आजच सकाळी मैत्रिणीचा फोन आला. ती फारच उत्साहाने मला सांगत होती की, तिने एका वेबसाइटवरून ऑनलाइन एक छोटे कपाट बुक केले आहे. त्या कंपनीची मॉलमध्येही दुकाने आहेत, त्यामुळे काही काळजीच नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे, कपाट टिकवूडचे आहे आणि ऑनलाइन सेल असल्याने ते फारच स्वस्तात मिळणार होते. आमचे बोलणे झाल्यावर मी विचार करीत होते की, कितीही स्वस्त विकायचे ठरवले तरीही टिकवूडचा जो भाव घनफुटाचा आहे त्याच दारात संपूर्ण कपाट कसे मिळेल? अगदी ते छोटे कपाट असले तरीही इतक्या स्वस्तात मिळणे शक्य नव्हते. शिवाय, काचेचे दरवाजे- तेही वुडन फ्रेममध्ये.. एक इंटिरिअर डिझायनर म्हणून माझ्यासाठी ही फारच विचार करायला लावणारी गोष्ट होती. कारण आम्हीही फर्निचर बनवून देतो, त्यामुळे कच्च्या मालाचा दर मला माहीत होता. मला तिच्या त्या कपाटाची जरा काळजीच वाटली. झाले, ३-४ दिवसांनी पुन्हा तिचा फोन आला. तिचे कपाट घरी आले होते आणि तिचा सूर जरा निराशेचाच होता. तिने मला सांगितले की, हे कपाट फक्त टिकवूड फिनिशचे आहे मटेरियल टिकवूड नाहीए, आणि ते फारच खराब फिनिशिंगचे आहे. तिने त्या कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला होता. त्यांनी विकलेला माल आम्ही परत घेत नाही, अशी पॉलिसी असल्याचे सांगितले.

असे का होते? छोटय़ा छोटय़ा गोष्टी पारखून घेणारे आपण असे का करतो, का भुलतो अशा गोष्टींना? यात ऑनलाइन फर्निचर वाईटच असते असे मला म्हणायचे नाही. कारण ऑनलाइन वस्तू न विकताही लोक फसवून फर्निचर बनवून देऊ  शकतात. आपण जाणून घेऊ  की, असे का होते? आपण फसले जाऊ  नये आणि चांगल्या दर्जाचे फर्निचर हवे असेल तर काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात.

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
  • आजकाल गुगलमुळे कोणतीही माहिती मिळणे सहज सोपे आहे, पण त्या गोष्टींचे प्रॅक्टिकल ज्ञान मिळत नाही हे लक्षात ठेवायला हवे. केवळ माहिती मिळवून आपण एखादे फर्निचर घेऊ शकत नाही. आणि फर्निचरच्या बाबतीत तर आकार, डिझाईन, रंगसंगती, त्याचे हार्डवेअर.. हे फारच महत्त्वाचे असते. अगदी मटेरियलइतकेच! त्यामुळे आपला गोंधळ होणे स्वाभाविकच आहे. वस्तू बनविणाऱ्याला त्यातील जास्त ज्ञान असते.
  • याशिवाय आपण जे फर्निचर घेणार आहोत ते आपल्या रूममध्ये नीट बसेल का, आहे त्या फर्निचरला साजेसे असेल का, आपल्याला वापरायला सोयीचे असेल का, या बाबीही पडताळून पाहाव्या लागतात.
  • फक्त विविध वेबसाइट, दुकाने फिरून आपण बऱ्याचदा किमतीवरच फार लक्ष देतो, पण दर्जाचे काय? वेबसाइटवरचे सुंदर आणि आकर्षक फोटो, तर दुकानात चमकदारपणे बोलून आपल्या वस्तूबद्दल बोलणारे सेल्समन अशा कोणावर विश्वास ठेवायचा, खरेच अवघड असते. आणि आपण जी वस्तू घेणार असतो ती महागही असतेच की!
  • वस्तूंवर सवलतीही खूप असतात. दुकानांमध्ये अशा सवलतींची जाहिरात ही फक्त ठरावीक दिवशीच असते. जसे- काही महत्त्वाचे सण वगैरे.. पण ऑनलाइन खरेदीवर अशा सवलतींच्या जाहिराती सतत सुरू असतात. फक्त सवलतींची टक्केवारी बदलते.
  • अनेकदा आपल्याला प्रत्येक दुकानात फिरून वस्तू पाहायला वेळ नसतो. मग आपण विचार करतो की, वस्तू खरेदी करायला बाहेर पडले की पार्किंगचा प्रश्न, वाहतुकीची समस्या, सुतारकामाची कटकट, घरात काम नको.. अशा वेळी आपण सगळ्यात सुकर मार्ग अवलंबतो. मग अशा वेळी आपली भिस्त असते ती ऑनलाइन खरेदीवर. मग काय, फटाफट ऑर्डर आणि दोन दिवसांत वस्तू घरी हजर.
  • सगळ्यात महत्त्वाचे काय, तर आपल्याला दर्जेदार फर्निचर असावे असे न वाटणे. दर्जाबाबत आग्रही नसणे. सतत कामचलाऊ वस्तू घेण्याकडे अनेकदा कल असतो. सुंदर दिसणारी प्रत्येक वस्तू दर्जेदार असतेच असे नाही. आपण जरा किमतीने जास्त आणि दर्जेदार फर्निचर वापरतो हे सांगितल्यावर कोण काय म्हणेल, ही एक सुप्त भीती. किंवा उत्तम आणि दर्जेदार वस्तू फक्त काही ठरावीक लोकच वापरतात किंवा त्यांनाच ते परडवते, हा एक गैरसमज.

असे अनेक ग्रह बाजूला ठेवून बघा आणि तुम्ही तुमचे घर सजवा. आपण आपल्या पुढच्या पिढीलाही दर्जाहीन वस्तूंच्या विश्वात ठेवून त्यांनी मात्र दर्जेदार कामे करायला हवीत अशी अपेक्षा बाळगतो. सुंदरता, उपयुक्तता, दर्जेदारपणा ही त्रिसूत्री घराला परिपूर्ण करते.  आपण आपले घर सजवत आहोत, कितीही नाही म्हटले तरी २-४ वर्षे तरी कमीत कमी हे फर्निचर आपण वापरणार आहोत. फर्निचर सुंदर, सुबक आणि घराची शोभा वाढवणारे हवे, उपयुक्त तर हवेच हवे. घर सजवणे हा एक सुंदर प्रवास आहे. आपण आपल्या सोयीसाठी, आपले घर सुंदर दिसावे या भावनेने ते सजवत असतो. त्यासाठी आपण धन वापरतो. पण धन वापरून आपल्या तनमनाला आराम नसेल आणि त्यामुळे मन शांत नसेल तर काय उपयोग? परंतु हे टाळणे सहज शक्य आहे.  आपल्याला कोणत्या रूमला प्राधान्य द्यायचे आहे हे ठरवावे लागेलच आणि माझ्या बजेटमध्ये जे सुंदर आणि उत्कृष्ट आहे तेच मी वापरणार असे ठरवले तरच घर सुंदर, उपयुक्त, दर्जेदार दिसते आणि मनाला एक वेगळे समाधान मिळते.

घर पाहावे बांधून.. असे म्हणायला सोपे आहे, पण प्रत्यक्षात ते साकारणे ही खूप तारेवरची कसरत आहे. परंतु घर साकारतानाचा प्रवासही सुंदर आहे.. तुमच्या घराचे इंटिरिअर हे तुमचा स्वभाव, तुमची जीवनशैली आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.

फर्निचर निवडताना काय कराल?

  • सर्वात प्रथम जे फर्निचर आपल्याला हवे आहे त्याची यादी करावी.
  • किमतीचा सर्वसाधारणपणे अंदाज काढून आपले बजेट ठरवावे.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वस्तूच्या दर्जाला प्राधान्य द्यावे.
  • फर्निचर विकत घ्या किंवा बनवून घ्या, पण प्रथम तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यांची मदत घ्या. थोडेसे पैसे वाचवून होणारे जास्तीत जास्त नुकसान थांबवणे महत्त्वाचे आहे. डिझायनर ले-आऊट बनवतील, तुमच्या रूममध्ये कोणत्या आकाराचे फर्निचर शोभेल, कोणते रंग छान दिसतील, याशिवाय त्या फर्निचरने तुमची गरज पूर्ण होणार आहे की नाही यासाठी तुम्हाला मदत होईल. याचबरोबर दर्जेदार फर्निचरची निवड करायला मदतच होईल.
  • आजकाल काही फर्निचरच्या शोरूममध्ये त्यांचे डिझायनर असतात, त्यांना वेगळी फी द्यावी लागत नाही म्हणूनही आपण भुलतो. पण ते तुम्हाला मार्गदर्शन करणार नाहीत. ते फक्त त्यांचे फर्निचर तुम्हाला तुमच्या घराच्या लेआऊटमध्ये बसवून दाखवणार. ते पूर्ण रूम सुंदर कशी दिसेल, तुम्ही या फर्निचरला साजेसे कोणते पडदे लावायचे किंवा तुमच्या इलेक्ट्रिकच्या वायर्स बदलाव्या लागतील किंवा जुन्या टय़ूब काढून नवीन एलएडी लाईट बसावावा की नाही. असे अनेक महत्त्वाचे सल्ले शोरूममधले डिझायनर तुम्हाला देणार नाहीत. ते तुमच्या डोळ्यांनी तुमचे घर बघणार नाहीत.
  • बऱ्याचदा संपूर्ण रूमचे आपल्या बजेटमध्ये फर्निचर होऊ शकत नाही. तेव्हा केवळ बजेटमध्ये बसते म्हणून दर्जाहीन फर्निचर घेऊन घर सजवू नका. अशा वेळी आपल्याला कोणती रूम सजवायची आहे हा प्राधान्यक्रम ठरवा आणि बजेटमध्ये जे सुंदर आणि उत्कृष्ट आहे तेच फर्निचर बसवणार असा पक्का निर्धार मनाशी करा. दर्जेदार वस्तूंमुळे आपल्या मनालाही वेगळे समाधान मिळते.

– कविता भालेराव

kavitab6@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)