घराला घरपण असावे, घरात हसरे वातावरण असावे, घरात सुख, समाधान आणि शांती असावी, असे सर्वानाच वाटत असते. काही घरांमध्ये असे वातावरण निर्माण करावे लागत नाही, तर तिथे घरातील माणसेच इतक्या सकारात्मक विचारांची असतात की, त्या घरांमध्ये या ऊर्जा लहरी आपल्याला आत प्रवेश केल्याबरोबर जाणवू लागतात. अशा घरांमध्ये मनाने श्रीमंत असलेली माणसे राहतात! भौतिक सुखापेक्षा मानसिक आनंदाला तिथे अधिक महत्त्व असते. त्या घरात शिरल्यावर स्मित हास्याने आपले स्वागत होते. दिवसाच्या कोणत्याही वेळी फोन न करता कोणी आले तरी त्याचेही तेवढय़ाच उत्साहाने स्वागत होते कारण ‘अतिथी देवो भव’ ही उक्ती त्या भिंतींना चांगली माहिती असते. आल्यागेल्याची विचारपूस तिथे अगत्याने होते. परिवारातील सर्वाचे वाढदिवस आठवणीने साजरे केले जातात. नव्या वस्तूचे कुतूहलाने स्वागत होते, तर जुन्या वस्तूंची तेवढय़ाच नवलाईने काळजी घेतली जाते. अशा घरांमधून सहसा भांडणे होत नाहीत आणि समजा झालीच तर ती फारशी लांबत नाहीत! या घरांमधून संगीताचे सूर मधूनच ऐकू येतात किंवा वाऱ्याच्या झुळुकीलादेखील येता-जाता तान घ्यावीशी वाटते. एखादा चांगला पदार्थ बनवला तर वाटीत लगेच तो शेजारी पाठविला जातो. शेजारच्या घरात कोणी आजारी असले तर त्याची ताबडतोब दखल घेतली जाते. या घराच्या भिंती फक्त रंगानेच रंगलेल्या नसतात, तर त्या रंगांमध्ये भावना मिसळल्या गेल्यामुळे त्या रविवर्माच्या चित्रांप्रमाणे सुंदर दिसत असतात. पैशामुळे सर्व काही विकत घेता येते, या पलीकडे जाऊन विचार करणारी मंडळी येथे राहतात.
असे घर कुठे विकत मिळते का? या प्रश्नाला उत्तर नकारार्थी आहे, पण असे घर आपणच घडवायचे असते. ते विकत अजिबात मिळत नाही. पैशाने आपण काही चौरस मीटर जागा खरेदी करू शकतो, पण त्याचे रूपांतर वास्तूमध्ये करण्यासाठी आपल्याला प्रदीर्घ प्रयत्न करावे लागतात. त्यात अंत:करण ओतून ते घडवत राहावे लागते. जीवनाचा अर्थ कळण्यासाठी या वास्तूचा फार मोठा वाटा असतो आणि म्हणूनच या वास्तूमध्ये एक छोटेसे का होईना, पण ग्रंथालय असणे फार महत्त्वाचे आहे. या ग्रंथालयात आपल्या ऐपतीप्रमाणे भर टाकत राहिली पाहिजे व टाकलेली भर केवळ देखाव्यासाठी न ठेवता डोळ्याखालून गेली पाहिजे व त्यात काही आत्मसात करता आले पाहिजे. आपल्या आजच्या घरांना या वाचनसंस्कृतीची अतिशय गरज आहे.
जेव्हा अर्भक मातेच्या पोटी जन्माला येते तेव्हा ते मातीचा गोळा असते. त्या मातीच्या गोळ्याला आकार येण्यासाठी जशी अन्न-पाण्याची गरज असते तशी संस्कारांचीदेखील तेवढीच गरज असते. हे संस्कार आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांकडून कळत-नकळत त्याच्यावर होत असतात. अर्थातच आई-वडील त्याच्या सदैव सान्निध्यात असल्याने त्यांच्या वागण्याचा परिणाम त्याच्यावर सर्वात अधिक असतो. त्यामुळे जसजसे ते अर्भक दिवसेंदिवस वाढू लागते तसतशी त्याच्या शरीरात वाढ तर होतेच, पण त्याची बुद्धीदेखील विकसित होऊ लागते.
प्रत्येकाच्या जीवनात मातृभाषेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. आईच्या सान्निध्यात मूल जसे मोठे होऊ लागते तसे ते संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हा संवाद साधताना अर्थातच आईच्या भाषेचे आकलन त्याला नैसर्गिकरीत्याच होत जाते. त्याच्या आयुष्यातील पहिल्या दोन-तीन वर्षांमध्ये सातत्याने शब्दज्ञान वाढत जाते. अर्थात नंतरदेखील त्याच्यात भर पडत असते. पण त्याच्या डोक्यातील शब्दकोशाची पहिली आवृत्ती या दोन-तीन वर्षांमध्येच छापली जाते. हीच शिदोरी नंतर त्याला आयुष्यभर उपयोगी पडत असते. त्याच्या किती सुधारून वाढविलेल्या आवृत्त्या निघतात त्यावर त्याची किती प्रगती झाली हे ठरत असते.
शाळेत गेल्यानंतर इतर भाषा व विषय शिकताना वाचन व लेखन या दोन मार्गानी त्याचे ज्ञानार्जन सुरू होते. जर चांगले शिक्षक या काळात लाभले तर या मातीच्या गोळ्याचे रूपांतर ज्ञानी व अभ्यासू व्यक्तीमध्ये होते. ज्ञानार्जनाचे हे कार्य कधीच थांबत नसते. मात्र त्याला सातत्याने वाचनाची व लिखाणाची जोड असणे अतिशय महत्त्वाचे असते.
डॉक्टर भाभांना अगदी लहानपणी वाचनाची गोडी लागली होती. त्यांचा हा वाचनाचा छंद पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी घरातच मोठे वाचनालय त्यांना उपलब्ध करून दिले होते. डॉक्टर भाभांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य या वाचनालयात दडलेले आहे यात शंकाच नाही. सर्वानाच असे वाचनालय लाभते असे नाही, पण आहे त्या सोयींचा वापर करून आपण जर आपले वाचन वाढविले तर आपल्या सर्वागीण उन्नतीसाठी नक्कीच त्याचा फायदा होईल हे खात्रीने सांगता येते.
माझ्यावर वाचनाचे संस्कार माझ्या आईने केले होते. त्याला अर्थातच जोड माझ्या वडिलांच्या शिक्षण प्रेमाची होती. पुस्तके खरेदी करताना त्यांनी कधीही काटकसर केली नाही. आमची सांपत्तिक स्थिती फार चांगली नसतानाही त्यांनी आम्हाला पुस्तके कमी पडू दिली नाहीत. सात-आठ वर्षांपासून मला जी पुस्तकांची साथ मिळाली ती आईवडिलांमुळे, यात शंकाच नाही. विशेषत: महाविद्यालयात असताना लागणारी पुस्तके महाग होती व ती आमच्या हाती पडावीत म्हणून त्यांना अधिक काम करावे लागे. पण अगदी आनंदाने त्यांनी कित्येक वर्षे मेहनत करून हा पुस्तकांचा खजिना आमच्यासाठी उपलब्ध करून ठेवला होता. अहमदनगर या शहरवजा गावी आम्ही राहत होतो. त्या शहरात वाचनालये होती. त्यांचा अतिशय चांगला उपयोग आईने आमच्यासाठी केला होता. त्या वेळी उपलब्ध असलेली कुमार, अमृत, किशोर, चांदोबा यांसारखी मासिके वाचायला मिळायची. रीडर्स डायजेस्टच्या वाचनामुळे इंग्रजी आम्हाला कधीही अवघड गेले नाही. श्रीमान योगी, स्वामी, ययाति, राजा शिवाजी, मृत्युंजय, गारंबीचा बापू, एल्गार यांसारख्या कादंबऱ्या आयुष्यातील पहिल्या वीस वर्षांत मला वाचायला मिळाल्या होत्या. ह. ना. आपटे, बाळ कोल्हटकर, लोकमान्य टिळक, रा. ग. गडकरी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, ना. ह. आपटे, वसंत कानेटकर, चिं. वि. जोशी, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, ना. सी. फडके, इरावती कर्वे, शशी भागवत, रवींद्र भट, सुरेश भट, शांता शेळके, इंदिरा संत, केशवसुत, बालकवी, बा. भ. बोरकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, बहिणाबाई चौधरी यांसारख्या प्रथितयश साहित्यिकांची व संतांची विविध पुस्तके वाचताना अनेक चांगले संस्कार आमच्यावर घडत होते हे आज अगदी प्रकर्षांने जाणवते.
शाळेत असताना सोसायटी हायस्कूलमधील आमचे शिक्षक व माझे आईवडील यांच्या प्रेरणेतून विविध भाषा विषयांच्या शालेय शिक्षणेतर परीक्षा आम्ही अगदी हौसेने दिल्या होत्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजीच्या चार परीक्षा, त्याच विद्यापीठाच्या संस्कृतच्या तीन परीक्षा व राष्ट्रभाषा सभेच्या हिंदीच्या पंडितपर्यंतच्या परीक्षा नवव्या इयत्तेच्या अखेरीपर्यंत आम्ही दिल्या होत्या त्यामुळे हरिवंशराय बच्चन, महादेवी वर्मा, दिनकर, गुलशन नंदा, संत तुलसीदास, संत कबीर, संत मीराबाई, मैथिली शरण गुप्त, माखनलाल चतुर्वेदी, न. वि. गाडगीळ, काका कालेलकर, कमलेश्वर, सूर्यकांत त्रिपाठी (निराला), प्रेमचंद, सुमित्रानंदन पंत यांसारख्या नावाजलेल्या हिंदी साहित्यिकांची पुस्तके आम्हाला वाचायला मिळाली होती. हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला आजही तशी आठवते! वर्डस्वर्थ, लॉर्ड टेनिसन, सर विन्स्टन चर्चिल, बट्रेड रसेल, शेक्सपियर, बर्नाड शॉ, पंडित नेहरू यांनी लिहिलेले इंग्रजी साहित्य आम्हाला शालेय जीवनात वाचायला मिळाले होते हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या नावाचे मराठी रसिकांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या लेखनाने अगदी लहानपणापासून मी प्रभावित झालो होतो. पुलंनी माणसाच्या स्वभावाचे विविध कंगोरे अतिशय प्रभावीपणे हाताळले होते. त्यांनी चितारलेल्या नंदा प्रधान, चितळे मास्तर, रावसाहेब, बापू काणे, सखाराम गटणे, नारायण इत्यादी व्यक्तिरेखांमधून हे कंगोरे सातत्याने प्रतीत होत राहतात. या व्यक्तिरेखा आपल्याला खूप काही शिकवून जातात. माणसाने माणसाशी कसे वागावे याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे पुलंचे साहित्य आहे.
घराला घरपण देणारी ही छोटी छोटी ग्रंथालये काळाच्या ओघात हरवत चालली आहेत हे पाहून मनाला वेदना होतात. ग्रंथांची जागा किंडलने घेतली याचे दु:ख नाही, तर किंडल शोभेसाठी दिवाणखान्यात ठेवले जाते याचे दु:ख फार मोठे आहे. वाचनाने प्रगल्भ झालेली माणसे हे देशाचे फार मोठे वैभव आहे. आपल्याला हे वैभव परत मिळवायचे किंवा राखायचे असेल तर प्रत्येक घरात व गृहनिर्माण संस्थेत या वाचनाच्या छंदाला खतपाणी घालून वतावरण निर्मिती करावयाची खरी गरज आहे.
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र
डॉ. शरद काळे – sharadkale@gmail.com

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !