पाण्यात पडलेली प्रतिबिंब हलक्याशा झुळकेने हलतात. अंधुक प्रकाशात आणखीच वेगळी भासतात. तसेच साहित्यकृतीतून दिसणाऱ्या वास्तू वाचकागणिक वेगवेगळ्या भासतात. ऐसपैस भव्य वा खुज्या वा किरटय़ा. कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट! साहित्यकृतीतून मनापुढे उभारत जाणाऱ्या वास्तूंविषयीचं सदर.
बरीच र्वष झाली. मालगुंडला गेलो होतो तेव्हा केशवसुतांचं घर पाहिलं. गड-किल्ल्यांवर जसं ‘इथून शिवाजीचा घोडा दौडला असेल, त्यांच्या पायाचा स्पर्श या मातीला झाला असेल,’ असं वाटून ना-ना प्रकारच्या भावनांचा कल्लोळ उठतो, तसं काहीसं ते घर पाहून झालं. साधंसुधंच. पुढे अंगण, ओसरी, जांभ्या दगडाचा बांध असलेलं, शेणा-मातीनं नीट सारवलेलं, गावातलं मध्यमवर्गीय घर! पण प्रतिभावान कवीचा वावर असलेलं! या घराच्या मागल्या दारी गेल्यावर अंगावर उधळण करणाऱ्या निसर्गाला पाहिलं आणि त्यांच्या अनेक कवितांचं रहस्य उलगडतंय असं वाटायला लागलं. आम्ही एम.ए.ला असताना आमच्या सरांच्या ओळखीने कुसुमाग्रजांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांना प्रत्यक्ष भेटणं, त्या वास्तूत प्रवेश करणं हा आम्हा १५-२० जणींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. एवढी र्वष झाली, पण त्या ग्रुपमधलं कोणीही भेटलं की या प्रसंगाची आठवण अजूनही निघतेच निघते.
‘लेखकाचं घर’ या पुस्तकातून अनेक लेखकांच्या घरांची ओळख अंतरंगातून झाली. ‘आहे मनोहर तरी’ वाचताना एक संदर्भ कळला की, मुंबईत कुसुमाग्रजांचं वास्तव्य एका छोटय़ाशा खोलीत होतं. खरं तर मुंबईत पाय रोवण्यासाठी ही खोली, पण तिथे कोण कोण येऊन गेलं हे कळलं तेव्हा ती छोटी खोली ताजमहालपेक्षा ‘भारी’ वाटायला लागली आणि जगप्रसिद्ध वास्तूंपेक्षा ती दहा बाय बाराची खोली पाहण्याची ओढ लागली.
विजया राजाध्यक्ष यांनी विंदा करंदीकरांची एक दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्यात कळतं की, स्वत: सुतारकामात मुशाफिरी करून विंदांनी एक स्टूल उंच करून घेतलं आहे. त्यावर बसून त्यांनी पाहिलेला भोवताल, खालून जाणाऱ्या मित्रमंडळींना केलेले अभिवादन! तर त्यांच्या कारागिरीचं गॅलरीतलं ते स्टूल पाहावंसं वाटतं.
‘बापलेकी’मधल्या काही लेखांमधून बापलेकींच्या विविध रंगांच्या नात्याबरोबरीनंच उभं राहतं ते त्यांचं घर! रा. चिं. ढेरे यांचं लहानसं भाडय़ाचं घर. मधल्या खोलीत सतरंजी टाकून बसलेले रा. चिं., भोवताली पुस्तकांचा पसारा. तिथूनच धावणाऱ्या, खेळणाऱ्या मुली. घरात पलंगाखेरीज दुसरं काही नाही, पण मोठी श्रीमंती म्हणजे छतापर्यंत भिडणारी ओळीनं लावलेली पुस्तकं! आणि अशा या घरात वर्दळ असायची ती माडगूळकर, पु. भा. भावे, बा. भ. बोरकर, सिद्धेश्वर शास्त्री यासारख्यांची! त्यामुळे व्यावहारिक जगाच्या दृष्टीने नसेल, पण हे घर समृद्ध, श्रीमंत झालं होतं. ते निदान पाहावं, असं वाटणार नाही का?
त्यांच्या घरात संशोधनात्मक, गंभीर लेखन-वाचनाची परंपरा असताना घरातल्या तरुण मुलीनं दारा-भिंतींवर रेखा-अमिताभ यांचे फोटो, कॅलेंडर्स लावले तर त्याला हे घर हरकत न घेता ‘घर मुलांचंही आहेच ना’ अशी समजूत व्यक्त करतं.
आत्मवृत्तात्मक लेखनातून खऱ्या वास्तू, खरी माणसे डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यांना आधीचाच एक मनीमानसी आकार असतो, पण तरीही मूळच्या खऱ्या खुऱ्या वास्तूपेक्षा ही मनासमोरची वास्तू वेगळीही असेल. पण त्यांच्या लेखनातून ती माणसांगणिक वेगवेगळी दिसू लागते.
कथा, कादंबऱ्या, नाटकं इतकंच नव्हे तर काही कवितांमधूनही एक वास्तू डोळ्यांसमोर साकारली जाते. हे सर्व विश्व कल्पनेतलं असूनही, कधी ती धूसर असते आणि त्या घरातली माणसं म्हणजे कथेतल्या व्यक्तिरेखा ठसठशीतपणे उभ्या राहतात. तर कधी ती वास्तू छोटय़ा-मोठय़ा तपशिलांसह ठळक उभी राहते. व्यक्तिरेखा बरोबरीनंच सामोरी येते आणि तेव्हा ती केवळ दगड-विटांची राहत नाही तर तिच्याशी अनुबंध असलेले रंग-रूप, गंध, नाद यांच्यासह येते. प्रसन्नता-उदासी, भकासपण, शांती-समाधान, सुरक्षित-ऊबदार की कलह-वादावादी हे गुणधर्म जोडलेले असतात. एखादा सुखाचा सांदिकोपराही उजळलेला दिसतो.
एखाद्या घरातून शुभंकरोती ऐकू येईल तर कुठून संगीताची लकेर! एखाद्या ‘गिधाडे’सारख्या घरातून शिव्या तर दुसऱ्या एखाद्या घरातून ओव्या-अभंग ऐकू येतात आणि मग आपल्या मनाच्या पायावर ती वास्तू उभारत जाते.
काही कलाकृतींमध्ये ही वास्तू मध्यवर्ती असते. तिचं आणि व्यक्तिरेखांचं नातं अभिन्न असतं. इतकं की,
‘‘पावसात कोसळलेल्या बंगल्याला
पावसानं म्हटलं,
माझ्या मनात असं नव्हतं..
बंगला म्हणाला,
तू तर निमित्तमात्रच!
माणसातून आधीच कोसळलो होतो
चिऱ्यातून आज कोसळलो.’’ – (निरंजन उजगरे)
घरांनाही माणसांचं वागणं बोचतं-टोचतं किंवा सुखावतं. माणसांना आपलं स्वत:चं घर असावं अशी ओढ असते. एवढय़ा मोठय़ा विश्वातून कोरून काढलेल्या एका छोटय़ाशा अवकाशावर आपली नाममुद्रा उठवायची असते. त्या घराला एक वैशिष्टय़ द्यायचं असतं. माणसागणिक घरांचे स्वभावही वेगवेगळे असतात आणि अशी ही घरं साहित्यातून सामोरी येतात. ती आपल्यापुढे आणण्याचा एक अल्पसा प्रयत्न. यातूनच वाटलं की, ती ती मूळ कलाकृती वाचून पाहावी. आधीच वाचली असेल तर परत वाचावी. तर ती एक आनंदाची गोष्ट! कदाचित एक वेगळी वास्तू वा तिचा वेगळाच पैलू आपल्याला जाणवेल, सामोरा येईल.