18 October 2019

News Flash

निवारा : लॉरी बेकर गांधीजींच्या विचारातील वास्तुशिल्पी

वास्तुकलेचे शिक्षण घेऊनही लॉरी बेकर यांना इंग्लंडमधील औद्योगिक प्रगतीने भुरळ घातली नाही.

(संग्रहित छायाचित्र)

प्रतीक हेमंत धानमेर

वसाहतवादातून पेटलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वास्तुकला मात्र स्वत:च क्षितिज रुंदावत होती. सिमेंटसारख्या विलक्षण मटेरीअलने वास्तुशिल्पींच्या वैचारिक मर्यादांना आभाळ खुलं करून दिलं होतं. औद्योगिकीकरणाचं आणि ग्लोबलायझेशनचं वारं सुसाट होतं. ‘फ्रँक लोयेड राइट, ल’कॉर्बुझीअर, ऑस्कार नेमायरसारखे दिग्गज वास्तुशिल्पी सामन्यांच्या कल्पनेपलीकडील जग निर्माण करत होते. त्यांची प्रत्येक इमारत स्वत:ची ठाम ओळख निर्माण करत होती. वास्तूची भव्यता, उंची-खोलीची अद्वितीय रचना, प्रकाशाचा खेळ यांनी सामान्यांच्या मनाला भुरळ घातली होती. ही मोहिनी इतकी होती की स्वातंत्र्यानंतर चंदीगढ शहराच्या नियोजनासाठी पंतप्रधान नेहरूंनी कॉर्बुझीअर यांनाच भारतात बोलावले.

याच काळात या लख्खं दिव्यांच्या रोषणाईत एक दिवा शांतपणे तेवत होता. नव्या इमारती आभाळाला चुंबने घेत असताना हा वास्तुशिल्पी मात्र चीनच्या कुठल्याशा युद्धभूमीवर सनिकांची शुश्रूषा करण्यात दंग होता. या अवलियाचे नाव होते ‘लॉरी बेकर’.

वास्तुकलेचे शिक्षण घेऊनही लॉरी बेकर यांना इंग्लंडमधील औद्योगिक प्रगतीने भुरळ घातली नाही. दुसरे महायुद्ध पेटले असताना बेकरजी जखमी सनिकांची सेवा करण्यात गुंतले होते. १९४३ च्या सुमारास इंग्लंडला परतीचा प्रवास करण्यासाठी बेकरजी मुंबईला आले आणि त्यांची परतीची बोट ३ महिने लांबली. पण याच विलंबाने भारताला एक युगपुरुष मिळाला. या तीन महिन्यांच्या विलंबात बेकरजी आणि गांधीजी यांची भेट झाली. या भेटीत गांधीजींनी बेकरजींच्या हाताने शिवलेल्या चपलेने सुरू केलेले संभाषण स्थानिक वास्तुकलेपर्यंत नेले. त्यावेळी गांधीजींनी एक विलक्षण मंत्र बेकरजींना दिला- ‘‘५ किलोमीटरच्या परिघात मिळणाऱ्या स्थानिक साहित्याने घराची बांधणी.’’ इंग्लंडवरून हजारो मलाचा प्रवास करून येणाऱ्या पोर्टलँड सिमेंटच्या काळात हा विचार कोणत्याही वास्तुशिल्पकाराला मागासच वाटला असता. पण एका महात्म्याचे विचार समजून घेण्यासाठी तेवढी पात्रतासुद्धा असावी लागते. बेकरजींना या विचारातील अध्यात्म समजले. जेव्हा जेव्हा आपण स्थानिक साहित्याचा वापर करतो तेव्हा आपण स्थानिक अर्थशास्त्राला बळकटी आणत असतो. स्थानिक साहित्याने बांधकाम करण्यासाठी स्थानिक कारागिरांची गरज लागते. या कारागिरांना त्या साहित्याची योग्य पारख असते, त्याचा योग्य वापर त्यांना माहीत असतो. हे स्थानिक साहित्य स्थानिक वातावरणाला अनुकूलन साधते. त्यामुळे मानवनिर्मित ऊर्जेची गरज कमी होते; परिणामी खर्च कमी होतो. साहित्य ने-आण करण्याचा खर्च कमी झाल्याने एकूण घर बांधकामाचा खर्च कमी होतो. इंधनाची बचत होते. साहित्य स्थानिक असल्याने बाकीच्या भूभागावर आणि स्रोतांवर त्याचा ताण येत नाही. (उदा. आज कोटा येथून येणाऱ्या कोटा दगडामुळे तेथे भरपूर प्रमाणात नैसर्गिक हानी झाली आहे आणि त्याचे दुष्परिणाम तेथील स्थानिक लोकांना भोगावे लागत आहेत) स्थानिक साहित्याचा वापर स्थानिक लोक काळजीपूर्वक करतात कारण त्यांना त्याची गरज असते. घरांमधून दिसून येणारी आर्थिक विषमता कमी होते. गावातला पसा गावात राहतो, त्यामुळे गावातील तरुण स्थलांतर करून शहरात जात नाहीत. परिणामी गाव समृद्ध होते आणि शहरांवरचा ताण कमी होतो. केवळ एका वाक्यातला विचार, पण किती प्रगल्भता या विचारात दडली आहे. ही प्रगल्भता बेकरजींच्या प्रगल्भ कल्पनाशक्तीला समजली आणि त्यातूनच भारताला भारतीय वास्तुकलेची वेगळी ओळख निर्माण करणारा वास्तुशिल्पी मिळाला.

मातीच्या भाजलेल्या विटेचे सौंदर्य केवळ बेकरजींनाच समजले. विटांना प्लास्टर करून त्याचे सौंदर्य झाकणे त्यांना मान्य नव्हते. विटांच्या बांधकामाच्या रचनेत त्यांनी बदल करून बांधकामाला नक्षीदार केले. भिंतींमध्ये जाळी देऊन त्रिवेंद्रमच्या उष्ण आणि दमट हवामानाला घरात हवा खेळती ठेवली. त्यांच्या विटेची रचना इतकी सुबक की कोणाची हिम्मत होईल त्याला प्लास्टर करायची? वीट उघडी ठेवल्याने भिंती श्वास घेऊ लागल्या. घरातील वातावरण नियंत्रित ठेवू लागल्या. प्लास्टरचा खर्च कमी झाला. विटेच्या सांधेबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतानाच बेकरजींनी ‘रॅट ट्रॅप बॉण्ड’चा शोध लावला. या सांधेबांधणीतील भिंतीमुळे जवळजवळ २५ ते ३० टक्के विटांची बचत होऊ लागली. तसेच या भिंतीमधील पोकळीमुळे घराबाहेरील वातावरण आणि आतील वातावरण यात पृथक्करण होऊन घर थंड राहू लागले. या सर्व बांधकाम तंत्रांचा उगम बेकरजी यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून आणि भारतीय पारंपरिक घरांच्या अभ्यासातून झाला. बेकरजींनी आधुनिक बांधकाम आणि पारंपरिक बांधकामाची सुरेख सांगड घातली. फिलर स्लॅब हे त्याचेच उदाहरण. आर.सी.सी. स्लॅबमधील दोन सळ्यांमध्ये असलेल्या काँक्रिटच्या जागी त्यांनी मंगलोरी कौले घातली. त्यामुळे स्लॅबमधील सिमेंटचे प्रमाण कमी झाले. मातीच्या कौलामुळे स्लॅबचे तापमान कमी झाले. तसेच घराच्या आतील बाजूने त्याचे सौंदर्यसुद्धा खुलून आले. साधारण १९६०-७० दरम्यान शोधलेल्या या साऱ्या बांधकाम तंत्रांचा वापर आजही जगभरात होत आहे. आजच्या घडीला दर दिवशी जन्म घेणाऱ्या नवनवीन बांधकाम साहित्याच्या युगात बेकर यांच्या या तंत्रज्ञानाचे स्थान अढळ आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा शोध लावूनही बेकरजींनी त्याचे पेटंट घेण्याचा विचार कधीच केला नाही. उलट या सर्व तंत्रज्ञानाची सोप्या भाषेतील सचित्र पुस्तके लिहून विनामूल्य त्याचा प्रसार केला. हे सर्व बांधकाम स्थानिक कामगारांना आपलेसे वाटू लागले. म्हणूनच काय, भारतातील घरकुल योजनेचा आराखडा बनवण्याची जबाबदारी १९८५ साली लॉरी बेकर यांना देण्यात आली.

हसन फादी यांनी जसे मातीच्या बांधकामाला आधुनिक वास्तुकलेत अढळ स्थान मिळवून दिले, त्याप्रमाणे बेकरजींनी वास्तुकला सामान्यांच्या आवाक्यात आणली. जेव्हा मोठय़ा मोठय़ा इमारतींची निर्मिती करण्यात वास्तुतज्ज्ञ गुंग होते तेव्हा लहान लहान आविष्कारांनी बेकरजींनी सामान्यांची स्वप्ने पूर्ण केली. या दिग्गज वास्तुतज्ज्ञांच्या मांदियाळीत त्यांचे स्थान कुठे? हा प्रश्न त्यांना पडलाच नाही. आजही भारतातील ग्रामीण भागात आर्किटेक म्हणजे कोण? हा प्रश्न लोकांना पडतो. त्यांच्यासाठी आर्किटेक म्हणजे बांधकामाचा इंजिनीअर. कारण वास्तुतज्ज्ञांनी ग्रामीण वास्तुकलेकडे पाठच फिरवली होती. त्यावेळी बेकरजींनी घरांची सुंदर रचना करून या वास्तुकलेची कवाडं सर्वासाठी खुली केली. विद्यार्थी या विषयाकडे गांभीर्याने पाहू लागले. बेकरजींची वास्तुकला ही सप्तसुरांसारखी साधी आहे, सखोल आहे. त्याच्या साधेपणातून अनेक रागांची निर्मिती व्हावी तशी ही वास्तुरचना बहरत जाते. त्यातील अवकाशाला मंदिराचे पावित्र्य प्राप्त होते. ही वास्तुकला दिसते तितकी सोपी नाही. त्यातील साधेपणा समजून घ्यायला तपस्येची गरज असते, विरक्तीची गरज असते. आम्हा नवोदित वास्तुशिल्पींवर आणि भारतीय वास्तुकलेवर बेकरजींचे किती उपकार आहेत हे शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठीण काम आहे.

pratik@designjatra.org

First Published on May 4, 2019 1:21 am

Web Title: laurie baker gandhis think tank architect