04 March 2021

News Flash

आटोपशीर स्वयंपाकघरे

 घरी आल्यावर त्यावर विचार करत बसले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

परवा मैत्रिणीबरोबर तिला नुकताच पुनर्विकासांतर्गत नव्याने मिळालेला फ्लॅट बघायला गेले होते. मुंबईसारख्या शहरात अतिशय प्रशस्त असा टू बेड हॉल किचन आणि पुढे सुंदरशी बाल्कनीसुद्धा असलेल्या त्या फ्लॅटमधे राहायला जाण्यापूर्वी तिथे अंतर्गत सजावट चालू होती. सर्व खोल्या ऐसपैस असलेल्या त्या घराचे स्वयंपाकघर मात्र मला फारच लहान वाटले. तिला तसे म्हटल्यावर, ‘‘अगं स्वयपाक करायला अशी कितीशी जागा लागते? आणि आजकाल स्वयंपाकघरात आपण असतो कितीसा वेळ.. ?’’

घरी आल्यावर त्यावर विचार करत बसले. नुकतीच कोकणातील आजोळच्या ऐसपैस घरात जाऊन आल्यामुळे वरचेवर त्याची शहरातल्या घरांबरोबर तुलना मनात चालूच होती त्यात आता पाटाचे निमित्त पुरले. शहरात जागेच्या टंचाईमुळे २ किंवा ३ खोल्यांमधे ऐसपैस स्वयंपाकघरे अशक्यच. त्यामुळेच तिथे उपलब्ध जागेत कालानुरूप बदल पटापट स्वीकारले गेले. ओटे बैठे न राहता उभे झाले. गृहिणीचा खाली वाकून दहा वेळा उठाबश्या करून स्वयंपाक करायचा त्रास कमी झाला. तरीही त्या आटोपशीर स्वयंपाकघरातही पाटपाणी घेऊन जेवायची परंपरा बरीच वर्षे चालूच होती. फक्त जागेप्रमाणेच कुटुंबातील सदस्यांचा आकारही कदाचित लहान झाल्यामुळे एकाच पंगतीत सर्वाची जेवणे आटोपली जाऊ  लागली. अपवाद फक्त घरात काही खास कार्यक्रमामुळे बरीच पाहुणेमंडळी जेवायला असतील..

बदलत्या जीवनशैलीमुळे पाटावर बसून मांडी घालून बसणे जेव्हा कठीण होऊ  लागले, तेव्हा जेवण्यासाठी डायनिंग टेबल आणि खुच्र्या हे घरोघरीचे आवश्यक फर्निचर बनले. डायनिंग टेबलमुळे खाली वाकून जेवण वाढण्याचे किंवा प्रत्येकाला स्वहस्ते वाढण्याचे बायकांचे कामही तसे कमीच झाले. अर्थात टेबल्सचा आकार मात्र प्रत्येकाच्या स्वयंपाकखोलीच्या आकारावरून ठरत असे. छोटय़ा स्वयंपाकघरासाठी तर फोल्डगची टेबले आली. जी हवी तेव्हा उघडता येतील आणि जेवणे झाल्यावर भिंतीला चिकटून उभी राहतील किंवा अरुंद होतील. खुच्र्याही त्याच प्रकारच्या फोिल्डगच्या पाहिजे तेव्हा उघडायच्या आणि नको तेव्हा पाटांप्रमाणे भिंतीशी मुकाटय़ाने उभ्या करायच्या.

एकेकाळी स्वयंपाकघरापुरतेच मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या स्त्रियांचे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारले. अर्थार्जनासाठी करिअरसाठी त्यांचा दिवसाचा बराच काळ घराबाहेर जाऊ  लागल्यावर वेळ वाचवण्यासाठी अनेक कल्पनांचा आणि आधुनिक उपकरणांचाही उपयोग होऊ  लागला. वर्षभरासाठीचे धान्य, पापड, लोणची, मसाले निगुतीने करून ते भरून ठेवण्याचे प्रकार हळूहळू बंद होऊन हे सर्व पदार्थ आयते बाजारातून गरजेनुसार आणले जाऊ  लागल्यामुळे साठवणासाठीच्या मोठय़ा मोठय़ा डबे बरण्यांची गरजही कमी झाली. मिक्सर ग्राईंडर तसेच फूडप्रोसेसरसारख्या आधुनिक उपकरणांनी स्त्रियांना कमी कष्टात आणि झटपट स्वयंपाक करायला हातभार लावल्यामुळे एकेकाळी स्वयंपाकखोलीत आवश्यक असणारा पाटा-वरवंटा, खलबत्ता, विळी वगैरे वस्तूही बसण्याच्या पाटासारख्याच अडगळीत गेल्या, शिवाय आजकाल घरातील एखाद्या छोटय़ाशा समारंभासाठीसुद्धा घरी जेवण न बनवता बाहेरून जेवण मागवायची पद्धत सुरू झाल्याने आणि त्यासाठीच्या ताटवाटय़ा वगैरेची सोय केटरर मंडळीकडूनच होत असल्याने एकेकाळी अगदी १५-२० माणसांसाठी लागणाऱ्या भांडय़ा-कुंडय़ांचीही गरज कमी होत जाऊन त्यांचीही रवानगी माळ्यावर झाली.

बदलत्या काळाची पावले अचूक ओळखून बांधकाम व्यावसायिकांनी नवीन गृहरचनेत स्वयंपाकखोली म्हणजे जेवण बनवण्याची तसेच एकत्रितपणे जेवण्याची खोली ही संकल्पनाच मोडीत काढली. त्याऐवजी, जिथे एखाद् दुसऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करण्यासाठी वावरता येईल..  जिथे स्वयंपाकासाठी आवश्यक वस्तू आणि उपकरणे सामावतील (उदा. रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह मिक्सर किंवा ओटय़ाखालच्या किचन ट्रॉलीज) इतक्याच आकाराचे स्वयंपाकघर बांधण्याची कल्पना यशस्वीपणे रुजवली. जेवणाच्या टेबल खुच्र्याची प्रतिष्ठापना आता जेवताना टी.व्ही. ही दिसेल अशा बेताने लिव्हगरूममध्येच झाल्यामुळे!   छोटय़ा स्वयंपाकघराचे समर्थन करताना मैत्रीण म्हणाली ते खरंच आहे. पाटपाणी किंवा पाटरांगोळ्या हे यापुढे फक्त शब्दप्रयोग म्हणूनच वापरले जातील. पाटरांगोळ्याच्या पंगती तर आता फक्त पूर्वीच्या लग्नाच्या कृष्ण-धवल फोटोंच्या अल्बममधूनच पाहायला मिळतील. विचार करता करता मनाशी म्हटले, खरंच बदल फक्त गृहरचनेतच झाले नाहीत, तर काळानुरूप आपल्या मानसिकतेतही बदल होत चाललेत आणि ते आपल्या चांगलेच पचनीही पडलेत की!

– अलकनंदा पाध्ये

nalaknanda263@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 2:03 am

Web Title: how to design the perfect kitchen
Next Stories
1 कौटिल्याचे दुर्ग
2 नियोजनबद्ध प्लम्बिंग
3 बांधकामशास्त्र
Just Now!
X