अमेरिकेत राहणारी भारतीय कुटुंबे अनेक बाबींचा विचार करून राहण्यासाठी घरे निवडतात आणि ती गरजेनुसार बदलत राहतात. सुरुवातीला लहान अपार्टमेंट ज्यांना पुरेसे वाटते त्यांनाच पुढे तीन बेड रूम, लिव्हिंग रूम शिवाय तळघर  आणि तेथे होम थिएटर, लहानशी व्यायामशाळा यांची गरज भासते. मुले लहान असली तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या व खेळण्याची जागा लागते, असा हा प्रवास असतो.
भारतातील आणि विशेषत: मराठी कुटुंबातील ज्या मंडळींनी तरुण वयात अमेरिकेत येऊन गेल्या वीस-पंचवीस वर्षांत घरे थाटली, त्यातील कित्येकांच्या प्रवासाची सुरुवात स्वावलंबन आणि साधेपणातून झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरुवातीच्या काळात जे उच्च शिक्षणासाठी आले, त्यातील कित्येकांनी शिष्यवृत्ती अपुरी होती तेव्हा घरोघरी वर्तमानपत्रे टाकणे किंवा उपाहारगृहात बश्या विसळण्यापासून कामे केली. नंतरच्या काळात जे पदव्युत्तर शिक्षणासाठी आले, त्यातील अनेक जण तीन-चारच्या समूहात अपार्टमेंट घेऊन राहिल्याने त्यांना गृहव्यवस्थापनाचे धडे गिरवावे लागले. इतकेच नव्हे तर आळीपाळीने स्वयंपाक केल्याने ‘घर’च्या अन्नाची भूक भागवता आली. पुढे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकऱ्यांचे पेव फुटल्याने मोठय़ा संख्येने भारतीय तरुणवर्ग येऊ लागला तेव्हासुद्धा या लोकांना ‘अमेरिकेत जाताय, तेव्हा प्रेशर कुकर आणि पोळपाट लाटणे घेऊन जा,’ असे सल्ले अनुभवी लोकांनी दिले आणि ते योग्यच ठरले. एकंदरीत या सर्वच लोकांनी अमेरिकेत येऊन पाय रोवताना स्वत:हून कष्ट केलेले असतात याची अनेक उदाहरणे असतात.
मिहिर (नाव बदलले आहे) या ‘इन्फी’मध्ये काम करणाऱ्या तरुणाचे उदाहरण आहे. २००५ मध्ये तो अमेरिकेत आला तेव्हा भाडय़ाने घेतलेल्या घरासाठी त्याने तीन सीटरचा सोफा सेट गराज सेलमध्ये सेकंड हॅण्ड घेतला. महत्त्वाचे म्हणजे एका तासासाठी एक लहान ट्रक भाडय़ाने घेऊन त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून तो सोफा सेट ट्रकवर चढवला आणि स्वत: ट्रक चालवून तो घराकडे आणल्यावर दोघांनी मिळून ते धूड पहिल्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये जिन्यावरून चढवले. आज असे कित्येक जण स्वत:च्या प्रशस्त घरात थाटाने राहतात पण त्यासाठी आजही अंगमेहनत करतात, याचा प्रत्यय येत असतो.
शीतल आणि प्रियदर्शन (नावे बदलली आहेत) यांचे कॅलिफोर्नियातील प्रशस्त घर पाहण्याचा योग आला. शीतल ही मराठी कुटुंबातील युवती नागपूरहून एम्. ए केल्यावर अमेरिकेत आली. ती अ‍ॅमेझॉन कंपनीत काम करते. तिचा नवरा मूळचा हैदराबादचा असून अभियंता आहे. विशेष म्हणजे घर घेताना अपूर्ण असलेल्या बेसमेंटचे (तळघर) लाकूडकाम या दोघांनी मिळून स्वत: केल्याचे सांगितले. यात प्रत्यक्ष हव्या त्या लांबी-रुंदीच्या इमारती लाकडाची खरेदी आणि वर्कशॉपमध्ये नेऊन ते कापणे, तासणे आणि घरी आणून फिटिंग करणे हे सर्व काम त्यांनी केल्याचे कळल्यावर त्यांचे कौतुक वाटले. अशी स्वत:ची घरे थाटल्यावर त्यांचे व्यवस्थापन आत्मीयतेने होणे ओघानेच येते.
अमेरिकेतील घरे
अमेरिकेत घरांचे विशिष्ट प्रकार आहेत. टाऊन होम या प्रकारची घरे म्हणजे रो हाऊस असून, त्यांच्या भिंती एकमेकांना लागून असतात आणि सभोवतालचा परिसर सामूहिक असतो. दुसरा प्रकार सिंगल फॅमिली होमचा. यात घर स्वतंत्र असते आणि सभोवतालच्या मालकीच्या परिसराची देखभाल घरात राहणाऱ्यांना करायची असते. भारतातून आलेले बहुसंख्य लोक या दोन प्रकारच्या घरात राहतात. या व्यतिरिक्त ‘मदर -डॉटर हाऊस’ असा प्रकार असून या स्वतंत्र घरात दोन स्वयंपाकघरे आणि स्वतंत्र न्हाणीघरे असतात आणि लिव्हिंग एरिया साधारणपणे वेगळा असतो. अशी घरे किती प्रमाणात असतील हे कळत नाही, पण ज्या नातेसंबंधाचा इथे विचार केला आहे तो पाहता अशी घरे बरीच असल्यास आश्चर्य नाही. (भारतातसुद्धा ही कल्पना मूळ धरू शकेल.) याशिवाय ‘रान्च हाऊस’ असा एक प्रकार असून विस्तीर्ण अशा चराऊ/शेतजमिनीवर एक किंवा दोन मजली असे हे ऐसपैस घर असते. हे बाहेरून साधे दिसले तरी आत सर्व सुखसोयी असतात. गृहव्यवस्थापनाच्या संदर्भात वरील पहिल्या दोन प्रकारच्या घरांचा विचार केला आहे. परंतु त्याआधी अमेरिकन जीवनशैलीची थोडी माहिती असणे आवश्यक आहे.
जीवनशैली
अमेरिकेत राहणाऱ्यांची एक विशिष्ट जीवनशैली असून इकडे स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबांनी ती थोडय़ा फार फरकाने स्वीकारली आहे. यात घरातील पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जाणार तेही कदाचित वेगवेगळ्या वेळी हे गृहीत आहे, परंतु कित्येकांना आपल्या घरी राहून संगणकाच्या साहाय्याने कार्यालयीन काम करता येण्याची सोय आठवडय़ातून काही दिवस उपलब्ध असते. त्यांना लहान मुले पाळणाघरात ठेवता येतात आणि पुढे शाळेत जाऊ  लागल्यावर तीही घराबाहेर असतात. पालकांच्या गरजेनुसार या मुलांना शाळा सुटल्यावर तिथेच काही तास थांबता येण्याची सोय शाळा उपलब्ध करते. यासाठी शाळा आकारणी करते आणि पालक ठरलेल्या वेळी येऊन मुलांना घरी नेतात. मधल्या वेळात मुले अभ्यास करतात किंवा खेळतात. घरात आई-वडील मुले याशिवाय इतर कोणी व्यक्ती साधारणत: असत नाहीत. परंतु मुलांच्या शाळांना सुटय़ा असतात त्या काळात (जुलै-ऑगस्ट) भारतीय कुटुंबात आजी-आजोबा आल्याने व्यक्तींचे प्रमाण वाढलेले दिसते. तो काळ वगळता घरातील मोजकी माणसे, त्यांच्या कामाच्या/घराबाहेर असण्याच्या वेळा, त्यांचे कामाचे दिवस आणि साप्ताहिक सुट्टय़ा यासभोवताली त्या घराचे व्यवस्थापन फिरत असते.
पाच दिवस सतत धावपळ झाल्यावर ‘वीक-एंड’ येतो तेव्हा कुटुंबाला एकत्र वेळ घालवणे, मित्रमंडळींसोबत पार्टी ठेवणे किंवा त्यांच्याकडे जाणे, कुठे तरी रिसॉर्टला किंवा समुद्रकिनारी जाणे इ. पर्याय असतात. तसेच स्वत:चे आणि मुलांचे वाढदिवस आणि भारतीय सण साजरे करणे हे ओघानेच येते. हे सर्व काही साजरे करण्यासाठी घरात सुविधा असणे आणि त्या प्रसंगाचे चांगले नियोजन करणे हाही गृहव्यवस्थापनाचा भाग असतो.
अमेरिकेत राहणारी भारतीय कुटुंबे साधारणपणे या सर्व बाबींचा विचार करून राहण्यासाठी घरे निवडतात आणि ती गरजेनुसार बदलत राहतात. सुरुवातीला लहान अपार्टमेंट ज्यांना पुरेसे वाटते त्यांनाच पुढे तीन बेड रूम, लिव्हिंग रूम शिवाय तळघर (बेसमेंट) आणि तेथे होम थिएटर, लहानशी व्यायामशाळा (जिम) यांची गरज भासते. मुले लहान असली तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या व खेळण्याची जागा लागते, असा हा प्रवास असतो.
घरातील सुविधा
अमेरिकेत घर लहान किंवा मोठे असले तरी त्यात काही मूलभूत सुविधा आणि व्यवस्था समान असतात आणि त्यास कोणी चैन समजत नाही. यात घर हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यासाठी वातानुकूलनाची व्यवस्था प्रामुख्याने येते. तसेच गॅस किंवा विजेवर चालणाऱ्या चार शेगडय़ा आणि त्यांच्या खालच्या बाजूस केक इ. भाजण्यासाठी ओव्हन आणि वरील बाजूस मायक्रोवेव्ह अशी कुकिंग रेंज असते. तसेच अन्न टिकवण्यासाठी भलामोठा फ्रिज, कपडय़ांसाठी धुलाईयंत्र आणि कपडे वाळवण्यासाठी ड्रायर, स्वयंपाकाची भांडी आणि ताटे, बश्या इ. साठी डिश वॉशर इ. सुविधा असतात. तसेच स्वयंपाकघरातील सिंक, घरातील प्रत्येक वॉश बेसिन आणि अंघोळीसाठी टब, फवारा इ. प्रत्येक ठिकाणी थंड पाणी आणि ६० अंश सें.वरील गरम पाणी आणि तेही २४ तास मिळेल अशी सोय असते.
मुख्य म्हणजे वर नमूद केलेली प्रत्येक व्यवस्था म्हणजे घराचे पॅकेज असून त्याशिवाय घराला पूर्तता येत नाही आणि कोणी व्यवहारही करीत नाही. यातील वातानुकूलन करणारी आणि पाणी गरम करणारी यंत्रणा काही ठिकाणी प्रत्येक घरासाठी वेगळी असते आणि तिची देखभाल तिथे राहणाऱ्यास करावी लागते तर काही ठिकाणी इमारतीमधील सर्व अपार्टमेंटसाठी मिळून एक सामूहिक यंत्रणा असून तिचे संचालन कंपनीकडून केले जाते. गॅस, वीज आाणि पाणीपुरवठा यासाठी अर्थातच प्रत्येक घरासाठी मासिक बिले येत असतात.
वरील कोणत्याही सुविधेत / पुरवठय़ात बिघाड झाल्यास तुमचे घर स्वतंत्र असेल तर तुम्हालाच प्लंबर किंवा इलेक्ट्रिशियन शोधावा लागतो. परंतु तुम्ही कम्युनिटी / टाऊनशिपमध्ये राहत असाल तर फोनवर तक्रार केल्यावर तातडीने किंवा काही तासांत
मदत मिळते. कधी त्यासाठी आकारणी असते तर काही ठिकाणी मासिक भाडेपट्टीतच अशी सेवा अंतर्भूत असते.
या वेगवेगळ्या यंत्रांचा योग्य वापर करणे, देखभाल करणे आणि त्यात बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे हा गृहव्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. यातील बरीच यंत्रे वापरायला सोपी असून कोणासही निर्धोकपणे चालवता येतात. तरीसुद्धा ती चालवण्याचे काम घरातील मोठी माणसे करतात. यात कपडे धुण्याचे यंत्र कोण चालवील, भांडी धुण्याचे यंत्र कोण चालवील हे प्रत्येक ठिकाणी पती-पत्नी ठरवतात आणि ते ठरवताना एकमेकांकडे किती वेळ आहे हेच महत्त्वाचे असते. बाहेर कंपनीत मोठय़ा पदावर काम करणारा पुरुष घरी कोणताही कमीपणा न मानता पार्टीनंतर अ‍ॅप्रन बांधून भांडी विसळून ती धुलाईयंत्रात ठेवताना पाहणे हे दृश्य अजिबात विरळ असत नाही. तसेच कपडय़ांना रोज इस्त्री करण्याची पद्धत आणि गरज नसली तरी वेळ आल्यास ते काम दोघांपैकी कोणीही करताना दिसतात.
स्वच्छता व्यवस्थापन
बहुतेक घरात भांडी रोज धुण्याचा आणि कपडे धुलाई गरजेनुसार आठवडय़ातून दोन-तीन वेळा करण्याचा क्रम असतो. संपूर्ण घराची स्वच्छता हा एक वेगळाच विषय असून त्याकडे दैनंदिन लक्ष देण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो. मुळात घरे वातानुकूलित आणि दरवाजे-खिडक्या बंद असल्याने धूळ कमीच येते आणि आली तरी मोठे घर आणि कार्पेटचे आच्छादन किंवा लाकडी फ्लोिरग असल्याने त्यावरील धूळकचरा रोज साफ करणे शक्य होत नाही. तसेच स्वयंपाकघरातील सिंक, शेगडय़ा, फ्रिज इ. सर्व धुऊन पुसून स्वच्छ करणे; दोन-तीन बाथरूम असल्याने तेथील टॉयलेट, वॉश बेसिन, टब, सर्व नळ, आरसे इ. धुणे-पुसणे शक्य नसते. घरातील टेबले, खुच्र्या, अलमाऱ्या, टी. व्ही. केस, सरकणाऱ्या दरवाजांच्या काचा पुसणे, चॅनेल्समधील कचरा काढणे इ. कामे करताना किती दमछाक होईल याची कल्पनाच केलेली बरी. घरोघर व्हॅक्युम क्लीनर असतात, पण त्याचाही उपयोग एका मर्यादेनंतर रोज होऊ  शकत नाही. यावर शेवटी
एक उपाय म्हणजे साधारण दोन-तीन आठवडय़ानंतर एकदा संपूर्ण घराची स्वच्छता हाती घेतली जाते. पण घर मोठे असल्यास तेही काम हाताबाहेरचे ठरते.
यावर पर्याय म्हणून अनेक घरांत आता संपूर्ण स्वच्छतेसाठी बाहेरून मदत घेतली जाते. यात वर म्हटलेले प्रत्येक काम करण्यासाठी एजन्सीकडून एक-दोन बाया येऊन दोन-अडीच तासांत संपूर्ण घर स्वच्छ करून देतात.
यासाठी लागणारे व्हॅक्युम क्लीनर, ब्रश, स्क्रबर, डिर्टजट, पेपर नॅपकिन, स्प्रे इ. सर्व साहित्य त्यांचेच असते आणि सर्व घर लख्ख करून मिळते. घराच्या आकाराप्रमाणे साठ-सत्तर डॉलर एवढा खर्च येतो, पण गृहिणींना समाधान मिळते. हे नेहमी करावे लागल्याने येणाऱ्या बाया ओळखीच्या होतात आणि विश्वासाने काम होते.
स्वयंपाकघरातील ओला-कचरा हा मात्र साठेल त्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या बंद केलेल्या पिशव्यांतून आणि सुका कचरा चाके असलेल्या प्लॅस्टिक बिनमधून विवक्षित ठिकाणीच नेऊन ठेवावा लागतो आणि त्याची विल्हेवाट रोज होत असते. हे काम लहान मुलेसुद्धा जाता-येता करतात आणि याबाबत कोणीही हयगय करताना दिसत नाही. त्यामुळे परिसर स्वच्छ असतो.
श्रमव्यवस्थापन
अमेरिकेत कोणत्याही कामासाठी (उदा. बागकाम) माणूस बोलावला तर त्याला तासाच्या हिशेबाने पारिश्रमिक द्यावे लागते. याऐवजी कित्येक जण नेहमी लागणारी यंत्रे, अवजारे स्वत:ची ठेवतात. तुमच्या घरासभोवताली तुमचा परिसर असेल तर हिरवळ कापणारे यंत्र, झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी कात्र्या- करवती, शिडी, खणण्यासाठी कुदळ-फावडी-खुरपी, हिमवर्षांवानंतर घरासमोरील बर्फ हटवण्यासाठी फावडे, कीटकनाशकासाठी स्प्रे-पंप तसेच इलेक्ट्रिक-प्लंबिंग साहित्य, गॅॅरेजमध्येच खचाखच भरलेले असते. कधी ते इतके असते की शेवटी गाडीच गॅॅरेजमध्ये ठेवण्याची वेळ येते. गृहव्यवस्थापनाचा भाग म्हणाल तर हे सर्व साहित्य पुरुषांनाच वापरावे लागते म्हणूनच सुरुवातीला दिलेले शीतलचे उदाहरण अपवादात्मक आहे असे कोणीही म्हणेल. या संबंधातील आणखी एक बाब म्हणजे तयार फर्निचरसुद्धा मॉलमधून घेताना संच (किट) स्वरूपात मिळते आणि तो संच अवजड असेल तरी हातगाडीवरून पार्किंगमध्ये नेणे, आपल्या वाहनावर चढवणे, घरात नेणे आणि त्यातील सर्व पार्ट नकाशानुसार एकत्र जोडणे हे कामसुद्धा आपल्यालाच करावे लागते आणि ही मंडळी करताना दिसतात.
एकंदरीत पाहता अमेरिकेत आल्यावर या लोकांनी जी जीवनशैली स्वीकारली आहे, त्यानुसार येथील गृहव्यवस्थापन असून त्यात ऐदीपणाला थारा नाही. आपण समजतो त्याहून किती तरी जास्त कष्टच करून ही मंडळी जीवनातील आनंद मिळवीत असतात, हे प्रत्यक्ष पाहिल्यावर कळते आणि त्याला दाद द्यावीशी वाटते.
मुकुंद नवरे – mnaware@gmail.com