15 December 2018

News Flash

प्लायवूडचे भाऊबंद

आज मागील पानावरून पुढे येताना अतिशय आनंद होत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आज मागील पानावरून पुढे येताना अतिशय आनंद होत आहे. गेल्या वर्षीच्या संपूर्ण लेखन प्रवासाचा आढावा घेता, मला असं जाणवलं की, घराच्या इंटिरिअरसंबंधी मी जितक्या जिव्हाळ्याने लिहीत गेले तितक्याच जिव्हाळ्याने तुम्ही ते सारं समजून घेत गेलात. म्हणूनच या वर्षी दुप्पट उत्साहानं माझ्याकडील माहितीचा, अभ्यासाचा खजिना मी तुमच्यासमोर ओतायला सज्ज आहे. आशा करते, आपण याचा नक्की उपयोग करून घ्याल.

गेल्या वेळी प्लायवूड तसेच ब्लॉकबोर्ड यांची माहिती करून घेतली होती. तसेच आज इतर काही उत्पादनांचा, ज्याचा उपयोग फर्निचर बनवण्याच्या कामी होऊ शकतो. अर्थात प्लायवूडचे भाऊबंद. पार्टकिल बोर्ड- खरं तर या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. फर्निचर वा इतर काही बनवताना जो लाकडाचा बारीक चुरा (भुसा) उरतो त्यापासून पार्टकिल बोर्ड बनतो. काही वेळा रस काढून घेतलेल्या उसाच्या चिपाडांचाही यात समावेश होतो. तर थोडक्यात, सारा फेकून देण्याचा माल एकत्र गोळा करून त्यात योग्य अशा प्रकारचे गोंद मिसळून प्लायवूडच्याच आकाराच्या ‘शीट’ बनवल्या जातात. याचा पृष्ठभाग फारसा गुळगुळीत नसल्याने आणि काम करण्यास सोपे जाण्याच्या दृष्टीने कारखान्यातूनच दोन्ही बाजूंनी लॅमिनेट लावलेल्या स्वरूपातच बाहेर पडतात. झटपट आणि स्वस्त फर्निचर बनवण्याच्या कामी याचा उपयोग केला जातो. अर्थात यात फारशी ताकद नसल्याने अगदी कामचलाऊ पद्धतीच्या फर्निचरच्या कामासाठी याचा वापर होतो. बाजारात जे हलक्या दर्जाचं फर्निचर मिळतं त्यात सर्रास पार्टकिल बोर्डचा वापर केल्याचं दिसून येतं.

याचीच पुढची पायरी म्हणजे एमडीएफ आणि एचडीएफ, एमडीएफ म्हणजे मीडियम डेन्सिटी फायबर  बोर्ड. हाही एक प्रकारचा पार्टकिल बोर्डच. परंतु हा बनवताना विशेष काळजी घेतली जाते. यात थेट लाकडाचा चुरा तसेच लहानसहान तुकडे न वापरता अगदी बारीक अशी लाकडाची पावडर- जिच्यात तंतूंचे प्रमाण जास्त असते- ती वापरली जाते. यावर यंत्राच्या साहाय्याने दाब दिला जातो. प्लायवूडप्रमाणेच एमडीएफही निरनिराळ्या जाडींमध्ये उपलब्ध होते. प्लायवूडपेक्षा स्वस्त, प्लायवूडपेक्षा पृष्ठभाग अधिकच गुळगुळीत आणि प्लायवूडपेक्षा कापायलाही सहज सोपा असल्याने तयार फर्निचरसाठी याला वाढती मागणी आहे. शिवाय याच्या एकसंध आणि मृदू गुणांमुळे राउटर मशीनचा वापर करून झटकन मोल्डिंग करता येते.

आता एवढे सगळे गुण आहेत म्हटल्यावर प्लायवूडला पर्यायच आहे नाही का? पण थोडं थांबा! जसे याचे गुण पाहिले तसेच थोडे अवगुणही समजून घेऊ या. फर्निचरमध्ये जेव्हा वजन पेलण्याच्या क्षमतेचा विचार केला जातो तेव्हा हा प्लायवूडच्या तुलनेत बराच मागे पडतो. पाण्याशी संपर्क येताच हा फुगूही शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एमडीएफची स्क्रू धरून ठेवण्याची क्षमता फारच कमी आहे. कालांतराने याच्या दरवाजाच्या बिजागऱ्या त्यामुळेच निकामी होण्याचे प्रमाणही जास्तच आहे. एमडीएफप्रमाणेच सर्वसाधारण गुण-अवगुण असणारी अजून एक वस्तू म्हणजे एचडीएफ. एचडीएफ म्हणजेच हाय डेन्सिटी फायबर बोर्ड. नावावरूनच कल्पना आली असेल. हा एमडीएफपेक्षा थोडय़ा अधिक क्षमतेचा बोर्ड असून, हा तयार करताना एमडीएफपेक्षाही थोडय़ा जास्तच दबावाखाली तयार केला जातो; त्यामुळे यातील फायबर अधिकच एकसंध होतात. ज्यायोगे त्याच्या एकंदरीतच वजन पेलण्याच्या क्षमतेत एमडीएफच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून येते. काही तयार फर्निचर विकणाऱ्या कंपन्या एचडीएफपासून डायनिंग टेबल वगैरे बनवतात. बाकी इतर गुणावगुण साधारण एमडीएफप्रमाणेच.

वरील सर्व प्रकार तसे म्हटले तर लाकडाची उपउत्पादनेच. पण झपाटय़ाने बदलणाऱ्या जगासाठी आणखीही काही उपलब्ध आहे. जाता जाता डब्ल्यूपीसी म्हणजेच ‘वूड प्लास्टिक कॉम्पोझीट’. प्लायवूडला पर्याय ठरू पाहणारं हे उत्पादन लाकडाचे फायबर आणि प्लास्टिकचा मेळ घालून बनवले जाते. वजनाने प्लायवूडच्या तुलनेत हलके असणारे डब्ल्यूपीसीवरून लॅमिनेट किंवा विनिअर न लावताही वापरता येते. तर हे सगळे प्लायवूडचे भाऊबंद थोडक्यात भरीव लाकडाला पर्याय. आता आपण ठरवायचं आपल्या घरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य.

गौरी प्रधान

ginteriors01@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)

 

First Published on February 17, 2018 2:00 am

Web Title: how to select best plywood