22 November 2017

News Flash

इमारतीचा आराखडा

सर्वच इंटिरियर डिझायनर्सकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ शकते.

गौरी प्रधान (इंटिरियर डिझायनर) | Updated: September 9, 2017 2:02 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घाटकोपरमधील साई दर्शन इमारत कोसळली आणि अनेक निष्पाप जिवांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. इमारतीचे मुख्य आधारस्तंभ असणारे आर. सी. सी. कॉलम तोडून टाकल्याने इमारत कोसळली, असेच आत्तापर्यंतच्या माहितीवरून तरी दिसत आहे. तसेच प्रथमदर्शनी तरी यात एका इंटिरियर डिझायनरची चूक दिसत आहे. अर्थात पुढे जाऊन घटनेच्या चौकशीअंती ज्याच्या मार्गदर्शनाखाली ते काम सुरू होते तो खरोखर प्रशिक्षित इंटिरियर डिझाइनर होता का? असल्यास त्याला कामाचा काय अनुभव होता? या व इतर बाबी समोर येतीलच, परंतु तोवर सर्वच इंटिरियर डिझायनर्सकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ शकते.

अर्थात, हे स्वाभाविक जरी असले तरी आपण ज्या व्यक्तीला काम देत आहोत तिची योग्यायोग्यता पडताळून पाहणेदेखील आपल्याच हातात आहे. आपले काम योग्य, अनुभवी आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या हाती द्यावे हा झाला एक भाग, पण त्याचसोबत आपण ज्या वास्तूत अथवा इमारतीत राहतो तिची आपल्यालाही थोडी माहिती असणे आवश्यक असते. म्हणूनच आजचा हा लेखनप्रपंच.

माणसाने घर बांधण्याची कला अवगत केल्यापासून वेळोवेळी त्या त्या भागातील हवामान व भौगोलिक परिस्थितीनुसार घरबांधणीच्या पद्धतीत बदल होत गेले. मोठमोठय़ा वास्तू बांधताना वास्तुविशारदांचा व अभियंत्यांचा सल्ला घेतला जाऊ  लागला. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि अभ्यासातून आजचे आधुनिक बांधकामाचे शास्त्र रूपास आले.

आधुनिक माणूस एकावर एक माजले चढवून उंच उंच इमारतीमधून राहू लागला, मग त्याच्या सोयीसाठी आर. सी. सी. फ्रेम स्ट्रक्चर, लोखंडी फ्रेम स्ट्रक्चर, लोड बेअरिंग बांधकाम अशा विविध बांधकाम पद्धती प्रचलित झाल्या. भारताचा विचार करता जास्तीतजास्त निवासी इमारती या आर. सी. सी. फ्रेम स्ट्रक्चर पद्धतीने बांधलेल्या आढळतात. म्हणजेच तुमच्या-माझ्यासारखी शहरातील बरीच मोठी लोकसंख्या ही आर. सी. सी. इमारतींमध्ये राहते. आर. सी. सी.चे पूर्ण रूप रिइन्फोर्स्ड सिमेंट काँक्रिट असे असून, या प्रकारच्या बांधकामात लोखंडी सळ्या, सिमेंट, वाळू, खडी यांचे तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य प्रमाण ठरवून बांधकाम केले जाते. आर. सी. सी. इमारतीच्या उभ्या खांबांना कॉलम तर आडव्या खांबांना बीम म्हटले जाते. हे बीम आणि कॉलम मिळून इमारतीचा सांगाडा उभा राहतो. यातील कॉलम म्हणजे आपल्या इमारतीचे आधारस्तंभ, तर बीम म्हणजे भारवाहक. बीमच्या वरील भागात स्लॅब घातला जातो. ज्यावर आपण प्रत्यक्ष वावरतो. स्लॅबवरील भार हा बीमवर व त्यावरून कॉलमवर असे करत करत शेवटी जमिनीवर उतरविला जातो. म्हणूनच या दोहोंपैकी एकाला जरी इजा पोहोचली तरी त्याचा थेट परिणाम इमारत कोसळण्यावर होतो. जेव्हा मी इजा शब्दाचा उल्लेख केला तेव्हा त्यात फक्त बीम-कॉलम तोडून झालेली इजा एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. बीम अथवा कॉलम तोडल्यास त्याचा परिणाम लगेचच दिसून येतो; परंतु याव्यतिरिक्तदेखील बरेच वेळा तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय घरात केलेले अंतर्गत बदलदेखील आपल्या इमारतीच्या सुरक्षेवर परिणाम करतात. तर अशा चुका आपल्या हातून होऊ  नयेत याकरता काही ढोबळ नियम हे आपल्याला माहीत असावेतच.

त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम, घरातील खोल्या लहान-मोठय़ा करण्याच्या नादात स्लॅबवर वाट्टेल तिथे विटांचे बांधकाम करू नये. फ्रेम स्ट्रक्चरमध्ये बीम, कॉलम व स्लॅबला हात न लावता भिंतींच्या जागा आपण निश्चित बदलू शकतो, पण कोणतेही नवे बांधकाम हे बीमवरच येईल अशा प्रकारे करावे म्हणजे भिंतीचे वजन योग्य प्रकारे पेलले जाईल. अगदीच तसे करणे शक्य नसल्यास विटांच्या भिंतीला पर्याय ठरू शकतील असे, पण हलक्या वजनाचे सिपोरेक्स ब्लॉक किंवा लाकडी अथवा सिमेंट बोर्डच्या पार्टिशनचा पर्याय निवडावा.

याखेरीज खिडकीच्या बाहेर दिला जाणारा सज्जा हा खरा तर फक्त पावसाचे पाणी आत घरात येऊ  नये म्हणून केलेली एक सोय असते. आणि त्यामुळेच इमारतीच्या इतर भागातील स्लॅबपेक्षा याची जाडी आणि वजन पेलण्याची क्षमता- दोन्ही फारच कमी असते. परंतु थोडय़ा अधिक जागेच्या लालसेपायी बरेचदा चुकीचे निर्णय घेऊन सज्जा घराच्या आत घेतला जातो आणि तिथेच आपल्या इमारतीच्या सुरक्षेला आपणच धाब्यावर बसवतो.

वरील सर्व तर झाले माणसाने निर्माण केलेले धोके, पण निसर्गदेखील आपली किमया दाखवतच असतो. नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी मुळातच आपल्या इमारतीचे बांधकाम भक्कम असावे लागते. यात सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे भूकंपाचा. याच ठिकाणी आपल्या इमारतीचे फ्रेम स्ट्रक्चर कामाला येते. २००१ मध्ये झालेल्या गुजरात भूकंपानंतर तर या आपत्तीकडे जास्त गांभीर्याने पहिले जाऊ  लागले. आपण जर नवीन बांधकामाचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की इमारतीतील काही ठिकाणी संपूर्ण भिंतीच आर. सी. सी.मध्ये बनविलेल्या दिसतात. या भिंती इमारतीचा लवचीकपणा वाढवायला मदत करतात, ज्यामुळे भूकंपामध्येही इमारत कोसळण्याची शक्यता कमी होते.

तरीही एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे, मुळात आर. सी. सी. पदार्थ हा लवचीक नसल्याने अशी इमारत पूर्णपणे भूकंपरोधक होऊ  शकत नाही. मग यासाठी पर्याय काय? तर पर्याय आहे लोखंडी सेक्शनचा वापर करून इमारत बांधण्याचा. गोडाऊन किंवा कारखान्यांसाठी अशा प्रकारच्या इमारती मोठय़ा प्रमाणावर बांधल्या जातात. या इमारती आर. सी. सी. इमारती इतक्याच भक्कम असतात, शिवाय भूकंप जरी झाला तरी लोखंडाच्या वाकेन, पण मोडणार नाही या अंगभूत गुणधर्मामुळे शक्यतो अशा इमारती झटकन पडत वैगेरे नाहीत. आता प्रत्येक वस्तूला जशी चांगली बाजू असते तशीच वाईटही आहेच. लोखंडी इमारतीला जर आग लागली तर त्यातील लोखंड वितळायला सुरुवात होऊन या इमारतीचे मोठे नुकसान होऊ  शकते. त्याचप्रमाणे जर आपली इमारत दमट खाऱ्या हवेच्या परिसरात असेल तर खाऱ्या वातावरणाचा परिणाम म्हणून लोखंडावर गंज चढूनही इमारत कमजोर होते. अर्थात, त्यावर गंजरोधक आणि अग्निरोधक रसायनांचे लेपन करून काही प्रमाणात या संकटापासून आपण सुटकादेखील करून घेऊ  शकतो.

याचसोबत फार फार पूर्वीपासून प्रचलित असणारी लोड बेअरिंग बांधकामाची पद्धतदेखील आपण पाहूयात. लोड बेअरिंग पद्धतीमध्ये भिंती हाच इमारतीचा आधार असतात. किती उंच इमारत उभी करायची आहे त्यावर इमारतीच्या भिंतीची जाडी ठरते. अनेक जुन्या बांधकामांमध्ये तर तळमजल्याला सोळा सोळा फूट जाडीच्या भिंतीदेखील पाहायला मिळतात. या इमारतींचे वैशिष्टय़ असे की इथे दरवाजे आणि खिडक्यांच्या जागा इमारत बांधतानाच निश्चित कराव्या लागतात. नंतर इंटिरियर करताना आपल्या सोयीनुसार दरवाजे-खिडक्या हलविणे किंवा नवीन दरवाजे-खिडक्या पाडणे म्हणजे इमारतीला मोठा धोका निर्माण करणे. गावात जुनी घरे असणाऱ्यांनी अशा पद्धतीचे बांधकाम नक्कीच पाहिले असेल, दक्षिण मुंबईतही अशा प्रकारे बांधलेल्या काही इमारती आजही पाहायला मिळतात. पण भारतात लोड बेअरिंग पद्धतीने बांधलेली अहमदाबाद, गुजरात येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आय. आय. एम. अहमदाबादची इमारत तिच्या वास्तुरचनेकरता अतिशय प्रसिद्ध आहे. जर अजूनही लक्षात येत नसेल तर ‘टू स्टेट्स’ चित्रपट आठवा, त्यात नायक नायिका ज्या इन्स्टिटय़ूटमध्ये शिकतात तीच ही इमारत.

लोड बेअरिंग स्ट्रक्चरदेखील भूकंपात तग धरू शकत नाही. तसेच हे बांधकाम जर विटांऐवजी दगडात केले असेल तर आग लागण्याच्या घटनेतही दगड फुटून इमारतीला धोका संभवतो. याखेरीज खरं तर फार जागा व्यापली जात असल्याने आणि अतिशय खर्चीक असल्यामुळे ही पद्धत आता तशी कालबा समजली जाते.

या काही महत्त्वाच्या बांधकाम पद्धतींविषयी आपण चर्चा केली. जगात अनेक ठिकाणी याहूनही निरनिराळ्या बांधकाम पद्धतींचा अवलंब होतो, परंतु घाटकोपरला झालेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर आपले घर कसे आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे. मुळात आपल्या घराचे इंटिरिअरचे काम आपण योग्य तांत्रिक जाण असणाऱ्या व्यक्तीच्या हातात देणे जितके महत्त्वाचे तितकेच काही ढोबळ नियम आपल्यालाही माहीत असणे गरजेचे. काही गोष्टींचे पथ्य पाळले तर इमारतीच्या सुरक्षेला धोका न पोहोचवता आपल्या घरातील अंतर्गत बदल करणेदेखील फार अवघड नाही. अगदी आपली एकाच इमारतीत वर-खाली दोन घरे असतील तर आतून स्लॅबमध्ये काही फेरबदल करून दोन्ही घरे अंतर्गत जिन्याने एकमेकांना जोडतादेखील येतात. पण यासाठी आधी इमारतीच्या बांधकामाचा दर्जा उत्तम असणे व त्याचबरोबर असे काम करताना तज्ज्ञ अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य परवाने घेऊन असे काम करणे योग्य.

या सर्व गोष्टींसोबत थोडी सजगतादेखील हवी. जेव्हा आर. सी. सी. कॉलम, बीम किंवा स्लॅब तोडला जातो तेव्हा त्याच्या अति काठिण्यामुळे तोडताना भयंकर आवाज होतात, ज्यामुळे आपल्याला या कामाची माहिती मिळू शकते. असे प्रकार जर आपल्या इमारतीत घडत असतील तर लगेचच त्यावर र्निबध आणावेत. पण याचबरोबर आपण तांत्रिक बाजूदेखील समजून घ्याव्यात. आर. सी. सी. फ्रेम स्ट्रक्चरमध्ये भिंती कोणतेही वजन घेत नाहीत किंवा इमारतीला आधारही देत नाहीत, त्यामुळे त्यात जर कोणी आधीच नमूद केल्याप्रमाणे नियमात राहून बदल करत असेल तर विनाकारण कामात अडथळे आणणे मात्र निश्चित टाळावे.

हे सदर जरी घराच्या अंतर्गत सजावटीशी निगडित असले तरी आज आपण मुद्दामच इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती घेतली. मला आशा आहे की याचा नक्की उपयोग आपल्याला आपले घर सजवताना होईल, जेणेकरून घाटकोपरसारख्या दुर्घटना भविष्यात घडणार नाहीत. शेवटी आपली इमारत हेदेखील आपले घरच आहे, ते सुरक्षित तर आपण सुरक्षित.

गौरी प्रधान (इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

First Published on September 9, 2017 2:02 am

Web Title: interior designers and building blueprints