कोणत्याही घरात शिरलं म्हणजे त्या घरावर प्रभाव टाकणारे प्रवाह सहज लक्षात येतात. घरात दिसणारी ग्यानबा-तुकारामांची चित्र, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ किंवा नेल्सन मंडेला यांची पोस्टर्स, ठरावीक विचारांची पुस्तकं किंवा अगदी उशा-अभ्रे-पडद्यांचे रंग आणि पोत सारख्या अनंत गोष्टींतून आपण आपल्यावरच्या सामाजिक, वैचारिक प्रभावांना आपल्या घराच्या माध्यमातून व्यक्त करत असतो.
आम्हा मुंबईच्या लोकांमध्ये ट्रेनच्या प्रवासाला एक अनोखं महत्त्व आहे. काही ट्रेन्स त्यांच्या वेळांप्रमाणे तर काही त्यातल्या संस्कृतीमुळे ओळखल्या जातात. उदाहरणच द्यायचं झालं तर मी महाविद्यालयात असताना सकाळी लवकर असणाऱ्या व्याख्यानाकरता उपस्थित राहण्याकरता ६.३३ ची ट्रेन पकडायचो. सगळा डबा पेंगुळलेला असायचा. मात्र ट्रेन सुरू झाल्यावर थोडय़ाच वेळात खंजिरी खणखणायची, डफलीवर थाप पडायची, आणि टाळाच्या किणकिणीत हळुवार विठूनामाचा गजर सुरू व्हायचा. मग काकड आरती, भजनं यांसोबत वांद्यांपर्यंत भजनं आटोपती घेऊन संतजागर सुरू व्हायचा आणि माटुंग्यापर्यंत हा कार्यक्रम आटोपता घेऊन दादरला यांच्या सहकाऱ्यांची उतरण्याची तयारी सुरू झालेली असायची. ही होती दिवसातली ‘पहिली भजनी ट्रेन!’ त्यानंतर ७.४५, ८.०५ अशा दुसऱ्या तिसऱ्यादेखील असायच्या आणि त्यांच्यातल्या भजनींचे डबेदेखील ठरलेले होते. भजनी ट्रेनसारखेच पत्ते खेळणारी, सार्वजनिक वृत्तपत्र वाचणारी अशाही ट्रेन होत्या. शिवाय दिवसभरात प्रामुख्याने वेगवेगळ्या वेळेला ट्रेन्समध्ये विविध प्रकारची माणसं असायची. सकाळ-दुपारी विद्यार्थी, साधारण सकाळ संध्याकाळी पहिल्यांदा नोकरदार वर्ग, मग त्यामागूनच प्रामुख्याने कामकरी-कष्टकरी वर्ग आणि थोडं निवांत व्यापारी वर्ग ट्रेनमध्ये दिसायचे. मी अर्थातच या विशेष ट्रेन्सच्या प्रेमात असायचो. पसायदान, तुकारामांची भजनं यांपासून राजकीय घडामोडी ते आर्थिक क्षेत्रातील गणितं या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडायच्या.
मला वाटतं घरांचंही असंच असतं. माझा एक चुलत काका आहे. त्याच्या घरी पुष्कळ पुस्तकं आहेत-रोमेल, हिटलर यांच्या चरित्रांसोबतच स्वामी, ययातिसारख्या कादंबऱ्या आणि सावरकरांचं समग्र साहित्य. सोबतच, गर्वसे कहो हम हिंदू हैं असं एक ठळक पोस्टर त्यांच्या घरी दर्शनी भागात लावलेलं आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या घरी त्याच्या मित्रमंडळींचा, नात्यांचा प्रभावही जाणवायचा. एका मित्राने काढलेलं माझ्या काकाचं पेन्सिल स्केच त्याच्या घरी होतंच शिवाय बाजारातून विकत आणलेली अनेक उत्तम चित्रंदेखील त्याच्या घरी आवर्जून लावलेली असायची. दिवाळीत आलेली उत्तम शुभेच्छा पत्रं पुस्तकांच्या काचेच्या दरवाजांना आतून चिटकवून दर्शनी लावलेली असायची. त्याच्या स्वत:च्या देशभक्तीपर आणि थोडय़ाशा उजव्या विचारांची कल्पना त्याच्या घरात शिरल्यावर नक्कीच यायची. शिवाय या घराशी जोडलेल्या माणसांची जाणीव या घरी व्हायची.
माझ्या वडिलांच्या आईला मी पाहिलं नाही. तिच्या आणि आजोबांच्या एकत्र सहवासाची, त्यांच्या घराची मला काहीच कल्पना नाही. मात्र माझ्या आजीचं जे काही सामान माझ्यापर्यंत पोहोचलं त्यावरून तिच्या घराची, तिने केलेल्या संसाराची कल्पना नक्कीच करता येते. माझे आजोबा पोलिसात नोकरीला. करारी. सारं घर त्यांना घाबरून असायचं. मात्र पोलिसातल्या नोकरीमुळे घरी फारच कमी वेळ देता येत असे. साहजिकच घरची सारी सूत्र आजीच्या हाती. तिने जुने कपडे देऊन घेतलेलं सेराचं काचेचं भांडं आज साठएक र्वष आमच्या घरी नांदतं आहे. आजही विशेष प्रसंगी आम्ही त्यात खीर, कोशिंबीर वाढायला घेतो. सुबक घडणीचं, साधंच निळ्या रंगांचे पट्टे असलेलं हे भांडं तिच्या सौंदर्यदृष्टीची साक्ष देतंच, मात्र जुन्या कपडय़ावर ते घेण्यातली व्यावहारिक चतुरपणाची झलकही दिसते. आजीने क्रोषियाच्या सुईने, साध्या फुलपुडय़ाच्या धाग्याने विणलेले काही नमुने आजही टिकून आहेत. पांढरा रंग, सुबक विणलेली नक्षी असे हे छोटेच नमुने देखणे आहेत. विशेष प्रसंगी ताटाभोवतीच्या नक्षीदार रांगोळीसारख्या गोल मॅट्स आहेत, चौकोनी आकारातली लहान मुलांची बसकरं आहेत, तांब्या-भांडं ठेवायला असावीशी छोटी चटई आहे. नवऱ्याच्या पोलिसाच्या पगारात पाच मुलांचा संसार, पै-पाहुणे आणि दीर-जावांच्या गोतावळ्यात आजीने तिचं घर निगुतीने सांभाळलं असेलच, पण तिने तिच्या संसारात खास तिच्या शैलीत सौंदर्याची भर घातली याचा प्रत्यय या तिने घडवलेल्या गोष्टींतून येतो. तिच्या काळातल्या नव्याने शहरात आलेल्या, शहरातलं स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या अनेक व्यवहार कुशल स्त्रियांप्रमाणे तीदेखील संसाराच्या व्यवहारात आपला ठसा यशस्वीपणे उमटवत होती, त्यायोगे एक व्यक्ती म्हणून स्वत:ला धुंडाळत होती.
‘कम्युनिस्टांचं घर म्हणजे पुस्तकांनी भरलेलं आणि विचारांनी भारलेलं’ हा माझा समज ठाम करण्यात गोविंदमामा आणि कालिंदीमामीचं घर. फार थोडय़ा वेळेला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला, मात्र त्यांच्या घरातला पुस्तकसंग्रह आजही मनावर कोरलेला आहे. अनेक लोकचळवळींशी नातं सांगणारी, त्यांचा धांडोळा घेणारी वैचारिक, ललित पुस्तकं यांसोबतच गोविंदमामाच्या घरी संतसाहित्याची रेलचेल होती. घरात अगदी सहज होणाऱ्या गप्पांमध्ये या पुस्तकांवर चर्चा चाले, त्यातले दाखले दिले जात आणि अमुकतमुक पुस्तक जरूर वाच असे सल्लेही! गोविंदमामा आणि कालिंदीमामी सहज बोलता बोलता काहीतरी विलक्षण विचार मांडत की तो आयुष्यभर पुरावा.
माझ्या स्वत:च्या घरी अनेक वादांचा झगडा अखंड चालू असतो. त्यातही दोन प्रवाह मला महत्त्वाचे वाटतात, एक निसर्ग चळवळीतून आलेली जागरूकता आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतून आकाराला आलेला बुद्धिवाद. या दोहोंचा झगडा घरातल्या पारंपरिक मतांशी, रूढींशी असतो. शिवाय तो स्वत:मध्ये खोल रुजलेल्या मतांशी, विश्वासाशीही असतो. माझ्या घरी पाणी बचत, ऊर्जा बचत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर असे अनेक प्रयोग चालू असतात. कधी मी सौरऊर्जेवर संपूर्ण स्वयंपाक करण्याचा प्रयत्न सातत्याने करतो. त्यातल्या यशाची चव चाखत आई वर्षांचे आठ महिने सौरचुलीवर नवनवे प्रयोग करत पारंपरिक पदार्थ उत्तम रीतीने करते. घरात भाजी निवडण्या-टिपण्याची जबाबदारी घेतलेले बाबा, आमच्या घरातल्या खत बनवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतात. त्या खताचा वापर उत्तमपणे करत घरची बाग फुलवतात.
हे सारे बदल तुलनेने सहजपणे स्वीकारले जातात. मात्र घरात होणाऱ्या धार्मिक चिकित्सेमध्ये सहभाग मिळवताना खूप नेटाने प्रयत्न करावे लागतात. घरात वास्तुशांत करण्याला माझा ठाम विरोध होता. आईला विधिवत् गृहप्रवेश हवासा वाटला. यातला मध्यममार्ग म्हणून आम्ही आमच्या प्रत्येक घरात कलश ठेवून, स्वत:च प्रार्थना म्हणून गृहप्रवेश केला आहे. कष्टाने वेचलेला पैसा, निगुतीने घेतलेल्या घरात घालताना त्या घराला शांत कसलं करायचं? हा माझा सवाल. तर आपण घरात राहायला येताना गृहदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा ही आईची श्रद्धा. आमच्या प्रकारात तिची श्रद्धा जपली गेली आणि माझा आक्षेपही.
आमच्या घरात मला आवडतात म्हणून गणपतीच्या अनेक मूर्ती आहेत. अगदी महाविद्यालयात असल्यापासून मी त्या जमवतो आहे. मला गणपती या देवाचं रूप, त्यामागच्या गोष्टी यांचं भारीच आकर्षण आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आल्यावर, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात ईश्वर या संकल्पनेच्या चिकित्सेशी परिचय झाल्यावर घरातल्या गणपतींच्या मूर्तीचं काय करायचं हा महद्प्रश्न उभा ठाकला. त्यांची पूजा होत नाही म्हणून त्या धार्मिक नाहीत हे मनाने ठरवलं होतं, मात्र गणपती हा देव त्यायोगे धार्मिक प्रतीक हेदेखील नाकारता येत नव्हतं. हा वाद खूप र्वष मनात द्वंद्व म्हणून टिकला. काही वर्षांपूर्वी गाडी घेतली तेव्हा या वादाची उकल अगदी अनपेक्षितपणे झाली. गाडी घेताना डीलरकडे पूजेचं साहित्य दिलं गेलं. आईनेच पूजा नाकारली. तिथल्या एका बुजूर्ग माणसाकडून गाडीला हळद-कुंकू तिने वाहून घेतलं. मग आला गाडीत लावायचा गणपती. आता आली का पंचाईत.. अशी माझी अवस्था झाली. मी तो गणपती तसाच खोक्यात घालूनच गाडीच्या आतल्या कप्प्यात ठेवून दिला. पुढे केव्हा तरी गाडी घेऊन घरातून निघताना विचारांचं काहूर मनात माजलं होतं. काही टेन्शन्स होती. वाटलं, अशा मनाच्या अवस्थेत गाडी नको चालवायला, मात्र तरी नेटाने गाडीत बसलो. मन थाऱ्यावर नव्हतं. मग आठवला बाप्पा. काढला त्याला कप्प्यातून. मनोभावे नमस्कार केला. मग त्या बाप्पाच्या मूर्तीला ठेवला गाडीत, दर्शनी भागी. आता क्वचित कधी मन विचलित झालं म्हणजे बाप्पाला नमस्कार करतो आणि मन एकाग्र होतं. शांत होतं. तेव्हा कळलं, ‘अंनिस’मध्ये ऐकलेले डॉ. दाभोलकरांचे शब्द, ‘आमचा विरोध श्रद्धेला नाही, पिळवणुकीला आहे.’ हे आत्ता हळूहळू उमगत होते. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा त्या बुद्धी देवतेच्या उपासनेचा वारसा तारतम्याने चालवण्यात माझ्या मनातल्या वादाचं निरसन होतं.
अनेक नवे सामाजिक, आर्थिक, कलात्मक विचार प्रवाह आणि चळवळी आपलं आयुष्य व्यापून टाकतात. आपल्यावर प्रभाव टाकतात. साहजिकच आपल्यावरच्या या प्रभावांचे पडसाद आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकावर, अर्थातच आपल्या घरावर स्पष्टपणे उमटतात. कळत नकळत हे प्रवाह आपल्या घराला घडवत असतात. घरासोबतच त्यात राहणाऱ्या इतर माणसांना हे विचार आपल्या कवेत घेत असतात. ही प्रक्रिया खूपच धिमी असली तरी रोचक आणि खूप काही शिकवणारी असते- व्यक्तीला आणि घरालाही!