09 August 2020

News Flash

वास्तुसंवाद : अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन ..

अंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भात संलग्न असलेल्या सहकारी सोसायटीची परवानगी घेणे किंवा त्यांना कामासंदर्भात सूचना देणे महत्त्वाचे असते.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

‘‘कोणतीही गोष्ट वेळेत झालेली बरी असते.’’ हे एक वडीलधाऱ्या मंडळींकडून नेहमी कानावर पडणारे वाक्य. या वेळेचे एक गणित असते. अर्थात मांडायला सोपे आणि अमलात आणायला कठीण. का बरे असे? मांडायला सोपे म्हणायचे कारण, ते आकडय़ांमध्ये बद्ध असते. परंतु आकडेमोड झाली की विषय संपतो का? तर नाही. कारण हे वेळेचे गणित मांडताना कामाच्या अनुषंगाने सर्व बारीकसारीक गोष्टींचा साकल्याने विचार करणे आवश्यक असते.

अंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भातही अगदी हेच तत्त्व लागू होते. कामाच्या अंमलबजावणीसाठीचे पूर्वनियोजन हे केवळ कामाच्या कालमर्यादेपुरते मर्यादित असून चालत नाही. प्रथमत: त्या कामाची किंवा प्रकल्पाची त्याच्या स्वरूपानुसार विभागणी आणि उपविभागणी करणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधित कामे, कोणी, कधी आणि कशा प्रकारे करायची आहेत याबाबतची सविस्तर माहिती संकलित करणे अपेक्षित असते.

खरे पाहता वेळ, पसा आणि ताकद यांपैकी कोणतीही गोष्ट जेथे उपस्थित असते, तेथे नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व येते.

अगदी सुरुवातीला कामाची संकल्पना (Project – Concept design  stage) ठरून खर्चाचे अंदाजपत्रक निश्चित (Initiating project  work) केले जाते. परंतु कामाची अंमलबजावणी सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीचे पूर्वनियोजन.. अर्थात Pre- Execution Planning

अंतर्गत सजावटीच्या कामाचे पूर्वनियोजन करताना आधी कामाच्या स्वरूपानुसार (Perspective or Nature), व्याप्तीनुसार (Extension or Coverage) आणि प्रक्रियेनुसार (Process) कामाची विभागणी केली तर पुढील विचारांना चालना मिळते. अंतर्गत सजावटीच्या कामात सिव्हिल, प्लिम्बग, इलेक्ट्रिकल, फॅब्रिकेशन, अ‍ॅल्युमिनियम स्लायिडग विंडोज्, फॉल्स सिलिंग वर्क, फर्निचर वर्क, पॉलिशिंग- पेंटिंग वर्क इत्यादी अनेक प्रकारच्या तांत्रिक (Technical) कामांचा समावेश असतो. इतकेच नव्हे, तर एअर कंडिशिनग, CCTV, Data – Cabling, फायर- फायटिंग, इंटरकॉम सिस्टिम यासंदर्भातील कामे हीदेखील नियोजनाचा अंतर्भाग असतात. या अनुषंगाने त्या त्या क्षेत्रातील कंत्राटदार आणि तज्ज्ञ यांची उपलब्धता नियोजन पूर्वक निश्चित करणे आवश्यक असते.

कामाच्या मर्यादेनुसार, जेव्हा संपूर्ण काम एकाच कंत्राटदाराकडे देऊन तो उप-कंत्राटदार उपलब्ध करतो आणि कामाची संपूर्ण जबाबदारी घेतो त्याला Turnkey Contract असे म्हटले जाते. दोन ते तीन कंत्राटदारांकडून निविदा (Quotation) मागवून मग quality आणि rate यांचा एकत्रित विचार करून comparative Statement तयार केले जाते. आणि त्यानुसार कंत्राटदार निश्चित केला जातो. हे ठरवताना कंत्राटदाराचा पूर्वानुभव, क्षमता आणि completion Period यांचा निश्चितपणे विचार करावा लागतो.

कंत्राटदारांच्या निश्चितीबरोबरच विविध क्षेत्रांतील विक्रेते किंवा पुरवठादार यांची माहिती मिळवून, त्याही बाबतीत निश्चित निर्णय आधीच केला तर काम चालू असतानाचा वेळ नक्कीच वाचवता येतो. त्यासाठी  कामाच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या वस्तूंची बाजारातील उपलब्धता, तसेच त्यांचा बाजारभाव समजून घेणे, विक्रेत्यांची यादी करणे, वाहतुकीच्या साधनांचा अंदाज घेणे हे महत्त्वाचे ठरते. यानुसारच आपल्याला वस्तू अर्थातच टाइल्स, प्लायवुड, लॅमिनेट्स, इत्यादी कोठून खरेदी करावे हा निर्णय घेता येतो.

अंतर्गत सजावटीच्या कामासंदर्भात संलग्न असलेल्या सहकारी सोसायटीची परवानगी घेणे किंवा त्यांना कामासंदर्भात सूचना देणे महत्त्वाचे असते. अशी कामे नियोजित प्रकल्प कालावधी (Project period) सुरू होण्याआधी झालेली असल्यास उत्तम. जेणेकरून काम सुरू झाल्यावर अडथळा येणार नाही.

त्याचप्रमाणे दुपारी २ ते ४ किंवा संध्याकाळी ६ नंतर, तसेच रविवारी किंवा सुटीच्या दिवशी काम करण्यास सोसायटीकडून परवानगी नसेल तर त्याचाही परिणाम काम वेळेत पूर्ण करण्यावर होतो, म्हणून वेळेचे अंदाजपत्रक बांधतानाच हा सर्व विचार केला पाहिजे.

अंतर्गत सजावटीच्या कामात विविध प्रकारची तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण कामे अंतर्भूत असल्याने आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रेखीवपणा असण्यासाठी कोणत्या कामानंतर कोणते काम करायचे हा क्रम आणि त्यानुसार कंत्राटदारांचे आणि कामाचे सुसूत्रीकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. टीम वर्क आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रांतील तसेच स्तरातील लोकांनी परस्परांना समजून घेऊन एकत्रितरीत्या काम करणे हे या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरते.

अंतर्गत सजावट करताना या क्षेत्रातील रचना (Designing) कामात कला आणि तंत्रज्ञान या दोन्हींची गरज असते. परंतु हे काम अमलात आणताना एका कुशल आयोजकाचीही नक्कीच गरज असते. काम सुरू होण्याआधी वरील सर्व मुद्दय़ांचा विचार करून नियोजन केले तर काम वेळेत पूर्ण होण्यास आणि कामाची प्रत राखली जाण्यास नक्कीच मदत होईल.

बरेचदा कंत्राटदार कामे अर्धवट सोडून गेले असे आपल्याला ऐकावयास मिळते; परंतु हा विसंवाद घडण्यामागे जी काही करणे असू शकतात त्याचा आधीच विचार करून काळजी घेतली आणि संवादांची सुस्पष्टता ठेवली तर असे नक्कीच घडणार नाही. म्हणूनच कंत्राटदार, रचनाकार आणि उपभोक्ता या तिघांनीही कामाचा कालावधी निश्चित करताना किंवा मान्य करताना या सर्व पूर्वनियोजित कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नियोजन करून कामाचा श्रीगणेशा केला तर वास्तुसंवाद सर्वार्थाने नक्कीच अबाधित राहील.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:03 am

Web Title: internal decoration implementation planning abn 97
Next Stories
1 मेणवलीतील घंटेचे देऊळ
2 बांधकाम व्यवसायाला वाली नाही
3 उद्योगाचे घरी.. : वित्तीय गुंतवणुकीतून सर्वसामान्यांना श्रीमंत बनवणारं ऑफिस
Just Now!
X