वैयक्तिक अहंकारापोटी द्वेषमूलक भावना अन्य सभासदांमध्ये पसरविणे, हेच कार्य या वृत्तीचे सभासद करत असतात आणि या कार्याला बळी पडणारे सभासद सत्य-असत्याचा, समज-गैरसमजाचा किंवा चांगल्या-वाईटाचा विचार न करता अंधवृत्तीने या ‘वारी’मध्ये सामील होतात. याचा परिणाम गृहनिर्माण संस्थेच्या निकोप वाटचालीवर होतो. विध्वंसक वृत्तीचा तात्पुरता विजय होतो. मात्र जेव्हा हा बुडबुडा फुटतो व सत्य परिस्थितीचे आकलन व्हायला सुरुवात होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.
गृहनिर्माण संस्थांचे आरोग्य निरोगी आणि संतुलित राखणे ही सोसायटीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या दृष्टीने एक प्रकारे कसरत असते. कार्यकारी मंडळामध्ये पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना या कसरतीचा अनुभव दैनंदिन कामकाजात सातत्याने येत असतो. या कसरतीमुळेच गृहनिर्माण संस्था चालविणे व तिचे मानसिक आरोग्य संतुलित ठेवणे ही एक अवघड बाब बनून राहिलेली आहे.
अनुभवांती असे दिसून येते की, कार्यकारी मंडळात पदाधिकारी किंवा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करण्यास स्वखुशीने कुणीच तयार होत नाही. आणि जर कुणी सेवाभावी वृत्तीने तयार झाला तर प्रत्यक्ष कामकाज चालविताना अन्य सभासदांच्या नाहक असहकारामुळे, अडवणुकीच्या धोरणामुळे व असंसदीय वर्तनामुळे काम करण्याची इच्छा हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळेच कार्यकारी मंडळाच्या कामकाजामध्ये एक प्रकारची मरगळ तयार होते. ज्या भावनेतून एखादा सभासद गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी ऊर्मी बाळगून येतो त्याच्या पदरी निराशा पडते. पुढे हीच निराशा एका सभासदाकडून दुसऱ्यात मग तिसऱ्यात अशी परावर्तित होत जाते.
गृहनिर्माण संस्था नीट चालायला हवी असेल तर प्रथम त्या संस्थेला सेवाभावी वृत्तीचे कार्यकारी मंडळ लाभायला हवे. सुदैवाने अशा भाववृत्ती असणारे कार्यकारी मंडळ लाभले तर त्यावर प्रथम अन्य सभासदांनी ‘विश्वास’ ठेवायला शिकले पाहिजे. अडचणीच्या प्रसंगी नैतिक पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची वृत्ती बाळगली पाहिजे. जेणेकरून कार्यकारी मंडळाच्या मनात विश्वासाची भावना तयार होईल व संस्थेचा कारभार मनापासून करण्याची इच्छा अधिक दृढ होईल.
पण प्रत्यक्षात काय होते? काही अपवादात्मक गृहनिर्माण संस्था सोडल्या तर बहुसंख्य संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ व अन्य सभासद यांच्यामध्ये सुसंवादी वातावरण मुळीच असत नाही. त्याला अनेक कारणेही असतात.
मुळातच सहकारी गृहनिर्माण संस्था, तिची उद्दिष्टे, नियमावली, सभासदांची कर्तव्ये, कार्यकारी मंडळास पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या व अधिकार अशा अनेक बाबींची नेटकी माहिती अनेक सभासदांना नसते आणि ती जाणून घेण्यासाठी कोणी उत्सुकही नसते. त्यामुळे सभासद आणि कार्यकारी मंडळ यांच्यामधील वादाचा पहिला मुद्दा इथेच बनतो. विसंवादाची सुरुवात इथूनच सुरू होते. अविश्वासाची भावना इथेच तयार व्हायला लागते आणि पुढे त्याचे रूपांतर सासू-सुनेच्या पारंपरिक संघर्षांमध्ये होते. सर्वसामान्य सभासदांची उदासीनता व गैरसमजावर आधारित तयार केलेले वैयक्तिक मत हे एक प्रमुख कारण यामागे आहे.
गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांमध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या ‘वृत्ती’चे सभासद दिसून येतात.
१)    जागरूक व समंजस सभासद.
२)    केवळ विरोध करायचा म्हणून प्रत्येक गोष्टीस विरोध करणारे.
३)    स्वत:चा अहंभाव जपण्यासाठी अन्य सभासदांमध्ये गैरसमजूत पसरवून द्वेषभावना तयार करणारे.
४)    संस्थेच्या कामकाजाविषयी अनास्था बाळगणारे व पूर्णपणे दुर्लक्ष करणारे.
यापैकी क्रमांक २ व ४ मध्ये उल्लेखलेल्या सभासदांच्या वृत्तीचा फायदा क्रमांक ३चे सभासद घेत असतात व विद्यमान कार्यकारी मंडळाच्या विरोधात प्रत्येक धोरणाला ‘सुरूंग’ लावण्याचे काम करत असतात. वैयक्तिक अहंकारापोटी द्वेषमूलक भावना अन्य सभासदांमध्ये पसरविणे, हेच कार्य या वृत्तीचे सभासद करत असतात आणि या कार्याला बळी पडणारे सभासद सत्य-असत्याचा, समज-गैरसमजाचा किंवा चांगल्या-वाईटाचा विचार न करता अंधवृत्तीने या ‘वारी’मध्ये सामील होतात. याचा परिणाम गृहनिर्माण संस्थेच्या निकोप वाटचालीवर होतो. विध्वंसक वृत्तीचा तात्पुरता विजय होतो. मात्र जेव्हा हा बुडबुडा फुटतो व सत्य परिस्थितीचे आकलन व्हायला सुरुवात होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो. पण या प्रकारामुळे गृहनिर्माण संस्थेची ‘प्रकृती’ बिघडते व तिचे ‘आरोग्य’ धोक्यात येते.
या वातावरणाचा एक अदृश्य परिणाम सोसायटीतील तरुण वर्गावर होत असतो. सोसायटीत चालणारे राजकारण, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप व अहंभाव या सर्व बाबींचे निरीक्षण हा तरुण वर्ग करीत असतो. वास्तविक या तरुण वर्गासमोर निरोगी व सकारात्मक असे वातावरण ठेवण्याची गरज असताना त्यांच्यासमोर क्लेशकारक व नकारात्मक असे वातावरण ठेवले जाते. याचा परिणाम म्हणजे सोसायटीच्या कामकाजात आपण सक्रिय सभासद म्हणून भाग घ्यावा अशी इच्छाच त्यांच्या मनात तयार होत नाही. प्रत्यक्षात याच तरुण वर्गाला भविष्यकाळात सोसायटीचे व्यवस्थापन करायचे असते, पण त्यांच्यापुढे असलेले वातावरण उत्साहवर्धक नसते. त्यामुळे हा तरुण वर्ग संस्थेच्या व्यवस्थापनात विशेष रस घेत नाही.
प्रत्येक सभासदाने गृहनिर्माण संस्थेचे प्रश्न कोणते? कार्यकारी मंडळाने करावयाची कामे कोणती? या कामात येणाऱ्या अडचणी कोणत्या? हे नीट जाणून घेतले तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतात; पण हे न करता बिनबुडाचे आरोप करीत राहणे हेच आपले परमकर्तव्य आहे, याच भावनेतून वावरणाऱ्या सभासदांकडून सहकार्याची अपेक्षा ती काय करणार? कार्यकारी मंडळाचा बराचसा वेळ या नाहक कटकटींची सोडवणूक करण्यातच जातो व मुख्य काम बाजूलाच पडते.
इथे केवळ कार्यकारी मंडळाची बाजू घेऊन लेखन-प्रपंच करण्याचा हेतू नसून, ज्या कार्यकारी मंडळामध्ये नि:स्वार्थी वृत्तीने काम करणारे सभासद असतात, अशा सभासदांच्या मन:स्थितीचा व मनोबलाचा विचार करणे हा आहे. काही गृहनिर्माण संस्थांमध्ये कार्यकारी मंडळ स्वत:च्या मनाप्रमाणे कामकाज करून सभासदांच्या भावना झिडकारीत असतील किंवा दहशतीचे वातावरण तयार करून बहुमताच्या जोरावर मनमानी कारभारही करीत असतील. या विषयाला दोन्ही बाजू आहेत, पण प्रस्तुत लेख हा कल्याणकारी वृत्तीने वागणाऱ्या कार्यकारी मंडळाबद्दल आहे; त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल आहे.
मुळात एखाद्या गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व स्वीकारल्यानंतर संस्थेच्या नियमांचे सभासदांकडून पालन केले गेले तर अनेक प्रश्न आपोआपच मिटू शकतात, पण तसे केल्यास कार्यकारी मंडळास त्रास द्यायला कसा मिळणार? या वृत्तीचे सभासद हे प्रश्न मुद्दाम तयार करतात. रचनात्मक व विद्ध्वंसक वृत्तीमधील हा संघर्ष अनादीकालापासून सुरू आहे. मग गृहनिर्माण संस्था त्याला अपवाद कशा ठरणार?
स्वत:च्या सदनिकेत लाखो रुपयांची अंतर्गत सजावट करणारा सभासद किंवा चारचाकी वाहन बाळगणारा सभासद जेव्हा मासिक मेंटेनन्सची रक्कम थकवितो, या प्रकाराला काय म्हणायचे? पण ज्या महिन्यात आपण मेंटेनन्सची रक्कम दिलेली नाही, त्या महिन्यात संस्थेकडून मिळणारे वीज, पाणी, सफाई व वॉचमन या सेवांचे लाभ मात्र तो बिनदिक्कत घेत असतो. स्वत:ला सुशिक्षित व सुसंस्कृत मानणाऱ्या अशा सभासदांच्या या वृत्तीला काय म्हणावयाचे? कार्यकारी मंडळास ‘ओलीस’ ठेवण्यासाठी केले जाणारे हे प्रकार हाणून पाडण्यासाठी सहकार खात्याचे प्रचलित असणारे विद्यमान कायदे व तरतुदी या पुरेशा सक्षम व सबळ नाहीत आणि त्याचाच फायदा विघ्नसंतोषी सभासदांचा कंपू घेत असतो.
गृहनिर्माण संस्थांना अशा ‘कंपूं’चे ग्रहण लागू नये म्हणून प्रत्येक सभासदाने सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आचरण करावयास हवे. ही वृत्ती जेवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढीस लागेल व टिकेल तो गृहनिर्माण संस्थेच्या निकोप कामकाजाच्या दृष्टीने ‘सुदिन’ ठरेल.

बहुसंख्य गृहनिर्माण संस्थांच्या कार्यकारी मंडळांना सर्वसाधारणपणे पुढील बाबींचा त्रास होतो.
१) प्रामाणिक सभासदांमध्ये गैरसमजुतीची भावना तयार करून त्यांना भडकविणे.
२) इमारतीच्या भोवतालच्या परिसराची स्वच्छता न राखणे.
३) सदनिकांमध्ये नियमबाह्य बदल करणे.
४) सुरक्षिततेचे नियम न पाळणे.
५) सफाईवाला, वॉचमन यांच्याबरोबर नाहक वादविवाद करणे.
६) अनधिकृत पार्किंग करणे.
७) सार्वजनिक विजेचा अवास्तव वापर करणे.  
८) वेळेवर मेंटेनन्स न देणे.
९) अर्थहीन गोष्टींवरून कार्यकारी मंडळाबरोबर वादविवाद करणे.
१०) वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ माजविणे. कार्यकारी मंडळ सक्षम व विचलित होणारे नसेल तर वरील त्रास सहन करून काम करीत राहते; अन्यथा पदाधिकारीवगळता इतर कार्यकारिणी सदस्य राजीनामा देऊन या त्रासापासून वेगळे होतात.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क