25 March 2019

News Flash

कौटिल्याचे दुर्ग

कौटिल्याने लिहिलेला ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले

‘‘राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सन्य व मित्र ही राज्याची सप्तांगे वा सात प्रकृती होत.’’ असे कौटिल्य म्हणतो. या संबंधातले नीतिशास्त्रे वा पुराणांमधले उल्लेख हे किंचितसा फरक सोडला तर कौटिल्याच्या क्रमवारीशी मिळतेजुळते आहेत. मात्र साऱ्यांच्याच यादीत दुर्गाचा उल्लेख आहे व दुर्गाचा क्रमसुद्धा बराच उजवा आहे.

कौटिल्याने लिहिलेला ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर हे शास्त्र वा ही दंडनीती ‘अलब्धलाभार्था’- जे आजवर लाभले नाही ते लाभून देणारी; ‘लब्धस्य प्रतिपालिनी’- जे लाभले त्याचा प्रतिपाळ करणारी; ‘प्रतिपालितस्य परिवíधनी’- ज्याचा प्रतिपाळ केला ते वृद्धिंगत  करणारी आणि त्याही पुढे जाऊन तो म्हणतो, की ही दंडनीती ‘परिवíधतस्य तीथ्रे प्रतिपादिनी’ म्हणजे जे जे वृद्धिंगत  झाले त्याचा उपयोग प्रजेला होईल हे पाहण्यासाठीच या ग्रंथाची रचना झालेली आहे! साधारण बुद्धपूर्वकाल व बुद्धोत्तरकाल या काही शतकांच्या काळातील राज्यव्यवस्था, समाजजीवन, अर्थकारण यांचे अतिशय प्रभावी असे चित्रण या ग्रंथात उमटलेले दिसते. या कालखंडावर प्रकाश पाडणारे, सुसंबद्ध व परिपूर्ण असे हे एकमेव तत्कालीन प्रबंधस्वरूप लिखाण आहे.

राजनीतिविषयक अनेक विषयांच्या संदर्भात आपले विचार मांडताना कौटिल्याने राज्यसंरक्षणाविषयीच्या अनेक बाबींचा परिपूर्ण असा विचार केला आहे. अर्थशास्त्रांच्या ‘अध्यक्षप्रचार’ म्हणजे ‘अध्यक्षांचे कार्य’ या नावाच्या दुसऱ्या अधिकरणातील दोन संपूर्ण अध्याय दुर्गाची बांधणी व दुर्गातील नगराची रचना या विषयावर प्रकाश टाकतात. एवढेच नव्हे, तर या ग्रंथाच्या शेवटापर्यंत मधील नाना प्रकरणांमध्ये दुर्ग व त्यासंबंधीच्या बाबींचे असंख्य उल्लेख आहेत. दुर्ग या विषयाचे उत्तम निरीक्षण या उल्लेखांमधून आढळते व त्याकाळातील दुर्ग या विषयाचे अपरिहार्यपणसुद्धा तेवढय़ाच प्रकर्षांने जाणवते.

या दुसऱ्या अधिकरणातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्याच श्लोकात जनपदाची म्हणजेच माणसांची वसाहत कशी करावी या संदर्भात कौटिल्य म्हणतो : ‘‘पूर्वी जिथे जनपद वसलेले असेल किंवा वसलेले नसेल अशा ठिकाणी परदेशांतून लोक आणून अथवा स्वत:च्याच देशातील दाट वस्तीच्या भागातील लोक स्थलांतरित करून जनपद वसवावे. मुख्यत: शूर शेतकऱ्यांची वस्ती असलेली, कमीत कमी शंभर तर जास्तीत जास्त पाचशे कुटुंबे असलेली, एकमेकांचे संरक्षण करू शकतील अशा प्रकारे गावे वसवावी. सरहद्दीवर, जनपदात ये-जा करण्यासाठी दरवाजासारखे असलेले, अंतपालांच्या आधिपत्याखाली दुर्ग स्थापन करावेत. दोन दुर्गामधील मोकळ्या जागेत शंबर, पुिलद, फासेपारधी, चांडाल अशा अरण्यवासीयांनी पहारा करावा.’’

‘दुर्गविधानम्’ म्हणजे दुर्गाची बांधणी या तिसऱ्या अध्यायाची सुरुवात करताना कौटिल्य म्हणतो : ‘‘जनपदाच्या सरहद्दीवर चारही दिशांना निसर्गाने बनवलेले, युद्धासाठी सुसज्ज असे दुर्ग स्थापन करावेत. बेटावर असलेला किंवा पाण्याने वेढलेला असे दोन प्रकारचे जलदुर्ग, खडकांनी बनलेला किंवा गुहेच्या स्वरूपाचा असे दोन प्रकारचे पर्वतदुर्ग, जल व झुडुपे यांनी विरहित असलेल्या किंवा क्षारयुक्त जमिनीच्या स्वरूपाचा असे दोन प्रकारचे धान्वदुर्ग, दलदल व पाणी असलेला वा गच्च झाडीने वेढलेला असे दोन प्रकारचे वनदुर्ग स्थापन करावेत. यांपकी जलदुर्ग व पर्वतदुर्ग ही जनपदाच्या रक्षणार्थ असलेली ठिकाणे तर धान्वदुर्ग व वनदुर्ग ही अरण्यवासींनी राहावयाची वा संकटसमयी आश्रयास येण्याची ठिकाणे असे समजावे.’’

‘‘जनपदाच्या मध्यभागी राज्यातील उत्पन्न जमा होण्याचे ठिकाण म्हणून स्थानीय वसवावे. स्थानीय म्हणजे आठशे गावांच्या समूहाचे मध्यवर्ती ठिकाण. चारशे गावांचे ते द्रोणमुख, दोनशे गावांचे ते कार्वटिक अन् दहा गावांचे ते संग्रहण. हे स्थानीय वास्तुशास्त्रविशारदांनी पसंत केलेल्या जागी, नद्यांच्या संगमावर वा कधीही कोरडय़ा न पडणाऱ्या जलाशयाच्या काठावर, वर्तुळाकार लंबचौरस वा चौरस आकाराचे वा जागेच्या अनुरोधाने आकार असलेले, नदीचे पाणी प्रदक्षिण दिशेने वाहणारे असावे, त्या जनपदात निरनिराळ्या मालांच्या बाजारपेठा असाव्यात व हे जनपद वा स्थानीय खुष्कीचे मार्ग व जलमार्ग यांनी इतर प्रदेशांशी जोडलेले असावे.

‘‘या स्थानीयांच्या भोवती निरनिराळ्या रुंदीचे तीन खंदक असावेत. त्यांची खोली रुंदीच्या पाऊणपट असावी. या खंदकांचे तळ दगडांनी बांधलेले असावे. किंवा त्यांच्या केवळ बाजू दगड अथवा विटा यांनी बांधलेल्या असाव्यात. त्यात जिवंत पाण्याचे झरे लागलेले असावेत किंवा दुसरीकडून पाणी सोडून ते भरलेले असावेत; अधिक पाणी वाहून जाण्यासाठी त्यात मार्ग असावेत व या पाण्यात कमळे व मगरी असाव्यात.

‘‘सर्वात आतल्या खंदकापासून काही अंतरावर, उंचीच्या दुप्पट रुंदीचा पक्का तट खंदकांसाठी खणलेल्या मातीने बांधून घ्यावा. तो वर निमुळता होत जाणारा व सपाट माथ्याचा असावा; हत्ती व बल यांनी तुडवून तो घट्ट केलेला असावा. त्याच्या बाहेरच्या बाजूस काटेरी झुडुपे वा विषारी वेली लावाव्यात. उरलेली माती सखल भाग भरून काढण्यासाठी वा राजप्रसाद बांधण्यासाठी वापरावी. या तटाच्या वर रुंदीच्या दुप्पट उंची असलेली विटांची िभत (वप्र) बांधून घ्यावी. तिच्यावर रथांची हालचाल होण्याएवढी ती रुंद असावी. किंवा विटांच्या ऐवजी मोठमोठय़ा दगडांची िभत बांधावी, पण लाकडाची िभत कधीही करू नये कारण त्यांत अग्नी दडलेला असतो.’’  या संदर्भात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते : मॅगेस्थिनीसने चंद्रगुप्तकालीन पाटलीपुत्राचे वर्णन केले आहे. त्यात त्याने पाटलीपुत्राच्या लाकडी तटबंदीचे वर्णन केले आहे. पाटलीपुत्राच्या उत्खननात या लाकडी तटबंदीचे अवशेष सापडले आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा आधार घेतला तर हे असंभव वाटते. कारण कौटिल्य म्हणतो की, अशा प्रकारच्या तटबंदीच्या कामात लाकूड वापरू नये. मग हे कसे घडले असावे अशी शंका उभी राहते. पाटलीपुत्र हे साधेसुधे नगर नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षांवर राज्य करणाऱ्या बलाढय़ अशा मौर्य साम्राज्याची ती राजधानी. या संदर्भात ‘Forts and Palaces of India’ या आपल्या ग्रंथात प्रभाकर बेगडे म्हणतात : ‘‘.. इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की भारतीय कारागिरांनी अतिशय कलात्मकतेने या दगडी बांधकामामध्ये लाकडाचा आभास निर्माण केला. प्राचीन भारतीय कला व वास्तुशास्त्राचा संदर्भ यात घेतला तर हे सहजपणे सिद्ध करता येण्याजोगे आहे. सांची येथील स्तूप व इतर ठिकाणी दगडांत कोरलेला लाकडी कामाचा आभास यास साक्ष आहे. लाकडासारखे भासणारे कोरीव काम व अलंकरण पाहून मॅगेस्थिनीस बहुधा चकला असावा.’’

सह्यद्रीच्या पोटात कोरल्या गेलेल्या असंख्य लेण्यांमध्ये हेच आभासतंत्र अतिशय प्रभावीपणे वापरले गेले आहे. तत्कालीन वास्तूंचे यथार्थ दर्शन दगडात घडविण्यासाठी त्या अनाम शिल्पींनी लेणी कोरताना त्या वास्तूंचा आभास सह्यद्रीच्या कातळकडय़ात नेमका निर्माण केला. किंबहुना त्या काळातील वास्तू कशा होत्या हे लेण्यांची प्रवेशद्वारे आणि त्याभोवतालचे गवाक्षांचे अन् तालिकांचे शिल्पकाम पाहून आपणास नेमके उमजते. बेगडेंनी बहुधा याचाच संदर्भ घेऊन हे विधान केले असावे. नेमक्या याच कारणासाठी मला दुर्गाच्या संदर्भातील बेगडे यांचे हे विधान पटत नाही. याच कालखंडात जगात इतरत्रही दुर्गाची बांधकामे होत होती. दुर्गाच्या बांधकामशास्त्राविषयी कौटिल्याइतक्याच अधिकारवाणीने लिहिणारा फिलो ऑफ बायझान्टिअम- ख्रिस्तपूर्व दुसरे शतक- यानेसुद्धा तटबंदीच्या बांधकामासंदर्भात लिहिताना एके ठिकाणी म्हटले आहे : ‘‘तटबंदी वा टेहेळणी बुरुजाचं बांधकाम करताना ओक लाकडाचे वासे तटाच्या संपूर्ण लांबीत घालावेत. या वाशांच्या रांगांमधलं उभे अंतर सहा फुटांपेक्षा जास्त नसावे. कारण तट भंगला तर दुरुस्तीच्या वेळी यांचा अतिशय उपयोग होतो.’’

ख्रिस्तपूर्व ३० मध्ये लिहिणारा व्ह्रिटव्हिअस सुद्धा फिलोचं म्हणणं मान्य करतो की, तटबंदीत मजबुतीसाठी लाकडाचा सांगाडा असावा. मात्र त्याच्या मते- ‘‘ओक लाकडाच्या ऐवजी भाजलेल्या ऑलिव्हच्या लाकडाचा उपयोग करावा, जे जमिनीत पुरले वा पाण्यात बुडाले तरीही नाश पावत नाही.’’ ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात रचलेल्या पॉम्पे या इटलीतील शहराचे अवशेष या पद्धतीच्या बांधकामाचे साक्ष देतात. इ.स. ७९ च्या सुमारास व्हेसुविअस ज्वालामुखीच्या राखेखाली हे शहर पूर्णत: दडपले गेले अन् ही तटबंदी जशीच्या तशी राहिली.

गॉलसारख्या उत्तर युरोपातील काही शहरांची तटबंदीसुद्धा लाकडाचा वापर करून सांधली गेली आहे. आजच्या बांधकामात मजबुतीसाठी जशा लोखंडी जाळ्या (RCC Framework) वापरतात त्याच पद्धतीने इथे तटबंदीच्या बांधकामात लाकडी रचनेचा उपयोग केला गेला आहे. अशा प्रकाराने बांधलेली तटबंदी आगीच्या धोक्यापासूनही दुभ्रेद्य होती, हे ऐतिहासिक सत्य ज्यूलिअस सीझरने गॉलच्या लढाईत अनुभवले आहे.

या काही उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, दुर्गाच्या तटबंदीच्या बांधकामाची ही पद्धत जगभरच्या वास्तूंचे बांधकाम करताना प्रचलित होती. जगाच्या दोन कोपऱ्यांत नांदत असलेल्या दोन समकालीन विचारवंतांनी आपल्या लिखाणात याचा उल्लेख करावा, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही! किंबहुना कौटिल्याला १०० टक्के लाकडाची तटबंदी अभिप्रेत नसावी हे जास्त सयुक्तिक वाटते. पोलंडमधील वॉर्टा व प्रोस्ना या नद्यांच्या खोऱ्यांमधल्या प्रदेशातील क्युरो, स्ट्रॉबिन येथील तटबंदीने युक्त अशा वसाहती ख्रि. पू. ९०० ते ७०० या काळातल्या आहेत. या तटबंदींचे वैशिष्टय़ असे की, या तटबंदीमध्ये लाकडाचा वापर विपुल प्रमाणात केला गेला आहे. दोन उभ्या गाडलेल्या खांबांमध्ये अडकवलेले आडवे वासे असे या तटबंदीचे ढोबळ स्वरूप आहे. मात्र हे सारे अवशेष जळून गेलेल्या अशा अवस्थेत आहेत. हे निश्चितपणे आगीमुळेच झाले असावे असा पुरातत्त्ववेत्त्यांचा तर्क आहे. मात्र नंतरच्या काळात झालेल्या उत्खननात पुरातत्त्वज्ञांना असे आढळून आले, की नंतरच्या कालखंडात याच ठिकाणी दगडमातीचा प्रामुख्याने वापर करून हा तट पुन्हा बांधला गेला व त्यात लाकडाच्या वाशांच्या सांगाडय़ाचा वापर करण्यात आला.

तटबंदीयुक्त शहराची वा दुर्गातील शहराची रचना कशी असावी याचे दिग्दर्शन कौटिल्यानं मोठय़ा साक्षेपाने व विस्तारपूर्वक केलेले आहे. या विषयाच्या मांडणीला हात घालताना त्याने प्रथम जनपदाची वस्ती कशी स्थापावी ते सांगितले. नंतर त्याने दुर्गाची बांधणी-तेही त्याचं बारूप- कसे असावे आणि कसे रचावे ते सांगितले. मग तो सांगतो दुर्गाचा अंतर्भाग- म्हणजे आतले शहर कसे असावे ते. हे सारे अतिशय पद्धतशीर आहे. सखोल विचारांती रचलेलं आहे.

पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे तीन राजमार्ग व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे तीन राजमार्ग याप्रमाणे दुर्गातील वस्तीची विभागणी करावी. या नगराला बारा दरवाजे, त्यांत उत्तम पिण्याचे पाणी, पाणी वाहून नेण्यासाठी पाट व छुपे रस्ते- छन्नपथ- असावेत. इथे छुपे रस्ते याचा अर्थ Underground Drainage System असा असावा असे मानण्याला जागा आहे. कारण सिंधुसंस्कृतीतील शहरांमध्ये जर सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांचे नियोजन केलेले आढळते तर त्यानंतरच्या काही सहस्रकांनी नांदणाऱ्या संस्कृतींनी, उत्क्रांतीच्या नियमानुसार, त्यात स्वत:ची भर घातली असणे जास्त संभवते. उघडी नव्हेत, जमिनीखालूनही नव्हेत, मात्र झाकणे असलेली जलविसर्गव्यवस्था असणे अतिशय संभवनीय आहे.

सर्वोत्कृष्ट जागी, जिथे चारही वर्णाचे लोक राहणे शक्य आहे अशा ठिकाणी राजाचे निवासस्थान बांधावे. ते पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख असावे. आचार्य, पुरोहित यांची निवासस्थाने आणि यज्ञागारे व तलाव, मंत्र्यांची निवासस्थाने, पाकशाला, हत्तीशाळा, कोठारे, व्यापारी पेठा, हुन्नरी कारागीर, कलावंत, क्षत्रिय, भांडारे, कोषागारे, अधिकारी, सेवक यांच्या जागा, आयुधागारे, धान्याचे व्यापारी, कारखान्यांवरील अधिकारी, सेनाधिकारी, अन्न, मध, मांस यांचे विक्रेते, वेश्या व नर्तक, वैश्य यांची वस्ती, जनावरांचे गोठे, गाडय़ा व रथ ठेवण्याच्या जागा, कोष्टी, टोपल्या विणणारे बुरूड, चामडय़ाचे काम करणारे, चिलखते,शस्त्रे, शिरस्राणे यांचे काम करणारे लोहार व शूद्र यांच्या वस्त्या, पण्यगृहे, औषधागार, कोशगृह, गोशाळा, अश्वशाळा यांच्या जागा कुठे कुठे व कशा असाव्यात याचे दिशादिग्दर्शनही कौटिल्याने केले आहे.

नगरदेवता, राज्याच्या कुलदेवता यांची मंदिरे, इतर देवतांची मंदिरे, वास्तुदेवता, ब्राह्मण, दिशांच्या देवता व त्यांची मंदिरे, चारही वर्णाची स्मशाने, पाखंडी व चांडालांची वस्ती यांचीही नोंद कौटिल्याने घेतलेली आहे. वस्ती नसलेल्या भागात तटाच्या बाजूला श्रेणी व परदेशी व्यापारी व त्यांचे संघ यांनी राहावे असे कौटिल्य जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्या सावध व चाणाक्ष वृत्तीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

व्यवसायाला आवश्यक असलेल्या जागेच्या अनुरोधाने कुटुंबांना जागेच्या हद्दी ठरवून द्याव्यात. दर दहा कुटुंबांच्या समूहासाठी एक विहीर असावी. नाना परींचे पदार्थ, धान्य, क्षार, सुगंधी द्रव्ये, औषधे, सुकवलेल्या भाज्या, जनावरांचे खाणे, सुके मांस, चारा, लाकडे, शस्त्रे, चिलखते, पाषाण यांचे अनेक वष्रे पुरतील एवढे साठे करून ठेवावे. नवीन जसजसे हाती येईल, तसतसे जुने संपवीत जावे.

दुर्गाच्या रक्षणासाठी वा दुर्ग युद्धसज्ज ठेवण्यास असणाऱ्या आयुधागारावरील अध्यक्षाने आवश्यक असणारी व शत्रूच्या शहरांचा विनाश करू शकणारी यंत्रे, शस्त्रास्त्रे, चिलखते, अवजारे हे सारे सदैव सिद्ध ठेवावे. त्यांचा योग्य तेवढा संग्रह करून ठेवावा. त्यांची जागा वरचेवर बदलावी. त्यांना ऊन, हवा द्यावी. ओलावा, उष्णता, कृमी यांच्यापासून त्यांस इजा पोहोचत असल्यास ती वेगळ्या पद्धतीने साठवावीत. त्या साऱ्याची खडान्खडा माहिती दुर्गातील आयुधागाराध्यक्षाला असणे आत्यंतिक गरजेचे आहे, असे कौटिल्य म्हणतो.

चतुरंग सेना एकापेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या हाताखाली नगरात ठेवावी. कारण एकमेकांच्या भयामुळे ते फितुरीस बळी पडत नाहीत. सरहद्दीवरील दुर्गाचीही अशाच प्रकारे व्यवस्था लावावी. राष्ट्रघात करू पाहणाऱ्या व्यक्तींना वा टोळ्यांना दुर्गामध्ये निवास करू देऊ नये. त्यांना दुर्गाबाहेरील जनपदांत हाकलून द्यावे व सर्व प्रकारचे कर देण्यास भाग पाडावे.

समाहर्ता म्हणजे नगरावरचा मुख्य अधिकारी. याने ‘दुर्ग’ या सदरात येणारे सर्व उत्पन्न विचारात घ्यावे असे कौटिल्य म्हणतो. जकात, दंड, वजने, मापे, नागरिक, नाणी पाडणारा अध्यक्ष, मुद्राध्यक्ष, सुराध्यक्ष, सुनाध्यक्ष, सूत्राध्यक्ष, तेल, तूप, गूळ, क्षार, सुवर्णकार, बाजारपेठा, वेश्या, द्यूतगृहे, नाना कारागीर व कलाकार, देवताध्यक्ष, दरवाजावर व बाहेरच्या लोकांकडून घ्यायचा कर या साऱ्यांतून मिळणारे उत्पन्न ‘दुर्ग’ या उत्पन्नाच्या अंगात मोडते. अर्थ असा की, दुर्ग हे केवळ स्थलनाम नसून राष्ट्राच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे अंग आहे, असे कौटिल्याला अभिप्रेत होते, किंबहुना कौटिल्याला अभिप्रेत असणारी जी सप्तांग राज्यपद्धती, त्याचे दुर्ग हे एक अतिशय महत्त्वाचे अंग होते.

दुर्गाचे महत्त्व सांगताना कौटिल्य एके ठिकाणी म्हणतो : ‘‘दुर्गामुळे कोश व सन्य सुरक्षित राहते. कारण त्यांची उत्पत्ती दुर्गात होते. कोश, सन्य, गुप्त युद्ध, आपल्याच पक्षातील (शिरजोर) लोकांचे दमन, बळाचा वापर, मदतीला येणाऱ्या सन्याचा स्वीकार व परचक्र आणि रानटी टोळ्या यांना प्रतिकार, या गोष्टी तर दुर्गावर अवलंबून आहेत आणि दुर्ग नसेल तर कोश शत्रूच्या हाती जातो, कारण ज्यांना दुर्गाचे संरक्षण आहे, त्यांचा उच्छेद होत नाही असे दिसून येते.’’

डॉ. मिलिंद पराडकर

discover.horizon@gmail.com

(लेखकाने ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विद्याशाखेत ‘दुर्गशास्त्र’ या विषयात पीएचडी केली आहे.)

First Published on March 3, 2018 4:55 am

Web Title: kautilya arthshastra exploring architecture of fort