|| वस्तू आणि वास्तू : प्राची पाठक

स्वयंपाकघराची झाडाझडती :- स्वयंपाकघरातील बदलते ट्रेंड्स, फॅन्सी ट्रॉलीज्, वापरात येणारी नवनवीन उपकरणे आणि बदलत जाणारी भांडी याबद्दल आपण माहिती करून घेतली. स्वयंपाकघरातील ट्रॉलीज्बद्दल अनेकांचे वेगवेगळे अनुभव असतात. त्या स्वच्छ राहाव्यात, त्यात आतमध्ये ओलावा राहू नये, कीटक, पाली तिथे जाऊन बसू नयेत, कुबट वास तिथून येऊ नयेत आणि मुख्य म्हणजे त्या प्रसन्न दिसाव्यात, हे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेच; पण सुटसुटीत ट्रॉलीज् या स्वयंपाकघराच्या अ‍ॅस्थेटिक सेन्समध्येही भर घालत असल्याने, त्यांची समोरील बाजूही तितकीच आकर्षक राखता आली पाहिजे. त्यावर पडणारे डाग स्वच्छ करत राहिले पाहिजेत. वापरात आल्यावर कालांतराने ट्रॉलीज्ला जे समोरील बाजूने कोटिंग केलेले असते, जुन्या पद्धतीत कुठे सनमायका लावलेला असतो, त्यांचे सांधे तुटले, कोपरे उडाले की तिथे पाणी, अन्नपदार्थ वगरे अडकून बसतात. ते वरचेवर दुरुस्त केलं नाही, तर त्यात फटी वाढत जातात. कधी काही जॉइंट्स केवळ फेव्हिकॉल, एखादं सोल्यूशन भरूनदेखील नीट होऊन जातात. कुठे एखादी छोटी टेप पुरेशी असते. त्याने ट्रॉलीज्चे पुढे वाढत जाणारे नुकसान एका मर्यादेत रोखता येते. मुळात, ही अतिशय लहानसहान अशी मेन्टेनन्सची कामे असतात. ती करायला सहसा कोणी कारागीर चटकन येत नाहीत. आले तर अवास्तव पसे मागतात आणि तरीही करायचे तसेच काम करून जातात. म्हणूनच, लहानमोठय़ा दुरुस्त्या, ट्रॉलीज्ची रचना नेमकी कशी आहे, त्यातील स्टीलच्या रॅक्स कशा काढून घ्यायच्या, त्या कशा प्रकारे आतमध्ये बसवलेल्या असतात, हे सर्व नीट पाहून ठेवावं, जेणेकरून लहानमोठी फिटिंग्ज् आपली आपल्याला वेळच्या वेळी करता येतील. त्यासाठी आवश्यक अशा टूल किट्स घरात असतील तर दुरुस्ती करण्यात खूपच मदत होते. ट्रॉलीज् पुढेमागे ओढून ओढून त्यांचे घर्षण होणारे पार्टस्देखील खराब होऊ शकतात. कधी त्यांचे लॉक निघून आले तर जुन्या पद्धतीच्या ट्रॉलीज् थेट हातातच येऊ शकतात किंवा पायावर पडू शकतात. त्यात सामान असल्याने पायावर जर ते कप्पे पडले, तर पायाला गंभीर इजा होऊ शकते. म्हणूनच, एरवी जिथे वरकरणी काही धोका जाणवत नाही, तिथेही अशा प्रकारे दक्ष राहावे लागते. घरातले ज्येष्ठ नागरिक जर त्या ट्रॉलीज् हाताळणार असतील, तर जरा जास्तच दक्ष राहिले पाहिजे. ट्रॉलीज्च्या, स्वयंपाकघरातल्या आणि इतरही फíनचरच्या कडासुद्धा खूप टोचणाऱ्या असतात. त्याने लहान मुलांना आणि आपल्यालादेखील इजा होऊ शकते. या कडांमुळे दुखापत होऊ नये म्हणून मशीन प्रेस केलेल्या ट्रॉलीज् जरा जास्त किंमत देऊन मिळतात. त्या शक्यतो बसवून घ्याव्यात. त्याने घाईघाईत ट्रॉलीज् हाताळताना वरचेवर काही इजा होत नाही.

ट्रॉलीज्चे समोरचे प्लाय आणि त्यांचा आतला सांगाडा काही स्क्रूंच्या साहाय्याने त्या-त्या जागी बसवलेला असतो. हे स्क्रूदेखील काम होत असताना दोन-चार जास्तीचे घेऊन ठेवावेत. ते एका पाकिटात किंवा छोटय़ा पिशवीत/ डबीत लेबल लावून नीट ठेवून द्यावेत. पुढेमागे एखादा स्क्रू पडला, हरवला तर यांचा वापर करता येतो. वेळच्या वेळी मेंटेनन्स झाला की ट्रॉलीज्चे पुढचे खिळखिळे होणे रोखता येते. ट्रॉलीज्ची जी दारं तिरपीतारपी झालेली असतात, तिथेही वेगळे स्क्रू असतात. या दारांना हाताळतानाच नीट काळजी घेतली, त्यावर भार दिला नाही, नीट वापर असेल, तर ट्रॉलीज्ची दारं अनेक काळ नीट राहतात. खालच्या फरशीवर ती घासली जात नाहीत. ट्रॉली कितीही फरशीच्या जवळ असली, तरीही लहानसहान स्वरूपाचा कचरा, अन्नपदार्थ त्याखाली जातात. स्वयंपाकघरात काही खाली बसून काम केलं तर त्यातून जो कचरा तयार होतो, तो झाडून लावताना कळत नकळत ट्रॉलीज् खाली लोटला जाऊ शकतो. म्हणूनच सर्वात खालची जी फिक्स केलेली ट्रॉली असते, त्यातील रॅक बाहेर काढून आतमध्येदेखील साफसफाई गरजेची असते. अनेकदा ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या चपटय़ा डिशेस, चमचे, सुरी वगरे या गॅपमध्ये पडून जातात. तेही अशा वेळी पाहून घेता येते. तिथे पॅकिंग टाकून ठेवावे किंवा जाळी असलेली ट्रॉली बसवून घेता येते.

सिलेंडरच्या पुढील भागाचा वापर व्हावा म्हणून मागे सिलेंडर आणि त्यापुढे एखादी लहानशी ट्रॉली अशीही रचना अनेक ठिकाणी दिसते. काही जण या भागात केवळ दार बसवतात. त्याला आतून कचऱ्याचा डबा ठेवायला जशी रिंग असते, तशी रिंग किंवा रॅक्स बसवता येतात. या भागात करायची ट्रॉली पूर्णपणे बाहेर येणारी छोटीशी ट्रॉली केली, तर साफसफाईच्या आणि दुरुस्तीच्या दृष्टीने ते अतिशय सोपं जातं. खरं तर जुन्या लाकडी ट्रॉलीज् ते आता वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅडव्हान्स ट्रॉलीज् असेही अनेक टप्पे ट्रॉलीज्च्या रचनेत, सामानात पार पडलेले दिसतात. अधिकाधिक युझरफ्रेंडली ट्रॉलीज् बसवून घेता येतात. फक्त आपण जे काही बसवून घेत आहोत, जे आधीच बसवलं आहे, त्याकडे स्वच्छतेच्या दृष्टीनेदेखील बघावं आणि लहानसहान कामं वेळीच करून टाकावीत. म्हणजे, ट्रॉलीज्चा दिमाख टिकून राहतो.

तुमचेही अनुभव, प्रयोग जरूर कळवा आम्हाला! prachi333@hotmail.com