05 August 2020

News Flash

वस्तू आणि वास्तू : स्वयंपाकघराची झाडाझडती

गॅसवर बदाबद पाणी आणि भसाभस साबण न ओतता तो नीट स्वच्छ करता येणं ही एक कला असते. ते एक तंत्रसुद्धा असतं.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

स्वयंपाकघरात जितक्या प्रमाणात या वस्तू वाढतात, तितक्या प्रमाणात त्या काढून टाकल्या जात नाहीत. एरवी स्वयंपाकघराचं इंटेरिअर चकाचक केलेलं असतं. पण ज्यावर अन्न शिजवलं जातं, तो गॅस मात्र सर्व बाजूंनी अतिशय चिकट आणि काळपट पडलेला असतो. गॅसवर बदाबद पाणी आणि भसाभस साबण न ओतता तो नीट स्वच्छ करता येणं ही एक कला असते. ते एक तंत्रसुद्धा असतं.

भाग १

स्वयंपाकघरात जरा डोकावून बघू या. घरात माणसं किती आणि त्यांना लागणाऱ्या आणि आल्यागेल्याला लागणाऱ्या अशा तिथल्या वस्तू किती! मग ते ऑफिसला न्यायचे डबे असोत किंवा लहान मुलांची अशी वेगळी भांडी असोत. वयस्क मंडळींचे असे काही वेगळे ताटं-पेले असो किंवा पाहुण्यांसाठी लागतील म्हणत जमा करून ठेवलेल्या ठेवणीतल्या कपबशा, ताटं-पेले, डिनर सेट्स असो. नेहमीच्या वस्तू वरचेवर असतात. जास्तीच्या झालेल्या वस्तू ना टाकवत, ना त्यांचा सातत्याने वापर होतो. काही ना काही निमित्ताने नवीन वस्तू आणि त्यांचे सेट्स मात्र वाढतच जातात. घरात त्यांचा भरणा होत राहतो. स्वयंपाकघरात जितक्या प्रमाणात या वस्तू वाढतात, तितक्या प्रमाणात त्या काढून टाकल्या जात नाहीत. एरवी स्वयंपाकघराचं इंटेरिअर चकाचक केलेलं असतं. पण ज्यावर अन्न शिजवलं जातं, तो गॅस मात्र सर्व बाजूंनी अतिशय चिकट आणि काळपट पडलेला असतो. गॅसवर बदाबद पाणी आणि भसाभस साबण न ओतता तो नीट स्वच्छ करता येणं ही एक कला असते. ते एक तंत्रसुद्धा असतं. इतर वस्तू जशा सरसकट घासून काढल्या जातात, तसं ते करायचं नसतं, याचं भान अनेक स्त्री-पुरुषांना नसतं. म्हणूनच गॅसची केवळ वरवरची सफाई केली जाते. त्यातून एखादा पार्ट लूज होतो, तुटतो. गॅसचं लीक सुरू होऊ शकतं- जे अतिशय धोकादायक असू शकतं. जुन्या पद्धतीचा गॅस असेल तर त्याच्या फ्लेमच्या छिद्रांमधून गॅस बाहेर येण्यात घाणीचे अडथळे तयार होऊ शकतात. चालत्या कामात अशा साफसफाईच्या निमित्ताने खीळ बसू शकते. हेही एक कारण होऊन जातं, त्याची स्वच्छता न करायचं. गॅसच्या दर्शनी भागातच इतकी घाण असते, की तो खालून, पाठून वगैरे स्वच्छ करणं दूरचीच गोष्ट! पुन्हा अशा सर्व स्वयंपाकघरातील स्वच्छतेला एक लिंगभेददेखील अजूनही जोडला गेलेला आहे. स्वयंपाकघर स्वच्छ करणं ही जणू घरातल्या स्त्रियांची पिढीजात जबाबदारी होऊन गेलेली असते. स्वयंपाकघर अस्वच्छ असेल तर त्या घरातल्या बाईची परीक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. आपलं घर स्वयंपाकघरासकट स्वच्छ असणं ही एकूणच त्या घरातल्या सर्वाची जबाबदारी असते. घराची साफसफाई हा काही एकटय़ा स्त्रियांचा प्रांत नसतोच!

आजकाल लोक लागेल-लागेल करत इंडक्शन कुकरसुद्धा घेऊन ठेवतात. त्याचा पृष्ठभागदेखील असाच कळकट्ट झालेला असतो. स्वयंपाकघरातल्या खिडक्यांवर वर्षांनुवर्षांची धूळ साठलेली असते. आजकालची घरं मोठाली असतात, बाथरूम्स मोठाले असतात. परंतु ज्या स्वयंपाकघरात आपल्याला जास्तीतजास्त वेळ आपली पोटापाण्याची सोय पूर्ण करत घालवायचा असतो, ती स्वयंपाकघरं मात्र अतिशय छोटी असतात. दोन-तीन माणसं तिथे धडपणे उभी राहू शकत नाहीत, इतकी कमी जागा तिथे असते. एकेकदा साधा पंखासुद्धा स्वयंपाकघरात बसवलेला नसतो. पंखा असलाच तर तोही फोडण्यांच्या कृपेने चिकट धुळकट झालेला असतो. पूर्वीच्या अनेक घरांमध्ये एक्झॉस्ट पंखे नसत. हळूहळू नवीन बांधकामात त्यांची सोय केली जाऊ लागली. हे पंखेसुद्धा एकदा बसवून घेतले की त्यांची धूळ साफ करायला सहसा कोणीही जात नाही. तिथेही एक काळपट कोपरा तयार झालेला असतो. मायक्रोवेव्ह ओव्हनदेखील भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अगदी अलीकडेच ठाण मांडून बसू लागले आहेत. त्यांचे हॅन्डल्स, त्यांच्या आतलं वातावरण यात अनेक वर्ष काय काय शिजलं, काय काय ओसंडून वाहिलं, कसं-कसं, काय-काय सांडलं याच्या खुणा भूषवत असलेले दिसते. तीच कथा मिक्सर आणि फूड प्रोसेसर्सची. मुळात अनेक घरी मिक्सर्स आणि फूड प्रोसेसर्स यांच्या पूर्ण फंक्शन्सची माहिती करून घेतली जात नाही. ठरावीक अशी दोन-चारच फंक्शन्स जास्त करून वापरली जातात. त्यांची इतर नवी कोरी भांडी तर माळ्यावरच्या कोपऱ्यांमध्येच मोक्षाची वाट पाहत बसलेली असतात. मुद्दा असा की, ज्या उत्साहात फूड प्रोसेसर्स आणि ज्यूसर्स घेतले जातात, तितक्या उत्साहाने आणि सातत्याने त्यांचा वापर कालांतराने होत नाही. ती भांडी तशीच पडून राहतात घरात.

नेहमीच्या वापरातले साधेसे मिक्सर आणि त्याची भांडी बघू या! या भांडय़ांवरच नव्हे, तर जिथे मिक्सर ठेवलेला असतो, त्याच्या मागच्या फर्निचरवर, भिंतीवर काहीतरी सांडल्याचे डाग पडलेले असतात. अनेक घरांमध्ये हे चित्र दिसून येतं. अशी विशिष्ट प्रकारे चिकट झालेली, डागाळलेली जागा म्हणजे मिक्सरच असणार इथे, हे ताडण्यासाठी कोणत्या विशेष स्किलची गरज नसते. स्वयंपाकघरातली दिव्यांची बटणंदेखील विशेष प्रकारे कळकट, चिकट झालेली असतात. त्यांची स्वच्छता सहसा होत नाही. ती स्वच्छता करणं तसं जोखमीचंच काम असतं. शॉक न बसवून घेता, त्या बटनांमध्ये पाणी न जाऊ देता आणि त्यांचे प्लॅस्टिक- जे मुळातच फारसे चांगल्या दर्जाचे दणकट नसते, ते थेट तोडूनच न ठेवता त्यांची स्वच्छता करावी लागते. एरवी महागडी किचन वेअर सामग्री असणाऱ्या, भरपूर पैसे खर्च करून इंटेरिअर केलेल्या अनेक स्वयंपाकघरांमध्ये अशा अनेक बारीकसारीक गोष्टी तपासल्या तर वर्षांनुवर्षांची चिकट धूळ, डाग यांचे भरपूरच पुरावे सापडतील. एक चक्कर ‘डस्ट हंटिंग’साठी मारून बघू या, आपापल्या स्वयंपाकघरांमध्ये!

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2019 1:42 am

Web Title: kitchen interior prachi pathak abn 97
Next Stories
1 घर सजवताना : दरवाजा
2 शंभर टक्के लेखापरीक्षणाचे सहकार खात्याचे सूतोवाच
3 रेरा नियमात सुधारणा
Just Now!
X