‘वास्तुरंग’ मधील गणेशोत्सवासंदर्भातील लेख वाचले आणि मन भूतकाळातील आठवणींमध्ये रमले. नेमेचि येतोप्रमाणे गणेशोत्सव आला की मला ५०-६० वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव आठवतो. ही आठवण आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतील गणपतीची. सप्टेंबरचा महिना, दिवस लहान व्हायची सुरुवात झालेली. कधी कधी भुरभुरत असलेला पाऊस. ठेवणीतला फ्रॉक घातलेली मी नऊवारीतील आजी आणि तिच्या ट्रेडमार्ककॉटनच्या साडीतील आई. रस्त्याच्या कडेला संध्याकाळी ६।।-७ ला रिक्षाची वाट बघत उभ्या आम्ही तिघी. विद्यापीठात मराठी माणसांची संख्या बेताचीच, पण हा उत्सव मात्र दणक्यात साजरा होई. श्रींची प्रतिष्ठापना आणि विसर्जन या दोन दिवसांशी माझा संबंध नसे, पण मधल्या दिवसांची मात्र मी आतुरतेने वाट पाही. एक दिवस विद्यापीठातील मुला-मुलींनी बसवलेलं नाटक असे. यातच मी पुलंचं अंमलदार, तुझं आहे तुजपाशी, अत्रेंचं लग्नाची बेडी, कवडीचुंबक ही नाटकं बघितली. या लेखकांच्या नावाशी माझा परिचय पुढे अनेक वर्षांनी झाला. एक दिवस गृहिणींचं पुरुष पात्रविरहित नाटक असे, तर एक दिवस स्त्रियांच्या हळदी-कुंकवाचा. एक संध्याकाळ लहान मुलांच्या विविध स्पर्धानी गाजत असे तर एक दिवस त्यांच्या विविध गुणदर्शनासाठी राखून ठेवलेला असे. यात मी एकदा दिवाकरांची नाटय़छटा सादर केलेली आठवते. नृत्यात मला गती नव्हती, पण चोख पाठांतरामुळे नाटकात एखादं काम मिळून जाई.

एकदा ज्योत्स्ना भोळे आल्याचे आठवते. माझ्या आईचं वक्तृत्व चांगलं होतं, त्यामुळे कलाकाराचा परिचय आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी तिची असे. ती संस्कृतची विविध सुभाषितं पेरून तिचं भाषण असं खुमासदार बनवी, की कधी कधी मूळ कार्यक्रमापेक्षा तिच्या आभार प्रदर्शनालाच जास्त दाद मिळून जाई. विद्यपीठामधील एक ड’ नावाचा हॉल या उत्सवासाठी उपलब्ध असे. प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे दिलेल्या वर्गणीतून श्रींची मूर्ती आणून हॉलची सुंदर सजावट केली जाई. सुंदर रांगोळ्या घालणाऱ्यांना तिथे भरपूर वाव होता. क्वचित आलेल्या अमराठी व्यक्ती त्या ठिपक्यांच्या रांगोळ्यांकडे कौतुकाने बघत. तिकडे ही कला अवगत नव्हती. विसर्जनाच्या आदल्या दिवशी बक्षीस समारंभ आणि अल्पोपाहार असे. कार्यक्रमांत भाग घेतलेल्या प्रत्येक मुलाला कुठलं तरी बक्षीस मिळे. एक वर्ष लकी डिपमध्ये चार आण्यांचं तिकीट घेऊन मला चार रुपयांचा आरसा मिळाल्याचे

स्मरते. लॉटरीत काही मिळाल्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला आणि शेवटचा प्रसंग. कार्यक्रमानंतर आरती आणि कोणाच्या तरी घरून आलेला प्रसाद. त्यासाठी आई आणि आजी नारळाच्या वडय़ा करत बसलेल्या आठवतात.

२-३ चांगले फ्रॉक आलटूनपालटून सर्वच मुली घालत. परवा घातलेला फ्रॉक आज पुन्हा कसा घालू असं कधी मनात आल्याचं आठवत नाही. ते आठ दिवस अक्षरश: भारल्यासारखे असत. संध्याकाळी पाच वाजता शाळेतून आल्यापासून किती वाजता जायचं म्हणून आईच्या मागे असे. आई-आजींना त्या गॅस नसलेल्या काळात पाच माणसांचा रात्रीचा स्वयंपाक करून निघायचं असे. वडील आणि भाऊ  या सगळ्यापासून अलिप्त होते.

एका संध्याकाळी आम्ही तिघी रिमझिम पावसात, अंधारून आलेलं असताना रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट बघत उभ्या होतो. समोर आलेली एक रिक्षा आमच्या आधीच एका गृहस्थांनी चपळाईने थांबवली, पण मग आमच्याकडे लक्ष गेल्यावर ‘जनानी सवारी है, ले जाओ,’ म्हणून ते बाजूला झाले. ते स्त्री-दाक्षिण्य अजूनही माझ्या मनावर कोरलेलं आहे. आजही बी. एच. यू.मधला मूठभर मराठी माणसांनी एकत्र येऊन उत्साहानी साजरा केलेला गणेशोत्सव आठवतो.

नंदिनी बसोले

 

रेरासंदर्भात उपयुक्त माहिती

‘वास्तुरंग’ (२ सप्टेंबर) ‘रेरा आणि कर्ज’ हा अ‍ॅड. तन्मय केतकर यांचा लेख वाचला. रेरा बद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती प्रसिद्ध होते. मात्र, आजपर्यत कोणीही रेरा आणि कर्ज  तसेच त्याच्याशी संबंधीत तरतुदींवर लिहिलेले नव्हते. हा माहितीपण्रूा लेख उपयुक्त ठरेल.

अशोक काळे

 

उल्लेखनीय लेख

‘वास्तुरंग’ (२ सप्टेंबर) ‘रेरा आणि कर्ज’ हा अ‍ॅड. तन्मय केतकर यांचा लेख वाचला. या लेखात साध्या-सोप्या भाषेत रेरा आणि कर्ज याविषयी मांडणी केली आहे. हा लेख माहितीपूर्ण आहे.

अजित पगारे

 

पानाची गादी आणि पुलंचा पानवाला

‘वास्तुरंग’ मधला ‘पानाची गादी’ हा मोहन गद्रे यांचा लेख सुंदर आहे. मुंबईतल्या किंवा इतरही ठिकाणच्या पानपट्टीच्या दुकानांचे अगदी बारीक सारिक निरिक्षण गद्रे यांच्या लेखात आहे. या पान गाद्यांचे दुकानदार बहुतांश कोकणातले असल्याने त्यांची नावे देखिल मलुष्टे, जागुष्टे, शेटे अशीच असतात. पान, विडी, सिगारेट, तंबाखू या व्यतिरिक्त नाना प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्या या पान गाद्यांचे स्वरुप जनरल  स्टोर्सचेच खरे. गद्रे यांच्या लेखावरून पुलंच्या सुप्रसिद्ध ‘पानवाला’ या लेखाची आठवण झाली. पानवाला या लेखात पुलं म्हणतात की, ‘पान पात्र पट्टी बनवून देण्याच्या व्यतिरिक्त अठरा पगड स्वरूपाच्या वस्तू विकणारा पानगादीवाला हा अस्सल पानवाला नव्हेच. कारण त्याचे फक्त पानाशीच ईमान नसते. पानगादीवाला भागिर्थि बाई भ्रतार सखाराम मलुष्टे या आपल्या विधवा मावशीच्या नावे तंबाखूचे लायसन्स काढून तंबाखूही विकतो त्याशिवाय मेणबत्त्या, साबणाच्या वडय़ा, तपकीर,  इतकेच नाही तर पोस्टाची कार्डे, पाकिटेसुद्धा विकतो. पानागादीवाल्यात मोटारगाडीची केवळ उपयुक्तता आहे तर अस्सल पानवाल्यात दोन घोडय़ांच्या बग्गीचा सरंजामी डौल आहे.’ अर्थात विनोदाचा भाग सोडला तरी पानगादी ही सर्वसामान्य गिऱ्हाईकांच्या दृष्टीने एक उपयुक्त संस्था आहे.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण