रजनी अशोक देवधर

घराची ओढ लागलेला माणूस जसा घराकडे परततो तसा मी जंगलात जातो. आयुष्यातला अनावश्यक फापटपसारा काढून टाकत निसर्गाचे उदात्त सुंदर रूप पाहण्यासाठी..

१२ जुलै १८१७ रोजी अमेरिकेत जन्मलेला, अवघे ४३ वर्षांचे आयुष्य लाभलेला हेन्री डेव्हिड थोरो हा लेखक, कवी, निसर्गवेडा. तिरकस बुद्धीचा आणि वागण्यात सच्चेपण असलेला विचारवंत. निसर्गाची अपार ओढ असलेला कलंदर. याच्या विचारांचा, साहित्याचा प्रभाव उच्च मानवी मूल्यांसाठी; अन्याय, शोषण याविरुद्ध झगडणाऱ्या युगपुरुषांवर आहे.  महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टनि ल्युथर किंग या साऱ्यांनाच थोरो गुरुस्थानी. त्याच्या Civil Disobedience (सविनय कायदेभंग ) या निबंधाचे वाचन महात्मा गांधींनी आफ्रिकेतील तुरुंगात असताना केले होते.  बलाढय़ ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देण्याच्या त्यांच्या धोरणाला अिहसेच्या मार्गाची दिशा सापडल्यावर भारतात परतल्यावर १४ फेब्रुवारी १९३० रोजी गांधीजींनी  सविनय कायदेभंग चळवळ म्हणजेच हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे आणि शिक्षा भोगणे अशा पद्धतीने सुरू केली. सविनय कायदेभंग ही संकल्पना त्यांना थोरोच्या साहित्यात सापडली.

अमेरिकत मॅसेच्युसेट राज्यात काँकॉर्ड येथे त्याचा जन्म. थोरो काँकॉर्डला राहायचा तेव्हा गावात थोडय़ा इमारती होत्या. तलाव, शेतं आणी नद्या आणि जंगल होते. थोरोला उपजत आवड घराबाहेर निसर्गात राहायची, निसर्गातल्या विविध गोष्टींची दखल घेत निरीक्षण करायची. घराबाहेर पडून जंगलात राहायची. घरी वडिलांचा पेन्सिल बनवायचा छोटा व्यवसाय. त्यात मदत करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर लेखक व कवी राल्फ इमर्सन यांच्याशी त्याचे मत्रीपूर्ण संबंध जुळले. थोरोचं निसर्गप्रेम पाहून त्यांनी थोरोला निसर्गात पाहिलेल्या घटना नोंद करून ठेवण्यास सांगितले, तसेच निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्यांच्या मालकीच्या वतनवाडीत राहण्यास दिले. थोरो तिथे १८४५ ते १८४७ दोन वर्षे दोन महिने राहिला. काँकॉर्ड येथील वॉल्डन नामक तळ्याकाठी स्वत: लहानसे साधे झोपडे बांधून दोन वर्षे तेथे राहणाऱ्या थोरोच्या गरजा फार कमी. जरुरीपुरत्याच वस्तू, स्वयंपाकासाठी भांडी आणि पलंग, टेबल, तीन खुर्च्या इतकेच फर्निचर. कमीत कमी गरजा ठेवून जास्तीत जास्त काळ निसर्गाच्या सान्निध्यात जगणारा थोरो निसर्ग हा गुरू मानणारा. साधी राहणी, सुलभ व्यवहार याचा खंदा पुरस्कर्ता. थोरो वॉल्डन सरोवराकाठी जंगलात हेतुपूर्वक कमीत कमी गरजा या प्रयोगासाठी राहिला. स्वत: जमीन खणून,मशागत करून धान्य, बटाटे पिकवून रांधलेली श्रमाची भाकरी किती रुचकर लागते हा अनुभव घ्यायला हवा हे त्याचे श्रमाचे महत्त्व पटविणारे विचार आणि त्यानुसार कृतीदेखील. तत्कालीन अमेरिकेतील शोषणावर आधारलेल्या गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध असलेला थोरो वॉल्डन काठच्या या दोन वर्षांच्या वास्तव्यात त्याने मेक्सिकन युद्ध पुकारणाऱ्या जुलमी सरकारचा निषेध म्हणून कर भरला नाही आणि शिक्षा म्हणून तुरुंगवासदेखील भोगला होता. त्या अनुभवावर आधारित त्याचा विचारप्रवर्तक निबंध Civil Disobedience गांधीजींना प्रेरणा देणारा. वॉल्डन सरोवराकाठी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवसंपन्न होत त्याने मानवी आयुष्यात शारीरिक श्रमाचे महत्त्व, निसर्ग निरीक्षण, शोषण, अन्याय याविरुद्ध सविनय कायदेभंग हे अस्त्र जगाला दाखविणारी; विविध विषयांवरील साहित्यसंपदा निर्माण केली. वॉल्डन सरोवराचा विस्तीर्ण जलाशय हिवाळ्यात गोठलेला, त्यात येणारी बदके, काठी असलेले पानगळीचे मेपल वृक्ष हिवाळ्याआगोदर लाल, किरमिजी, केशरी रंगात न्हाऊन नंतर पर्णभार उतरविणारे या साऱ्याचा आस्वाद घेत जगणारा हा निसर्गपुत्र –  Enjoy land but own it not- जमिनीवर मालकी हक्क मिळविण्यापेक्षा निसर्गाचा आनंद घ्या म्हणत साधी जीवनपद्धत सहज अंगीकारतो. माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं, माणसाच्या निसर्गाच्या ठायी असलेल्या जाणिवांचा शोध घेणारे त्याचे अनुभव वॉल्डन सरोवराच्या सान्निध्यातल्या त्याच्या वास्तव्यातले त्याने वॉल्डन या पुस्तकात लिहिले.

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट राज्यात काँकॉर्ड परगण्यात असलेले वॉल्डन सरोवर त्याच्या काठावर टेकडीशेजारी थोरोनी १८४५ साली स्वत: बांधलेले त्याचे घर तिथे अस्तित्वात नाही. थोरोच्या घराची प्रतिकृती बनवून वॉल्डन सरोवराच्या निसर्गसुंदर परिसरात त्याचे घर असलेल्या जागेपासून काहीशी दूर तलावाच्या उत्तरेला जतन केली गेली आहे.  १०० वर्षांनंतर १९४५ साली पुरातत्व शास्त्रज्ञ रॉलॉन्ड वेल्स रॉबिन्स यांनी केलेल्या उत्खननात थोरोचे घर असलेली जागा सापडली. तिथे थोरोची स्मारकशिला बसविली आहे. थोरोने घराच्या बांधकामात कोणतीही कलाकुसर, तत्कालीन स्थापत्यशैलीचे दिमाखदार आविष्कार जाणीवपूर्वक टाळले होते. घरातील माणसांना ताणतणाव नसल्यास ते घर सुंदर होतं. सजावट, नक्षीकामाने नाही असे विचार असणारा थोरो वॉल्डनकाठच्या जंगलात झोपडी बांधून जीवन शिकण्यासाठी राहिला. घर म्हणजे ऊन, पाऊस, बर्फवृष्टी यांपासून संरक्षणासाठी निवारा. घर बांधण्याचा इतकाच हेतू असल्याने थोरोचे घर होते लहान एका खोलीचे. त्या काळी असलेले तंत्रज्ञान आणि साहित्य वापरून त्याने एकटय़ाने बांधलेले. अनावश्यक फापटपसारा टाळून कमीत कमी गरजा ठेवून जगणाऱ्या थोरोने स्वत: बांधलेले त्याचे घर म्हणजे चार भिंती आणि वर छप्पर. हवेसाठी समोरासमोर दोन खिडक्या, घरात जाण्यासाठी दरवाजा इतकी साधी रचना. सरपणाची लाकडं ठेवण्यासाठी घरामागे लहानशी खोपी. थंडीपासून बचावासाठी घरात मागच्या भिंतीत बसविलेली शेगडी. त्यावर धुरांडे- धूर घराबाहेर टाकणारे. त्याचे टोक छपरापेक्षा उंच काढलेले. या उंच धुरांडय़ाचा जमिनीत खणलेला दगडाचा पाया उत्खननात सापडला ज्यावरून वॉल्डन सरोवराकाठच्या विस्तीर्ण परिसरातील थोरोच्या लहानशा घराची नेमकी जागा निश्चित झाली होती. घर बांधण्यासाठी थोरो कुऱ्हाड घेऊन वॉल्डनकाठच्या जंगलात गेला. जंगलातील पाईन वृक्ष तोडून त्याच्या लाकडापासून घराचा सांगाडा करताना थोरो पाईन जंगलाचा मित्र झाला. लाकडाचा सांगाडा, लाकडाची जमीन असलेली छोटेखानी केबिन, वर लाकडी माळा उंच छत आणी घराखाली जमिनीमध्ये खणलेले  ६ फूट रुंद ७ फूट खोल तळघर. शीत प्रदेशातल्या कडक हिवाळ्यात उबदार राहणारे. त्या काळी घरासमोर जमिनीमध्ये खड्डा करून कंदमुळे, भाज्या साठविण्याची पद्धत होती. तळघर हे त्याचे सुधारित स्वरूप थोरोने केलेले. थोरो दोन वर्षे राहून तेथून गेल्यावर हे घर पाडून टाकण्यात आले. मात्र थोरो जीवन शिकण्यासाठी या हेतूने तिथे राहिला तो हेतू सफल झाला. त्याचे निसर्गविषयक सूक्ष्म निरीक्षणे असलेले साहित्य निसर्गाचे महत्त्व विशद करणारे आहे. त्याचे विचारधन मानवी मूल्यांसाठी बलाढय़ सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या युगपुरुषांना प्रेरणा देणारे आहे. ६ मे  १८६२ साली त्याने जगाचा निरोप घेतला.

deodharrajani@gmail.com