16 February 2019

News Flash

हर दिवार कुछ कहती है..

भिंती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या घराचा आरसा असतात.

|| कविता भालेराव

‘हर घर कुछ कहेता हैं’, ‘इस घर मैं कोई रहता हैं,’ ते ‘भय्या, ये दिवार मत तोडना’ अशी वाक्ये आपण जाहिरातीत नेहमीच पाहतो आणि आपल्याला या जाहिरातींत असलेल्या भिंतीही छान आणि गुंतवून ठेवणाऱ्या वाटतात.

भिंती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या घराचा आरसा असतात. भिंती या आपल्या घराचा चेहरामोहराच बदलून टाकतात. ‘दिवरों के कान होते हैं’ पेक्षा ‘दिवारों के चेहरे भी होते हैं..’ असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. आज आपण पाहू की, भिंत- म्हणजेच आपल्या घराचा चेहरा आपण कसा सुंदर व आकर्षक बनवू शकतो.

घर सजवताना आपण जेवढा विचार फíनचरचा करतो ना, तेवढा विचार आपण सजावटीच्या वस्तूंचा करत नाही. किंवा आपण आपल्या बजेटमध्येही ते पकडत नाही. परंतु घर सुंदर आणि परिपूर्ण अशाच सजावटींच्या वस्तूंनी होते. घराच्या मोकळ्या भिंती या कधी कधी घराचा पूर्ण लुक घालवतात. तेव्हा, घराची सजावट करताना फíनचरच्या बरोबरीने या भिंतींचाही विचार करायचा असतो.

बाजारात वॉल आर्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आणि मेटरियलचे मिळते आणि आवडीनुसार खास बनवूनही घेता येते. नुसत्याच फ्रेम लावणे म्हणजे वॉल आर्ट नव्हे. वॉल आर्ट बऱ्याच प्रकारचे असते.

वॉल पेंटिंग आणि टेक्स्चर- एखादी वॉल ही सुंदर बनविण्यासाठी आपण त्या भिंतीला एखादा वेगळा रंग देऊ शकतो. आजकाल बाजारात बऱ्याच प्रकारचे टेक्स्चर पेंटही उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही वापर करू शकतो. परंतु टेक्स्चरचा वापर करताना ते आपण कोणत्या रंगात बनवतो हे फार महत्त्वाचे असते. आपण जर का टेक्स्चर पेंट टीव्ही युनिटच्या मागच्या भिंतीवर किंवा सोफ्याच्या मागे वापरणार असू, तर मात्र रंगसंगतीचा विचार आवश्यकच आहे. नाहीतर सोफा किंवा टीव्ही युनिट आणि आपण खास  करून घेतलेली टेक्स्चर वॉल यांपकी काहीच उठून दिसणार नाही.

वॉल म्युरल- आजकाल मार्केटमध्ये खूप विविध मटेरियल्समध्ये म्युरल मिळतात. किंवा आपण आपल्या बजेटमध्येही ते बनवून घेऊ शकतो. म्युरल का, तर एखादी भिंत फक्त त्याच्याचसाठी ठेवून, बाकी फíनचर त्याप्रमाणे डिझाइन केले तर फारच सुंदर दिसते आणि एक वेगळाच इफेक्ट देते. आपण आधीपासूनच म्युरलसाठी जर का एखादी थीम ठरवली असेल तर उत्तमच! मग आपण त्यासाठी लाइट पॉइंटस्ही घेऊ शकतो आणि मग त्या भिंतीला अजूनच उठाव आणू शकतो.

म्युरल अनेक मेटरियलमध्ये बनवता येते अथवा उपलब्ध असते. जसे मेटल, फायबर, काच, स्टोन, लाकूड.. म्युरलची डिझाइन ही मटेरियलवर अवलंबून असते. कारण मटेरियल आणि त्याचे  फिनिशिंगही म्युरलच्या सौंदर्यात भर टाकतात.

भित्तिचित्र किंवा वॉल इलस्ट्रेशन- भित्तिचित्र म्हणजे थोडक्यात काय, तर भिंतीवर काढलेले चित्र. यासाठी मात्र एक संपूर्ण वॉल जर का आपण वापरली तर याचा फारच उत्तम प्रभाव पडतो. घराची सजावट ज्या वेळेला सुरू होते तेव्हा आपण भित्तिचित्रासाठी जागा निश्चित केली तर फारच उत्तम.

कलाकार आपल्या भिंतीवर थेट चित्र काढतात. ती पिट्र नसते. आपण यामध्ये भारतीय कलेचा वापर करू शकतो. तसेच त्या-त्या खोलीनुसार किंवा थीमनुसार आपण पेंटिंग करून घेऊ शकतो आणि तेही आपल्या बजेटमध्ये.

या प्रकारच्या वॉल आर्टमध्ये ब्लॅक आणि व्हाइट पेंटिंग्ज्ही छान दिसतात.

वॉल फ्रेम- एखादी भिंत फारच मोकळी वाटते म्हणून फ्रेम लावणे, हे अगदीच चुकीचे आहे. घराच्या प्रत्येक भिंतीचा विचार हा घराची सजावट सुरू होते तेव्हाच करायचा. नाहीतर मग तडजोड करावी लागते. वॉल फ्रेम फारच सुंदर दिसतात. आजकाल तर फार छान पॅटर्न आणि रंगातही उपलब्ध आहेत. एखादी भिंत ही फॅमिली फोटोसाठी ठेवली तरी आकर्षक करता येते. तसेच कालानुरूप आपणही सतत फोटो बदलत राहू शकतो.

बेडच्या मागील भिंतीवर, पॅसेजमध्ये, डायिनगमधील एखादी वॉल यांचा वापर फ्रेम लावण्यासाठी करू शकतो.

पेंटिंग्ज्- पेंटिंग्ज् या शब्दाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर मोठमोठय़ा कलाकारांची नावे उभी राहतात. पेंटिंग फक्त त्या भिंतीचाच नाही तर संपूर्ण रूमचा चेहरामोहरा बदलून टाकते. पेंटिंगची निवड करताना तज्ज्ञांची मदत आवश्यक ठरते.

सगळीकडेच एकदम मोठे पेंटिंग लावण्याऐवजी आपण छोटय़ा पेंटिंग्ज्चा ग्रूप करूनही भिंतीवर लावू शकतो.

पेंटिंग आणि तेही मूळ पेंटिंग यात एक प्रकारची तुमची उच्च अभिरुची दिसून येते. आणि पेंटिंगला जर का लाइट्सचा इफेक्ट दिला तर त्या भिंतीला एक वेगळाच लुक येतो.

वॉलपेपर- वॉलपेपरचा भिंतीच्या सजावटीसाठी सर्रास वापर केला जातो. विविध रंगांचे, प्रकारचे वॉलपेपर्स असतात. आपण सिग्नेचर वॉलपेपरही बनवून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला पाहिजे ते डिझाइन आपल्या भिंतीच्या आकारानुसार पिट्र करून आपण ती भिंत सजवू शकतो. लहान मुलांसाठी तर खूपच छान वॉलपेपर्स बाजारात मिळतात.

बाउल, प्लेट वॉल- ऐकताना मजा वाटते ना! बाउल किंवा प्लेट वापरतात का कधी वॉल डेकोरसाठी? याचे उत्तर आहे ‘हो’ वापरतात. आणि या पद्धतीने कलात्मक सजावट आपण अगदी सहज करू शकतो. सजावटीच्या वस्तूंच्या दुकानात भिंतीवर लावायच्या प्लेट आणि बाउल मिळतात. त्या सिरॅमिकमध्ये बनविलेल्या असतात. त्यावर कधी पिट्र असते तर कधी मूळ पेंटिंग केलेले असते. आपण या पद्धतीचा वापर आपल्या डायिनग रूमच्या भिंतीवर करू शकतो. पण डिझाइनची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी.

वॉल टाइल्स- वॉलला टाइल्स लावण्यासाठी दरवेळेला भिंतीला ओल असली पाहिजे असे नाही. वेगवेगळ्या स्टाइलच्या आणि ट्रेंडस्च्या टाइल्स बाजारात मिळतात. आपण त्याचा पॅटर्न करून वॉलला त्या लावल्या तर फारच छान दिसतात. टाइल प्रकारात ब्रिक पॅटर्न, फ्लोरल पॅटर्न, स्टोन पॅटर्न, प्लेन, पण ग्लॉसी याशिवाय भौमितिक आकार बाजारात उपलब्ध आहेत.

मिरर वॉल- खोली मोठी दिसण्यासाठी आरशाचा वापर केला जातो. प्लेन आरसे लावण्यापेक्षा आपण त्याचे डिझाइन बनवून ते भिंतीला लावले तर अधिक आकर्षक दिसतात. मिरर म्युरलही फारच छान दिसतात. खोली मोठी दिसणे, लाइट इफेक्ट्स यांसाठी मिरर वॉल आर्टचा वापर महत्त्वाचा आहे.

ग्रीन वॉल- हे सगळ्यात सुंदर आणि वेगळे वॉल आर्ट. आपण मूळ  रोपटय़ांचा वापर करून एखादी भिंत फारच आकर्षक करू शकतो. ही वॉल बनविताना जरा काळजी घ्यायला लागते. पाण्याचा पुरवठा आणि ते पाणी वाहून नेणे यांचा विचार करावा लागतो.

आपल्याला जर का ग्रीन वॉल थोडी अवघड आणि जपायला कठीण वाटत असेल तर आपण झाडाच्या कुंडय़ा या भिंतीला हूक लावून अडकवू शकतो. आणि थोडी वेगळी ग्रीन वॉल आपण बनवू शकतो. छोटय़ा जागेत आपण बरीच फुलझाडे, शोभेची झाडे लावून घरात एक प्रसन्न वातावरण तयार करू शकतो.

बघायला गेलो तर भिंत किंवा वॉल आपण किती विविध प्रकारे सजवू शकतो. आपल्या घराचा आकर्षण बिंदू हा एखादी भिंत असेल तर घर नेहमीच छान दिसते.

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)

 

First Published on August 18, 2018 12:39 am

Web Title: home wall painting