मधुवंती सप्रे

ऑनोरे द बाल्झॅक हा प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार. बाल्झॅक याचं घर हे पॅरिसमधलं साहित्यिक म्युझियम आहे, हे जेव्हा वाचलं तेव्हा ते घर कसं आहे ते पाहावं अशी तीव्र इच्छा झाली. फ्रेंच मैत्रीण ख्रिस्तीनबरोबर पॅरिसमध्ये फिरताना एकदा ती हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेली. हॉटेल काही फारसं डोळ्यात भरेल असं नव्हतं. हॉटेलचं नाव होतं ‘द फ्लोर लिदमॅगो.’ ख्रिस्तीन त्या हॉटेलला कॅफे म्हणत होती. मी आपली फ्रेंच अक्षरं वाचता येत नाहीत म्हणून इकडे तिकडे पाहात होते. फ्रेंच भाषेची लिपी इंग्रजी, पण स्पेलिंग आणि उच्चार लिपीला फटकून असणारे. कारण  musees चं म्युझियम होतं. आणि  la maisonचं मॅन्शन म्हणजे घर असा अर्थ होतो.

ख्रिस्तीन म्हणाली, ‘‘रस्त्याचं नाव बघ तुला ओळखता येईल.’’ पण मला समजत नव्हतं. ती म्हणाली, ‘‘अगं, सीमॉन द बुऑ नाव आहे.’’ मी उडी मारायची बाकी ठेवली. कारण पुढे ती म्हणाली, ‘‘ते नाव का दिलं? तर आपण बसलोय या कॅफेमध्ये सीमॉन आपला मित्र सार्त्रबरोबर येत असे. सीम़ॉन या बंडखोर लेखिकेचा हा आवडता कॅफे. मग मलाही तो कॅफे आवडला. आता इथल्या लेखिकेचं नाव निघालंच आहे तर मी ख्रिस्तीनला म्हटलं, ‘‘आपण कांदबरीकार बाल्झॅकचं घर पाहायला जाऊ. मग तिची तारांबळ उडाली. तिला ते ठाऊकच नव्हतं. मग पॅरिसचा नकाशा धुडाळणं आलं. म्युझियम वेबसाइटवर घर कुठे आहे हे समजलं.’’

बाल्झॅकचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. २० मे १७९९ ला. त्याचं शिक्षण हॅदोम आणि पॅरिस इथे झालं. प्रथम तो कविता लिहायचा आणि विविध विषयावरचं लेखन वाचायचा. अगदी तुफान वाचायचा. पॅरिसमध्ये त्याने प्रथम वकिलांकडे कारकुनी केली. त्यातले बारकावे आणि डावपेच त्याने आत्मसात केले. नंतर त्याने प्रकाशन व्यवसाय हाती घेतला. मग छापखाना विकत घेतला. पण दोन्ही ठिकाणी अपयश आल्याने आणि कर्ज झाल्याने त्याने लेखन करायला सुरुवात केली.

‘ले श्वा’ ही पहिली कादंबरी १८२९ साली प्रसिद्ध झाली आणि लोकप्रिय ठरली. पुढे झपाटय़ाने त्याने लेखन केलं. म्हणजे १८२९ ते १८४८ या १९ वर्षांच्या कालावधीत ९१ कादंबऱ्या व नाटकं लिहिली. बापरे, काय झपाटा होता त्याचा!

द मॅजिक स्कीन (पो द शाग्रं- फ्रेंच नाव) ही तात्त्विक स्वरूपाची कादंबरी १८३१ साली प्रसिद्ध झाल्यावर पोलंडहून एका अनामिक स्त्रीचं अभिनंदनपर पत्र त्याला आलं. ती श्रीमंत आणि उमराव घराण्यातली होती. पुढे पत्र व्यवहार वाढत गेला आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर विवाहात झालं. तिचं नाव मादाम हान्स्का. हा विवाह १८५० साली झाला.

बाल्झॅक हा फ्रेंच साहित्यातील वास्तववादाचा अग्रदूत गणला जातो. मध्यमवर्गीय जीवनाचे वास्तववादी चित्रण आणि कादंबरीच्या कथानकाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी म्हणजे गावं, घरं, रस्ते, व्यक्तिरेखा याचं तपशीलवार वर्णन तो करीत असे.

आंद्रे झीद आणि मार्सेल प्रुस्त या श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिकांनी बाल्झॅकचं श्रेष्ठत्व मान्य केलं. त्याच्या ‘ह्युमन क़ॉमेडी’तील साहित्य कृतीचे इंग्रजी अनुवाद जॉर्ज सेंट्स बरो यांनी अनुवादित केले. अतिश्रमाने १८/८/१८५० रोजी तो वारला. पण त्याचं पॅरिसमधलं घर त्याची स्मृती जागवत आहे. त्याचं घर पाहायला मी ख्रिस्तीनबरोबर गेले तो अनुभव रोमांचकारी होता.

बाल्झॅक जगविख्यात फ्रेंच कादंबरीकार ‘द ऑनोरे बाल्झॅक’- जन्म २० मे १७९९, मृत्यू १८ ऑगस्ट १८५०. त्याच्या ९१ कादंबऱ्या, कथा, नाटकं, हे लेखन वास्तववादी होतं. ‘ल पेर गोर्थी’ आणि ‘यूजीन आंद्रे’ या कादंबऱ्या मध्यमवर्गाचं वास्तववादी चित्रण असल्याने गाजल्या.

कधी काळी पॅसी नाव असलेल्या खेडय़ाच्या कुशीत ‘ला मेसाँ द बाल्झॅक’ बाल्झॅकचं घर आहे. त्या कादंबरीकाराच्या जुन्या पॅरिसमधील घरांपैकी आजतागायत उभे असलेले हे एकच घर आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात एका बगिचातील बा इमारतीमध्ये हे घर आहे. आपल्या देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी १ऑक्टोबर १८४० रोजी बाल्झॅकने इथे आश्रय घेतला होता. त्याने बागेलगतच्या पाच खोल्यांची जागा भाडय़ाने घेतली होती. ‘मस्यूर दी बूनॉल’ या खोटय़ा नावाखाली सात र्वष या तात्पुरत्या निवाऱ्यात दडून राहणं त्याला खूपच सोयीस्कर पडलं.

घराखालच्या चित्रासारखा देखण्या रूई बेर्शत रस्त्याने गेल्यास बाल्झॅकला पॅसीची वेस जवळ होती. म्हणजेच पॅरिसचा केंद्रबिंदू सहज अंतरावर होता. त्याला बागेचा वापर करण्याचीही मुभा होती. तिथे तो शांततेचा उपभोग घ्यायचा आणि हॅन्स्कासाठी लायलॅक आणि व्हायोलेटची फुलं खुडून पॅरिसच्या सूर्यप्रकाशात, हवेत फुलं आणि पुस्तकं बहरतात, तिथे प्रवेश करायचा. तो म्हणायचा, ‘मला शांत घर आवडतं. परसू आणि बगिचा यांच्यामध्ये ते एक घरटं आहे. एक कवच, माझ्या जीवनाचं वेष्टन आहे.’ परंतु पॅसीचं घर सतत काम करण्याची जागा होती. काम करणं म्हणजे दररोज मध्यरात्री उठून आठ वाजेपर्यंत लिहिणं, पाव तासात सकाळचं जेवण संपवणं. पाच वाजेपर्यंत काम करणं. रात्रीचं जेवण घेऊन झोपी जाणं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करणं.

सुदैवाने त्याची ती अभ्यासिका बाल्झॅकच्या काळात होती तशीच आज ठेवली गेली आहे. छोटं लेखनाचं मेज अजूनही आहे. त्याचं वर्णन बाल्झॅकने हॅन्स्काकडे असं केलं होतं- ‘माझ्या चिंतांचा, माझ्या दुर्दशेचा, माझ्या दु:खाचा, माझ्या आनंदाचा, सगळ्याचा साक्षीदार हे टेबल. लेखन करता करता माझ्या हाताने जणू ते झिजलं आहे.’

याच टेबलावर संपूर्ण ‘ला कॉमेडी ह्युमेन’ (ह्युमेन कॉमेडी) ची प्रूफं तपासली गेली आणि त्याच्या अनेक सर्वोत्कृष्ट कलाकृती लिहिल्या गेल्या. ज्यांच्यात ‘अ मर्की बिझीनेस/गाँडरव्हिल मिस्टरी’, ‘द ब्लॅकशीप’, ‘अ हार्लट हाय अ‍ॅण्ड लो’, ‘कझी बेट्टी’ आणि ‘कझीन पॉन्स’ यांचा समावेश आहे.

बाल्झॅकची सदनिका बऱ्याच खोल्या असलेली आहे. इतर भाडेकरू राहत असत ती बा इमारत आणि एक वाचनालय असं सगळं मिळून बाल्झॅकचं हे घर एक साहित्यिक वस्तुसंग्रहालय झालं आहे. हे तीन मजली वस्तुसंग्रहालय पॅसीमधील टेकडीजवळ आहे.

या घराचं एक दालन हॅन्स्काला समर्पित आहे. जिच्याशी बाल्झॅकने अठरा वर्षांच्या भावोत्कट पत्र व्यवहारानंतर विवाह केला. वस्तुसंग्रहालयाच्या भांडारात अनेक साहित्यासंबंधित वस्तू उदा. हस्तलिखितं, बाल्झॅकच्या हस्ताक्षरातील पत्रं, प्रथमावृत्ती, बाल्झॅकच्या खाजगी वाचनालयातील दुर्मीळ पुस्तकं, इत्यादी आहेत.

नुसतं वर्णन वाचून त्या साहित्यिक संग्रहालयाची कल्पना येत नाही. जिथे प्रत्यक्ष लेखक वावरला ते त्याचं लिहिण्याचं टेबल, त्याची खोली, पुस्तकांनी भरलेली लायब्ररी हे सगळं अनुभवताना वाटतं, आता आतून बाल्झॅक बाहेर येईल आणि स्वाक्षरी देईल. हे स्वप्नरंजन ठरतं, पण तेच आनंद देणारं असतं.

madhuvanti.sapre@yahoo.com