मानवी वृत्ती अशी आहे की, जे जे उत्तम असते, जे काही न काही वैशिष्टय़ांमुळे मनाला भावते, त्याचे त्याचे थेट अनुकरण होते. कधी हे म्हटले तर अंधानुकरण असते तर कधी हे शास्त्रीय मोजपट्टीवर जोखलेल्या प्रगतीचेही असते. हे असे अनुकरण केवळ स्थानीय पातळीवरच नव्हे तर जेथे जेथे मानवाने भूतलावर पाय रोवले, स्वत:ची संस्कृती जोपासली, स्वत:चा वेगळा ठसा उमटवू पाहिला तेथे तेथे झाले. एकमेकांच्या कल्पना, त्यातील तंत्र व त्यामागील तत्त्वज्ञान आत्मसात करीत व बारकाव्यांसकट त्यांनी उचलल्या. दुर्गाच्या बाबतीतही हे निश्चितपणे झाले असावे, कारण तसे मानण्याजोगे लिखित संदर्भ आणि पुरातत्त्वीय पुरावे आपल्याला जागोजागी आढळून येतात. मात्र हे जेव्हा वैश्विक पातळीवर अनुभवता येते तेव्हा मन आश्चर्याने मुग्ध होऊन जाते.

वेदकालीन तटबंदी या लाकडाच्या वा दगडांच्या असत. या प्रकारच्या तटबंदीवर मात करताना तटबंदीला एक तर आग लावायची वा ‘पुरचरिष्णु’चा वापर करायचा अशी पद्धत वापरली जाई. पुरचरिष्णु म्हणजे चालता दुर्ग वा चालते पूर. इथे ग्रीकांच्या व रोमनांच्या स्वत:च्या सैन्याभोवती तटबंदी उभारून वेढे लढविण्याच्या- Siege Engines – पद्धतीचे स्मरण होते. मात्र या ग्रीकांच्या पद्धती सनपूर्व ३० एवढय़ा अलीकडच्या आहेत तर ‘पुरचरिष्णु’ हा उल्लेख वेदकालीन म्हणजे त्याच्याही कितीतरी सहस्रके अगोदरचा आहे.

रोमन छावण्यांचे वर्णन करताना फ्लावियस जोसेफस् हा सनपूर्व पहिल्या शतकातील ज्यू-रोमन विद्वान म्हणतो- ‘रोमन साम्राज्याच्या विस्तारीकरणाच्या काळात रोमन राज्यकर्त्यांनी युद्धकाळात जे तळ वा छावण्या उभारल्या, त्या इतक्या नियोजनबद्ध होत्या व त्यांच्या रचनेमागे एवढा प्रगत विचार होता की, त्या लष्करी छावण्यांनीच पुढे दुर्ग म्हणून ख्याती मिळवली. भक्कम अशी दगडी तटबंदी, त्यामध्ये ठरावीक अंतरांवर असलेले बुरूज, दगडफेक करणारी यंत्रे, धनुर्धारी सैनिकांसाठी तटांवर व बुरुजांवर असलेल्या सुविधा, मूळ लाकडी दरवाजे व त्यांना संरक्षण म्हणून असलेले वरून खाली सोडता येणारे लोखंडी जाळीदार दरवाजे; तेसुद्धा चार दिशांना चार. या दारांमधून निघणाऱ्या वाटांनी परस्परांना जिथे छेद दिला, त्यामुळे निर्माण झालेल्या चौरसांच्या मोकळ्या भूभागांचा वेगवेगळ्या लोकांच्या वस्तीसाठी वापर!

कौटिल्यसुद्धा आपल्या अर्थशास्त्राच्या नगररचना या प्रकरणात अशाच प्रकारच्या शहरांचा अतिशय तपशीलवार उल्लेख करतो. फरक एवढाच की, रोमन सैन्याच्या छावण्यांनी ही शहरांची वा दुर्गाची रूपे धारण केली, तर कौटिल्याच्या मनी त्यांची रचनाच मुळी नगर वा दुर्ग म्हणून करण्यात आली. मात्र याखेरीज दुर्ग आणि त्याचे मुलकी व लष्करी उपयोग याविषयी कौटिल्य त्याच्या अर्थशास्त्रात जे  विवेचन करतो त्या प्रत्येक शब्दात त्या द्रष्टय़ा विद्वानाचा साक्षेप पूर्णार्थाने डोकावतो आहे.

कौटिल्य म्हणतो- ‘दुर्ग व जनपद यांची जशी शक्ती असेल त्याप्रमाणे एकूण उत्पन्नाच्या एकचतुर्थाश त्यावर खर्च होईल अशा प्रकारे नोकरांचे काम व त्यासाठीचे वेतन ठरवून द्यावे. उत्पन्नाच्या बाबींकडे लक्ष द्यावे. धर्म व अर्थ यांची हानी होऊ  देऊ  नये. राजवाडा, सरकारी इमारती, दुर्ग व राष्ट्र यांतील रक्षक सैन्यामधल्या कोणालाही कमी करू नये. त्या रक्षक सैन्यावरील मुख्य एकाहून अधिक व कायम असावेत. तांडय़ातील व्यापाऱ्यांची शस्त्रे व चिलखते ही सरहद्दीवरील दुर्गपालाने ठेवून घ्यावीत किंवा त्यांच्यावर मोहोर करून आत नेऊ  द्यावीत. खजिना व सैन्य विश्वासू माणसांच्या ताब्यात दुर्गात किंवा सरहद्दीवर एके ठिकाणी गोळा करावेत.’ – हा उल्लेख राजावर संकट आले असता काय करावे, या संदर्भात आहे. राजा, अमात्य, जनपद, दुर्ग, कोश, सैन्य व मित्र ही राज्याची सप्तांगे वा सात प्रकृती होत, असे कौटिल्य म्हणतो.  या संकल्पनेतील नीतिशास्त्रे वा पुराणांमधले उल्लेख हे किंचितसा फरक सोडला तर कौटिल्याच्या क्रमवारीशी मिळतेजुळते आहेत.

‘शत्रुसैन्य वा जंगली टोळ्या यांनी दुर्ग वा जनपद उद्ध्वस्त केले असेल, तर त्या संकटात स्वत: सापडलेली ठेव स्वीकारणारा ती परत करण्यास बांधलेला नाही.’ हा उल्लेख कर्जफेडीविषयीच्या प्रकरणातला आहे. ही फेड सरकारमार्फत होईल का, यासंबंधीचा उल्लेख मात्र यात नाही. मात्र दुर्गात राहणाऱ्या एखाद्या सामान्य सैनिकाचे भले पाहणारी दूरदृष्टी कौटिल्याच्या ठायी होती. जणू आजच्या काळातील रोजगार हमी योजनेचे रूप कौटिल्याने तेव्हा वर्णन करून ठेवले आहे : ‘दुष्काळ पडला असता राजाने बियाणे व धान्ये यांचा संग्रह करून प्रजाजनांना सहाय्य करावे. किंवा दुर्ग वा बंधारे बांधण्याचे काम काढून प्रजाजनांच्या पोटापाण्याची सोय करावी.’  एक तर्क यातून असाही करता येतो की, दुर्गाची बांधकामे हे एक प्रमुख कार्य असावे, केवळ दुष्काळी नव्हे. आजही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत रस्ते बांधायची कामे घेतली जातात; पाझरतलावांची, विहिरींची कामे घेतली जातात. ही कामे एरवीही प्रामुख्याने होतच असतात, मात्र कठीण काळात रोजगाराची ददात पडू नये या कारणाने ती हाती घेण्यात येतात, कारण ती अतिशय महत्त्वाची असतात. म्हणूनच इतर काही हाती न घेता मुख्यत: यांवरच भर दिला जातो. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, दुर्ग बांधण्याचे कामही त्या काळात अतिशय महत्त्वाचे मानले जात असावे.

‘गोप व स्थानिक- हे मुलकी अधिकारी – यांच्या साहाय्याने दुर्गाबाहेरच्या प्रदेशात प्रद्वेष्टय़ाने व दुर्गाच्या आत नागरिकाने- प्रद्वेष्टा व नागरिक हे फौजदारी अधिकारी-पूर्वनिर्दिष्ट कारणांच्या अनुरोधाने चोरांचा तपास करावा.’  या उल्लेखात दुर्गाच्या व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांची जंत्री व त्यांच्या पराक्रमाची आपणास ओळख होते.

दुर्गाच्या बाबतीत घडलेल्या काही गुन्ह्य़ाबाबतच्या शिक्षांचाही उल्लेख इथे आहे :  ‘आत येण्याची परवानगी नसता दुर्गात शिरणाऱ्या किंवा तटाच्या छिद्रातून वा खिंडारातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस पायाचे स्नायू कापण्याची शिक्षा वा दोनशे पण दंड करावा.’ ‘राज्याची अभिलाषा धरणारा, राजप्रासादावर चढाई करणारा, रानटी टोळ्या किंवा शत्रू यांस प्रोत्साहन देणारा किंवा दुर्ग, जनपद वा सैन्य यांत बंडाचा उठाव करणारा यांच्या मस्तकास व हातास जाळ लावून मारावे.’; ‘दुर्गातील राजद्रोही अधिकारी व बाहेरच्या प्रदेशातील राजद्रोही अधिकारी यांना गुप्त हेरांनी एकमेकांचे पाहुणे होण्यास प्रवृत्त करावे. तेथे विष देणाऱ्या हेरांनी पाहुण्यांवर विषप्रयोग करावा. त्या अपराधाबद्दल यजमानास शासन करावे.’

परराष्ट्रविषयक धोरणांचे ऱ्हास, स्थिरता व वृद्धी यांच्या प्रसंगी घ्यायच्या विवेचनाच्या अनुषंगाने कौटिल्य म्हणतो- ‘ज्या धोरणाचा अवलंब केला असता, त्याला (म्हणजे राजाला) असे दिसून येईल, की या धोरणाच्या अवलंबनाने मी दुर्ग बांधणे, सेतू वा बंधारे बांधणे, व्यापारी मार्ग प्रस्थापित करणे आणि शत्रूच्या याच कार्याचा नाश करू शकेन, त्याच धोरणाचा त्याने अवलंब करावा.’

संधी व विग्रह यांसंदर्भात दुर्गासंबंधी बोलताना कौटिल्य म्हणतो- ‘मुख्यत: लढवय्यांची अथवा श्रेणींची वस्ती असलेला व पर्वतदुर्ग, वनदुर्ग अथवा नदीदुर्ग यांमुळे सुरक्षित असलेला माझा देश शत्रूचा हल्ला परतवून लावण्यास समर्थ आहे; किंवा राज्याच्या सरहद्दीवरील अभेद्य दुर्गात राहून मी शत्रूच्या कार्याचा विध्वंस करू शकेन, त्याचा देश बळकावू शकेन, तर त्याने विग्रहाचा अवलंब करून आपली भरभराट साध्य करावी.’

‘पराजित होणारे राजे सारखेच बलवान असल्यास जो दुर्गात असलेल्या संरक्षित शत्रूला पराभूत करून त्याचा प्रदेश मिळवतो, तो मात करतो, कारण दुर्गाची प्राप्ती झाली म्हणजे आपल्या प्रदेशाचे रक्षण करता येते.’ याच प्रकरणात तो पुढे म्हणतो- ‘दुर्गाचा भक्कम आधार असलेले, एकाला स्थलदुर्गाचा तर दुसऱ्याला जलदुर्गाचा, तर अशा वेळी स्थलदुर्गाच्या भूमीचा लाभ श्रेयस्कर. मात्र जलदुर्ग सर करण्यास दुप्पट क्लेश होतात. नदीदुर्ग असलेला व पर्वतदुर्ग असलेला यांपैकी नदीदुर्गापासून होणाऱ्या भूमीचा लाभ उत्तम. मात्र गिरिदुर्ग हा रक्षण करण्यास सोपा, वेढा देण्यास कठीण व चढाईच्या दृष्टीने कष्टप्रद असतो. त्याचा एखादा भाग भग्न झाला, तरी संपूर्ण दुर्ग उद्ध्वस्त होत नाही; व आक्रमकांवर वरून दगड व झाडे यांचा वर्षांव करता येतो.’

कर्मसंधीच्या संदर्भात कौटिल्य म्हणतो- ‘संधी करणाऱ्या दोन राजांपैकी जो निसर्गनिर्मित हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा दुर्ग बांधून घेईल तो दुसऱ्यावर मात करतो. त्यातही भुईकोट, पाणकोट व पर्वतावरील किल्ल्यांपैकी नंतर नंतरचा अधिक चांगला.’

मदत करणाऱ्या राजांच्या अभावी दुर्गाचा आश्रय घ्यावा, जिथे शत्रूजवळ कितीही मोठे सैन्य असले तरी तो अन्नसामग्री, गवतचारा, लाकूडफाटा वा पाणी यांचा पुरवठा तोडू शकणार नाही व त्याला स्वत:लाच मनुष्यहानी व द्रव्यहानी सोसावी लागेल. धान्यादींचे साठे व रक्षणास माणसे असलेला दुर्ग केव्हाही पसंत करावा. राज्यवृद्धीचे धोरण ठेवून निरनिराळ्या कारणांसाठी दुर्गाचा आश्रय घ्यावा. इतर आचार्याचे मत असे की, हे शक्य नसल्यास दुर्गाचा त्याग करून निघून जावे किंवा दिव्यावर कोसळणाऱ्या पतंगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडावे. मात्र हे मत बरोबर नाही, असे कौटिल्य म्हणतो. तो म्हणतो- ‘तह करावा वा युद्ध करून तहाचे बोलणे करावे अन् त्याच वेळी आसराही शोधावा.’

जनपद व दुर्ग यांवरील संकटांची तुलना करताना कौटिल्य म्हणतो की, ‘पर्वतदुर्ग व जलदुर्ग यांच्यात वस्ती नसते. कारण तिथे जनपदाचा अभाव असतो. जनपदातील लोकांमध्ये स्थैर्य, शौर्य, दक्षता व विपुल संख्या उपलब्ध असते. मात्र जनपद वा दुर्ग यांपैकी ज्या ठिकाणी लढवय्या सैन्याची वस्ती जास्त त्या ठिकाणचे संकट अधिक गंभीर.’

कोश व दुर्ग यांच्यावरील संकटांपैकी कोशावरील संकट गंभीर असे पिशुनाचे म्हणणे आहे. कारण दुर्गाची निर्मिती, त्याचे संरक्षण व दुरुस्ती, जनपद, मित्र, शत्रू यांचा निग्रह, सैन्यबळाचा वापर यांचा उगम कोशात असतो. कोशामुळे शत्रू दुर्गात फितुरी करू शकतात अन् संकटकाळी कोश घेऊन पळून जाता येते- दुर्ग घेऊन नाही!

मात्र हे म्हणणे चुकीचे असे कौटिल्याचे मत आहे : ‘दुर्गामुळे कोश व सैन्य सुरक्षित राहते. त्यांची उत्पत्ती दुर्गात होते. कोश, सैन्य, गुप्त युद्ध, आपल्याच पक्षातील (शिरजोर) लोकांचे दमन, बळाचा वापर, मदतीला येणाऱ्या सैन्याचा स्वीकार व परचक्र आणि रानटी टोळ्या यांना प्रतिकार या गोष्टी तर दुर्गावर अवलंबून आहेत. आणि दुर्ग नसेल तर कोश शत्रूच्या हाती जातो, कारण ज्यांना दुर्गाचे संरक्षण आहे, त्यांचा उच्छेद होत नाही असे दिसून येते.’

‘राष्ट्रातील मुख्य अधिकारी, सरहद्दीवरील दुर्गाचा मुख्य, रानटी टोळ्यांचा मुख्य वा बळाने शरण आणलेला मांडलिक यांपैकी एखाद्याचे बंड म्हणजे बाह्य़ अधिकाऱ्याचे बंड. यांचे हर प्रयत्नाने, हर उपायाने दमन करावे. अशा प्रकारची बंडे शत्रूच्या राज्यात उभी करावीत आणि आपल्या राज्यातील शमवावीत.’

‘युद्धकाळी पळून जावे लागल्यास जिथे आश्रय घेता येईल आणि जिथे राखीव सैन्य ठेवले असेल असा पर्वतदुर्ग किंवा वनदुर्ग पिछाडीला राहील याची काळजी घेऊन स्वत:ला अनुकूल भूमीवर युद्ध करावे.’

‘शत्रू जवळ येऊन ठेपला व दुर्गाचा आश्रय घेणे क्रमप्राप्त झाले, तर जनपदातील युद्धास तोंड देऊ  शकणाऱ्यांना दुर्गात आणावे अन् दुर्गातील सगळ्यांना दूरवर नेऊन ठेवावे. दुर्गाच्या सभोवतालीचा एक योजन अंतरापर्यंतचा गवत व लाकूडफाटा जाळून टाकावा. पिण्याच्या पाण्याचे तलाव दूषित करावे. बांध फोडून पाणी वाहून जाऊ  द्यावे. दुर्गाच्या भोवतालच्या प्रदेशात विहिरी, गुप्तपणे झाकलेल्या विहिरी व खड्डे अन् काटेरी तारा ठेवाव्यात.’

‘दुर्ग काबीज करताना, अगोदर शत्रूला दुर्बल करून मग दुर्गाला वेढा द्यावा. त्याच्या पेरण्या व उगवलेले धान्य यांचा नाश करावा. तसेच त्याची रसद पुरविणाऱ्या तुकडय़ांचा नायनाट करावा. रोगराई, दुष्काळ, संरक्षणसामग्रीचा ऱ्हास, सैन्य थकलेले असेल अशाच समयी शत्रूच्या दुर्गाला वेढा द्यावा. दुर्गास वेढा देऊन, शत्रूचा पाण्याचा साठा दूषित करावा. खंदक फोडावे वा मातीने भरून टाकावे. पक्ष्यांच्या शेपटास ज्वालाग्राही पदार्थ बांधून दुर्ग आगीच्या भक्ष्यस्थानी पाडण्याचा प्रयत्न करावा. अशा उपायांनी शत्रू त्रस्त झाला की, तीच दुर्गावर हल्ला चढवून काबीज करण्याची योग्य वेळ असे समजावे.’

‘फितुरीस प्रोत्साहन, गुप्तहेरांची योजना, शत्रूस हिकमतीने दुर्गाबाहेर काढणे, वेढा देणे व हल्ला करणे हे दुर्ग सर करण्याचे पाच उपाय आहेत.’ असे कौटिल्य म्हणतो.

‘दुर्ग, राष्ट्र व सैन्य यांच्यावरील मुख्य अधिकाऱ्याच्या सतत बदल्या कराव्यात.’ असेही तो धूर्त राजकारणी शेवटी म्हणून जातो!

कौटिल्याने रचलेल्या अर्थशास्त्राची एकूण पंधरा अधिकरणे आहेत. यांपैकी शेवटची दोन- गूढ प्रयोगांविषयी व शास्त्रीय विवेचनाची पद्धत – अधिकरणे वगळता राहिलेल्या तेरा अधिकरणांच्या १७६ प्रकरणांमध्ये एवढय़ा वेळा दुर्गाचा परोक्ष वा अपरोक्ष असा उल्लेख आला आहे. हा उल्लेख थेट आहे. संदर्भावरून घेतलेला नाही. यामधील प्रत्येक वाक्य हे जणू काळ्या दगडावरची रेघ असावी तसे जणू अढळ आहे. खणखणीत आहे. लखलखीत विचारधारेचे सामर्थ्य स्पष्ट करणारे आहे. परिणामी मौर्य साम्राज्याच्या काळात दुर्गाना किती अनन्यसाधारण महत्त्व होते हेच या प्रकारच्या उल्लेखांमधून अतिशय ठळकपणे आपल्या दृष्टोत्पत्तीस आल्याशिवाय राहात नाही. अन् मग आपसूकच कौटिल्याच्या असाधारण प्रज्ञेस मनोमनी दंडवत घातला जाणे हे क्रमप्राप्त ठरते!

– डॉ. मिलिंद पराडकर

discover.horizon@gmail.com

(लेखकाने ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ या विद्याशाखेत ‘दुर्गशास्त्र’ या विषयात पीएचडी केली आहे.)