21 October 2020

News Flash

घर शोधण्याच्या खाणाखुणा

एखाद्याचं घर शोधायचं असल्यास त्या घराच्या सभोवतालच्या खाणाखुणा फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच घर शोधण्याच्या खाणाखुणांविषयी..

| June 14, 2014 01:01 am

एखाद्याचं घर शोधायचं असल्यास त्या घराच्या सभोवतालच्या खाणाखुणा फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच घर शोधण्याच्या खाणाखुणांविषयी…

एकदा काही कारणांमुळे मला ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांच्या घरी जायचे होते. तेव्हा मी त्यांना फोन करून त्यांच्या घराचा पत्ता विचारला. त्यांनी घराचा पत्ता सांगितला. मी त्यांना घर पटकन सापडण्याच्या काही खास खाणाखुणा आहेत का, असं विचारता त्या म्हणाल्या, ‘‘हो, माझ्या घरासमोर पांढऱ्या चाफ्याचे झाड आहे.’’ घर सापडण्यासाठीची ही खास सुगंधी खूण ऐकताच मला एकदम आनंद झाला नि निमिषार्धात चाफ्याचं झाड, त्याची इतरत्र पसरलेली फुलं सारं काही माझ्या डोळ्यासमोर आलं आणि माझ्याही नकळत मी त्यांना म्हणाले, ‘‘अय्या! घर सापडावं म्हणून किती मस्त खूण आहे ही तुमच्या दारी.’’ तेव्हा उषाताईही अगदी अभिमानाने म्हणाल्या, ‘‘हो तर, खूप मस्त खूण आहे.’’
नंतर मी त्यांच्याकडे गेले तेव्हा उषाताईंचे घर शोधताना तो पांढरा चाफाच आधी शोधला आणि मग त्याच्याजवळील इमारतीचं नाव केवळ उपचार म्हणून बघितलं. पण मग तेव्हा अशी एक गंमत मला आढळली की, दारासमोरचा चाफा आणि इमारतीचा रंग पांढराच आहे आणि पांढरा रंग तर निरागसता आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्त्विकता याच रंगातून प्रतीत होते. त्यामुळे तिकडे राहणाऱ्या उषाताई तर मला पांढऱ्या रंगाप्रमाणे सात्त्विक, सोज्ज्वळ वाटतातच. त्या पांढऱ्या रंगाच्या त्रिवेणी संगमाने माझं मन प्रसन्न झालं. वाटलं, किती सार्थ खूण आहे ही एका कवयित्रीच्या घराची. हो ना!
बऱ्याचदा कुणाचं घर शोधायचं म्हटलं किंवा पत्ता शोधायचा असला तर पटकन सापडत नाही. येणाऱ्याजाणाऱ्या व्यक्तीला विचारावं तर आपल्याला बऱ्याच वेळा हे उत्तर ऐकायला मिळतं की, ‘मीपण इकडे नवीनच आहे.’ नाहीतर पत्ता सांगितला तर म्हणतात, ‘अरे, ये जगह तो बहोत नजदीक है’ आणि आपण चालतोय चालतोय तरी ती वास्तू काही दृष्टिक्षेपात येत नाही. असं एकदादोनदा झालं आणि तेव्हापासून मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली की, एकतर फोन करून त्या व्यक्तीलाच विचारायचं. किंवा त्या रस्त्यावरील किराणा दुकानदाराला विचारायचं. कारण मग आपलं काम एकदम फत्ते होऊन जातं. कारण होम डिलिव्हरी देता देता त्याला आजूबाजूच्या इमारतींचे पत्ते, नावं पाठ असतात. ते बरोब्बर तुम्हाला योग्य खाणाखुणा सांगतात. लॅण्डमार्क अर्थात खाणाखुणा असतील तरच घर शोधण्याचं काम खूप सोप्पं होऊन जातं. नाहीतर कर्मकठीण काम होऊन बसतं. जेव्हा कधी एखाद्या इमारतीवर असलेलं नाव आपल्याला शोधूनही सापडत नाही तेव्हा मात्र त्या खाणाखुणाच तर कामी येतात. आणि मग त्यातून चाफ्याच्या झाडासारखी एखादी मन प्रसन्न करणारी खूण सापडली की दिवसही सुगंधित होऊन जातो.
अर्थात बऱ्याचदा त्या घराच्या खाणाखुणा ठरवणं आपल्या हातात नसतं. म्हणजे कधी इतकी छान खुणेची आठवण गवसते तर कधी कधी आपली फजितीही होते. मला आठवतंय, माझ्या लहानपणी आम्ही लेनचं नाव सांगितलं आणि कोणाला पटकन ती लेन लक्षात आली नाही, त्यांनी काही खाणाखुणा विचारल्या तर आम्ही सांगायचो, ‘अहो ते पेठे हायस्कूल नाही का? त्याच्याच मागच्या गल्लीत आम्ही राहतो.’ आणि असं म्हटलं तर लगेच ती व्यक्ती हसून म्हणायची, ‘अच्छा, त्या कचराकुंडीजवळ राहता का तुम्ही?’ आता त्या कचराकुंडीपासून आमचा वाडा बरोबर पाचव्या नंबरला होता. पण नाही, ती कचराकुंडीच लोकांना पटकन आठवायची. तेव्हा वैतागून जायला व्हायचं. नको वाटायची ती खूण ऐकणं. पण आता हे सगळं आठवलं की हसू येतं, मज्जा वाटते.
पुढे लग्न झालं, सासरी आले. मुंबईच्या आमच्या घराच्या गल्लीच्या तोंडाशीच रस्ते का माल सस्ते में विकणारे चप्पलवाले बसतात. आणि त्या चपला खरेदी करण्यासाठी खूप गर्दी होते. म्हणजे अगदी सीरियल्समध्ये काम करणारेसुद्धा आमच्या हिलरोड आणि लिंकिंग रोडवर खरेदी करायला येतात. आणि मग या गर्दीमुळे लोकांना या गर्दीच्या पलीकडे एक लेन आहे हे अगदी आवर्जून सांगावं लागतं. आणि म्हणूनच लोकांना घराचा पत्ता शोधणं सोपं जावं म्हणून आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही आमच्या घराची खूण ‘बाटा’च्या गल्लीत सांगायचो, पण आता बाटाचे शोरूम जाऊन चक्क तिकडे एक कपडय़ाचे दुकान झालंय, पण त्यामुळे आमची फार पंचाईत झाली. मुंबईची प्रगती बघता वाटतं आपण आज एक नाव सांगितलं आणि उद्या त्याच्या जागी दुसरं दुकान उभं राहिलं म्हणजे येणारा बिचारा पत्ता शोधून शोधून हैराण होऊन जाईल. तशी आमच्या घराला अजून एक वेगळी खूण आहे, ती म्हणजे आमच्या घराच्या शेजारी रस्ता बंद अर्थात डेड एण्ड! म्हणजे जिकडे रस्ताच संपतो ना तिकडेच माझं घर आहे. आणि मग घर शोधत येणाऱ्याची काळजीही संपते. कारण आता त्याला घर सापडण्याची पक्की खूण मिळालेली असते.
मला माझ्या एका मैत्रिणीचं घर आठवलं. तिचं घर तर अशा रस्त्यावर आहे, तिकडे फक्त तिचीच सोसायटी आकाशाशी स्पर्धा करते. त्यामुळे ती दिमाखाने सांगते, त्या रस्त्यावरील ती एकमेव उंच बिल्डिंग आहे बरं! तर एका मैत्रिणीचं घर अगदी शाळेजवळ आहे, त्यामुळे तिच्याकडे जाताना बालपणीची आठवण जागी होते. तर एकदा एका नातलगाकडे जायचे असल्याकारणे त्यांना फोनवरून त्यांच्या घराजवळच्या खाणाखुणा विचारल्या आणि गंमत म्हणजे त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, ‘अगं इकडे ये, यांना जरा आपल्या घराचा पत्ता सांग, त्यांना घर सापडत नाही.’ मग त्या बाईने आम्हाला सर्व डिटेल्स सांगितले आणि एकदाचे आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. काय तर म्हणे घराजवळ कंपनीची बस येते आणि घराजवळ सोडते आणि गाडीत बसले की हे महाशय पुस्तकात डोकं खुपसून बसतात. आता या अशा प्रसंगात आपण आपल्याच डोक्याला हात मारून घेण्याशिवाय किंवा झापड लावलेल्या घोडय़ाची आठवण काढण्यापलीकडे दुसरे काहीही करू शकत नाही.
एकदा असंच एका कलावंताची मुलाखत घ्यायला मला जायचं होतं. मी त्यांना पत्ता विचारला आणि जवळच्या काही खाणाखुणा विचारल्या तेव्हा त्यांनी मला त्यांच्या घरी जाण्याचा एकदम व्यवस्थितपणे पत्ता समजावून सांगितला. पण तरीही मी गोंधळलेच. इकडून तिकडे फिरून झाल्यावर, विचारून झाल्यावर शेवटी घर सापडलं.
त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी विचारलं, ‘घर व्यवस्थित सापडलं ना?’ तेव्हा मी पटकन बोलून गेले, ‘सर, तुम्ही सांगितलं असतं की जवळच स्मशान आहे तर कदाचित मी अजून लवकर पोहोचले असते.’ त्यावर ते म्हणाले, ‘अहो, ही खूण सांगितली की लोक घाबरतात हो!’ अर्थात त्यांचं हे बोलणं मात्र मी लगेच मान्य केलं.
म्हणजे घर घेणं आपल्या हातात असलं तरी या खाणाखुणा मात्र आपल्या पहुंच के बाहरच असतात. तर अशी ही घरं आणि अशा त्यांच्या खाणाखुणा, ज्या संपता संपणार नाहीत.
हो की नाही?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: land mark
टॅग Building,House
Next Stories
1 घर घ्यायचे ते प्रकल्पाचा आराखडा बघूनच!
2 वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत ३० सप्टेंबपर्यंत!
3 वास्तुमार्गदर्शन
Just Now!
X