खूप वर्षांपासून कोनार्कचे सूर्यमंदिर पाहण्याची इच्छा होती. पण योग येत नव्हता. मात्र गेल्या महिन्यात अगदी ध्यानीमनी नसतानाच तिथे जाण्याचा योग आला. अजिंठा आणि वेरूळ लेण्यात गाइड म्हणून काम करत असल्यामुळे भारतीय शिल्पकलेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाल्याने कोनार्कचे सूर्यमंदिर पाहण्यासाठी जीव खऱ्या अर्थाने आसुसलेला होताच. आणि म्हणून जेव्हा ‘ब्लॅक पॅगोडा’ या नावाने जगप्रसिद्ध असलेले हे मंदिर पाहायला गेले तेव्हा  या वास्तूच्या भव्यतेमुळे दडपून गेल्यासारखे झाले. भारतीय स्थापत्यकलेचे सौंदर्य आणि महानता दर्शवणाऱ्या एकापेक्षा एक सरस अशा अनेक कलाकृती पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. पण पडझड झालेल्या अवस्थेत असूनही कोनार्कच्या सूर्यमंदिराच्या अनन्यसाधारण वास्तुकलाविष्काराकडे पाहून अक्षरश: दिपून गेल्यासारखे झाले. खरे तर भव्यदिव्य, उत्कृष्ट हे सारे शब्द या वास्तूचे वर्णन करण्यासाठी तोकडे वाटतात. एक वास्तू म्हणून हे सूर्यमंदिर भव्यतम आहेच, पण स्थापत्यकलेचा एक अत्युकृष्ट नमुना म्हणूनही हे मंदिर अप्रतिम आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिरावर असणारी डोळे खिळवून ठेवणारी अपूर्व अशी शिल्पकला पाहून आपण स्तंभितच होऊन जातो.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ओरिसा राज्यातील एका छोटय़ाशा खेडय़ात समुद्रकिनाऱ्यापासून केवळ तीन कि. मी. अंतरावर वाळूच्या विस्तीर्ण पट्टय़ावर हे मंदिर आजही ज्या दिमाखात उभे आहे ते पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते.  कोनार्कच्या मुख्य मंदिराची पडझड साधारणत: दोन शतकांपूर्वीच झालेली आहे. परंतु ओरिया स्थापत्य शैलीनुसार बांधण्यात येणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्य गर्भगृहापुढे असणारे सभागृह ज्याला सामान्यत: ‘जगमोहना’ असेही म्हटले जाते, तेच आज आपल्याला कोनार्क येथे पाहायला मिळते. या सभागृहाची वास्तू पाहूनच आपण एवढे चकित होऊन जातो की, मुख्य देवळाची इमारत किती उंच आणि भव्य असेल याची केवळ कल्पनाच आपल्याला मनोमन स्तंभित करून जाते. आज घडीला कोनार्कच्या सूर्यमंदिराचे जे शेष अवशेष आपण पाहतो त्यामध्ये सभागृहाची संपूर्ण वास्तू, तिचे भव्य आकारमान, अत्यंत प्रमाणबद्ध स्थापत्य, त्याच्या जोडीला संपूर्ण बाह्य़ अंगावर असणारे अप्रतिम कोरीवकाम हे पाहताना स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचा अनुपम संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. एखाद्या सुवर्णकाराने सुंदर दागिना घडविताना अत्यंत बारकाईने कलाकुसर करावी त्याप्रमाणे अप्रतिम असे शिल्पकाम, उत्कला वास्तुशैलीनुसार उभारण्यात आलेल्या या भव्यदिव्य मंदिरावर आपल्याला पाहायला मिळते.
 भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, राजा-राणी मंदिर, यमेश्वर मंदिर ही व अशी अनेक सुंदर मंदिरे निर्माण केली गेली. याच प्रवाहात तेराव्या शतकात बांधले गेलेले कोनार्कचे सूर्यमंदिर आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसते. कारण केवळ स्थापत्यशैलीच नाही तर अत्यंत उच्चदर्जाची शिल्पकला आणि अभूतपूर्व कल्पनाशक्तीचा उच्चतम आविष्कार यांचा एक सुंदर मिलाफ कोनार्कच्या वास्तुरचनेत पाहायला मिळतो. आपल्याला इथे असेही म्हणता येईल की, सातव्या शतकात सुरू झालेल्या ओरिया स्थापत्य कलाशैलीच्या परंपरेत, शतकानुशतके संचयित होत गेलेल्या कलानुभवाचा उत्कृष्ट परिपाक म्हणजेच तेराव्या शतकात निर्माण झालेले कोनार्कचे सूर्यमंदिर होय.
आज हे मंदिर ज्या अवस्थेत आहे ते पाहूनही आपण आश्चर्यचकित होतो. कारण स्थापत्यशैली, वास्तुकला व शिल्पकला यांचे इतके प्रमाणबद्ध वास्तवरूप नजरेसमोर पाहून भोवंडून जायलाच होते. मग ज्या कुणा स्थपतीने या वास्तूच्या निर्मितीपूर्व त्याची कल्पना केली होती त्याची प्रतिभा आणि कल्पनाशक्ती किती श्रेष्ठ दर्जाची असावी याची केवळ कल्पनाच केलेली बरी! सूर्यमंदिराच्या संपूर्ण वास्तूचे स्थापत्य हे एका भव्य आकाराच्या रथाप्रमाणे रचलेले आहे. या रथाला चोवीस चाकं असून सात घोडे हा रथ ओढताहेत अशी प्रमुख वास्तुरचना आहे. हे संपूर्ण मंदिर म्हणजेच ‘सहस्ररश्मी भगवान सूर्यदेव आपल्या सात घोडय़ांच्या रथामध्ये बसून आकाशाच्या पाश्र्वभूमीवर उदयास्ताच्या दिवसभराच्या प्रवासाला निघाले आहेत.’ या पौराणिक कथेला सौंदर्याविष्कार आहे असेच म्हणता येईल. ज्या उंच चौथऱ्यावर हा भव्यदिव्य मंदिररूपी रथ उभा आहे त्या चौथऱ्याच्या भिंतीवर अपूर्व अशी शिल्पकला पाहायला मिळते. या चौथऱ्याच्या उत्तर-दक्षिण आणि पश्चिम बाजूंच्या भिंतींवर तसेच, पूर्वेकडील पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर मिळून बारा जोडय़ा चक्रं कोरलेली आहेत. वर्षांच्या बारा महिन्यांचे प्रतीकात्मक रूप म्हणून या बारा जोडय़ा (चोवीस चक्र) चाकं अप्रतिम कलाकुसरीने परिपूर्ण रूपात कोरलेली आहेत. चक्रांच्या आतमध्ये आठ नाजूक तर आठ जाड आकाराच्या आऱ्या कोरलेल्या आहेत. हे आठ- आठ विभाग म्हणजे दिवसाचे आणि रात्रीचे आठ प्रहर आहेत. सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात अश्व म्हणजे आठवडय़ाचे सात दिवस असून, वर्षांचे बारा महिने आणि सातही दिवस, अष्टौप्रहर सहस्ररश्मी आपल्या रथातून आकाशाच्या निळाईमध्ये संचार करीत असतो. कोनार्क मंदिरात असणारी रथचक्रे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट परमबिंदू आहे. अगदी खऱ्याखुऱ्या रथचक्राप्रमाणे वाटणाऱ्या या चाकांना जोडणारी आख (अ‍ॅक्सल) आणि त्यावर बसवलेली कानखीळसुद्धा कोरण्यात आलेली आहे. अर्थातच सूर्यमंदिराचा रथाशी असलेला संबंध आणि साम्य घोडे आणि रथाची चाकं इथपर्यंतच आहे. बाकी पूर्ण मंदिराचे स्थापत्य मात्र ओरिसामधील ठरावीक पद्धतीचे आहे.
सूर्यमंदिराचे तीन प्रमुख विभाग आहेत. ओरिया पद्धतीच्या स्थापत्य शैलीनुसार इतर अनेक मंदिरांमध्ये असते त्याप्रमाणे मुख्य मंदिर किंवा रेखा देऊळ असून, ज्यामध्ये गर्भगृह असते. या मुख्य रेखा देवळामध्ये सूर्यदेवतेची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. रेखा देवळाच्या पुढे असते ते भद्र देऊळ किंवा सभागृह किंवा पिधा देऊळ. या सभागृहाला जगमोहना असेही म्हणतात. जगमोहनाच्या वास्तूला मंदिराचे प्रवेशद्वार असते. आज कोणार्क मंदिराच्या ठिकाणी या जगमोहनाचीच भव्य इमारत उभी आहे. या जगमोहनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. सूर्यमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे. त्याच्या जोडीला उत्तर आणि दक्षिण दिशेसही प्रचंड आकाराची प्रवेशद्वारं (आता ही सर्व प्रवेशद्वारं बंद करण्यात आलेली आहेत.) असून त्या सर्व द्वारांच्या द्वारशाखा अप्रतिम कोरीव कामाने नटलेल्या आहेत. रेखा देवळाची संपूर्ण इमारत आता ढासळलेली आहे. आज पूर्णावस्थेत उभ्या असणाऱ्या जगमोहनाच्या पश्चिम बाजूस या कोसळलेल्या देवळाच्या दगडमातीचा ढीग तसाच पडून आहे. त्या काळातही मंदिराच्या स्थापत्यकामात मोठमोठय़ा लोखंडी तुळया वापरण्यात आल्या होत्या. या सूर्यमंदिराशी अनेक दंतकथा जडलेल्या आहेत. असेही म्हटले जाते की, मंदिराच्या शिखरावर, टोकाशी खूप मोठा लोहचुंबक बसवलेला होता. मंदिराच्या शिखरबांधणीसाठी वापरण्यात आलेले लोखंडीबार आणि जोडणाऱ्या कडय़ा यांना या चुंबकामळे घट्ट खेचले जात होते व त्यामुळे इतके उंच असूनही मंदिर स्थिर उभे होते. पण या शक्तिशाली चुंबकामुळे समुद्रात व्यापारासाठी येणारी जहाजे कोनार्कच्या किनाऱ्याकडे खेचली जात असत. त्यामुळे कधी तरी दर्यावर्दी लोकांनी या मंदिरात असलेला चुंबक काढून टाकला आणि त्यामुळेच मुख्य मंदिर कोसळले. ही वदंताही अनेक दंतकथांपैकी एक म्हणावी लागेल. मात्र मंदिराच्या आवारात, कोसळलेल्या मंदिरातून बाजूला काढलेल्या लोखंडी तुळया पाहायला मिळतात हेही खरेच.!
आज उभ्या असलेल्या भद्र देवळाची म्हणजेच जगमोहनाची उंची ३९ मीटर आहे. यावरूनच त्याच्या पाठीमागे असलेल्या रेखादेवळाची उंची पुराणवास्तू संशोधकांच्या मते, (आर्कियॉलॉजिस्ट) ६१ मीटर तरी असावी. आज एकोणचाळीस मीटर उंचीचे भद्रदेऊळ पाहून आपण इतके दिपून जातो तर पूर्णावस्थेत उभे असताना, मुख्य देऊळ आणि त्याला जोडून असणारे भद्रदेऊळ व नृत्यमंडप या सर्व वास्तूंना एकत्रितपणे पाहताना केवढा आनंद मिळाला असता याची कल्पनाच केलेली बरी. भद्रमंदिराच्या समोर असणारा नृत्यमंडप किंवा भोगमंडप मात्र आज छताविनाच आहे. या सभागृहाच्या आत येणारे भक्तजन सूर्यदेवाच्या दर्शनासाठी जमा होत असत. याला पिधा देऊळ असेही म्हटले जाते. ज्या चौथऱ्यावर रेखा देऊळ आणि भद्र देऊळ उभे आहेत तो चौथरा पंचकोनी आकारात आहे. तसेच ही दोन्ही देवळेही बाहेरून पंचरथ आकारात बांधण्यात आली आहेत. मात्र अंतर्भागात दोन्ही वास्तू चौकोनी आकारात आहेत. सूर्यमंदिराच्या बाह्यभिंती या ओरिया वास्तुशैलीनुसार अनेक कोनांत बांधलेल्या आहेत. या प्रकारे एकापेक्षा अधिक कोनांत बांधलेल्या भिंतींना (प्रोजेक्शन) रथ किंवा पागा असे म्हणतात. यातील मधल्या कोनाला राहा म्हणतात. पंचरथाच्या आकारात अनेक (प्रोजेक्शन) रथ किंवा पागा, कनिका यांच्या साहाय्याने उभारलेल्या मंदिराच्या भिंतींना प्रकाशयोजनेचा अत्याधिक फायदा होतोच. शिवाय एकाच बाजूवर अनेक लहानमोठय़ा भिंतींवर अनेक शिल्पाकृती सजवण्यासही फायदा मिळतो. एकच बाजू अनेक भिंतींमधून शिल्पांकित करण्यासही मदत होते.
रेखा देऊळ आणि भद्रदेऊळ यांचे ओरिया वास्तुकला शास्त्रानुसार चार भागांत विभाजन केले जाते. तळापासून सुरू करता, पहिले पिश्ट किंवा पाया म्हणजेच चौथरा, दुसरा विभाग म्हणजे वाडा, त्यावर येणारा विभाग म्हणजे गंडी आणि शिखराचा शेवटचा भाग म्हणजेच मस्तक. या वास्तूचा आडवा छेद घेतला असता वाडा आणि गंडी हे अंतर्भागात चौरस असतात तर मस्तक हे नेहमीच गोलाकार असते. मंदिराच्या वास्तूचे चार भाग हे मनुष्य देहाच्या चार अंगांशी मिळतेजुळते मानून त्यांचे नामकरण त्यानुसार केलेले आहे.
ओरिया वास्तुकलाशास्त्राचे वैशिष्टय़ सांगावयाचे म्हणजे, रेखा देऊळ हे पुरुष-प्रतीक असून, पिधा देऊळ (जगमोहन) स्त्री-प्रतीक आहे असे मानले जाते. पिश्ट (पाया) आणि वाडा हे भाग दोन्ही मंदिरांच्या बाबतीत जवळजवळ सारखेच असतात. मात्र गंडी भागात दोन्ही वास्तूंच्या स्थापत्यशैलीमध्ये फरक असतो. सूर्यमंदिरात रेखा देवळाचा गंडी भाग गोलाकार पद्धतीने उंच होत गेला होता. परंतु भद्रा देवळाच्या बाबतीत मात्र पिधा पद्धतीचे (पिरॅमिड अथवा शंकूच्या आकाराचे छत असलेली वास्तू) छत आहे.एकमेकाला लागून बांधल्या जाणाऱ्या या दोन्ही वास्तूंच्या उभारणीमध्ये अत्यंत कौशल्यपूर्ण समन्वय असल्याशिवाय संपूर्ण वास्तूला पूर्णत्वाचा आकार मिळणे अशक्यच असते. मात्र सूर्यमंदिराच्या अतिभव्य वास्तूच्या प्रत्येक थराच्या बांधणीमध्ये आणि त्यावरील शिल्पकामामध्ये इतकी सुंदर परिपूर्णता आहे की, आपण भव्यता आणि हुबेहूब समानता या दोन्ही मुद्दय़ांवर अप्रतिम कामगिरी असणाऱ्या  सूर्यमंदिराच्या प्रेमातच पडतो. एकावर एक चिरे ठेवून केलेले हे भव्य बांधकाम इतक्या कुशलतेने आणि प्रमाणबद्ध पद्धतीने केलेले आहे की, आज इतक्या वर्षांनंतरही दोन दगडी चिऱ्यांमध्ये वापरण्यात आलेले माध्यम काय आहे हे कळूनही येत नाही.
 गंडीपासूनच मुख्य देऊळ आणि भद्र देऊळ यातील फरक लक्षात येतो. हा फरक पुढे मस्तकबांधणीतही सुस्पष्ट होतो. श्री, बेकी, आमलक पद्धतीचे गोलाकार कुशन, त्यावर घंटीच्या आकाराचे दगडी चिरे, कधी कधी आयुधे, कधी राज्याचे राजप्रतीक यांना स्थान दिले जाते. सर्वात शेवटी सोने, चांदी, रुपे अथवा तांबे या धातूंचा कलश आणि राज्याचा पद्मध्वज यांचे स्थान असते. शिखराचा कळस आणि त्यावर असणारा ध्वज अथवा राज्यप्रतीक यांचे स्थापत्यसुद्धा अत्यंत प्रमाणबद्ध रीतीने केले जाते. कोनार्क मंदिराच्या भद्र देवळाच्या शिखराकडे पाहताच आपल्याला या वास्तूची निर्मिती करणाऱ्या ओरिया कलाकारांनी किती उच्चतम निर्मिती मूल्यांचा वापर केलेला आहे हे लक्षात येते.
भोगमंडप अथव नटमंडपम् किंवा नृत्यमंडप- मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारासमोरच नृत्यमंडप किंवा भोगमंडपाची वास्तू आहे. अनेक स्तंभांच्या विशिष्ट रचनेतून या सुरेख मंडपाची रचना करण्यात आली आहे. या नृत्यमंडपावरील छत कधी कोसळले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र मंदिर परिसराची साफसफाई करताना मंडपाच्या जवळच अतिशय सुंदर कोरीवकाम केलेला गोल आकाराचा दगड सापडला होता. तो बहुधा नृत्यमंडपाच्या छतावर असणाऱ्या शिरोभागाचा दगड असावा असे संशोधकांना वाटते. हा नृत्यमंडपसुद्धा एका उंच चौथऱ्यावर बांधलेला आहे. या मंडपाचे छतही पिधा पद्धतीचे असावे. या चौथऱ्याच्या चारही बाजूंस पायऱ्या आहेत. चौथऱ्याच्या सर्व भिंतींवर अप्रतिम अशी शिल्पकला पाहायला मिळते. या भिंतींवर असणाऱ्या बहुतेक शिल्पाकृती अत्यंत देखण्या स्त्रियांच्या आहेत. स्त्री-प्रतिमा, नृत्यांगना, वादक, विविध पेहरावातील पुरुष-प्रतिमा, अर्धस्तंभ, लहान आणि मोठय़ा आकाराचे देवकोष्ठ, या कोष्ठांमध्ये कोरण्यात आलेल्या विविध प्रतिमा, अष्टदिक् पाल अशा व इतरही अनेक प्रकारच्या मूर्ती पाहून मन थक्क होऊन जाते.
स्त्री-प्रतिमांमध्येही खूप वैविध्य आहे. सुंदर स्त्रियांचे मनमोहक भावविभ्रम, वेगवेगळ्या मोहक मुद्रा, अंगविक्षेप, विविध केशरचना, अलंकारांतील वैविध्य, हस्तमुद्रा, पदन्यास तथा नृत्यमुद्रा आणि अगणित प्रकारची तलवाद्ये, तंतुवाद्ये..! हे असं सर्व काही आपल्याला भोगमंडपाच्या भिंतींवर पाहायला मिळतं. दागदागिन्यांनी नटलेल्या अभिसारिका, नृत्यांगना, राजस्त्रिया यांच्याबरोबर केशवपन केलेल्या साध्वी स्त्रियाही शिल्पप्रतिमांच्या रूपांमध्ये आपण पाहतो.  काही पुरुषप्रतिमा इतक्या वेगळ्या आहेत की, त्यांचा पेहराव पाहून वाटते ही मंडळी परकीय दर्यावर्दी लोक  आहेत. त्यांच्या केसांची रचना, चेहऱ्यावरील हावभाव, हसणे यांतील वैविध्य पाहून चकित व्हायला होते. नृत्यसाधनेशी संबंधित हरतऱ्हेची वाद्यं इथे आहेत. नृत्यशैली आणि नृत्यमुद्रा यांमध्येही वैविध्य आहे. उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशेला असणाऱ्या पायऱ्यांना लागून भव्य आकाराचे साजशृंगाराने नटलेले, अप्रतिम कोरीवकाम असलेले हत्तींचे शिल्प, युद्धासाठी सजलेले अश्व, आणि खाली बसलेल्या हत्तीवर पंजा ठेवून गुरकावणारे सिंह अशी मोठय़ा आकाराची शिल्पे भोगमंडपाच्या तीनही बाजूस होती. मात्र ही सर्व शिल्पे मूळ जागेपासून निखळली आहेत. आता हत्ती आणि घोडे यांना उत्तर आणि दक्षिण दिशेला नव्याने बांधलेल्या चौथऱ्यांवर पुन:प्रस्थापित केले आहे. मात्र हत्तीवर पाय रोवून गुरकावणाऱ्या सिहांच्या प्रतिमा भोगमंडपाच्या पूर्वदिशेच्या पायऱ्यांजवळ नव्याने मांडलेल्या आहेत. भोगमंडपावर जमा झालेले पावसाचे पाणी खाली उतरण्यासाठी ज्या पन्हाळी आहेत त्यांमध्येसुद्धा कल्पकता आढळते.
कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या बहिर्भागावर अगदी तळाच्या पट्टिकांपासून ते शिखराच्या गंडीपर्यंत अप्रतिम शिल्पकाम केलेले पाहायला मिळते. या शिल्पकलेमध्ये इतके वैविध्य आहे की, पाहणारा थक्क होऊन जातो. अगदी नाजूक कलाकुसरीपासून ते भव्य आकाराच्या कलोसल मूर्तीपर्यंत सर्व काही या ठिकाणी आहे. हे सर्व शिल्पकाम अचेतन दगडाला चैतन्य देऊन संपूर्ण वास्तूला एक दैवी परिमाण देऊन जाते. या कलेचे वैशिष्टय़ म्हणजे जरी या प्रत्येक शिल्पकृतींमध्ये वैविध्य असले तरी त्यांचे वेगळेपण संपूर्ण वास्तूच्या देखणेपणात भर टाकते. वास्तुकला आणि शिल्पकला या दोन्ही कला आपापल्या परिपूर्ण सौंदर्यानिशी एकमेकींच्या सौंदर्यात इतकी भर टाकतात की, कोणार्कचे हे सूर्यमंदिर उत्कृष्टतेच्या परमोच्च बिंदूशी पोहोचते. शिल्पसौंदर्यामुळे वास्तू सुंदर दिसते आहे की स्थापत्यशैलीमुळे शिल्पकला उठून दिसते आहे, याचा विचार करण्यात पाहणारा मग्न होऊन जातो. सर्व प्रकारची शिल्पकला या मंदिरामध्ये पाहायला मिळते आणि ती इतकी अजोड आहे की त्याची अनुभूती घेताना कलाकाराच्या अभिव्यक्तीचे आणि कल्पनाशैलीचे श्रेष्ठत्व पाहणाऱ्याच्या मनावर गारुड करत राहते. या ठिकाणी देवदेवतांच्या मूर्ती आहेत, सौंदर्यवती, तरुण कन्यका, वाद्य वाजविणारे स्त्री-पुरुष, धार्मिक मूर्ती, पशू-पक्षी, पाणपक्षी, तसेच पुराणात भेटणाऱ्या मायथॉलॉजिकल व्यक्तिरेखा आहेत. या सर्वाच्या जोडीला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी  अगणित कामशिल्पे सूर्यमंदिराच्या भिंतीवर मोठय़ा संख्येने कोरलेली आहेत. कामजीवनाचे संयत आणि सुखदर्शक मर्म सांगणारी मिथुन-शिल्पं भारतातील अनेक मंदिरांमधील भिंतीवर पाहायला मिळतात. मात्र कोणार्कच्या मंदिराच्या भिंतींवर कोरण्यात आलेली कामशिल्पे अत्यंत भडक आणि स्त्री-पुरुष शरीरसंबंधाविषयीच्या अत्यंत मुक्त आणि असांस्कृतीय पद्धतींना ठळकपणे दर्शविणारी आहेत.
अजोड शिल्पकला आणि अप्रतिम स्थापत्यकला यांनी अजरामर झालेले कोनार्कचे सूर्यमंदिर पाहिल्यानंतर अशी कारागिरी पुन: होणे संभव नाही, हे मनात आल्यावाचून राहत नाही.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा