आम्ही अमेरिकेला मुलाकडे गेलो होतो. तो त्यावेळी ‘कनेक्टिकट’ राज्यातील डॅनबरी गावात राहत होता. तेथे सगळी घरे सुटीसुटीत होती. प्रत्येक घराभोवती हिरवळ होती. हिरवळीतल्या एखाद्या कोपऱ्यात अगदी थोडी फुलांचीही झाडे होती. सकाळी उठून गॅलरीत आले की ती हिरवीगार हिरवळ व फुले बघून मन प्रसन्न व्हायचे. एका घरापुढे मात्र त्या हिरवळीत एक पाच फुटांचा खांब होता व त्यावर एक पारदर्शक नळकांडे अडकवलेले होते. त्याला चारही बाजूंनी बारीक दांडय़ा बाहेर आलेल्या होत्या व त्याच्यावर साधारण एखाद्या इंचावर भोक होते. मी गॅलरीत उभी राहावयाचे त्या वेळेस त्या घरातील गृहिणी बाहेर येऊन त्यात वरून धान्य ओतायची व परत घरात जायची. ती गेल्याबरोबर खूप पक्षी येऊन त्या दांडय़ावर बसून भोकातून चोचीने धान्याचे कण घ्यायचे. त्यातले काही धान्य खालीही पडायचे. हे पक्षी उडून गेल्यावर दुसरे यायचे. खाली पडलेले धान्यही ते टिपायचे. हे बघण्यात सकाळची थंडगार वेळ केव्हाच निघून जायची. तेव्हा ठरविले की हे नळकांडे आपण घरी न्यायचंच. मुलाला विचारलं, या नळकांडय़ाला काय म्हणतात? ठाण्याला हे मी कुठं पाहिलेलं नाही. तेव्हा मुलगा म्हणाला, Bird Feeder. लहान मुलांचा  Baby Feeder तसा हा पक्ष्यांचा Bird Feeder. एक दिवस आम्ही Wal Mart ला जाऊन Bird Feeder आणला. काही दिवसांनी आम्ही ठाण्याला परत आलो.
आमच्या बाल्कनीत आम्ही Bird Feeder लावला. प्रथम त्यात तांदूळ घातले, पण छे, एकही पक्षी, चिमणी फिरकलीसुद्धा नाही. पण आम्ही आमचा धीर सोडला नाही. थोडय़ा दिवसांनी दोन-तीन चिमण्या नाचत-नाचत कुतूहलाने Bird Feeder कडे बघत परत गेल्या. तीन-चार दिवस चिमण्यांनी असंच केलं. काही दिवसांनी आजूबाजूला कोणी नाही असं पाहून चिमण्या Bird Feeder च्या दांडीवर बसल्या व भोकातून चोच आत घालून तांदूळ घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण आमच्या असं लक्षात आलं की, तांदळाचे दाणे चिमण्यांच्या चोचीत मावत नाहीत व ते खाली गळून पडतात. मग काय करायचं? किराणा मालाच्या दुकानात तांदळाची कणी बघितली होती, ती आणली व घातली आणि काय आश्चर्य! तांदळाच्या कण्या चिमण्या बरोबर चोचीत घेत होत्या. आता एकीबरोबर दुसरी असं करीत पाच-सहा चिमण्या यायला लागल्या व Bird Feeder च्या सर्व दांडय़ांवर गोलाकार बसून कण्या टिपू लागल्या. आम्ही विचार केला, तांदूळ कणी तर चिमण्यांना आवडते. आणखी काय आवडत असेल? बारीक धान्य म्हणून नाचणी त्या कण्यात मिसळली व बघतो तो काय? चिमण्यांनी फक्त कण्याच वेचून वेचून खाल्ल्या. त्यात नाचणी तशीच होती. मग परत विचार करण्याची वेळ आली. बारीक धान्य म्हणून बाजरीची आठवण झाली. बाजरी व तांदूळकणी सारखे घेऊन Bird Feeder मध्ये भरली. हा प्रयोग मात्र यशस्वी झाला. चिमण्या दोन्ही धान्य आवडीने खायला लागल्या. सकाळी Bird Feeder तांदूळ कणी व बाजरीने भरण्याचे आम्हाला कामच झाले. आता जवळजवळ पंधरा ते वीस चिमण्या सकाळी चिवचिव करतात. एखादी चिमणी Bird Feeder च्या दांडय़ांवर जास्त वेळ बसून दाणे टिपू लागली तर ग्रिलवरील चिमणी जास्त चिवचिवाट करते. तरीही ती चिमणी दांडय़ावरून उठली नाही तर तिच्या शेपटीला चोच मारते व तिला उठवून आपण जागा घेते. हा खेळ आम्ही खोलीतून बघत असतो. त्याचा चिमण्यांना पत्ताच नसतो. आम्ही काही कामासाठी बाल्कनीत गेलो तर त्या सगळ्या भुर्रकन उडून जातात. त्या वेळी त्यांची जाण्याची लगबग, पंखांचा उडण्याचा आवाज व एकमेकींना बाहेर जाण्याची सूचना देणे हे बघताना आम्हाला फार मजा येते. आम्ही परत घरात आलो की, एक एक चिमणी कानोसा घेऊन परत  Bird Feeder वर यायची. चिमण्या तांदूळकण्या घेत असताना Bird Feeder झोपाळ्यासारखा हलायचा. त्यामुळे धान्याचे बारीक कण खाली पडत. ते खायला आता खारही यायला लागली. खारीने बघितले, हे धान्य कुठून पडते. खारीने ग्रिलवर जाऊन Bird Feeder मधील कणी व बाजरी खायचा प्रयत्न केला. खारीलाही ते साधले. खार आता मागचे दोन पाय ग्रिलवर ठेवून पुढच्या दोन पायांनी Bird Feeder आपल्याकडे ओढून घेते व लहान मूल जसे आईचे दूध पिते ना तसेच ती ते धान्य खाते. हे करताना कोणी येत नाही ना इकडे तिचे लक्ष असतेच.
एक दिवस मात्र वेगळाच उगवला. पोपटाला तांदळाच्या कण्यांचा सुगावा लागला. केबलच्या वायरवर बसून त्याने प्रथम अंदाज घेतला व उडून गेला. तो दररोज येऊ लागला; पण दुरूनच चिमण्यांचा हा प्रकार पाहत असे. एक दिवस हळूच तो ग्रिलवर आला व त्याने Bird Feeder मध्ये चोच घालायचा प्रयत्न केला. त्याची लालचुटूक बांकदार चोच वाकडी असल्यामुळे त्याला धान्य घेता येईना. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ग्रिलवर बसून Bird Feeder स्वत:जवळ ओढला व आपली वाकडी चोच त्यात घालण्याचे तंत्र त्याला समजलं. आता हा हिरवागार पोपट त्याच्या किंचित निळसर पोपटी रंगाची लांब पिसे, काळा कंठ व लालचुटूक बांकदार चोच बघून आम्हाला काय करू व काय नको असं झालं. निसर्गातील पोपट, निसर्गात स्वच्छंद बागडणारा पोपट व पिंजऱ्यातील पोपट यांमधील फरक लगेचच जाणवला. पोपट येताना बघून खारी व चिमण्याही त्याला लगेच जागा देतात व लांबूनच तो कधी उठतोय याची वाट बघतात. आपल्यापेक्षा आकाराने मोठा असा वाटेकरी आलेला बघून चिमण्याही त्यांचा निषेध व्यक्त करतात. आता पोपटही सर्रास येतात. दिवसातून चार-पाच वेळा येऊन मनसोक्त धान्य खातात. पोपटाला मिरच्या, पेरू, भिजलेली हरभऱ्याची डाळ घातली, पण त्याने त्याकडे पाहिलेही नाही. आणखी एक चिमणीसारखाच छोटासा पक्षीसुद्धा येतो. तो आपला छोटासा पिसारा पंख्यासारखा फुलवतो. त्याची चोच चिमणीपेक्षा किंचित मोठी आहे त्याचा रंग काळसर- हिरवट, भुरा, राखाडी आहे. कधीतरी बुलबुल पक्ष्यानेही हजेरी लावलेली आम्ही पाहिली.
रोज पक्ष्यांना भरपूर धान्य मिळाल्याने चिमण्या गुबगुबीत झाल्या आहेत. त्यांची संख्या नक्कीच जास्त झाल्याचे जाणवत आहे. रस्त्यावरून जाणारे येणारेही विचारतात, की एवढय़ा चिमण्या तुमच्याकडे कशा येतात? आमच्या येथे फक्त कबुतरेच आहेत व ती फार घाण करतात. त्यांची नजरही सरावाने Bird Feeder कडे आपोआप जाते.
संध्याकाळी सोसायटीत खाली गप्पांसाठी जमतो. तेथे शेजारी बांबूचे छोटेसे वन आहे. त्यावर चिमण्यांची शाळाच भरते जणू. सर्व चिमण्या बरोबर त्याच बांबूच्या झाडावर येतात. चिमण्या आल्यावर त्यांचा चिवचिवाट सुरू होतो. हळूहळू अंधार पडायला लागल्यावर चिवचिवाट कमी होत जातो. सूर्य मावळल्यानंतर एकदम त्या शांत होतात. सध्या पहाटे एकाच चिमणीचा आवाज येतो. मग दोन चिमण्यांचा, मग तीन चिमण्यांचा असा चिवचिवाट वाढत जातो. सहा वाजल्यानंतर पूर्वदिशा फाकायला सुरुवात झाली असताना सर्व चिमण्या चिवचिवाट करून एकमेकींना जणू काही उठवत असतात. दहा ते पंधरा मिनिटे हा चिवचिवाट होतो व हळूहळू त्या Bird Feeder वर जमू लागतात.
आता छोटी घरे व त्यासभोवतीचे एखादे पेरूचे झाड, एखादे आंब्याचे झाड, चिकूचे झाड, केळीचे झाड, फुलांची- तगर, पारिजातक, गुलबक्षी, रासतुरा, मोगरा वगैरे झाडेच राहिलेली नाहीत. घरांच्या हाऊसिंग सोसायटय़ा झाल्या. थोडय़ा राहिलेल्या रिकाम्या जागेतही फरशा बसविल्या गेल्या. त्यामुळे पक्ष्यांना झाडावरील बारीक किडे, बारीक अळ्या जे त्यांचे निसर्गातील अन्न होतं, ते राहिले नाही. घरटी करायलाही झाडे नाहीत. पण  Bird Feeder मुळे चिमण्या, पोपट, भुऱ्या रंगाचा चिमणीसारखा पक्षी, कावळे तरी येताहेत. चिमण्यांची संख्या तर निश्चितच वाढली आहे. पर्यावरणाला थोडासा हातभार लावला हेच छोटेसे समाधान. अशा रीतीने आमचे पक्ष्यांचे हॉटेलच आमच्या बाल्कनीत आहे.