शहरातच माझा जन्म झाला आणि सारी हयात शहरात गेली. तरी अनेक मित्र, नातेवाईक खेडय़ात आहेत. प्रसंगोपात त्यांच्याकडे जाणंयेणं असतं. पण शाळेत असताना पं. महादेवशास्त्री जोशी यांची ‘खडकातले पाझर’ वाचली होती आणि त्या कथेतून एक वेगळंच खेडेगाव आणि निराळंच घर मनात घर करून राहिलं आहे.
कसण्यासाठी दिलेल्या शेतीचा लागोपाठ दोन वष्रे वसूल आला नाही म्हणून संतप्त जमीनदार कुळाच्या घरी अचानक जाऊन धडकतो. घरधनी काही कामानिमित्त शहरात गेलेला असतो. त्याची बायको जमीनदाराला ओळखत नाही. जमीनदारदेखील स्वत:ची ओळख देत नाही. तरीही ती गृहिणी सुहास्य मुद्रेनं त्याचं स्वागत करते. आतिथ्य करते. जेवणाची तयारी करते. घरधनी रात्री घरी येतो. जेवणं होतात. जमीनदार त्या आतिथ्यानं भारावून जातो. सकाळी त्याला वसुलाची रक्कमदेखील दिली जाते. प्रेमभरानं निरोप घेऊन तो घरी परततो. खेडेगावच्या आतिथ्याचं वर्णन वाचून अगदी भारावून गेलो होतो. पुढे खेडय़ांचं गुणगान करणाऱ्या अनेक कथा, कविता, गाणी लाभली.    
आपल्याकडे शहरांच्या तुलनेत खेडी जास्त आहेत आणि पोटापाण्यासाठी खेडय़ातून आलेली बरीच माणसं शरीरानं शहरात असली तरी त्यांची मनं खेडय़ात गुंतलेली असतात. संधी आणि फुरसत मिळाली की सारे आपल्या गावाकडे धाव घेत असतात. शहरातच जन्मलेल्या माणसांनी इथली महागाई, जागेची टंचाई, धावपळ, दगदग आजन्म पाहिलेली असल्यानं त्यांच्याही मनात खेडय़ांविषयी सुप्त आकर्षण असतं. त्यामुळे रोजच्या प्रपंचाची बेगमी करून झाल्यावर गाठीशी जादाचा पसा जमला तर अशी माणसं शहरापासून थोडं लांब ‘सेकंड होम’ घेण्याचे मनसुबे आखू लागतात.
‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.’
अशी त्यांची सेकंड होमविषयीची भावना असते. आठवडाभर किंवा महिनाभर राबल्यावर एखादी सुटी काढून त्या सेकंड होममध्ये विसावा घ्यायला ते धाव घेतात. हे सेकंड होम म्हणजे शहरी माणसाच्या स्वप्नातलं कृतक खेडेगाव नि त्यातलं घर असतं. इथला तोंडवळा खेडेगावाचा असला तरी शहरातली प्रत्येक सुविधा इथं हजर असते.
जुन्या मराठी साहित्यातलं एकेकाळचं सुशेगात, सालस खेडेगाव आता उरलं नाही. खेडय़ांनी कात टाकली आहे. मेडिकल आणि इंजिनिअरिंग महाविद्यालये, बँका आणि इतर आधुनिकीकरणानं खेडी आणि शहरे यात फारसा भेद ठेवला नाही.
मात्र पूर्वी अगदीच वेगळं चित्र असे. शहरातल्या उपवर मुली चाळीसमोर किंवा वाडय़ासमोर असल्यानसल्या जागेत आपलं बालपण फुलवीत. खेडय़ात मात्र मोकळय़ा जागा, मोठाले वाडे अमाप होते. बारा घरच्या बारा जणींना एकत्र येण्याची फुरसत आणि खेळायला जागा खेडय़ात सहज उपलब्ध होत असे. म्हणूनच त्या गाऊ शकत-
‘बारा घरच्या बारा जणी खेळतो अंगणी
अंगणात रंगली गं माहेरची गाणी.’
लग्न करून शहरात आलेल्या सवाष्णीचा जीव तिथल्या सदनिकेत सहजी कसा रमावा? माहेरच्या भव्य वाडय़ाची आठवण अगदी ओघानं येणारच.
‘चौसोपी माझा माहेरचा वाडा
मीठमोहऱ्यांनी दृष्ट कुणी काढा
हिरेमाणकं भरली जशी वाडय़ाच्या नौखणी
अंगणात रंगली गं माहेरची गाणी..’
आणि ‘ऊनपाऊस’मध्ये गदिमांच्या गाण्यातदेखील खेडय़ातल्या घराची हळवी आठवण अशीच येते,
‘आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू.’
त्या निळय़ा पाखराला ‘खेडय़ामधल्या घर कौलारू’ची आठवण छळू लागते. सठीसामासी माहेरी, गावी जाण्याची संधी लाभली की डोळय़ांसमोर येतो तो-
‘माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिणती हळू ये कुरवाळू
दूर देशचे प्रौढ लेकरू.’
आणि बॉलिवूडनं तर अशी प्रणयरम्य, कल्पनारम्य खेडी अक्षरश: हजारो रंगवली असतील. एका जुन्या गाण्यातली मुग्धा अशी लबाड की रात्री तिच्या घरावर प्रियकराची थाप पडते. तर ती आपल्या वहिनीला म्हणते, दारावर कोणी तरी आलेला दिसतोय. वहिनी, जरा दिवा लावून उजेड कर, म्हणजे दिसेल- चोर आहे की साजण..
‘आया आया अटरियापे कोई चोर
ओ भाभी, आना, दीपक जलाना
देखूं- बलम है या कोई और..’
खेडेगावातल्या अवखळ आणि निरागस प्रेयसीचं आकर्षण प्रत्येकालाच असे. अवखळ, निरागस देखण्या प्रेयसीबरोबर तिचं घर, तिचं साधंसुधं गावदेखील आवडून घ्यायला तो तयार असे.
‘गोरी तेरा गाव बडा प्यारा, मैं तो गया मारा, आकर यहां रे
उसपर रूप तेरा सादा, चंद्रमा जो आधा, आधा जवां रे..’
जिथं पक्षी आपली घरटी बांधतात, तिथंच त्याला तिच्यासह आपलं घरकुल उभारावंसं वाटतं,
‘जी करता है, मोर के पांव में पायलियां पहना दूं
कुहू कुहू गाती कोयलिया को फूलों का गहना दूं
यहां घर अपना बनाने को पंछी करे देखो तिनके जमा रे
गोरी तेरा गाव बडा प्यारा, मैं तो गया मारा, आकर यहां रे..’
आणि ‘लाखाची गोष्ट’- गदिमांचं ते अमर गीत कोण विसरेल?
‘त्या तिथे पलीकडे
माझिया प्रियेचे झोपडे
गवत उंच दाट दाट
वळत जाय पायवाट
वळणावर आंब्याचे झाड वाकडे..’
काळाच्या ओघात जागा आक्रसत जाताना शहरात अशा ऐसपस घराचं स्वप्न आपण पाहू शकत नाही.
‘आकार मोठा तरिही बठा
आतून वेरुळ आणि अजिंठा
वरी लालसर असेल छप्पर..’
अशा वर्णनाचे गदिमांचे ‘ते माझे घर’ आता खेडेगावातच कदाचित सापडू शकेल. शहरीकरणाच्या रेटय़ामुळे आकर्षक वेतन देणारे उद्योगधंदे आणि तरुण खेडय़ाबाहेर चालले आहेत. खेडेगावातल्या एखाद्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी जाते तेव्हा ती शहरात जाते असंच आपण गृहीत धरतो. पण लग्न करून खेडय़ातल्याच सासुरवाडीला जाणाऱ्या एका मुलीचं वर्णन प्रभाकर नाईकांच्या एका सुंदर गाण्यात (चित्रपट- थापाडय़ा) आढळतं.  
‘अवतीभवती डोंगर झाडी, मधी माझी गं सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी..’
अशा निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या घरी नांदायला जाताना अर्थातच ती छान रंगीत स्वप्नं पाहात असते,
‘सख्यासंगती एकांतात,
प्रीत फुलंल अंधारात
हुईल काळजात गोड गुदगुली,
लाल होतील गाल मखमली
मिळंल मिठीत मधाची गोडी
माझी गं सासुरवाडी..’
खेडेगावातले घर आणि तिथल्या पाहुणचाराच्या मनात अशा आठवणी जपलेल्या असतात. काही लोकांनी ऐकीव माहितीवर आधारित अशा पाहुणचाराची स्वप्नं पाहिलेली असतात. याचं प्रत्यंतर आपण अनेकदा घेतो. विविध मीडियातून जाहिराती दिसतात. बातम्या दिसतात. हरहुन्नरी व्यावसायिक मोठय़ा प्रमाणावर या भावनांचं व्यावसायिकीकरण करतात. शहरातील एखादं मोठं मदान घेऊन त्यात विविध प्रांतांतल्या, विविध समाजातल्या खेडय़ांचे सेट्स उभारले जातात. तिथं त्या त्या संस्कृतीनुसार वातावरणाचे भास निर्माण केले जातात. मोठे शुल्क देऊन त्या ‘खेडय़ात’ प्रवेश केला की तिथं न्याहारीपासून भोजन, विसावा, लोकजीवन, लोककला, उत्सव, इ.ची कृतक प्रचीती घेण्याची, काही तास स्वत:चं रोजचं शहरी जगणं विसरण्याची सोय असते. यातून ग्राहकांच्या मनातील नोस्टॅल्जियाचं किंवा अपूर्ण स्वप्नांचं शमन होत असावं. कारण या प्रकाराला मिळणारा जनप्रतिसाद सतत वाढत जाताना दिसतो आहे.
मीदेखील शोधतो आहे असेच लहानपणी ग. ल. ठोकळ यांच्या कवितेत पाहिलेलं खेडय़ातलं घर. जिथला घरधनी स्वत:ला गरीब म्हणवतो आहे. पण आजच्या मूल्यव्यवस्थेच्या निकषावर मी त्याला अतिशय श्रीमंत यजमान म्हणेन. या घराचं चौ. फू. क्षेत्रफळ किती आहे ते कवीनं सांगितलेलं नाही. पण यजमानाच्या हृदयाला मात्र अमर्याद एफएसआय बहाल केला आहे. यजमान आपल्याला बसायला घोंगडी देतो नि म्हणतो,
‘घोंगडी टाकली हितं, बसा तीवर
अनमान करू नगा, आता हे समजा अपुलं घर.’  
तो आपल्याला अंघोळीसाठी गरम पाणी देतो. आपली अंघोळ होईतो जेवणाची तयारी झालेली असते. जेवण साधंच असलं तरी तोंडाला पाणी सुटणारं आहे.
‘पाव्हणं, चला या आता, हे पगा पिठलं टाकलं
वाढली पगा ज्वारीची जाड भाकरी.’
यजमानाला घरधनिणीच्या सुगरणपणाचा किती अभिमान आहे आणि तो असायलाच हवा-
‘लई सुगरण मपली बरं कारभारीण
किती अपरूप झालं हाय हे कांद्याचं बेसन
लसणीची चटणी अजून पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली.’
या फर्मास जेवणाला तो साधं जेवण म्हणतो. आपल्याला आग्रह करून जेवायला घालतो. नंतर सुपारी देतो. ओसरीवर थोडा आराम करायला फर्मावतो. राहण्याचा आग्रह धरतो. निरोप देताना कातर होतो आणि म्हणतो की गरिबाची ओळख ठेवा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात असं खेडय़ातलं आतिथ्यशील घर असेल. आतिथ्याचे तपशील वेगळे असतील. जेवणाचा मेन्यू अलग असेल, पण मनात स्वप्न नक्की असेल.
प्रत्येकाला स्वप्नातलं ते घर प्रत्यक्ष सापडो, तिथल्या आतिथ्याचा मन:पूत आनंद मिळो आणि ‘अन्नदाता सुखी भव!’ असं मनापासून शुभचिंतन करून पुन्हा आपल्या रोजच्या रहाटगाडग्याकडे परतण्याची शक्ती मिळो. अशी चार तृप्त माणसं एकत्र आल्यावर आपल्याला लाभलेल्या आतिथ्याच्या आठवणी काढतील तेव्हा त्यांना दासू वैद्य यांच्या गीतातील ओळी नक्की आठवतील-
 ‘ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळूमध्ये वाजलेल्या बासरीची.’

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Manohar Joshi, ex chief minister, art, good connections, akola, special connections bond, love,
मनोहर जोशी यांचे कलेवर होते विशेष प्रेम; अकोल्याशी राहिले ऋणानुबंध
saint shiromani acharya vidyasagar ji maharaj
आचार्य विद्यासागर: एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व