सात्त्विक रंगसंगतीनं नटलेली, उंचीपुरी नक्षीदार, आकाशाला सुशोभित करीत ढगांना भिडणारी, अस्सल द्रविड शैलीच्या गोपुरांची टोकं दिसू लागली की समजावं, आपण मदुराई शहरात पोहोचलोय. त्या दिशेनं थोडं पुढे गेल्यावर जाई, जुई, चमेली, मोगरा, गुलाब, इ. पारंपरिक फुलांचे भलेमोठे हार, त्यांचा मादक सुगंध व तिथं घोटाळणाऱ्या मधमाश्या, दुतर्फा पूजा सामानाची रेलचेल, श्रद्धाळूंची वर्दळ या सर्वाबरोबर आजकाल काहीसा दुर्मीळ झालेला आस्तिकतेचा ओलावा जाणवला की खात्रीनं ओळखावं, आपण मीनाक्षी मंदिराच्या पूर्वगोपुराबाहेर उभे आहोत. सुवर्णयुग, सुखसमृद्धी, भरभराट, निर्यात, विज्ञानशाखांमध्ये नेत्रदीपक प्रगती, श्रेष्ठ कलाविष्कार व टोकाची धार्मिक आस्था या सर्वाचं प्रतीक असलेला, जवळजवळ पासष्ट हजार चौरस मीटरवरील भूभागावर चौदा गोपुरांनी नटलेला हा मंदिर समूह पाहणं ही कलासक्त, शिल्पप्रेमी, अभ्यासक व सामान्य माणसालाही एक अनोखी मेजवानीच होय! इथल्या श्रीमीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी या दोन मुख्य मंदिरांशिवाय एकूण ऐंशीच्या आसपास असलेली उपमंदिरं, मंडप व पुष्करिणी, इ. पूर्णपणे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही कमीच पडतो. पंडय़ा, चोल व नायक या तीन राजघराण्यांनी सलगपणे ८०० वर्ष याचं बांधकाम केलं, यावरून त्यासाठी आलेल्या खर्चाची व मंदिराच्या अजस्र विस्ताराची कल्पना यावी!

पांडवांशी रक्ताचं नातं असलेल्या पांडय़ा राजघराण्यातील कुलेश्वर राजाच्या काळात, कदंबवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात एक स्वयंभू लिंग सापडलं. काही कालानं त्या संरक्षित स्वयंभू शिवलिंगावर कुलशेखर राजाने एक सुंदर मंदिर उभारलं. प्राचीन काळी पूर्ण लाकडाचं व त्यानंतर दगडीविटा व त्याहीनंतर सातव्या शतकात ते पूर्णपणे दगडाचं बनविलं गेलं असाव असा तज्ज्ञांचा कयास आहे. त्या कालातील वास्तुपंडितांशी सल्लामसलत करून निसर्गातील अदृश्य  ऊर्जा, पंचमहाभूतांचं संतुलन व वास्तुशिल्पशास्त्रांच्या सूत्रांचं काटेकोर पालन करून बांधलेली ही वास्तू लोकप्रियता व प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. द्रविड स्थापत्यकलेचा जणू आरसाच असलेला हा मंदिरसमूह, ८४७ फूट लांब व ८०० फूट रुंद व ४० फूट उंच अशा दणकट दगडी, भिंतीमध्ये सुरक्षित आहे. अत्यंत जागृत असल्याने विदेशी आक्रमण व मूर्तिभंजकांच्या तावडीतून हे अनेक वेळा सुटलं. इथं शिवाच्या ६४ लीलांचं दर्शन होतं. यात चौदा गोपुरं, १५०० पेक्षा जास्त खांब व अनेक मंडप या सर्वाच्या अवाढव्य पसाऱ्यामुळे मार्गदर्शनाशिवाय एकदा प्रवेश केलेली व्यक्ती मंदिराबाहेर येऊच शकत नाही. म्हणून इथली अंतर्रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

प्रथेनुसार पूर्वेकडून प्रवेश केल्यावर प्रथम अष्टशक्ती मंडप लागतो. मंडपाच्या दोन्ही बाजूंना महालक्ष्मी, महेश्वरी, यज्ञरूपानी, इ. आठ खांबांवर शक्तिरूपं चार-चार अशी विभागलेली असून द्वारपालक, गणपती व मुरुगन यांच्याही सुबक मूर्ती आहेत. इथं अनेक रंगीत चित्रं व शिल्पं आहेत व त्यामध्ये मुख्यत: शिवजींच्या लीला दाखविल्या गेल्या आहेत. यात श्रीमीनाक्षीदेवीची जन्मकथाही चित्ररूपात रंगविली आहे. ही चित्रं वा शिल्पं भिंतींवरती आहेत. मुख्यत: तिरुविलायादल पुराणातील प्रसंग असून मंडपाच्या पूर्वेकडील बाजूला शैव संतांच्या आकृत्या आहेत. यानंतर नायक राजांनी बांधलेला मीनाक्षी नायक मंडप लागतो. इथं पाच मोकळ्या जागा सहा खांबांच्या रांगांनी बनल्या आहेत. हे खांब शिल्पकृतीयुक्त असून विविध आकृत्या कोरीव व आकर्षक आहेत. अष्टशक्ती मंडप व नायक मंडप यांना जोडणारा आणखी एक मंडप असून, शिवपार्वतीच्या प्रतिमा आहेत. त्यात शिकारी रूपात दाखविलेलं शिवाचं रूप अत्यंत मोहक आहे. या मंडपाच्या पश्चिमेकडे एक हजार आठ पितळी व मोठय़ा समयांची आरास असून या आठही अजस्र समया पेटल्यावर संपूर्ण मंडप प्रकाशानं उजळून निघतो. यानंतर पुढे गेल्यावर लागतो मुदाली पिल्लारी मंडप. मुदलियार याने बांधलेला हा मंडप तेथील गोपुर व चित्रं यामुळे आकर्षणाचं ठिकाण ठरला आहे. इथं एका दगडात कोरलेले मुरुगन, कदंथाई व मुदलियार चितारले आहेत. याशिवाय या मंडपात बिक्षादन, थारुगवन व मोहिनी यांच्या आकृती अतिशय सुंदर आहेत. इथली सर्व शिल्पंही अप्रतिम आहेत.

स्वर्णकमल पुष्करिणी असून साक्षात इंद्र पापमुक्तीसाठी या पवित्र जलात स्नान करून इथं उगवणाऱ्या सुवर्णकमलांनी शिवपूजा करीत असे असं मानलं जातं. या अतिशय मोठय़ा तलावाभोवती भव्य भिंत व पायऱ्या असून घाट व प्राकारही आहे. तिसऱ्या तमीळ कवींच्या संगमातील सर्व कवींची शिल्पं इथल्या खांबांवर कोरलेली आहेत. याशिवाय ज्या धनंजयन् या व्यापाऱ्याने मूळ स्वयंभू शिवलिंगाचा शोध लावला. त्याचे व कुलक्षेत्र पंडय़ान- ज्याने शहर व प्रथम मंदिर बांधलं त्याचं, अशी दोन्ही शिल्पं खांबावर आहेत. पूर्व व उत्तरेकडच्या भिंतीवर पौराणिक कथाचित्रं दिसतात, तर पूर्वेकडून प्राकाराकडे पाहिल्यास श्रीमीनाक्षी व सुंदरेश्वरस्वामी यांच्या दोन स्वतंत्र मंदिरांची शिखरं दिसतात. इथंच दक्षिण प्राकाराच्या भिंतीवर थिरुक्कुरल या प्रसिद्ध तमीळ संतकवीची कवनं एका विशिष्ट प्रकारच्या दगडावर कोरलेली आहेत. स्वर्णपद्म सरोवराजवळच संगमरवरी कट्टा असून त्यावर श्रीमीनाक्षी व सुंदरेश्वरस्वामी यांच्या संपूर्ण सोन्यात बनविलेल्या भरीव मूर्ती दर शुक्रवारी पूजेसाठी ठेवल्या जातात. इथल्या छतावर मुरुगेशाच्या सहा जागृत स्थानांची रंगीत चित्रं आहेत व गच्चीत राणी मंगम्मा व मंत्री रामप्पयन् यांची शिल्पं ठेवली आहेत. जवळच किलिकोट्ट हा मंडप आहे. तिथं पिंजऱ्यामधील पोपटांची शिल्पं व लांबच लांब अशी अनेक खांबांची रांग आहे. त्यावरील नक्षीकाम व उत्तम कारागिरी यामुळे या मंडपाची शोभा द्विगुणित होते. इथंच पाच पांडव, वाली, सुग्रीव व द्रौपदी यांचे दगडात कोरलेले पुतळे आहेत. बाजूलाच राज्याभिषेक व विवाह सोहळ्याची मोठी व अतिशय सुंदर चित्रं आहेत. यामुळेही या मंडपाच्या शोभेत भर पडते. इथल्या छातावरही चकित करणाऱ्या शिल्पकृती आहेत.

श्रीमीनाक्षी देवी मंदिर

या मंदिरसमूहाच्या आवारातील हे अत्यंत महत्त्वाचं व मुख्य मंदिर आहे. सुरुवातीलाच सुवर्णध्वज स्तंभ व त्याआधी तीन मजली स्वतंत्र गोपुर आहे. त्यापुढे नायक मंडप, द्वारपालांच्या पितळी मूर्ती व विनायक असून कुदल कुमारासाठी उपमंदिर आहे. इथंच भिरुपुगाल काव्य भिंतीवर कोरलेलं आहे. याशिवाय भव्य महामंडप, राजनिद्रालय, अर्थ मंडप, आर्यावर्त विनायक व जवळच मुख्य गर्भगृह आहे. त्यात करुणेचा सागर असलेल्या मीनाक्षीदेवीची हातात पोपट व पुष्पगुच्छ घेतलेली अत्यंत आकर्षक मूर्ती आहे.

इथून पुढे येऊन किलिकुट्टू मंडपाकडून

उत्तरेकडे वळल्यावर दक्षिणमुखी मुक्कुरनी विनायकाची सुबक अशी दगडी मूर्ती आहे. थिरुमूर नायक खणत असताना ही आठ फूट उंचीची विनायक मूर्ती सापडली होती. इथंच संगमकाळातील ज्ञानसंबंध व नटराज यांची स्वतंत्र अशी उपमंदिरं आहेत. पुढे राय गोपुराचं अर्धवट केलेलं काम व चबुतरा दिसतो. त्याचा आकार पाहिल्यावर असं वाटतं की, हे गोपुर जर पूर्ण झालं असतं तर ते कदाचित जगातलं सर्वात उंच व सर्वात मोठं गोपुर ठरलं असतं. कंबथाडी या पुढील मंडपातील मूर्ती व शिल्पं यांचं सौंदर्य पराकोटीचं असून या मंडपाच्या मध्यावर सोन्याचा ध्वजस्तंभ, नंदी व मोठं बलीपीठ आहे. आठ मोठय़ा खांबांवर शिवाचे आठ अवतार कोरलेले आहेत. बाजूच्या खांबांवर विष्णूचे अवतारही आहेत. मीनाक्षी विवाहाचा प्रसंग अतिशय सुंदर कोरला आहे. याशिवाय अग्निवीर भद्र, अहोरावीर भद्र यांच्या भव्य मूर्ती, कलीशिव व ऊध्र्व तांडव करतानाच्या मूर्ती या आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असलेल्या व अत्यंत कलापूर्ण आहे. कंबथाडी मंडप हे एक मूर्तिसंग्रहालयच वाटते.

सुंदरेश्वरस्वामी मंदिर

या दुसऱ्या मुख्य मंदिरासमोर बारा फूट उंचीचे अजस्र द्वारपालक आहेत. इथं सहा खांबांवर एक चबुतरा बनविला आहे. त्याचं पौराणिक महत्त्व आहे. इथंच तिरुविलायडल हे तमीळमधलं अत्यंत महत्त्वाचं पुराण वाचलं गेलं अशी श्रद्धा आहे. याशिवाय इथं सरस्वतीदेवी, काशी विश्वनाथ (लिंग), भिक्षादनार, ६३ संत, अठरा सिद्धमुनी, दुर्गा व उत्सवमूर्ती यांचे भव्य पुतळे आहेत. उत्तरेला अजस्र असा कदंब वृक्ष आहे. हा प्राचीन मानला जातो. यापुढे कनकसभा, यज्ञशाळा व वन्नी हा स्थळवृक्ष असून पुढे प्राकार आहे. इथं उजवा पाय वर उचलून घेतलेली नटराजाची मोठी मूर्ती आहे. त्यापुढे या मंदिरातील मुख्य असे सुंदरेश्वरस्वामीचे मोठे व शिवाचे ६४ भूतगण तसेच बाजूला आठ हत्ती, बत्तीस सिंह व जवळच मोठे शिवलिंगही आहे. हाच सुंदरेश्वरस्वामी होय. यालाच चोक्कनाथ वा कर्पूरचोक्कर असंही म्हणतात.

सहस्रस्तंभ मंडप

सुंदरेश्वरस्वामी सन्निधीकडून या हजार खांबी मंडपाकडे आल्यावर लक्षात येतं की, अरियानाथ मुदलियारनं बांधलेला हा मंडप कलाकृतींचा खजिनाच आहे. दोन्ही बाजूंनी शिल्पकृती, छतावर ६४ तामीळ वर्षदर्शक चक्रांचं कोरीव काम, एका सुतात बसविलेले हजारापैकी ९८५ उंच, कोरीव कलायुक्त सुबक अखंड दगडातले खांब हे सर्व अद्भुत आहे. विशेष म्हणजे हे खांब अशा रीतीने बसविले आहेत की, ते कोठूनही पाहिले तरी एका सरळ रेषेतच दिसतात. अर्जुन, मोहिनी, मन्मथ, कालीपुरुष, राही, एक जुनं दुर्मीळ वाद्य वाजविणारी स्त्री ही सर्व अस्सल ग्रॅनाइटमधली शिल्पं अत्यंत रेखीव व मनमोहक आहेत. मंडपाच्या एका टोकाला मोठी, पण आकर्षक अशी नटराजाची मूर्ती आहे. याशिवाय बऱ्याच प्राचीन वस्तू, मूर्ती व अनेक आकर्षक गोष्टी इथं पाहावयास मिळतात.

हजार खांबी मंडपाच्या पुढे दक्षिणेकडे मंगायार्करसी हा नव्याने निर्माण केलेला असून, त्यात कूनपंडियान, मंगायार्करसी, ज्ञानसंबंधर व एक शिवलिंग हे सर्व खुबीने बसविले आहेत. या सर्व मूर्ती व शिवलिंग अत्यंत चित्ताकर्षक आहे.

आदिविथी नावाच्या रस्त्यानं वेढलेल्या या मंदिर समूहाच्या एकंदर शोभेत भर घातलीय ती १९० फूट उंचीच्या चार दिशांच्या चार गोपुरांनी. १६ व्या शतकात बांधलेलं दक्षिण गोपुर १६० फूट उंच, पूर्वेकडलं १३ व्या शतकात मरवर्मन् सुंदर पंडय़ान याने, तर पश्चिमेकडे गोपुर १४ व्या शतकात पराक्रम पंडय़न याने बांधलं. सर्वात जुनं पूर्वेकडचं गोपुर हे सर्वात उंच आहे व उत्तरेकडचं म्हणावं तसं तुलनेनं कलात्मक वाटत नाही.

सांगीतिक स्तंभ

या मंदिराचं हे एक खास असं वैशिष्टय़ आहे. उत्तरेकडील गोपुराकडून आतल्या बाजूला एका मंडपात हे एकूण पाच स्तंभ आहेत. त्या प्रत्येक स्तंभाला २२ छोटे उपस्तंभ वा खांब आहेत. हे विशिष्ट प्रकारच्या नाद येणाऱ्या दगडाचे असून त्या स्तंभांवर अलगद काठी मारल्यास मृदंग, सतार, इ. पाच वाद्यांच्या सप्तस्वरांचे आवाज येतात. विशेष म्हणजे हे छोटे स्तंभही एकाच दगडात आहेत. त्या प्रत्येकाचे  नाद भिन्न आहेत. पाच खांबांमध्ये पाच वेगळ्या वाद्यांचे नाद येतात. विशेष म्हणजे हे खांबांचे दगड खाणीत असताना आवाज/ नाद येतो, पण मूळ स्थानापासून वेगळे केल्यावर तो नाद बंद होतो. मग हे दगड वापरून कोणत्या अद्भुत तंत्राने त्यातील नाद टिकवला व एकाच दगडात सप्तस्वर कसे निर्माण केले, हा एक संशोधकांना अजूनही न उलगडलेलं कोडं आहे. जम्मूजवळ हिमालयात असे दगड सापडतात असं माहीतगार सांगतात.

पूर्वेकडील गोपुरासमोरील मंडप हा पुथु वा वसंत मंडप होय. ग्रीष्म ऋ तूत मीनाक्षीदेवी व सुंदरेश्वरस्वामी यांना विश्रामासाठी हा बांधला गेला आहे. उत्सवामध्ये ग्रॅनाइटच्या चबुतऱ्यावर देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. इथं थडथगई व मीनाक्षीदेवीच्या विवाहाच्या प्रसंगाची मूर्ती आहे. त्याशिवाय रावण कैलास उचलताना व हत्ती ऊस खातानाची शिल्पं दगडामध्ये कोरली आहेत. या शिल्पांचं सौंदर्य हे नायक राजघराण्याची आठवण वर्षांनुवर्ष देत राहील.

या मंदिरसमूहातील अनेक शिल्पं कायम आठवणीत राहण्यासारखी आहेत. उदा. मुख्य गर्भगृहाबाहेरील अनेक मूर्ती, मीनाक्षी विवाह शिल्प, कन्यादान करताना विष्णू, जो तिचा भाऊ म्हणून दाखविला आहे, स्वतंत्र चौकटीवर व दगडी मंडप करून बसविलेला कातीव कोरीव नंदी हा तर काळ्याशार दगडात असून तो जिवंत वाटतो. मंडप हा दगडाचा असला तरी शिसवी वाटतो व ही सर्व शिल्पं एकाच अखंड दगडातील आहेत. या संग्रहात ब्राँझ धातूचे व काही हस्तिदंती पुतळेही आहेत.

तामिळनाडूला दक्षिण भारताचं प्रवेशद्वार मानतात व मदुराई शहर हे पूर्वेचं अथेन्स म्हणून ओळखलं जातं. निसर्गाच्या कुशीतलं, वैगेई नदीच्या सुपीक वेढय़ानं संपन्न, संस्कृती व कलाविद्यांना आश्रय देणारं, शांत, उन्नत आध्यात्मिक पायावर वसलेलं, ख्रि.पू. ३०० वर्षांआधीपासून अस्तित्वात असलेलं, संगमकालात तीन महान तमीळ संतकवींची संमेलनं घेतल्यानं अधिकच ज्ञानसमृद्ध झालं. त्या कालापासून ज्ञानशाखा व कला इत्यादींची सर्वात जास्त उंची गाठलेल्या या मधुरा म्हणजेच मधुरपुरम संस्कृत नावापासून बनवलेल्या शहराचं हे मीनाक्षी मंदिर आभूषणच आहे. इथं सुंदरेश्वरस्वामी असूनही मंदिराचं मीनाक्षीदेवीच्या नावानं ओळखलं जाणं ही गोष्ट भारतीय संस्कृतीतलं गर्भित स्त्रीदाक्षिण्यच अधोरेखित करतं.

एवढय़ा मोठय़ा व सतरा एकरांवर पसरलेल्या वास्तुवैभवाची योग्य देखभाल, ना कुठे ढासळणं, ना अस्वच्छता, ना बेफिकिरी व सर्व बाबतीत नेटकेपणा व शिस्त हे सारं निखळ श्रद्धेपोटीच होतं असं काही नव्हे. ते दाखवत असलेली निष्ठा आस्था, आपुलकी व अभिमान यापासून आपल्याला बरंच काही शिकता येईल.

 – डॉ. उदयकुमार पाध्ये

cosmic_society_india@yahoo.co.in