29 January 2020

News Flash

वस्तू आणि वास्तू : स्वयंपाकघराची स्वच्छता

स्वयंपाक घर आवरणं एरवी किचकटच असतं. त्याला वेळही भरपूर लागतो.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

स्वयंपाक घराला लागून असलेल्या खिडक्या, गॅसच्या ओटय़ाच्या पुढे भिंतीत असलेल्या खिडक्या या वरचेवर साफ केल्या जात नाहीत. स्वयंपाक घर एरवी स्वच्छ राखलं जातं, पण त्याच्या आजूबाजूच्या खिडक्यांकडे फार लक्ष दिलं जात नाही. एक कारण असंही असतं यात की, या खिडक्या जरा अडचणीच्या जागी असतात. कुठेतरी चढून उभं राहिल्याशिवाय तिथपर्यंत नीट पोहोचता येत नाही. त्यामुळे, लांब झाडूने झाडून थोडीफार स्वच्छता केली जाते. घरातल्या इतर खिडक्या झाडूने वरचेवर साफ करून स्वच्छ होतात. परंतु स्वयंपाक घराची खिडकी मात्र तशी नसते.  इथेच फोडण्यांचे वास, स्वयंपाकाचा धूर वगैरे जाण्यासाठी अ‍ॅक्झॉस्ट पंखेदेखील असतात. ते आकाराने लहान असतात आणि उंचावर असतात. तेही हवे तसे स्वच्छ केले जात नाहीत. तिथे लागणारी जाळी जळमटी झाडूने निघतील एक वेळ; परंतु त्यांचं डिस्टग नीटसं होत नाही. त्यांच्यावर चिकट धुळीचे थरावर थर साचत जातात. घरातल्या इतर ठिकाणच्या खिडक्या जर स्लायिडगच्या असतील, तर त्यांच्या स्लाइड होणाऱ्या भागात तशीही पुष्कळ धूळ साचत असते. त्यात कचरादेखील अडकत असतो. स्वयंपाक घराच्या स्लायिडग खिडकीला फोडण्यांच्या धुराचा चिकटपणा हा आणखीन एक पलू जोडला जातो. आधीच सफाईसाठी जरा किचकट असलेल्या भागात ही वेगळीच भर पडते. स्वयंपाकाच्या खिडकीच्या काचा भाज्यांच्या उडालेल्या रेसिपीमुळे वेगवेगळ्या रंगांच्या होऊन जातात. गॅसच्या मागची जी भिंत असते, ती हमखास अशा रंगसंगतीने भरून गेलेली असते. न जाणो किती वर्षांच्या स्वयंपाकाच्या खाणाखुणा या खिडक्या मिरवत असतात!

गॅसच्या मागच्या बाजूला हमखास टाइल्स बसवलेल्या असतात आणि त्या टाइल्स जर खालीवर, मागे-पुढे बसवलेल्या असतील किंवा त्यांच्या सांध्यात जरा जास्त जागा सुटली असेल, तर त्यांच्या सांध्यांमध्ये हमखास घाण चिकटून राहते. तिथे कालांतराने घाणीचे थरावर थर साचत जातात. गॅसच्या शेगडीखाली देखील एक काळपट थर तयार होत जातो. तसाच चिकट थर त्याच्या मागच्या बाजूच्या सांध्यांमध्ये, कोपऱ्या कोपऱ्याने तयार होत जातो. टवके उडालेल्या टाइल्समध्ये जास्त प्रमाणात असे थर साचतात. गॅसच्या बटणांच्या आजूबाजूने, शेगडीच्या वरचेवर साफ न होणाऱ्या भागांत, खालच्या बाजूने असे अनेक विविध थर जमा होत जातात. ते नुसतेच पुसून, साबणाने धुवून निघत नाहीत. त्यांच्यासाठी वेळ काढूनच कोपऱ्या कोपऱ्याने हलक्या हाताने कोरून, ब्रशने घासून साफसफाई करावी लागते. त्यासाठी घरातलीच काही सोल्युशन्स, केमिकल्स देखील वापरता येतात. एक्सपायरी डेट उडालेले प्रवासातले हॅन्ड रब/ हॅन्ड सॅनिटायझर देखील या कामी वापरून टाकता येतात. एखाद्या फडक्यावर ते ओतून एखाद्या टोकदार वस्तूने, स्क्रू ड्रायव्हरने सर्व कोपऱ्यांमध्ये त्यांच्या आकारानुसार ती टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून अशी साफसफाई नीट होऊ शकते. त्यासाठी त्या त्या वस्तूंवर स्क्रॅचेस पडणार नाहीत, ही काळजी फक्त घ्यावी. निरनिराळ्या प्रकारच्या तारेच्या घासण्या बाजारात मिळतात. काही प्लॅस्टिक, नायलॉन आणि स्पंजच्या घासण्या असतात. या घासण्या कोणत्या वस्तूच्या सफाईसाठी वापराव्यात, याचा जरा अंदाज घ्यावा. त्या नीट वापरल्या नाहीत तर त्यांचेही स्क्रॅचेस भांडय़ांवर, वस्तूंवर पडतात. स्वयंपाक घरात वापरले जाणारे वेगवेगळे चॉपर्स, कटर्स ज्यांचे इतर पार्टस प्लॅस्टिकचे, धातूचे असतात, ते या घासण्यांनी स्वच्छ करायच्या नादात खिळखिळे होऊ शकतात. त्यावर ओरखडे पडू शकतात. त्या भेगांमध्ये कालांतराने आणखीन घाण साठत जाते. म्हणूनच साफसफाई कशी करणार आहोत आणि कशाने करणार आहोत, कुठे करणार आहोत, याचं भान ठेवावं लागतं. स्वयंपाक घराच्या खिडक्यांच्या कट्टयावरदेखील धुळीचे चिकट थर साठलेले असतात. जर तिथे टाइल्स असतील तर तारेच्या घासणीने हलक्या हाताने ते चटकन निघून जाऊ शकतात. कधी कधी कोरडी साफसफाईदेखील फायद्याची ठरते. नंतर ते ओल्या फडक्याने अथवा पाणी ओतून तो भाग धुवून घेता येतो. स्वयंपाक घराच्या खिडक्यांच्या जाळ्या देखील अशाच चिकट आणि मळकट झालेल्या असतात. त्यांच्या मटेरियलनुसार आणि त्या कशा बसविलेल्या आहेत त्यांच्या चौकटीत, त्यावर किती भार साफसफाईच्या कामात त्या पेलू शकतात, याचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या घासण्या, ब्रश आणि काही घरगुती सोल्युशन्स यांच्या साहाय्याने त्या स्वच्छ करता येतात. जरासं व्हिनेगर पाण्यात डायल्युट करून, त्यात सोडा आणि थोडासा साबण टाकूनदेखील साफसफाईसाठी चांगलं घरगुती सोल्युशन तयार होऊ शकतं. कुठे गरजेनुसार लिंबाच्या फोडींचा वापर करता येतो. केवळ ब्लेडने वरचेवर हलक्या हाताने घासून काम होऊन जाते. स्वच्छतेचे असे प्रयोग करत गेल्यावर आपला आपल्याला आपल्यापुरता एखादा फॉर्म्युला सापडून जातो. त्या अवजारांचं किट तयार होतं, ते हाताशी ठेवलं जातं. गरजेला चटकन मिळतंही.

स्वयंपाक घर आवरणं एरवी किचकटच असतं. त्याला वेळही भरपूर लागतो. तरीही, एकूणच घरातली आवरसावर, अतिरेकी वस्तूंचा साठा कमीत कमी करत जाणे, त्या वस्तू एक तर वापरात आणणे, वापरू शकणाऱ्या लोकांना देऊन टाकणे/ विकणे किंवा मोडीत काढणे, या सर्व गोष्टी मजेदारसुद्धा असू शकतात. स्वच्छता मोहिमेकडे कामातला बदल म्हणून आणि स्ट्रेस बस्टर म्हणून बघता आलं पाहिजे फक्त!

थोडी थोडी साफसफाई करून सुरुवात केली, तर त्याचे पर्क्‍सदेखील स्वच्छ आणि प्रसन्न घराच्या रूपात मिळतातच!

prachi333@hotmail.com

First Published on October 5, 2019 12:08 am

Web Title: kitchen cleaning kitchen windows abn 97
Next Stories
1 लता मंगेशकरांच्या वास्तव्याने सूरमयी झालेली वास्तू
2 प्याऊ सत्कार्याचा वारसा..
3 निवारा : ‘इको’ फ्रेंडली आणि ‘इगो’ फ्रेंडली वास्तुरचना
Just Now!
X