घराची सजावट आणि मानवी मन यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवणारं सदर
घराला घरपण देणारी आधुनिक कला आणि शास्त्र म्हणून उदयाला आलेलं नवीन क्षेत्र म्हणजे इंटीरिअर डिझायनिंग आणि डेकोरेशन, अर्थात गृहसजावट. सुरुवातीला केवळ स्त्रियांपुरतं मर्यादित असलेलं हे क्षेत्र कालांतरानं स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता सर्वानीच स्वीकारलं. निव्वळ स्वत:च्या घराची सजावट करण्यासाठी ते वापरलं न जाता हळूहळू व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जाऊ लागलं. आणि खरं तर त्यामुळेच ते अधिक लवकर विकसित होत गेलं. म्हणूनच ती कला न राहता ते शास्त्रही असल्याचं कालांतरानं आपल्याला समजू लागलं. आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी घराची जरुरी असतेच, पण त्या घराला घरपण आणण्यासाठी गृहसजावट अधिक आवश्यक असते.
गृहसजावट ही कला की शास्त्र?
आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रामुख्याने तोंडी बोलली जाणारी आणि देहबोलीचा वापर अधिक करत असतो. काही वेळा लेखी स्वरूपातील भाषाही वापरतो. परंतु संकल्पचित्रकृतीची भाषा अधिक प्रभावी ठरत असते. अनेकदा आपण चित्रकृतीचा संबंध कलेशी जोडत असतो. गृहसजावट करण्यासाठी जेव्हा या क्षेत्राचा खऱ्या अर्थाने उगम झाला तेव्हा त्याची सुरुवात चित्रकलेतून झाली. ही खरं तर एकप्रकारची भाषाच असते. आणि ती म्हणजे संकल्पचित्रकृती. जे प्रत्यक्षात अथवा अस्तित्वात नाही ते संकल्पचित्रकृतीच्या माध्यमातून साकारण्याची ही कला. या कलेला भाषेच्या कोणत्याही मर्यादा नसल्यामुळे ती कोणीही अवगत करू शकतो. त्यामुळेच तिची अधिक वेगाने प्रगती होऊ शकली. सुरुवातीला केवळ चित्रकला असं स्वरूप होतं. त्याच्या उपयोगातून गृहसजावट केली जाऊ लागली. परंतु गरजा, परिस्थिती, अपेक्षा दिवसेंदिवस बदलत गेल्यामुळे या कलेचा आवाका वाढत गेला. त्यामुळेच ही कला पुढे हळूहळू शास्त्र म्हणून नावारूपाला येऊ लागली. शास्त्रीय दृष्टिकोनातून गृहसजावट करण्याचं नेमकं महत्त्व काय, याचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं आहे.
प्रकाश-सावलीचा खेळ आणि मेळ : अंतर्गत सजावटीच्या कामात प्रकाशाचं ws08माध्यम अत्यंत महत्त्वाचं असतं. रंगसंगतीच्या निवडीप्रमाणे प्रकाशयोजना निवडणं हेदेखील गरजेचं असतं. रंगांचा वापर करताना आलेल्या काही मर्यादा आपण प्रकाशयोजनेतून पार करू शकतो. रंग आणि प्रकाश यांचा एकत्रितपणे मेळ बसवण्याची गरज लक्षात घेऊन प्रकाशयोजनेची निवड करावी लागते. रंग हे खरं तर प्रकाशाशिवाय अपूर्णच असतात. आपल्याला रंगांचं ज्ञान हे केवळ प्रकाशामुळेच होत असतं. प्रकाशयोजनेत नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्हीचा विचार करावा लागतो. गृहसजावट करण्यासाठी प्रकाशाचं माध्यम अधिक प्रभावी ठरत असतं.
वास्तुविद्या आणि अंतर्गत उपलब्ध जागेचं तसंच मालमत्तेचं शास्त्रीय व्यवस्थापन :वास्तुविद्येच्या दृष्टिकोनातून उपलब्ध अंतर्गत जागेचं आणि घरातल्या मालमत्तेचं शास्त्रीय व्यवस्थापन करावं लागत असतं. तेव्हाच ते गृहसजावट करण्याचं यथायोग्य काम झालं असं म्हणता येऊ शकतं.
अंतर्गत संरचनेची मूलतत्त्वे गृहसजावट करताना अंतर्भूत केलेली असणं गरजेचं असतं. घरातल्या अनेक लहानसहान वस्तू आपल्याला नेहेमीच वापराव्या लागतात असं नाही. त्यामुळे नेहमीच लागणाऱ्या अथवा नेहमी न लागणाऱ्या सर्वच वस्तू नेमकेपणानं व्यवस्थित ठेवाव्या लागतात. कोणतीही वस्तू लहान असली तरी ती आपली मालमत्ताच असते. अशा वेळी या लहान- मोठय़ा सर्वच वस्तूंचं शास्त्रीय व्यवस्थापन करणं महत्त्वाचं असतं.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गृहसजावट : आपल्या घराचा संबंध आपल्या मनाशी असतो तसंच घराच्या अंतरंगाचा संबंध त्या घरात राहाणाऱ्या व्यक्तींच्या अंतर्मनाशी असतो. त्यांचं परस्परांमध्ये एक निराळं नातं असतं. आपलं स्वत:चं, हक्काचं, आपल्या स्वप्नातलं असं घर की जे नेहमीच आपलं वाटत असतं केवळ आपल्या अंतर्मनातील भावभावनांमुळे. आपल्या मनातलं घर आणि घरातलं मन हे कधीही एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गृह सजावट करणं आवश्यक ठरतं. यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार करावा लागतो. प्रत्येक कौटुंबिक सदस्याच्या मानसिकतेचा अभ्यासपूर्वक विचार करावा लागतो. प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे आवडी-निवडी, अपेक्षा, गरजा, शारीरिक व्यक्तिमत्त्व हे निराळं असतं. त्याप्रमाणे त्याला साजेसं, शोभेल असं गृहसजावटीचं काम होणं निश्चितच उपयोगाचं ठरतं.
शारीरिक मोजमापांचा संबंध गृहसजावटीशी : गृहसजावट करताना वापरली जाणारी प्रत्येक वस्तू अथवा फर्निचर हे त्या घरात वापर करणाऱ्या व्यक्तीच्या शारीरिक आकार, मोजपामे यांवर आधारीत असावं लागतं. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं; त्याप्रमाणे पण शारीरिक दृष्टिकोनातून यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवांची मोजमापे महत्त्वाची असतात. प्रत्येक व्यक्तीच्या अवयवांची आकारमान, ठेवण निरनिराळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या शारीरिक हालचाली, चालणं, उठणं, बसणं असं सर्वच वेगवेगळं असतं. प्रगत तंत्रज्ञान : हल्लीचं आपलं जीवन खूपच धावपळीचं आणि म्हणूनच जलद झालं आहे. त्यामुळे आपलं दैनंदिन कामदेखील जलद गतीनं होण्याची गरज निर्माण होत चालली आहे. अशी जलद कामं करण्याकरता सद्यस्थितीत अंतर्गत सजावटीच्या कामासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. रिमोट कंट्रोल आणि सेन्सरच्या साहाय्याने वापरल्या जाणाऱ्या अनेकविध अत्याधुनिक वस्तू गृहसजावट करण्यासाठी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या गृहसजावटीच्या अनेकविध वस्तू आपण वापरण्यासाठी निवडू शकतो. अशा तंत्रज्ञानाच्या वापरातून केलेलं काम हे शास्त्रीय दृष्टिकोनातून उपयोगाचं ठरत असतं.
रंगशास्त्र : अंतर्गत संरचनेच्या आणि गृहसजावटीच्या दृष्टिकोनातून रंगशास्त्राचा खूप मोलाचा वाटा असतो. मुळातच अंतर्गत संरचनेचा संबंध अंतर्मनाशी असतो आणि रंगांचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. विविध रंग अंतर्मनाला जाऊन भिडणारे असतात. प्रत्येक रंगामुळे आपल्या अंतर्मनामध्ये निरनिराळे भाव प्रकट होत असतात. निरनिराळ्या रंगांमुळे निर्माण झालेल्या आपल्या भावना आपण उत्स्फूर्तपणे व्यक्त करत असतो. त्यामुळेच रंगशास्त्र गृहसजावटीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कोणत्या रंगाचा कोठे, कसा, किती, का आणि केव्हा वापर करायचा हे पाहणं अत्यंत आवश्यक असतं. अशा अनेकविध बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून आपल्या घराची अंतर्गत संरचना आणि सजावट करावी लागत असल्यामुळे ते निव्वळ कलेपुरते मर्यादित नसून शास्त्रही आहे. या सर्व दृष्टिकोनातून वरील सर्व बाबी किती महत्त्वाच्या असू शकतात हे जाणून घेऊन आपल्या घराला घरपण देणं सहज शक्य होऊ शकतं.
इंटिरीअर डिझायनर -sfoursolutions1985@gmail.com

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!