स्वयंपाक खोली तुलनेनं थोडी अंधारी. स्वयंपाकाची बैठी ओटी. तिच्यावरच्या फडताळात हाताशी लागणारं सामान. दुसऱ्या भिंतीला कपाट त्यात मोठी पातेली, जास्तीची ताटं-वाटय़ा वगैरे नंतर मांडणी. त्यावर घासून आलेली भांडी उपडी घातली जात. नंतर जाळीचं कपाट. त्यात दूधदुभतं, उरलेलं अन्न, चटण्या, लोणची वगैरे तसंच वडय़ा वगैरे केल्या असतील तर त्या ठेवत. दरवाजाच्याच भिंतीला लांबलचक संदुक. त्याला तेच ते मोठ्ठं वेगळंच कुलूप आणि त्याची वैशिष्टय़पूर्ण किल्ली!
तेव्हा आम्ही गिरगावात राहत होतो. ती जागा अगदी मजेदार होती. म्हणजे ओटीच्या पायऱ्या उतरल्या की थेट फूटपाथच! त्यामुळे तो फूटपाथ हेच आमचं अंगण! रुंदीला कमी आणि लांबलचक अगदी अंतहीन!
खरं तर ही त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे वाडीच म्हणता येईल, पण नाव होतं चायना-बाग. इथली घरं मात्र वाडीप्रमाणे बैठी वा एकमजली नसून ३/३ मजल्याच्या पक्क्या बांधणीच्या इमारती होत्या. इथली वस्ती गुजराथी होती आणि पुढे याचे मालकही गुजराथीच झाले. आमच्या घराच्या उजव्या हाताला एक मोठे मैदान होते आणि सगळ्यात डावीकडे शेवटी आम्ही. तिथेच गावाची वेस असावी तसं भलं मोठं प्रवेशद्वार होतं. हे दार लोखंडी जाळीचं उघडबंद होणारं होतं. पहाटे पहाटे हे दार उघडलं जाई. त्याला दणकट लोखंडाचा उंबरठा असल्यामुळे वाहनांची वाहतूक अजिबात नव्हती. त्यामुळे ठिक्कर, पकडा-पकडी हे खेळही खेळता येत. शिवाय सगळ्यात शेवटी असल्यामुळे जो एक मोठ्ठा कोपरा मिळाला होता तिथे बाजलं घालून वाळवणंही घातली जात. प्रवेशद्वाराच्या बाहेर पडल्याबरोबर भलाथोरला विठ्ठलभाई पटेल रोड. आमच्या समोरच्या बाजूची घरं या रस्त्यावर उघडत. अर्थात तिथे वेगवेगळे व्यवसाय चालत. दर्जी, हॉटेल, वाणी यांचा कामाचा भाग मागल्या दारी होता. म्हणजे शिलाई मशीन्स, भटारखाना, गोडाऊन इ. वरच्या मजल्यांवर या दुकानमालकांची कुटुंबं राहात. आमच्या लगत चहाचे मोठे लाकडी पेटारे भरलेले गोदाम होते. आमचं घर हा त्या गोदामाचाच एक भाग होता. त्यामुळे इतर घरांच्या मानाने त्याचं छत खूप उंच होतं. शिवाय खूप उंचावर गोलाकार काचा लावलेल्या खिडक्या होत्या त्यातून सगळीकडे सदैव भरपूर उजेड असे त्यामुळे १५ माणसांचं गजबजलेलं कुटुंब असूनही गर्दी-गर्दी वाटत नव्हती आणि एक प्रसन्नता घरात असे. त्या वेळच्या चाळीतल्या दोन खोल्यांच्या मानाने तर हे घर म्हणजे महालच होता.
व्हरांडय़ात समोरासमोर थोडे उंचच आणि रुंद असे दोन ओटे होते. एकाची खालची पोकळी बंद करून त्यात सर्वाच्या चपला होत्या आणि दुसऱ्या ओटय़ाची पोकळी भातुकली खेळायला रिझर्व केली होती. या ओटय़ावर सागर गोटय़ांचा डाव रंगायचा. शिवाय ती सुप्रसिद्घ एकमेव ‘लाकडी ठकी’ असायची. या बाकांवर आल्या गेल्यांची नेहमीच ऊठबस असे. बायका मात्र आत बसत. हे ‘आत’ म्हणजे कांद्याच्या पात्यांसारखं होतं. व्हरांडय़ाच्या मागे असलेल्या मोठय़ा दिवाणखान्याचे ३ भाग केले होते. त्यात पुढल्या भागात शिवण-मशीन होती. आजोबा इतरांचे कपडे शिवत. त्यांची देवघेव तिथेच चाले. तिथे भलंथोरलं काळंभोर शिसवी कपाट पाठ करून ठेवलं होतं. त्या कपाटाच्या आडोशाने २ भाग केले होते. तिथे जरा मोठय़ा असलेल्या आत्यांच्या गुजगोष्टी चालत. त्यांच्या मैत्रिणीही तिथेच बसत. कपाटाची पुढची बाजू या भागात उघडे. कपाटाला मोठाले खण होते. त्यात आपापले कपडे आणि शाळेची पुस्तकं. त्याच कपाटाला आरसा होता. एक फळी बाहेर यायची सोय होती. त्याच्यावर कोणी पत्र वा हिशोब लिहीत बसत. आरशामागेही लहान लहान खण होते. त्यात फणेरपेटी असे. इथे आडवा पडदा लावून तिसरा भाग तयार झाला होता. त्या भागात मोठ्ठा पलंग. त्या पलंगावर सर्वाची अंथरुणं, पांघरुणं, गाद्या घालून तो दिवसभरासाठी एवढा उंच होई की त्यावर चढण्याकरता एक बैठं स्टुल ठेवलं होतं. पलंगासमोरची जागा मोकळी होती. नातलग बायका काकी-मामी इथे आजीला भेटत. निवडणं-टिपणं, शिवण इ. तसंच कधी जरा पाठ टेकायची असेल तर ती याच भागात.
त्याच्या मागे स्वयंपाक खोली. ही तुलनेनं थोडी अंधारी. स्वयंपाकाची बैठी ओटी. तिच्यावरच्या फडताळात हाताशी लागणारं सामान. दुसऱ्या भिंतीला कपाट त्यात मोठी पातेली, जास्तीची ताटं-वाटय़ा वगैरे नंतर मांडणी त्यावर घासून आलेली भांडी उपडी घातली जात. नंतर जाळीचं कपाट त्यात दूधदुभतं, उरलेलं अन्न, चटण्या, लोणची वगैरे तसंच वडय़ा वगैरे केल्या असतील तर त्या ठेवत. दरवाजाच्याच भिंतीला लांबलचक संदुक. त्याला तेच ते मोठ्ठं वेगळंच कुलूप आणि त्याची वैशिष्टय़पूर्ण किल्ली! यात चांगल्या भरजरी साडय़ा-पैठण्या, रेशमी कद-पितांबर, जरीच्या टोप्या, चांदीची भांडी असत. या संदुकीवर पातळशी गादी होती. त्यामुळे ती पेटी न वाटता दिवाण वाटे. आजीची ऊठबस तिथेच. तिथे बसून वाल-वाटाण्याच्या शेंगा सोलायच्या, कधी काज-बटणं, हातशिलाई करायची. सुनांच्या कामावर देखरेख, सूचना, जेवायला बसलेल्या मुलांवर लक्ष ठेवणं हे करायची. कधी फार धावपळ होतेय असं वाटलं तर चुलीचा ताबा घ्यायची. सणावाराला, मोदक-पुरणपोळ्यांच्या स्वयंपाकाला मात्र ती पहिल्यापासून असायची. त्या वेळी कान असलेली लोखंडी कोळशाची शेगडी असायची. आतमध्ये जाळी. खालच्या कप्प्यात मुलांना बटाटे, रताळी, कांदे खमंग भाजून दिले जात. या शेगडय़ा उपवासांच्या दिवसात धुतल्या जात. मंद आचेसाठी भुशाचीही एक शेगडी होती. आजीकडून प्रथा-परंपरा सर्वाच्या आवडी सुनांना कळत.
स्वयंपाकघरातच मोरी होती. तिथे मोठय़ांच्या अंघोळी होत. मुलांच्या आंघोळी मागच्या गॅलरीत. ही मागची गॅलरी चौकोनात फिरली होती. डावीकडच्या भागात सामाईक नळ वगैरे. बाकीच्या तिन्ही बाजूंना घराची मागची बाजू. त्यामुळे मध्ये एक चौक झाला होता. त्याला शेरी म्हणत आणि सर्व जण वरून खाली त्यात बिनधास्त कचरा टाकत, पण कोणालाही त्यात काही गैर आहे असे वाटत नसे. आम्ही तळमजल्यावर असल्यामुळे त्याचा काही तरी त्रास आम्हाला होतच असेल, पण त्याची जाणीव नसावी. या चौकात उतरायला तिन्ही बाजूंनी पायऱ्या होत्या. खरं तर चौक स्वच्छ ठेवला असता तर आम्हाला खेळायला, मोठय़ांना उठा-बसायला चांगलं अंगण झालं असतं, पण ‘उपरसे कायकू कचरा फेकता है’ ही बंबय्या हिंदी उगवली नव्हती आणि स्वच्छता, हक्क हेही नव्हतं. दररोज सकाळी सफाई मात्र केली जात असे.
या घरात बालपणाचाच काळ गेला. तरीही आठवायलाच बसल्यावर एकेक पदर उलगडत गेला. मग आमची आंग्रेवाडीची शाळा- तिचं नाव हिंद विद्यालय असावं पण ती ‘आंग्रेवाडी’ म्हणूनच प्रसिद्ध होती. त्या शाळेत जाण्यापूर्वी ओळीनं चौघी-पाचजणींची वेणीफणी! दोघी-तिघी आत्या माझ्या बरोबरीच्या आणि एक मोठय़ा आत्याची मुलगी. ही आत्या विधवा झाल्यावर आमच्याकडेच राहायची. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी तिला शिक्षण द्यावं असं माझ्या वडिलांनी-दादांनी ठरविलं. माझ्या आईने त्या वेळी या सहा महिन्यांच्या मुलीला सांभाळलं, पण तेव्हा ‘नोकरी कशाला पाहिजे तिला? चार-चार भाऊ आहेत तिचे’ हे दादांना ऐकून घ्यावं लागलं होतं, पण दादा किती बरोबर होते हे बदलत्या काळानेच सांगितलं.
पलीकडच्याच कोळीवाडीत राहणारा माझा बापू मामा सायकलवरून मला आजीकडे नेण्याच्या निमित्ताने इथे येई. ओटीवरच जरा बसे. आईला गुपचूप एक पुस्तक देई. आई तितक्याच गुपचूप वाचून झालेलं पुस्तक त्याला देई. हा सगळा चोरीचा मामला माझ्या समोरच होई. हे पुस्तक आई भल्या पहाटे उठून किंवा रात्री जागून वाचत असे. स्वयंपाक पाणी झाल्यावर दुपारी निवडणं- टिपणं वा शिवणकाम- वीणकाम- भरतकाम करावं, अशी अपेक्षा असे. वाचन मंजूर नव्हतंच सासूरवाशिणीला! हे कळायचं माझं वय नव्हतं. त्यामुळे ‘वाचन’ ही काहीतरी गंमत आहे नक्की! पण ती इतरांपासून चोरून-लपून करावयाची गोष्ट आहे, अशी माझी समजूत झाली. आईच्या कादंबऱ्या त्या मोठय़ा पलंगाखाली जाऊन वाचायला सुरुवात केली. ‘क’ ‘कालिका मूर्तीचा’ आणि ‘र’ ‘रायक्लबचा’ झाला. यथासांग हे उघडकीला आलंच! प्रचंड घाबरून गेले आता काय होणार? पण आईसाठी ज्याला बंदी होती त्या ‘वाचना’ने माझ्या वाटय़ाला कौतुक आलं. मात्र त्यानंतर माझ्यासाठी लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं यायला लागली.
आजूबाजूला गुजराथी वस्ती असल्यामुळे त्यांच्या वर्तमानपत्रातल्या चित्रकथाही वाचता यायच्या. याच ओटीवर काही गुजराथी बायका १५/१५ किलोचे मोठाले पत्र्याचे डबे घेऊन यायच्या त्यात कापूर असे. तो कापूर नीट चौकोनी कागदात पॅक करायच्या. उरलेलं थोडं काम करून पाणी पिऊन जायच्या. जाताना तुटके-तुटके कापराचे तुकडे आमच्या हातावर ठेवायच्या. त्यामुळे ‘चायना-बाग’चं घर म्हटलं की या कापराचा सुगंध घेऊनच येतं. दारावरून चिनी माणसं कापडाचे गठ्ठे घेऊन जायची, कधी तो सुप्रसिद्ध ‘काबुलीवाला’ही सुकामेवा घेऊन यायचा. सिगारेटची जाहिरात करणारी २-३ माणसं नेव्हीतल्या सारखा पोशाख करून अगदी उंच होऊन येत. ती काठय़ांवर चालतात हे माहीत नसल्यामुळे ‘अबब! केवढी उंच माणसं ही’ असं पुस्तकातल्यासारखं म्हणायचो.
त्या वेळी श्रावणी सोमवारची अर्धी सुट्टी शाळा आणि ऑफिसेस नाही असे वातावरण. ग्रहण संपल्यावर अंघोळ करण्याची प्रथा काटेकोरपणे असल्यामुळे नळाचं पाणी त्या वेळी मुद्दाम सोडत, पण याच ग्रहणाची एक आठवण म्हणजे ‘दे दान सुटे गिरान’ म्हणणाऱ्या बाईच्या पल्लेदार आवाजाच्या लोभात पडून माझी आतेबहीण तिच्याबरोबर गेली. त्या बाईने तिच्या कानातले डूल आणि पायातली पैंजण काढून घेतली. खूप शोधल्यावर बहीण सापडली. सुखरूप होती याचाच आनंद सर्वाना जास्त झाला, पण तेव्हापासून सतत ‘अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही’ हा धडा गिरवावा लागला.
रविवारी संध्याकाळी चौपाटीवर दादा आईला घेऊन फिरायला जात. बरोबर दोन आत्या, आतेबहीण आणि मी असायचो. बायकोबरोबर फिरायला जाणं तितकंसं संमत नव्हतं. त्यामुळे हा मध्यम मार्ग असावा.
वाळूचेच खेळ, घरं बनवणं, गारुडय़ाचा खेळ पाहणं, दोरखंडावरून चढणारा मुलाची जादूही असायची. शंख-शिंपले गोळा करीत असू, पण आता हरपून गेलेली गोष्ट म्हणजे ‘तांदूळमणी’! चौपाटीवर ते खूप मिळायचं. त्याच्या माळा बनवायच्या. त्या ‘ठकी’ला आणि आपल्याही गळ्यात घालून ‘मिस युनिव्हर्स’ असल्याच्या तोऱ्यात घरभर हिंडायचं.
दादा कधी कधी उसाच्या गंडेप्या, खारेदाणे असं घेऊन देत. आजीला हे कळलं की ती आईजवळ धुसफुस करी. ‘बाहेरचं कसलं खाता? ती माणसं कोण-कुठली?’ आता कळतं ती एक घसरणीची सुरुवात होती. सत्त्वयुक्त स्वच्छ खाण्याचा आग्रह होता. त्या पिढीला कळत होतं, पण नीट मांडता येत नव्हतं.
घराजवळच ‘पॅटिट’ धर्मार्थ दवाखाना, देशमुख लेनमध्ये वैद्य देशमुख, मैदानातून बाहेर पडल्यावर ‘चंदाराम’ नाथीबाई कन्याशाळा होत्या, ‘व्यंकटेश मंदिर’, ‘काळाराम मंदिर’मध्ये नामवंताची कीर्तनं, प्रवचन, गायन होत असे. सोनोपंत दांडेकर, वझेबुवा, कऱ्हाडकरबुवा, बालगंधर्व, अब्दुल करीम खाँ अशी दिग्गज मंडळीही येऊन गेलीत. काका-मामा, आजी कोणी तरी या अशा कार्यक्रमांना घेऊन जात असे. तेव्हा या माणसांच्या उत्तुंगपणाची जाणीव नव्हती, पण अजाणतेपणीही मनावर प्रभाव पडतच होता.
अशा या परिसरातून आम्ही डोंबिवलीला गेलो. मला काही फरक पडला असेल असं वाटत नाही, पण आई-दादांना नक्कीच पडला असेल.   
मीना गुर्जर -meenagurjar1945@gmail.com