मनात घर करून राहिलेल्या घराला आपल्या मनाइतकंच सुंदर सजवायचं, खुलवायचं असतं. घर छोटं असलं तरी चालतं, पण त्याला सजवणारं मन मात्र मोठं असावं लागतं. आपल्या छोटय़ा घरातच मोठय़ा मनानं सौंदर्याचा साक्षात्कार घडवायचा असतो. तेव्हाच आपल्या मनातलं घर हवं तसं तयार होऊ  शकतं आणि घरातल्या मनाला त्याचा आनंद मिळू शकतो.
दैनंदिन जीवनात निरनिराळे प्रसंग, अनुभव येत असतात, की ज्यामुळे आपली मानसिकता बदलत असते. या बदलत जाणाऱ्या मानसिकतेच्या अनुषंगाने गृहसजावट करण्याची आवश्यकता असते. अर्थात सरधोपटपणे केलेल्या कामात इतका विचार केलेला नसतो. पण आपल्या मनातल्या घराच्या सुंदरतेसाठी तसा अभ्यासपूर्वक विचार होणं आवश्यक असतं. घर केवळ चार भिंतींचं नसतं, घराचं घरपण आपण मिळवायचं असतं. त्या घरात मनाला रमवायचं असतं. आपल्याच घरात रोज नवं काही तरी आजमावायचं असतं. मनाला रमवण्यासाठी आणि नवं आजमावण्यासाठी गृहसजावटीत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो.    
गृहसजावटीसाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोन :
आपल्या घराचा संबंध आपल्या मनाशी असतो; तसंच घराच्या अंतरंगाचा संबंध त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं असतं. आपलं स्वत:चं, हक्काचं, आपल्या स्वप्नातलं असं घर, की जे नेहमीच आपलं वाटत असतं केवळ आपल्या अंतर्मनातील भाव भावनांमुळे. आपल्या मनातलं घर आणि घरातलं मन हे कधीही एकमेकांपासून वेगळं होऊ  शकत नाही. त्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टिकोनांतून गृहसजावट करणं आवश्यक ठरतं. यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करावा लागतो. प्रत्येक कौटुंबिक सदस्याच्या मानसिकतेचा अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे आवडी-निवडी, अपेक्षा, गरजा, शारीरिक व्यक्तिमत्त्व हे निराळं असतं. त्याप्रमाणे त्याला साजेसं, शोभेल असं गृहसजावटीचं काम होणं निश्चितच उपयोगाचं ठरतं. विविध रंग, वस्तूंचे विविध आकार, निरनिराळे प्रकार, त्यांची कल्पकतेने केलेली मांडणी अशा अनेक बाबींचा थेट संबंध आपल्या मनाशी येत असतो आणि त्यामुळेच त्याचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात आपल्या मनावर होत असतो.  
कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मानसिकता :
व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे एकाच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, सवयी, मानसिकता हीदेखील भिन्न असते. या भिन्न-विभिन्न मानसिकतेचा विचार करून एकता निर्माण करावी लागत असते. यामध्ये अनेकदा अंतर्गत संरचनाकाराचा कस लागत असतो. अंतर्गत संरचनेच्या आणि गृहसजावटीच्या दृष्टिकोनातून रंगशास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. मुळातच अंतर्गत संरचनेचा संबंध अंतर्मनाशी असतो आणि रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात. प्रत्येक रंगामुळे आपल्या अंतर्मनामध्ये निरनिराळे भाव प्रकट होत असतात. निरनिराळ्या रंगांमुळे निर्माण झालेल्या आपल्या भावना आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त करत असतो. त्यामुळेच रंगशास्त्र गृहसजावटीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कोणत्या रंगाचा कोठे, कसा, किती, का आणि केव्हा वापर करायचा हे पाहणे अत्यंत आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीप्रमाणे रंगांची पसंती केली जात असते. याचा प्रत्यय आपल्याला दैनंदिन जीवनात प्रत्येकाच्या पेहरावाच्या निवडीवरून दिसून येतो. एखाद्याला एखाद्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे वापरावेसे वाटतील तर दुसऱ्याला पिवळ्या रंगाचे. अर्थातच हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. कोणत्याही वस्तूची निवड ही पूर्णत: त्या त्या व्यक्तीच्या आवडीवर ठरत असते आणि या आवडीचा थेट संबंध मानसिकतेवर अवलंबून असतो.   
प्रत्येकाच्या जीवनात आणि कुटुंबात घडणाऱ्या घडामोडी :
प्रत्येकाच्या जीवनात आणि एकूणच कुटुंबात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा संबंध अंतर्मनाशी असल्याने काही साठवणीतल्या आठवणींना एक निश्चित अशी जागा ठरवावी लागते. अनेक आठवणी आपल्या अंतर्मनावर कोरलेल्या असतात. कितीही दिवस उलटून गेले तरीही काही आठवणी आपण कधीही विसरू शकत नाहीत. आपल्या आयुष्यातल्या काही विलक्षण क्षणांचं जतन करण्यासाठी गृहसजावट हे अत्यंत योग्य माध्यम असतं. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी घरात
स्वत:साठी घेतलेल्या अनेक वस्तूंशी आपलं एक नातं निर्माण झालेलं असतं. अशा अनेक वस्तूंच्या सान्निध्यात आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण आपण अनुभवलेले असतात. त्या वस्तू जरी जुन्या झाल्या तरीही त्यांच्याशी निगडित आपल्या आठवणी मात्र नेहमीच नव्या आणि ताज्या असतात. अशा आठवणीतल्या साठवणीच्या वस्तूंचा संग्रह आणि त्याची मांडणी अत्यंत वेधक ठरायला हवी, त्या दृष्टिकोनातून गृहसजावट करायला हवी.   
घरातील सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम :
आपल्या सर्वाच्याच घरात अगदी गृहप्रवेश केल्यापासून विविध कारणाने काही ना काही तरी सण, समारंभ, धार्मिक कार्यक्रम होत असतात. यातही आपल्या भावभावनांना
अधिक महत्त्व असतं. होणाऱ्या प्रत्येक कार्यात आपल्याला मिळणारा आनंद आणि तो मिळवण्यासाठी आपली मानसिक गुंतवणूक आपल्या गृहसजावटीच्या कामात महत्त्वाची असते. प्रत्येक सण, समारंभ  दरवर्षीअपेक्षेप्रमाणे आणि धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार सततच आपल्या घरात होत असतात. त्याला अनुसरून आपल्याकडे येणाऱ्या व्यक्ती, नातलग, पाहुणे एकूणच कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला गृहसजावट करत असताना लक्षात घेणं आवश्यक असतं. त्या अनुषंगाने संरचना, सोयीसुविधा तसेच काही ठरावीक कामांची पूर्तता करणं योग्य ठरत असतं.   
नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार :
प्रत्येक कुटुंबात सर्व सदस्यांचा मित्रपरिवार साहजिकच भिन्न असतो. जवळचे, लांबचे नातेवाईक आणि आप्तेष्ट यांचं आपल्या घरी येणं अथवा पाहुणा म्हणून राहणं अशादेखील अनेक बाबींचा विचार गृहसजावट करताना करावा लागतो. अनेकदा गृहसजावट करताना केवळ प्रत्येक खोलीसाठी फर्निचर आणि काही प्रमाणात इतर सजावट केली जाते. पण मित्र परिवार, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांचा विचार करून आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि संरचनेत योग्य त्या तरतुदी केल्या जातातच असं नाही. या सर्वाशीदेखील आपलं मानसिक नातं फार दृढ झालेलं असतं. त्यामुळेच केवळ आपल्या अंतर्मनाचा विचार करून त्यांच्यासाठी काही विशिष्ट काम करणं योग्य ठरतं.
अशा बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून आपल्या घराची अंतर्गत संरचना करावी लागते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वरील बाबी किती महत्त्वाच्या असू शकतात, हे जाणून घेऊन आपल्या घराला घरपण देणं सहज शक्य होऊ  शकतं. मनातल्या घरासाठी आणि त्या घरातल्या मनासाठी एक हटके विचार होणं निश्चितच उपयुक्त ठरू शकतं.     
शैलेश कुलकर्णी -इंटिरीअर डिझायनर -sfoursolutions1985@gmail.com