सोसायटी वा रस्त्यावरील झाड पडण्याच्या अवस्थेत असल्यास किंवा झाडाच्या फांद्या वाढल्याने संभाव्य अपघात किंवा धोका निर्माण झाल्यास काय करावे, याविषयी..
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।
संत तुकारामांची ही प्रासादिक रचना फारच अर्थपूर्ण आहे. अर्थपूर्ण एवढय़ासाठीच की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जगाला एक महत्त्वपूर्ण संदेश सुमारे ३५० वर्षांपूर्वी त्यांनी दिला. असे हे निसर्गाने निर्माण केलेले सुंदर झाड जेव्हा काही कारणामुळे अथवा नसर्गिक आपत्तीमुळे उन्मळून पडते, तेव्हा आपण भीतीने गांगरून जातो. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात किंवा सोसाटय़ाच्या वाऱ्या-वादळात वड, पिंपळ, कडुनिंब व गुलमोहोर यासारखे घेरेदार, डेरेदार व आडवी वाढणारी भली-मोठी व जुनाट झाडे अनपेक्षितरीत्या मुळासकट उन्मळून पडण्याच्या किंवा मध्येच मोडून पडण्याच्या तसेच अवाजवी रीतीने वाढलेल्या फांद्या मोडून रस्त्यावर, घरावर किंवा सोसायटीच्या इमारतीवर पडून अपघात होण्याच्या घटना घडतात. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असलेल्या किंवा घराच्या / सोसायटीच्या इमारतीलगत असलेले झाड कमकुवत होऊन पडण्याच्या अवस्थेत असल्यास किंवा झाडाच्या फांद्या अवाजवी रीतीने वाढल्याने संभाव्य अपघात किंवा धोका निर्माण झाल्यास आपण नक्की काय करावे आणि कोणाशी संपर्क साधावा हे समजत नाही. अशा प्रसंगी आपण पालिकेच्या विविध विभागांस दूरध्वनी करून / संपर्क साधून त्यांचा व आपला वेळ उगाचच वाया घालवितो, म्हणूनच अशा प्रसंगी एक जबाबदार करदाता नागरिक म्हणून आपण नेमके काय केले पाहिजे याची माहिती घेऊ :
(अ)  वाहतुकीच्या रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यास किंवा झाडाचा एखादा भाग मोडून पडल्यास :
प्रथम १०१ या दूरध्वनी क्रमांकावर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास दूरध्वनी करून दुर्घटनाग्रस्त रस्त्याचे नाव, संपूर्ण पत्ता व दुर्घटनेचा संपूर्ण तपशील कळवावा. तपशीलवार माहिती दिल्यास अग्निशमन दल अधिकाऱ्यांना दुर्घटनास्थळी जाताना संभाव्य परिस्थिती हाताळण्याचे नियोजन व आखणी करणे सोपे जाते. दुर्घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन दल अधिकारी संपूर्ण परिसराची पाहणी करून त्याबाबतची माहिती त्वरित (१) आपत्ती व्यवस्थापन विभाग (२) वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभाग (३) घनकचरा व्यवस्थापन विभागास देतात. तसेच रस्त्यावर पडलेल्या झाडाखाली / झाडाच्या फांदीखाली एखादी व्यक्ती मृत किंवा गंभीर जखमी अवस्थेत अडकलेली आढळल्यास किंवा झाड रस्त्यावरील वाहनावर मोडून पडल्यास, वाहनाच्या आत एखादी व्यक्ती अडकून पडलेली आढळल्यास अशा व्यक्तीस प्रथम सुरक्षितपणे बाहेर काढून अग्निशमन दलाच्या वाहनातून नजीकच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात.  त्याच वेळी संबंधित पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती व मृत / जखमी व्यक्तींच्या नावाची नोंदणी करतात आणि मृत / जखमी व्यक्तींच्या घरच्या मंडळींना कळविण्याचे महत्त्वाचे कामही तेच करतात. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडून दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींची माहिती घेतात व अशा व्यक्ती जर तेथे हजर असतील तर त्यांना प्राथमिक उपचाराची व्यवस्था करतात. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी / कर्मचारी दुर्घटनास्थळी पोहोचल्यावर प्रथम उन्मळून पडलेल्या झाडाचे व ज्या ठिकाणी ते झाड उभे होते त्या ठिकाणचे छायाचित्र घेतात. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे पालिका हद्दीतील सर्व झाडांची विभागवार संगणकीकृत नोंदणी वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाकडे असते. अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने रस्त्यावर उन्मळून पडलेल्या झाडाचे बारीक तुकडे करून रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर नीट रचून ठेवतात व शक्य तितक्या लवकर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न करतात. झाड उन्मळून पडताना जर विजेच्या तारांना धक्का लागून त्या तुटल्या असल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीज कंपनीस दूरध्वनी करून त्यांच्याकडून वीजपुरवठा खंडित करून घेतात. आणीबाणीच्या प्रसंगी अग्निशमन दलाचे जवान जवळपासच्या विजेच्या खांबावरील फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित करतात. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी वाहतुकीचा रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्याच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या जवानास सर्वतोपरी मार्गदर्शन, मदत व सहकार्य करतात. शेवटी, घनकचरा व्यवस्थापन विभागास उन्मळून पडलेल्या झाडांचे तुकडे, फांद्या व पालापाचोळा दुर्घटनास्थळाहून त्वरित हलविण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देण्याचे काम करतात. झाड अर्धवट अवस्थेत मोडून पडल्यास फक्त झाडाचा रस्त्यावर पडलेला भाग व फांद्या तोडून रस्ता वाहतुकीस खुला करण्याचे काम अग्निशमन दल करते.
(ब) घरावर / सोसायटीच्या इमारतीवर झाड किंवा झाडाचा भाग मोडून पडल्यास :
प्रथम १०१ या दूरध्वनी क्रमांकावर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास दूरध्वनी करून दुर्घटनाग्रस्त घराचे / सोसायटीचे नाव, संपूर्ण पत्ता व दुर्घटनेचा संपूर्ण तपशील कळवावा. दुर्घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन दल अधिकारी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून त्याबाबतची माहिती (१) आपत्ती व्यवस्थापन विभाग (२) वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभाग (३) घनकचरा व्यवस्थापन विभागास देतात. उन्मळून पडलेल्या झाडाखाली किंवा घराचा / सोसायटीच्या इमारतीचा एखादा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली एखादी व्यक्ती मृत किंवा गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यास अशा व्यक्तीस प्रथम सुरक्षितपणे बाहेर काढून अग्निशमन दलाच्या वाहनातून नजीकच्या सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात. त्याच वेळी संबंधित पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती व मृत / जखमी व्यक्तींच्या नावांची नोंदणी करतात आणि मृत / जखमी व्यक्तींच्या घरच्या मंडळींना कळविण्याचे महत्त्वाचे कामही तेच करतात. तेथे उपस्थित लोकांकडून दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींची माहिती घेतात व अशा व्यक्ती जर तेथे उपस्थित असतील तर त्यांच्या प्राथमिक उपचाराची व्यवस्था करतात. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी / कर्मचारी दुर्घटनास्थळी पोहोचल्यावर प्रथम उन्मळून पडलेल्या झाडाचे व ज्या ठिकाणी ते झाड उभे होते त्या ठिकाणचे छायाचित्र घेतात.  कारण पालिका हद्दीतील (स्वत:चे घर / बंगला / सोसायटीचे आवार यातील ) सर्व झाडांची विभागवार संगणकीकृत नोंदणी वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागकडे असते.  वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी आपल्या मुख्याधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतात. जर झाड मुळासकट उन्मळून पडले असल्यास त्याचे बारीक तुकडे करून तेथून हलविण्याच्या सूचना अग्निशमन दलास देतात. अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याजवळ असलेल्या हत्याराने पडलेल्या झाडाचे बारीक तुकडे करून आवारात नीट रचून ठेवतात. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाच्या जवानास मार्गदर्शन, मदत व सहकार्य करतात.  शेवटी घनकचरा व्यवस्थापन विभागास पडलेल्या झाडाचे तुकडे, फांद्या व पालापाचोळा  दुर्घटनास्थळाहून हलविण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या जातात. हे सर्व काम पालिकेतर्फे विनामूल्य केले जाते.
(क) घरावर / सोसायटीच्या इमारतीवर झाड / झाडाची अवाजवी वाढलेली फांदी तुटून पडण्याची श्यकता आढळल्यास :-
आपल्या घराच्या / सोसायटीच्या इमारतीवर झाड / झाडाची अवाजवी वाढलेली फांदी तुटून पडण्याची शक्यता निर्माण झाल्यास प्रथम पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागकडे संपूर्ण तपशीलासह लेखी तक्रार द्यावी. लेखी तक्रार मिळाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी / कर्मचारी आपल्या घरास / सोसायटीच्या इमारतीस भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी करतात. संबंधित झाडाचे छायाचित्र काढून घेतील व आपल्या मुख्याधिकारी यांच्याशी सल्लामसलत करतात. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी झाड वाचविण्यासाठी शक्य ते सर्व पर्याय तपासून पाहतात. उदाहरणार्थ:–
(१)  सदरहू झाडाच्या अवाजवी रीतीने वाढलेल्या फांद्या (Trimming) छाटून, घरावर / सोसायटीच्या इमारतीला धोका निर्माण होणारी परिस्थिती टाळणे.
(२)  सर्व बाजूच्या फांद्या काही प्रमाणात (Trimming) छाटून सर्व बाजूस समान वजन पेलण्याच्या स्थितीत आणून झाड वाचू शकेल का हे तपासणे.
(३)  झाडाला आवश्यक ठिकाणी आधार देऊन त्याची नसíगक वाढ होऊ देणे व झाडाचे आयुर्मान वाढविण्याचा प्रयत्न करतात.
     हे सर्व काम पालिकेतर्फे विनामूल्य केले जाते.
(ड)  पूर्ण सुकलेले झाड / कोसळण्याची शक्यता असलेले झाड तोडण्याबाबत :-
     घराच्या / सोसायटीच्या आवारात पूर्ण सुकलेले झाड / कोसळण्याची शक्यता असलेले झाड तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागकडे त्याबाबत रीतसर अर्ज करावा. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी जागेस प्रत्यक्ष भेट देऊन झाडांची तपासणी करतील. घर / इमारतीचा आराखडा पालिकेने मंजूर केला असल्याची खात्री करतील. त्यानंतर झाडाचे छायाचित्र काढले जाईल. वृक्ष प्राधिकरण व संवर्धन समितीपुढे सदरहू प्रकरण मांडले जाईल. झाड तोडण्याची आवश्यकता असल्याची खात्री झाल्यावरच समिती झाड तोडण्याची लेखी परवानगी अर्जदारास देते. यासाठी एक झाड तोडल्यास एक नवीन झाड लावण्याची अट घातली जाते. अर्जदार जर जागेचा विकासक असेल तर एक झाड तोडल्यास पाच नवीन झाडे लावण्याची अट घातली जाते व रुपये एक हजार सुरक्षा अनामत म्हणून घेतली जाते. लावलेली सर्व झाडे जगल्यास सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यात येते.
(ई)  सुस्थितीतील झाड तोडण्यासाठी ना हरकत दाखला मिळण्याबाबत :-
     काही अपरिहार्य कारणास्तव अथवा नियोजित बांधकामाच्या आड येणारे झाड तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाकडे त्याबाबत रीतसर अर्ज करावा लागतो. असा अर्ज प्राप्त झाल्यावर, वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाचे अधिकारी सदरहू जागेस भेट देऊन पाहणी करून झाडाचे छायाचित्र घेतील. नियोजित बांधकामाचा आराखडा मंजूर असल्याची खात्री करून अन्य विभागांच्या पारवानग्या तपासतील व आपला अहवाल वृक्ष प्राधिकरण व संवर्धन समितीस सादर करतील. वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना देऊन नागरिकांच्या सूचना व हरकती मागविल्या जातात. प्राप्त झालेल्या अर्जासोबत सूचना, हरकती व अहवाल १५ सदस्य असलेल्या समितीपुढे ठेवला जातो. पालिका आयुक्त या समितीचे प्रमुख असतात. समितीत त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन पर्यावरणाच्या दृष्टीने पूर्ण विचार करून ना हरकत दाखला काही अटीवर देण्यात येतो. त्यातील प्रमुख अट म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या दृष्टीने किमान ५० चौरस मीटर अंतरावर एक झाड लावण्याची अट निवासी गृह संकुलासाठी घातली जाते व १५ चौरस मीटर अंतरावर एक झाड लावण्याची अट करमणूक स्थळासाठी घातली जाते. तसेच झाड लावण्याचे काम संबंधित विकासकाने करावयाचे आहे, तसेच लावलेल्या झाडांचे छायाचित्र काढून वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाकडे दप्तरी ठेवण्यासाठी पाठविणे बंधनकारक आहे.
झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच सावली व पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी :-
(१)  पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागातर्फे पालिका हद्दीतील सर्व झाडांची संगणकीकृत नोंद ठेवते.
(२)  सहसा सुस्थितीतील उभे झाड तोडण्याची पालिका परवानगी देत नाही.
(३)  स्वत:चे घर / बंगला / सोसायटीच्या इमारतीच्या आवारातील वृक्ष (Trimming) छाटणी पालिकेतर्फे विनामूल्य केली जाते. (४)  वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागातर्फे रस्त्याच्या दुतर्फा साधारणत: २५  फुटांच्या अंतरावर एक अशी विविध प्रकारची झाडे लावली जातात. त्याची योग्य ती जोपासना केली जाते.
(५)  वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागातर्फे नागरिकांना विनामूल्य रोपवाटिका देण्यात येतात.
(६)  नागरिकांच्या विशेषत: शालेय विद्यार्थी यांच्या मनात पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागातर्फे दरवर्षी प्रदर्शन भरविण्यात येते.
(७)  पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण व संवर्धन विभागाच्या लेखी परवानगीशिवाय झाड तोडल्यास, महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण अधिनियम १९७५ कलम  ८ (३) अन्वये कारवाई करण्यात येते. वृक्षतोड अजाणतेपणे झाली असल्यास व गुन्हा कबूल केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते, परंतु वृक्षतोड जाणीवपूर्वक व स्वत:च्या फायद्यासाठी केली असल्यास व त्याबद्दल कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त न केल्यास अशी वृक्षतोड करण्याऱ्या व्यक्तीवर कलम २१ (१) व (२) खाली प्रथमदर्शनी अहवाल  (एफआयआर) दाखल करून फौजदारी कारवाई केली जाते. अशी व्यक्ती विकासक असल्यास फौजदरी कारवाईबरोबरच बांधकाम परवाना रद्द केला जातो व बांधकामास
त्वरित स्थगिती देण्याचा अधिकार समितीस आहे.
रस्त्यावर, घरावर / सोसायटीच्या इमारतीवर आकस्मिकरीत्या पडलेले झाड हलविण्यासाठी, तसेच धोकादायक झाड / झाडाच्या फांद्या  (Trimming)  छाटणीसाठी व तशाच प्रकारच्या कामासाठी पालिकेचे चार विभाग :
               (१)   अग्निशमन दल
               (२)   वृक्षरोपण विभाग
               (३)   आपत्ती व्यवस्थापन विभाग
               (४)   घनकचरा व्यवस्थापन विभाग
एकमेकांच्या मदतीने व सहकार्याने मदतकार्य करतात. विशेष म्हणजे पालिकेच्या या सेवा विनामूल्य आहेत.
          आपल्या शहरातील पर्यावरणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने एक करदाता सुजाण नागरिक म्हणून आपणही किमान एक नवीन झाड लावण्याचा संकल्प करूया.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार