ  शकतात. अर्धवट ज्ञान आणि सामाजिक माध्यमांवरील अंध आणि फाजील विश्वास यामुळे त्यावर विश्वास ठेवला जातो. त्यातील सत्य पारखून न घेता त्यात स्वत:चा मसाला मिसळून अधिक रंगवून या अफवांच्या बातम्या होतात. म्हणूनच हा अभ्यास गरजेचा ठरतो. बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यांचा सुकाळ दिसतो. त्यामुळे चायनीज मार्केटमधून त्या भाज्या येत आहेत, त्यावर तऱ्हतऱ्हेचे विषारी फवारे मारलेले असतात, त्यामुळे प्रकृतीला हानी पोहोचते अशा प्रकारच्या पोस्ट वाचायला मिळतात. त्या अतिरंजित स्वरूपात असल्यामुळे त्यावर सहज विश्वास देखील टाकला जातो. त्यावर मात करण्यासाठी हा मूलभूत अभ्यास नक्कीच मदत करू शकतो.

वनस्पतीच्या वाढीसाठी जी रसायने मदत करतात त्यांना वनस्पती संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जशी हॉर्मोन्स किंवा संप्रेरके असतात तशीच ही वनस्पती संप्रेरके असतात. या संप्रेरकांचा उपयोग वनस्पतींच्या वाढीसाठी तर होतोच, शिवाय वनस्पतींच्या उत्पादनवाढीसाठी देखील त्यांचा सहभाग मोठा असतो. या संप्रेरकांचे जे पाच प्रकार आहेत त्यांची नावे ऑक्सिन्स, जिबर्लिन्स, सायटोकायनिन्स, अ‍ॅबसिसिक आम्ल आणि एथिलीन अशी आहेत. या सर्वाचा वनस्पतींच्या वाढीसाठी आणि उत्पादनक्षमतेशी निकटचा संबंध असतो. एथिलीन या संप्रेरकाची फळांच्या पिकण्यासाठी गरज असते, तसेच फुलांच्या परिपक्वतेसाठी देखील असते. पण उती संवर्धनासाठी जे तंत्र वापरले जाते त्यात मात्र एथिलीन वापरले जात नाही ही बाब ध्यानात ठेवायची आहे.

ऑक्सिन्स- या प्रकारच्या संप्रेरकांमुळे वनस्पतींच्या पेशींची वाढ होण्यास मदत होते. तसेच मूळ निर्मिती, उती निश्चितीकरण, विविध बा सादांना प्रतिसाद, शिखर पेशींचे वर्चस्व राखून होणारी वाढ आणि कळ्या, फुले आणि फळे यांच्या वाढीस साहाय्य हेही त्यांचे कार्यक्षेत्र असते. खोडामध्ये आणि मुळांच्या शिखर पेशींमध्ये यांची निर्मिती होते आणि वनस्पतींच्या अक्षांमधून त्यांचा पुरवठा इतर भागांना केला जातो. या गटातील प्रमुख रसायने म्हणजे इंडॉल ३ असेटिक आम्ल (कअअ) हे आहे. या मूळ रेणूपासून बनविलेली अनेक संयुगे असून, त्याची प्रयोगशाळेत निर्मिती करता येते व ती बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची फवारणी वनस्पतींवर केली तर त्यांचे रूपांतर मूळ आय. ए. ए. मध्ये होते आणि त्याची नैसर्गिक क्रिया सुरू होते. त्यांचा वापर मुख्यत: उती संवर्धनात कॅलस निर्मितीसाठी केला जातो तसेच मूळ आणि खोडाच्या घडणीत होत असतो.

सायटोकायनिन्स- पेशींच्या वाढीसाठी आणि गुणनासाठी आणि उती संवर्धन तंत्रात खोड आणि मुळांच्या घडणीसाठी या गटाच्या संप्रेरकांची गरज असते. ऑक्सिन्सच्या क्रियांना ही संप्रेरके रोखू शकतात. उती संवर्धनात जी सायटोकायनिन्स वापरतात त्यात झियाटीन, एडेनिन आणि कायनेटिन यांचा समावेश आहे. सायटोकायनिन्समुळे मूळ आणि गर्भजनन यांच्या निर्मितीस प्रतिबंध होऊ  शकतो.

जिबर्लिनस-  खोडाची उंची वाढविणे हे जिबर्लिनस या गटातील संप्रेरकांचे महत्त्वाचे कार्य आहे. तसेच फुलांच्या निर्मिती आणि वाढीसाठी देखील या संप्रेरकांची आवश्यकता असते. बीजांकुरण होत असताना आणि गर्भाची वाढ होत असताना त्यासाठी जो अन्नसाठा राखीव ठेवलेला असतो, तो त्या वाढत्या गर्भाला उपलब्ध करून देण्यात या गटातील संप्रेरके महत्त्वाचे कार्य बजावतात. जिबर्लिन गटातील ८० पेक्षा अधिक संयुगे वनस्पतींमध्ये आढळतात. पण त्यातील जिब्रालिक आम्ल (जी ए ३) आणि जी ए (४+३) या दोन संयुगांचा वापर उती तंत्रात आणि आपल्या घरच्या बागेत केला जातो. उती तंत्रात जिबर्लिनसचा वापर आगंतुक मुळेनिर्मितीसाठी केला जातो.

अबसिसिक आम्ल- टरपेनॉईड जातीचे हे संयुग असून तया संप्रेरकांचे कार्य बीजांकुरणाशी जोडलेले असते. बीजातील प्रथिनांचा साठा बनविण्यात आणि वनस्पतींना जलताण सहन करायला मदत करण्यात देखील त्यांचा सहभाग असतो. उती संवर्धनात यांचा उपयोग पेशीय भ्रूणजननासाठी आणि बीजांकुरणासाठी होत असतो.

एथिलीन- रासायनिकदृष्टय़ा एथिलीन हा हायड्रोकार्बन जातीचा रेणू आहे. या संप्रेरकाचा उपयोग वनस्पतीच्या वाढीसाठी होत नाही, पण त्याचा परिणाम मूळ आणि खोडाच्या घडणीवर होऊ  शकतो. फुलांच्या आणि फळांच्या परिपक्वतेसाठी त्याचा सहभाग असतो. उती संवर्धन तंत्रात या संप्रेरकाचा अजिबात वापर केला जात नाही.

या पाच गटांच्या अतिरिक्त अजून बरीच संप्रेरके विविध वनस्पतींमध्ये आढळून येतात. पण आपल्या गच्चीवरील बागेसाठी इतक्या खोलवर अभ्यासाची आपल्याला सध्या तरी गरज नाही. कोणती संप्रेरके कधी कार्यान्वित होतात ही जुजबी माहिती सध्या तरी पुरेशी आहे.

चांगले बीज आणि योग्य बीजांकुरण होणे या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे प्रत्येक वेळी खरेच असते. बीजांकुरण म्हणजे मातीच्या कुशीत ठेवलेल्या बीजापासून होणारी नवनिर्मिती. त्यासाठी पाण्याची आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते. बीज पाणी शोषून घेते. या पाण्यामुळे बीजगर्भातील प्रथिने आणि विकर यांना चालना मिळते आणि त्यामुळे त्यातील अन्न आता तयार स्थितीत येते. बहुतेक सर्वच बीजांना बीजांकुरणासाठी अंधार पोषक असतो. कांद्यासारखी काही बीजे प्रकाशात उगवतच नाहीत. तर बेगोनिया, कोलीयस यासारख्या वनस्पतींच्या बिया फक्त प्रकाशातच रुजतात. एकदा बीजांकुरण झाले की मग सर्वच रोपांना प्रकाशाची गरज असते. जोपर्यंत बीजांना पाणी, तापमान आणि चांगली व भुसभुशीत माती मिळत नाही तोपर्यंत ती रुजत नाहीत. युरोपमधील कडक हिवाळ्याच्या सुरुवातीला बिया पेरल्या जातात. अतिशय कडक थंडीत या बिया जमिनीखाली अगदी सुरक्षित राहतात. वसंताची चाहूल लागताच तापमान अनुकूल होऊ  लागते आणि बर्फ वितळून ते पाणी बियांना मातीतून मिळते आणि मग बीजांकुरणासाठी योग्य ती परिस्थिती निर्माण होऊन कोंब जमिनीतून वर येऊ  लागतात. ही प्रक्रिया सुरू असताना बीजगर्भातील साठविलेले अन्न वाढणाऱ्या कोंभास उपयोगी पडते आणि मग नवी कोवळी पाने प्रकाशसंश्लेषणाने वाढीसाठी आवश्यक ते अन्न तयार करू लागतात. जर जमिनीतील पाण्याचे प्रमाण अधिक झाले तर बिया उगवतच नाहीत हेही ध्यानात असू द्यावे. या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला बिया पेरताना पुढील काळजी घ्यावी लागेल :

  • जर बिया मातीत रुजवायच्या असतील तर माती भुसभुशीत तर हवीच, पण चांगली चाळलेली देखील हवी असते. म्हणजे त्यात ऑक्सिजनची मात्रा कमी राहत नाही.
  • बिया लावताना त्यांची गुणवत्ता चांगली आहे याची खात्री करून घ्यावी.
  • बिया लावताना दोन बियांमध्ये योग्य अंतर असावे.
  • बिया पेरताना त्यांचा संपर्क मातीशी व्यवस्थित सर्व बाजूंनी आला पाहिजे.

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.