News Flash

वसंत ऋतूतलं घर

नातवंडांच्या पावलांनी घरात पुन्हा वसंत अवतरतो. नातवंडांना दुधावरची साय मानणाऱ्या आजी-आजोबांना त्यांच्यात आपलं तिसरं बालपण दिसत असतं.

| July 8, 2013 01:00 am

गृहिणीच्या पावलांनी घरी लक्ष्मी येते हे खरंच. पण ती आली, सुखेनैव नांदली. वर्षे सरली. घरात जन्मलेल्या लेकरांना पंख फुटून त्यांनी बाहेर उड्डाण केले की रिकाम्या झालेल्या घरात आजी-आजोबा एकटेच उरतात, पण नातवंडांच्या पावलांनी घरात पुन्हा वसंत अवतरतो. नातवंडांना दुधावरची साय मानणाऱ्या आजी-आजोबांना त्यांच्यात आपलं तिसरं बालपण दिसत असतं. स्वत:ला मुलं होतात तेव्हाही त्यांच्यात आपलं बालपण दिसतं. पण आपण ते बघण्याच्या मूडमध्ये नसतो. मुलांचं संगोपन कसं होईल, मोठी झाल्यावर ती व्यवस्थित मार्गी कशी लागतील, याचे मनावर तणाव असतात. पण नातवंडांची बातच न्यारी असते.
लग्न झालं की मुलगी सासरी जाते. हल्ली मुलगा देखील लगोलग नव्या सदनिकेत जातो. तिकडे नातवंडं जन्माला येतात. थोडी मोठी झाली की सांभाळायला म्हणून आजी-आजोबांकडे येतात. निदान सुटीमध्ये तरी नक्की राहायला येतात. शिशिरात पानझड झालेल्या वृक्षांना वसंतात पुन्हा पालवी फुटावी तसं म्हातारं घर नातवंडांच्या आगमनानं पुन्हा फुलतं. बहरतं. हसायला लागतं. नातवंडांच्या आíथक संगोपनाची, शाळाप्रवेशाची जबाबदारी मुलासुनांनी, मुलीजावयांनी घेतलेली असते. आता त्या पिलांना नुसतं जवळ घेऊन लाड करायचे असतात. त्यांना बिघडवायचं असतं. त्यापायी होणारं मुलाचं, सुनेचं, मुलीचं, जावयाचं करवादणं कानांआड करायचं असतं.
पुलंनी एका लेखात म्हटलंय, ‘‘आजोबांसारखा खेळगडी मिळाला तर मुलांच्या आनंदात भर पडते. खेळगडी होऊन पोरांच्यात रमलेला म्हातारा हादेखील मजेदार अनुभव असतो. सत्तरी उलटलेल्या सेनापती बापटांना मी गल्लीतल्या पोरांबरोबर विटीदांडू खेळताना पाहिले आहे.’’
तर पाडगावकरांच्या कवितेतले आजोबा नातीशी दंगामस्ती करताना मुलात मूल होऊन रमतात आणि मधूनच आपल्या खोलीत जाऊन काहीबाही आठवताना मुके होऊन जातात.
‘‘आजोबांच्या खोलीत आता
धुकं धुकं धुकं
आजोबांचं जग सगळं
मुकं मुकं मुकं.’’   
संध्याकाळी आपल्या खोलीतून बाहेर आलेले आजोबा अंगणातल्या झाडाखाली बसतात तेव्हा ती कातरवेळ त्यांना गूढ आठवणींच्या गावात घेऊन जाते.
‘‘आजोबा संध्याकाळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेच बसत
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत..’’
दिवसभर त्यांच्याशी दंगामस्ती करणारी ती नात पाय न वाजवता त्यांच्या मागे जाऊन उभी राहते नि बघते तेव्हा तिला काही दिसत नाही. तिला दिसते फक्त आजोबांची सावल्यांमध्ये बुडून गेलेली खुर्ची आणि धुकं धुकं धुकं..
पण जुन्या आठवणींनी किंवा आणि कशाने व्याकूळ झाले तरी आजोबा असोत की आजी – नातवंडांच्या ओठांवर कायम हसू पेरीत असतात. स्मिता जोगळेकरांच्या कवितेतली आजी अशीच प्रेमळ आहे,
‘‘आजीसाठी नात म्हणजे
दुधावरची साय असते
पण नातीसाठी आजी
त्याहून बरंच काय काय असते

आजी ठसठशीत कुंकू
नऊवारी खटय़ाळ केळं
ठेंगणा ठुसका गोरा बांधा
मन वढाय वढाय असते

आजी चौघडीची ऊब
आजीच्या डोळी कौतुकाची डूब
सुरकुतले लोणकढी हात
विठ्ठलाची रखुमाय असते.’’
ही आजी शान्ता शेळक्यांच्या पठणीची आठवण करून दिल्याशिवाय कशी राहील. जी पठणी नेसून अनेक दशकांपूर्वी आजी तिच्या लग्नात मिरवली होती. हाच पदर हाताने सावरीत वडीलधाऱ्यांच्या पाया पडली होती. काळाच्या ओघात आजीचे सोने झाले. पण पठणी अजून आहे. तिचे रेशमी स्पर्श अद्भुत किमया करतात नि नातीला भूतकाळात नेतात.  
 ‘‘कधी तरी ही पठणी
मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळून
मधली वष्रे गळून पडतात
कालपटाशी जुळतो धागा..’’
पाडगावकरांच्या मराठी घरातले आजोबा आणि मुनव्वर राणासारख्या हिंदी कवीच्या घरातली आजी यांच्यातलं साम्य पाहून मौज वाटते. राणांच्या गजलेतला नातू म्हणतो,
‘‘उछलते खेलते बचपन में बेटा ढूंढती होगी,
तभी तो देखकर पोते को दादी मुस्कुराती है.’’
घर तेच असते. जिथे संसार केला, अर्धी हयात गेली, मुलं लहानाची मोठी झाली. पंख फुटले. उडून गेली. तेच घर. थोडे जुने, म्हातारे झालेले. तेच अंगण, सकाळी आणि संध्याकाळी चिमण्यांचे कलकलणारे थवे, अंगणातली तीच तुळस, सायलीची वेल, दुपार, सूर्य-चंद्रांची आवर्तने.. पण नातवंड घरी येतं तेव्हा घराचा नूर कसा पालटतो. इंदिरा संतांच्या कवितेतल्या आजीच्या चेहऱ्यावर हसू फुलतं.
 ‘‘बाळ उतरे अंगणी, आंबा ढाळतो सावली
चिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळी

बाळ उतरे अंगणी कसे कळाले चिऊला
भरभरा उतरून थवा पाखरांचा आला.’’
त्या चिमण्या बाळाशी खेळतात आणि घराचे अंगण वडीलधारा माणूस होऊन बाळावर लक्ष ठेवते. राखण करते,
‘‘चिमुकल्या चिमण्यांची बाळाभोवती खेळण
चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण.’’
‘ऊनपाऊस’ सिनेमातलं गदिमांचं हे गाणं कितीजणांना आठवत असेल, ठाऊक नाही. पण त्यातल्या ओळी अगदी कॅमेऱ्यासारख्या आपल्या डोळय़ांसमोर उभं करतात- जरा मोठय़ा वयाच्या बाळाला दिसणारं आजी-आजोबांचं घर-
‘‘पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता वाचती माझे आजोबा
     
खोडी करी खोडकर
आजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा.’’
आंतरजालावर जयंत विद्वांस यांच्या पेजवर त्यांच्याच आयुष्यातला एक प्रसंग आहे. पत्नी आणि मुलीला आणायला ते रत्नागिरीला (सासुरवाडी) गेले. मुलगी तेव्हा दीड वर्षांची होती. दोघींना घेतलं. मग गणपतीपुळय़ाला जाऊन पुण्याला परतताना पुन्हा सासुरवाडीवरून यायचं होतं. तर कोकणातल्या भर मे महिन्यातल्या कडक उन्हाळय़ात रस्त्याच्या कडेला एका दगडावर सासरेबुवा वाट पाहात बसलेले. एका हातात काठी आणि दुसऱ्या हाताने तोंडावर अशक्त सावली धरलेली. येण्याची वेळ ठाऊक असूनही चुकामूक होईल की काय म्हणून दीड तास आधीच येऊन बसले होते. नातीचा पापा घेऊन ढगाळलेल्या डोळय़ांनी त्यांनी निरोप दिला. आता पुन्हा वर्ष-सहा महिने ती भेटणार नव्हती. पुण्याकडे गेलेली जावयाची गाडी ठिपक्याएवढी होईतो त्या दिशेने पाहात रस्त्यावरच ओठंगून राहिले.
आजोबांच्या भावना आजीच्या शब्दांत व्यक्त करणारी त्यांचीच एक कविता आहे,  
‘‘मी काय म्हणते, आल्यासरशी रहा अजून चार दिवस
हे काही बोलणार नाहीत, मग चार दिवस मौन असेल
मला मेलीला निदान रडू तरी येतं
यांच्या डोळय़ात आभाळ दाटून येतं.’’
नातवंडांच्या तात्पुरत्या आगमनानं घरात फुललेली वसंतपालवी थोपवून धरण्यासाठी आजी-आजोबा लहान मुलासारखे वागतात, काहीबाही करीत राहतात,
‘‘नातीची भातुकली डोळय़ांपुढून हलत नाही
तिचा गोड पापा ओठांवरून पुसत नाही
अरे, महिनाभर अन्न गोड लागत नाही,
हे म्हणतात, हल्ली मला भूक लागत नाही

नातीचा फ्रॉक छातीजवळ धरतात
त्याचे हात स्वत:च्या गळय़ाभोवती टाकतात
सोनू, आता झेपत नाही, म्हणतात,
आणि शून्यात नजर लावून बसतात.’’
घरात रोजचे व्यवहार चालू असतात. एक वर्ष आधी प्रकाशित केलेल्या दिनदíशकेनुसार. रोजचे सूर्य-चंद्र डय़ुटी पार पडल्यासारखे उगवून आणि मावळून जात असतात. पण घराचे हसण्याचे दिवस ठरलेले असतात. सुटीत आलेली नातवंडं शाळा सुरू झाली की निघून गेल्यावर आजोबा
‘‘तुम्ही सगळे गेलात की कॅलेंडर काढतात
गणपती कधी, ते बघत बसतात
सप्टेंबरचा गणपती ऑगस्टला आणू
साळगावकरांना फोन लावू म्हणतात.’’
एका अशा प्रेमळ आजोबांना पुलंनी आपल्या ‘ऋग्वेदी’ या लेखात अमर करून ठेवलं आहे. ऋग्वेदी म्हणजे त्यांच्या आईचे वडील. त्या काळात अख्ख्या विले पाल्र्यातील घरे आजीआजोबांच्या वास्तव्याने आणि बागडणाऱ्या नातवंडांनी समृद्ध झाली होती. सारे गाव एक कुटुंब होते, एक घर होते आणि आजोबा लोक ही त्या घरातली कर्ती माणसे होती. कुठल्याही मुलाच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवायला पुढे होणार आणि कुठल्याही चुकणाऱ्या मुलाचा कान याच वडीलधाऱ्या मंडळींनी आजोबांच्या अधिकाराने उपटावा, असे वातावरण होते.
ऋग्वेदी आजोबांच्या दिवाणखान्यात आजीलाही मानाचे स्थान होते. काव्यशास्त्रविनोदात ती भाग घ्यायची नि पुष्कळदा आजोबांना निरुत्तरदेखील करायची. आजोबा गेल्यानंतरच्या वर्षी गणेशोत्सवासाठी पु. ल. आजोळी गेले तेव्हा दिवाणखान्यात बसले.
‘‘दिवाणखाना रिकामा होता. खूपच रिकामा होता. भिंतीवर आजोबांची फक्त तसवीर होती. उद्या येणाऱ्या गणरायासाठी आसन तयार केले होते. आता आजोबांची- आयलो रे, पुता? – ही ऐकू येणार नव्हती..’’
आणि आजोबांच्या आठवणीनं हा नातू गहिवरतो तेव्हा-
‘‘रिकाम्या दिवाणखान्यात जाऊन मी बसलो. सगळे आजोळ गोळा झाले माझ्याभोवती- फक्त आजोबा आणि आजी सोडून. मी त्या खिडकीजवळच्या खुर्चीवर बसलो. समोरच्या रस्त्यावरून दूरवर पाहू लागलो. लहानपणी संध्याकाळच्या वेळी आजोबांच्या येण्याची आम्ही नातवंडे अशीच वाट पाहात बसायचो.’’
एकमेकांची वाट पाहणाऱ्या आजी-आजोबांनी आणि नातवंडांनी चिरतरुण फुललेली घरे हे एक सुंदर चित्र आहे. त्या चित्रातल्या तपशिलाला महत्त्व नाही. चित्र वाडय़ाचे असो, चाळीतल्या खोलीचे असो, बंगलीचे असो, की सदनिकेचे.. एकमेकांवर लुब्ध असलेली माणसं त्या चित्राला जिवंतपणा देतात. तो जिवंतपणा प्रत्येक चित्रात, चित्रातल्या घरात नांदता राहो. प्रत्येक घरातल्या आजीआजोबांना माझ्याकडून याच शुभेच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 1:00 am

Web Title: home with grandchildren feels to be spring season for the home
Next Stories
1 शहर : ओसंडून वाहणारे!
2 शहरीकरण एक समस्या?
3 कायदा अधिक खुलासेवार हवा!
Just Now!
X