साध्यासुध्या घरापासून राजाच्या महालापर्यंत कुठेही स्वयंपाकघर, देवघर, न्हाणीघर, शय्याघर वगरे मूलभूत सुविधा असतातच. पण आपापल्या ऐपतीनुसार माणसं या सुविधांमध्ये जी वाढ करतात त्यावरून त्यांची ओळख पटते. म्हणजे एखाद्या घरात देवघराच्या जोडीला कुणा बुवाच्या सेवेसाठी वेगळी खोली बांधली जाईल. कुणी अग्निहोत्राची प्रतिष्ठापना करील. कुणाला गायनाच्या रियाजासाठी घरातला कोपरा नि शांत प्रहर राखून ठेवावासा वाटेल. कुणी कातरवेळेला चार मित्र जमवून एखाद्या खोलीत मद्यपानाचा नि संगीत ऐकण्याचा घाट घालील. एखाद्या श्रीमंत घरातली बाहेरची खोली ‘होम  थिएटर’ची इलेक्ट्रॉनिक सुविधा घेऊन आल्यागेल्याचं दणदणीत मनोरंजन करायला सिद्ध असते. पण ज्या घरातली एखादी खोली किंवा एखादा कोपरा- निदान एखादं कपाट चार चांगल्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेलं असतं, त्या घरातल्या वाचनवेडय़ाशी माझ्या मनाच्या तारा चटकन जुळतात. त्या घरात माझं मन मनापासून गुंतून जातं.
पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय, मनुष्यप्राण्याला भाकरी तर हवीच हवी. ती त्याच्यातल्या प्राण्याची भूक आहे. त्याची दुसरी भूक आहे ती शरीरापलीकडे नांदणाऱ्या आनंदाची. हा आनंद जो तो आपापल्या अभिरुचीनुसार घेत असतो. यात कुणी कुणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.
अगदी तरुण वयात वाचनाची आवड कमी असते की काय अशी अनेकांना शंका येते. हिंदी सिनेमातल्या प्रेमकहाण्या पाहिल्या की तो समज दृढ होऊ शकतो.

‘दिल की किताब कोरी है कोरी है, कोरी ही रहने दो,
हाय जो अब तक चोरी है, चोरी ही रहने दो’   

म्हणणारे प्रेमिक असोत की प्रेमभंग झाल्यावर निराश होणारे आणि कथा-कादंबरीतलं प्रेम प्रत्यक्षात लाभत नाही म्हणून पुस्तकांच्या नावानं –

‘किताबों में छपते हैं चाहत के किस्से,
हकीकत की दुनिया में चाहत नहीं है
जमाने के बाजार में यह वह शय है
कि जिसकी किसीको जरुरत नहीं है’

या शब्दांत बोटे मोडणारे असोत किंवा ताटातुटीच्या क्षणी-

‘अब के बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सुखे हुये फूल किताबों में मिले’

असं शायरीच्या ढंगानं स्वत:ला समजावणारे प्रेमिक असोत, मात्र उत्तम शब्दकळेची ओढ प्रत्येकाला असते. या वयात पाठय़पुस्तकांची पीडा पाठीवर असल्यानं त्या आकारातील इतर वस्तूंविषयी त्यांना परकेपणा वाटत असेल. पण सफल-असफल प्रेमाच्या कहाण्या-विराण्या कोणाला आवडत नाहीत? माझ्या लहानपणी वाचनालयात ना. सी. फडके आणि चंद्रकांत काकोडकरांच्या पुस्तकांना असलेली लोकप्रियता मी पाहिली आहे. सत्तरच्या दशकात हेरॉल्ड रॉबिन्स आणि त्यानंतर ‘मिल्स आणि बून्स’च्या प्रणयकथा वाचणारी पिढी पाहिली आहे. आजदेखील पुढच्या पिढय़ा लोकलमध्ये प्रवास करताना नुसतीच मोबाइलवर गाणी ऐकत नाहीत. निकोलस स्पार्क्सची कादंबरी किंवा ‘ग्रे-शृंखले’तील कथा, चेतन भगतची पुस्तकं आणि काही ना काही वाचत असतात. त्यांची मिळेल तिथून थेट किंवा ऑनलाइन खरेदी करीत असतात. त्यामुळे नव्या घरात पारंपरिक ग्रंथघर नसले तरी लेखक-कवींच्या प्रिय रचना वेगळय़ा माध्यमातून जतन केलेल्या असतात.

गाणी ऐकताना नुसतीच सुरावट नव्हेतर दर्जेदार शब्ददेखील जोमानं लोकप्रिय होताना दिसतात. गेली काही दशकं नीरज या कवीचे

‘फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती
कैसे बताउं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती’   

हे प्रियाराधन असो, की

‘दिल आज शायर है, गम आज नगमा है,
शब, मय, गजल है सनम,
गरों के शेरों को ओ सुननेवाले
हो इस तरफ भी करम’

हे शोकगीत असो! सतत लोकप्रियतेच्या शिखरावर पाय रोवून उभी आहेत. शिवाय शकील बदायुनी, शैलेंद्र, साहिरपासून जावेद अख्तपर्यंत दर्जेदार-लोकप्रिय गीतकारांची भलीमोठी रांगच आहे इथं. आबालवृद्धांच्या सर्व पिढय़ांनी प्रेम केलेली. मराठीत कुसुमाग्रज, गदिमा, शान्ता शेळके, सुरेश भटांपासून सुधीर मोघे, संदीप खरे, स्वानंद किरकिरे आणि अक्षरश: यादी करताना थकून जाऊ इतकी दर्जेदार-लोकप्रिय नावं आहेत. चंद्रशेखर गोखले यांचं ‘मी माझा’ नव्वदच्या सुमारास प्रकाशित झालं आणि हजारो घराघरांत पोचलं. नंतरच्या काळात संदीप खरे यांच्या कविता लोकप्रिय झाल्या. हे सारं लेखन नव्या पिढीनं रेकॉर्ड्स, सीडी, नकला, पुस्तकं, पीडीएफ फाइल्स, मोबाइलमध्ये जपलेली फोल्डर्स आणि रोज बाजारात येणाऱ्या असंख्य माध्यमांतून साठवलेलं आहे.
 तारुण्याचा नवथर उत्साह पेलत असतानाच दुसरीकडे कथा, कादंबऱ्या, ललित, वैचारिक पुस्तकांनी तर किती घरांची कपाटं, अभ्यासिका सजवल्या असतील त्याला सुमार नाही. पुस्तकं मुद्रित स्वरूपात असोत की इलेक्ट्रॉनिक माध्यमात, लोकांची सुसज्ज ग्रंथघरं आणि संग्रह दिसला की मनापासून आनंद होतो. पुस्तकं आपल्या घराला सुंदर सांस्कृतिक चेहरा देतात. आपण वेळ काढू तेव्हा आपल्या सेवेसाठी हजर असतात. एकांतात यांच्यासारखा जिवलग मित्र नसतो आणि त्यांची आपल्याकडून किती माफक अपेक्षा असते. एक अगदी सर्वश्रुत सुभाषित इथं सांगण्याचा मोह अगदी आवरत नाही.   

तलाद् रक्षेत् जलाद् रक्षेत् रक्षेत् शिथिल बंधनात्
मूर्ख हस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकं

आणि काहींच्या मते मूर्ख माणूस तर सोडाच, आपल्या संग्रहातलं चांगलं पुस्तक शहाण्या-जाणकार व्यक्तीलादेखील देऊ नये. कारण मग ते पुस्तक आपल्याला परत कधी मिळत नाही. एक मजेदार सुभाषित नोंदवतो,

पुस्तकं वनिता वित्तं परहस्त गतं गतं
आगतं पुनरागच्छेत् नष्टं, भ्रष्टं च खंडितम्

आता आपल्या पुस्तकाची पीडीएफ फाइल नकलून मित्राला देता येईल. तो भाग अलाहिदा. या पुस्तकांचं फक्त व्हायरसपासून रक्षण केलं की झालं.

पूर्वी जीवनाची गती सुशेगात होती, विरंगुळय़ाचे चार क्षण मनाप्रमाणे घालवणं परवडण्याजोगे होतं तेव्हा देशोदेशी अक्षरांच्या उपासकांनी केलेली घराची सजावट पाहून मन थक्क होतं.
‘आना कॅरेनिना’ आणि ‘युद्ध आणि शांती’ या दोन जगड्व्याळ कादंबऱ्यांचा जनक रशियन लेखक तल्स्तोय याच्या घराचं वैशिष्टय़ म्हणजे त्या घरात पिढय़ान्पिढय़ा जपलेलं, वाढवत नेलेलं ‘तल्स्तोय वाचनालय’. तल्स्तोयच्या आजोबांनी या वाचनालयाची स्थापना केली. त्यातून लेखकाला किती मोठा साहित्यिक वारसा आणि संस्कार मिळाले असतील. स्वत: तल्स्तोयचं निधन झालं त्या वर्षी म्हणजे १९१०च्या सुमारास या वाचनालयात बावीस हजार ग्रंथ आणि पाच हजारांहून अधिक नियतकालिकं जमली होती. यातील काही ग्रंथ सतराव्या आणि अठराव्या शतकातील होते. पुढे सरकारनं या घराची आणि वाचनालयाची देखभाल करण्याची जबाबदारी शिरावर घेतली, पण दुसऱ्या महायुद्धात जर्मन सन्यानं या घराचा दुष्टपणे विध्वंस केला.
वॉल्टर अॅलन या इंग्रज लेखकाच्या मनात साम्यवादी रशियाबद्दल काही अढी होती. पण रशियाच्या दौऱ्यावर आला तेव्हा त्यानं तल्स्तोयच्या या घराला आणि वाचनालयाला भेट दिली. ही वास्तू पाहून त्याच्या मनातला राग निवळला आणि त्यानं आपला नियोजित टीकालेख रद्द केला अशी आख्यायिका आहे. ती खरी असेल तर एका घराचं सुसंस्कृतपण सबंध राष्ट्रावरचा टीकालेख थोपवू शकते, असं म्हणायला हरकत नाही.   
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला लोकप्रिय कथाकार आणि विनोदी लेखक रोल्ड डाहल यानं आपल्या घरात लेखनासाठी स्वत: एक खोली उभारली होती. लिहिताना स्वत:च्या पाठीला व मानेला आराम पडेल अशी लाकडी खुर्ची त्यानं स्वत: बनवली. तो संगणक किंवा टाइपरायटर न वापरता पेन्सिलनं लेखन करायचा. ‘या खोलीत प्रवेश केल्यावर मी माझा उरत नाही. माझ्यासाठी काळ तात्पुरता नष्ट होतो. लेखन करताना मला काळवेळेचं भान उरत नाही.’ असे त्याचे उद्गार आहेत. त्याच्या मृत्यूनंतर वारसांनी खोली जतन केली आहे नि पर्यटकांना पाहता येते.  
अमेरिकेचा अध्यक्ष रुझवेल्ट यालाही लेखनवाचनाची आवड होती. त्याच्या घरातदेखील ग्रंथांसाठी स्वतंत्र खोली होती. तिला तो आपली गुंफा (डेन) म्हणायचा. या गुंफेत शिरला की सहजी बाहेर निघत नसे. पुढे या खोलीला कुटुंबीय  शस्त्रागार म्हणू लागले. कारण याच खोलीत घरातल्या बंदुका, पिस्तुले आदी शस्त्रे देखील ठेवली होती. अशा एकेक गमती.
आपल्याकडचे देशबंधू बॅरिस्टर चित्तरंजन दास हेदेखील असे मनस्वी ग्रंथप्रेमी होते. त्यांच्या घराचा मोठा भाग दुर्मिळ ग्रंथ, धार्मिक हस्तलिखितं आणि पोथ्यांनी व्यापला होता. आणि ही सारी शब्दसंपदा त्यांनी स्वकष्टार्जित प-प वेचून जमवली होती. यातला विशेष असा की असहकारिता आंदोलनात भाग घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या वास्तूवर अक्षरश: तुळशीपत्रं ठेवून सारी ग्रंथसंपदा बंगालच्या साहित्य परिषदेला देणगीदाखल दिली.
बॉलिवूडमध्ये अशा कोणा ग्रंथवेडय़ाची कहाणी चित्रित केल्याचं आठवत नाही. पण नमकहराम सिनेमात रजा मुरादनं एक मनस्वी कवी रंगवला आहे. त्याच्या मृत्यूसमयीचं गाणं अतिशय समर्पक आहे.

‘मैं शायर बदनाम, मैं चला, मैं चला
महफिल से नाकाम, मैं चला, मैं चला

मेरे घर में तुमको कुछ सामान मिलेगा
दीवाने के घर में एक दीवाना मिलेगा
और एक चीज मिलेगी टूटा खाली जाम
मैं चला मैं चला..’

कलंदर कवीच्या घरात दोनच गोष्टी मिळतील- कवितेची वही आणि मद्याचा फुटका प्याला? पण ठीक आहे. आपण आपल्या घरात फक्त त्याच्या कवितांचं पुस्तक ठेवायला काय हरकत आहे!