08 April 2020

News Flash

घराचे आवार

घरातल्या मुली गजरा लावायच्या वयाच्या झाल्या की मोगरा, अबोली आवारात लावायच्या.

(संग्रहित छायाचित्र )

यशवंत सुरोशे

पूर्वी माणसे जशी मोकळी-ढाकळी असायची, तशी त्यांची घरेही सुटसुटीत असायची. दोन घरांमध्ये पुष्कळ मोकळी जागा असे. घरासमोर जसे मोठे अंगण असे तसे घरामागे मोठे आवार असे. अंगण आणि आवार यांच्या सीमेवर घर उभे असायचे. एकवेळ अंगण लहान असायचे, पण आवार मात्र मोठे असायचे. घराच्या मागच्या पडवीला लागून असणारी मोकळी जागा आवारासाठी राखली जाई. या आवाराला कुंपण घातले जाई. या कुंपणाला वई म्हणायचे. शेजारच्या रानातून आणलेल्या झित्र्यांपासून (विशिष्ट झाडाच्या झावळ्या) ही वई केली जाई. वई करण्याचे दोन मौसम असत. पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आवाराला कुंपण केले की मोकळ्या आवारात कारली, भोपळ्याचे वेल लावता यायचे. पावसाळ्यात वईचे वासे, झित्र्या, पेटय़ा कुजून जात. मोकळी जनावरे आवारातील हिरव्यागार भाज्यांना पाहून वई ओलांडून येत. मग पुन्हा पावसाळ्यानंतर वासे, पेटय़ा, ताणे (वेली) झित्र्या आणून आवाराला वई केली जाई. जो-तो आपापल्या सवडीनुसार वई करे. जुन्या वईचा पाला, कचरा राबासाठी शेतावर नेला जाई.

घरातल्या कर्त्यां स्त्रीला आवाराचा मोठा हातभार लागे. घराच्या न्हाणीघराचे पाणी आवारात निघे. या पाण्यावर घेवडय़ाचा वेल पोसायचा. चार खाकऱ्या उभ्या केल्या की त्यावर घेवडा पागांयचा. दिवसाआड टोपलीभर शेंगा निघत. चुलीतली राख आवारात टाकायची जागा ठरलेली असे. सुरणाचे कंद लावलेले असत. त्याभोवती सकाळी चुलीतून काढलेली राख या सुरणाच्या खोडाभोवती आई टाकायची.

पावसाची चाहूल लागली की सर्वजण आवार साफ करायचे. गोठय़ातील खाटी (शेणखत)आवारभर पसरीत. मग मिरची, वांग्याचा वाफा बनवीत. आई येता-जाता खरकटं पाणी हात लांब करून वाफ्यावर टाकी. दिवाळीत काढलेले करवंद आणि अळू ओटा करून लावले जाई. पावसाअगोदरच त्यांना धुमारे फुटलेले असत. वाफ्यात वाढलेली वांग्या, मिरच्यांची रोपं ओटय़ावर लावली जात. श्रावणाच्या चाहुलीपूर्वीच अळूची पाने वाऱ्यावर डोलू लागत. घरातील लहान मुले अळूच्या पानावरील पावसाचा थेंब खेळत. कोपऱ्यातील शेवग्याचे झाड वाऱ्याने मोडेल म्हणून आई आवाराकडे जाऊ द्यायची नाही.

आवाराच्या बाजूला पडवीला लागूनच भांडी घासायची जागा असे. जेवणे झाली की उष्टी भांडी या जागेवर आणून ठेवायची. आईचे जेवण झाल्यावर ती भांडी घासायची. भांडी घासायला लागणारी राख आणि शाळेचे मदान आखायला लागणारी राख आवारातच मिळे.

अंगण मोकळे असल्यामुळे वाळवण राखायला लागते. पण आवार स्वच्छ असेल तर वाळवण ठेवायला आवराइतकी सुरक्षित जागा नसे. पडवीच्या वाश्याला एक टाके व घेवडय़ाच्या वाश्याला एक टाके बांधून वाळणी केली जाई. त्यावर आईचे लुगडे उन्हात दिवसभर तापे.

अचानक कोणी पाहुणा-रावळा आला नि घरात तेला-मिठाची बोंब असेल आई आवारातून शेजाऱ्याकडे जाई. तिथूनच पदराखाली हातात काही आणे. आवारामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राही. मेच्या सुट्टीत आवारात खेळायला पुष्कळ जागा असे. शेवग्याची सावली ती किती असणार? तरी खेळ रंगत जायचा. घरातली पोरं आवारात खेळतात यामुळे धास्ती वाटत नसायची. मुले आपसूक म्हणायची.. चल आमच्या आवारात खेळायला.

आवाराच्या शेजारून जाताना एखादी बाई आवार न्याहाळे. आपल्या नजरेने शेवगा, अळू, घेवडा शोधी. मग घराजवळ येऊन म्हणे, ‘‘वन्स, भाजीपुरत्या शेंगा नेऊ का?’’ घरातून आवाज येई, ‘‘तूच काढ ना, तूच ने..’’ असा सारा मामला असे. आवारातल्या वाणावळ्यांची देवाणघेवाण व्हायची. श्रावणातल्या सोमवारी अळूची भाजी वाटय़ाला येत नसे. पण सारा गाव तृप्त व्हायचा.

लग्नप्रसंगी, हेच आवार स्वयंपाकाचे केंद्रस्थान होई. अंगणात पंगती बसत.आवारात जेवण बनवले जाई. कधी घरातील अडगळ पडवीतही नकोशी होई. मग ही अडगळ आवारात येई. गोठय़ाची भुई घालून सुकेपर्यंत गाई-गुरे आवारात एका बाजूला बांधली जायची. बलगाडी सोडण्याचे ठिकाण म्हणजे आवार!

घरातल्या मुली गजरा लावायच्या वयाच्या झाल्या की मोगरा, अबोली आवारात लावायच्या. फुलांचा गजरा करून माळायच्या. दसऱ्याला लागणारी फुले आवारातल्या झेंडूची पुरेशी होत. कुणी कुठल्या गावाला जाई. तिथून नवे फुलझाड आणी. आपल्या आवारात वाढवी.ते नवे पोरा-पोरींनी पाहिले की त्यांनाही वाटायचे. हे फुलझाड आपल्या आवारात हवे. घरातली मोठी माणसे फुलझाडांना किंमत देत नसत. त्यांना ती बिनउपयोगाची वाटत.  त्यापेक्षा चार बिया डांगर, भोपळा, कोहळा, घोसाळी, शिरवळा यांच्या लावा असे म्हणत. एखादीच्या साखरपुडय़ाला आवारातल्या अबोलीच्या फुलांचा भला मोठा गजरा केला जाई. मग मुली म्हणायच्या, पाटलांच्या आवारातून आणली फुले!

पण जशी माहितीची गर्दी झाली नि मने संकुचित बनली तशी लोकसंख्या वाढली नि घरे आवाराविना गावात हरवली. सवता निघालेल्या भावाचे घर आवारात उभे राहिले नि आवार अस्तित्व गमावून बसले. आवारातील फुलझाडे अंगणात आली. मग अंगणही आक्रसले तेव्हा फुलझाडे कुंडीत आली. आता कुंडय़ाही घरात आल्यात नि फुलझाडांचे बोन्साय झालेय.

दोन घरांच्या बोळीतून पलीकडे जाताना आठवत राहते आवार! बंगल्याभोवती चार चार फुटांची राखलेली मोकळी जागा पाहताना आठवत राहते आवार! वईच्या आल्याड-पल्याड उभे राहून घटकाभर गप्पा मारणाऱ्या चुलत्या-काकी आठवत राहतात. हरवत चाललेले गावपण पाहून आठवत राहते आवार!

surosheyashavant @gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 1:49 am

Web Title: house yard vasturang abn 97
Next Stories
1 निवारा : ग्रामीण भारतात असलेली वास्तुकलातज्ज्ञांची गरज
2 वस्तू आणि वास्तू : स्वच्छता नांदो इथे!
3 ‘घर खरेदीदार धनकोच’
Just Now!
X