गृहसजावट करताना आपल्याला सर्वात प्रथम सुरुवात करावी लागते ती त्या घराच्या प्रवेशद्वारापासून. घरात प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे त्या घराचं प्रवेशद्वार. आपल्या गृहप्रवेशाच्या वेळी तसेच आपल्याकडे येणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी हे प्रवेशद्वार केवळ सज्जच नाही, तर सजलेलं असलं पाहिजे. आपल्यापैकी अनेकांसाठी गृहप्रवेश आपल्या घराशी असलेल्या भावनिक नात्याशी संबंधित असतो. गृहप्रवेशाच्या बाबतीत अनेकांच्या निरनिराळ्या संकल्पना असतात. स्वत:च्या घरातला पहिला प्रवेश नेहमीच अविस्मरणीय असतो. त्यातही ते घर पहिलंच असेल तर एक निराळाच आनंद असतो.   
या मुख्य प्रवेशद्वारामुळे आणि त्याच्या संरचनात्मक सजावटीमुळे त्या घरात राहणाऱ्यांची संस्कृती, सौंदर्यदृष्टी, सजकता, सुरक्षितता, सामाजिक स्थान, आर्थिक कुवत, शैक्षणिक पात्रता अशा अनेक बाबींची कल्पना येत असते. आपल्या घराची सुरुवातच मुळी या ठिकाणापासून होत असते. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रथम भेटीतच आपल्याकडे आणि आपल्या घराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असेल, हे सर्वस्वी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अवलंबून असतं. या कारणामुळे एकूणच आपल्या घर सजवण्याच्या सर्व कामांमध्ये आत्यंतिक महत्त्वाचं काम म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराची संरचनेच्या माध्यमातून सजावट करणं.
गृहसजावटीत प्रथम स्थान प्रवेशद्वाराचं : आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रामुख्याने प्रवेशद्वाराचा वापर दिवसभरात अनेक वेळा आणि निरनिराळ्या कारणाने करत असतो. घराचा मुख्य दरवाजा त्या घरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला वापरावाच लागतो. त्यामुळेच गृहसजावट करताना प्रवेशद्वाराचं स्थान मोलाचं आणि म्हणूनच मानाचं असतं. प्रवेशद्वार खरं तर त्या घराची एक प्रकारे ओळखच असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रवेशद्वाराची सजावट करण्याचं नेमकं महत्त्व काय, याचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं आहे. अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सर्वसाधारणपणे एकेरीच असतं. अशा दाराच्या बाहेरील बाजूस सुरक्षिततेसाठी अजून एका सेफ्टिडोअरची सोय केली जाते.
प्रवेशद्वाराची जागा आणि ठिकाण :  आपल्या घराचं प्रवेशद्वार कशा प्रकारे सजवावं हे सर्वसाधारणपणे आपल्या घराची जागा, ठिकाण, मुख्य प्रवेशद्वाराची जागा, त्या सभोवतालची जागा, घराची उंची, एकूणच आकारमान, घराची जमिनीपासूनची उंची, घराच्या बांधकामाचे स्वरूप, आजूबाजूचा परिसर अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्वक विचार होणं गरजेचं असतं. या शिवाय आपल्या स्वत:च्या तसेच आपल्या कुटुंबीयांच्या लौकिक आणि अलौकिक गुणांचादेखील विचार होणं आवश्यक असतं. आपला व्यवसाय तसेच शिक्षण हेदेखील आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या संरचनेवरून नव्यानं आपल्या घरी येणाऱ्यांना समजू शकलं पाहिजे.
स्थापत्य शास्त्र आणि अंतर्गत सजावट यांचं महत्त्व : आजही वाडा संस्कृतीच्या माध्यमातून साकारलेल्या घरांची प्रवेश दारं निरनिराळ्या प्रकारे सजवलेली पाहायला मिळतात. या घरांच्या मुख्य दाराची सजावट करताना प्रामुख्याने सभोवतालच्या भिंतींवरही चित्रकृतींच्या उपयोगातून विविध प्रकारे त्या घराचं आणि दाराचं महत्त्व पटवून देण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केलेला असल्याचं दिसून येतं. अशा घराच्या दाराबाहेरील ओसरीदेखील विशिष्ट प्रकारे सजवली जात असल्याचं दिसतं. घराचा उंबरठा, दाराची चौकट आणि मुख्य दार या सर्वच भागांचा सजावट करताना विचार केला जात असल्याचं आपल्या लक्षात येतं. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी असं सजवलेलं दार सज्ज असल्याची संकल्पना त्यामागे असल्याचं समजलं जातं. या दारांची सजावट प्रामुख्यानं लाकडाचा वापर करून आणि त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करून केली जाते. ही सजावट करत असताना काही वेळा पितळी वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केल्याचंही दिसून येतं. वाडा संस्कृतीच्या घरांना किमान मुख्य दोन दारं असतातच; परंतु तरीही कायम मुख्य प्रवेशद्वाराच्या सजावटीलाच अधिक प्राधान्य दिलं जात असल्याचंही आपल्या लक्षात येतं.  
प्रवेशद्वार म्हणजे त्या घराचा आरसा : हल्लीच्या घरांमध्ये आपल्याला नावीन्यपूर्ण प्रवेशद्वारांचा मुळातच वापर केल्याचं दिसतं. फरक एवढाच की त्यांचं संरचनेचे स्वरूप बदललं आहे, त्यांच्या सजावटीच्या संकल्पना बदलल्या आहेत. आणि अर्थातच त्यांचे आकार तसेच आकारमानदेखील निराळे झाले आहे. त्यांच्या जागा वेगवेगळ्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. अपार्टमेंटमधल्या घरात आणि बंगल्यात एकूणच त्यांच्या संरचनेत फरक असतो.
प्रवेशद्वाराची संरचना आणि त्या घरातलं कुटुंब : आपलं घराचं स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो. स्वप्नात बघितलेल्या घराची सुरुवातच मुळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून होते. आपल्या घराची खरं तर ओळख होत असते ती मुख्य प्रवेशद्वारामुळे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील सर्व गुणांचा परिचयच या प्रवेशद्वारामुळे होत असतो.
विविध मोजमापं लक्षात घेऊन प्रवेशद्वाराची संरचना :  बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी सजावट करण्याच्या दृष्टिकोनातून बरंच काही करण्यासारखं असतं. मुख्य म्हणजे त्याचं आकार आणि आकारमान दोन्हीही अपार्टमेंटमधल्या घराच्या तुलनेनं मोठं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी दोन दारांचे प्रवेशद्वार बनवता येऊ  शकतं अथवा गरजेनुसार दाराचा आकार ठेवून उर्वरित भागात काचेचे पार्टिशन बनवून घेता येऊ शकतं. या काचेच्या पार्टिशन ऐवजी आपण ग्लास ब्रिक्सदेखील वापरू शकतो. त्यामुळे एकतर नैसर्गिक प्रकाश तर उपलब्ध होतोच; शिवाय घराच्या आतून घराच्या प्रवेशद्वाराबाहेरील सर्व काही व्यवस्थितपणे आपल्याला दिसू शकतं. आपल्याकडे येणारी व्यक्ती कोण आहे हे नीटपणे आपल्याला समजू शकतं. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे नेहमीच आवश्यक असतं.   
विविध प्रकारचा माल वापरून बनवलेलं प्रवेशद्वार : मुख्य प्रवेशद्वार मग ते कोणत्याही घराचं असो, ते बनवण्यासाठी प्रामुख्यानं लाकडाचा उपयोग अधिक केला जातो. त्यासोबत मेटल, काच, स्टील, जी. आय., रॉट आयर्न अशा अनेक वस्तूंचा वापर केला जाऊ  शकतो. प्रत्येक प्रवेशद्वारासाठी एक चौकट बनवून घ्यावीच लागते. या चौकटीच्या आकारावरून आणि ती बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तूंवरून त्या दरवाजाची मजबुती ठरत असते. हल्ली लाकडाचा वापर चौकट बनवण्यासाठी कमी करून त्या ऐवजी लोखंडाची चौकट बनवण्याची पद्धत प्रचलित झाल्याचं दिसून येतं. चौकट कोणत्याही वस्तूपासून बनवली गेली तरीही ती नेहमीच भिंतीमध्ये काही प्रमाणात गुंतवली जाते. त्यामुळे चौकटीला आणि दरवाजालाही मजबुती येऊ शकते.
गृहप्रवेश आपल्या स्वत:ला आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करणारा तसेच अविस्मरणीय ठरला पाहिजे. तेव्हाच आपल्या घराचं नेतृत्व करणारं प्रवेशद्वार आपल्या कौटुंबिक सदस्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समर्थ ठरू शकतं.      
इंटिरीअर डिझायनर