News Flash

खिडक्यांमध्ये घुसमटलेले सामान!

वस्तू आणि वास्तू

(संग्रहित छायाचित्र)

|| प्राची पाठक

‘सातशे खिडक्या, नऊशे दारं’.. अगदी इतक्या नसल्या, तरी आपल्या घरांना बऱ्यापकी संख्येत दारं-खिडक्या असतात. कुठे छोटे कोनाडे असतात. कधी भिंतीचीच रचना अशी असते की, आत एक वेगळा कपाटासारखा भाग तयार झालेला असतो. कुठे घरातल्या घरात वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या छतांमुळे वेगळा स्लॅब बाहेर आलेला असतो. तिथे एक छोटा माळा तयार होतो. त्यावर नकोशा वस्तू अगदी सहजच ढकलल्या जातात. घरातले माळे आणि त्यात आत आत कोंबलेले सामान हा एक वेगळाच विषय आहे. परंतु म्हणायला माळा नसला तरी तशाच छोटय़ा-मोठय़ा अनेक जागा, खाचा घरात असतात- ज्यात सामानाची कोंबाकोंब केली जातेच. घरातल्या फíनचरच्या रचनेमुळे सुद्धा काही जागा आडोशाच्या तयार होतात आणि नकोशा सामानाने भरत राहतात. कधी घरात वारा नीट खेळावा म्हणून लहानसहान खिडक्या घराच्या रचनेतच दिलेल्या असतात. त्यांचेही कट्टे तयार होतात लहानसे. त्या खिडकीच्या कडेवर जी जागा तयार होते तिथे आपण वस्तू ठेवत जातो. त्या अनेकदा तिथेच साचत राहतात. खिडक्यांना मोकळा असा श्वास फारच क्वचित मिळतो.

व्हेंटिलेशनसाठी आजकाल ए.सी.च्या उंचीवरसुद्धा दर खोलीत एखादी खिडकी दिलेली असते. कधी इमारतीची रचनाच तशी असते म्हणून इतक्या उंचावर एखादी दोन फूट लांब आणि फूटभर उंच अशी छोटी खिडकी असते. तिच्या कट्टय़ावर सहजच ज्या वस्तू ठेवल्या जातात, त्या साधारणत: लहान मुलांपासून दूर म्हणून ठेवायच्या, सांडायला नको म्हणून ठेवायच्या. नेहमी लागत नाहीत म्हणून ठेवायच्या वस्तू असतात. कधी घरातल्या उंदीर- ढेकणांसाठी, झुरळांसाठी कुठले औषध वापरले असते आपण. तेही वरचेवर मिळायला तर हवे, पण चटकन् कोणी घेऊन वापरायला नको, म्हणून अशी औषधे हमखास या उंचीवरच्या खाचाखोचांमध्ये दडपून ठेवली जातात. कुठल्याशा पावडरीसुद्धा असतात त्यात. नुकताच रंग दिलेला असेल, तर उरलेले रंग, जास्तीचे रॉकेल, टर्पेटाइन, उरलेले फेव्हिकॉल, सुतारकामाच्या पट्टय़ा, लहानसहान रॉड्स इथे खुपसून ठेवले जातात.

आपल्या घरातल्या अशा सर्व लहान-मोठय़ा खिडक्यांचीच सफर एकदा करायला हवी. एक्झॉस्ट पंख्यांच्यासुद्धा बारक्या खिडक्या स्वयंपाक घरात, बाथरूम-टॉयलेट्समध्ये असतात. तिथेही जी जागा तयार होते त्यात आपण काय-काय सामान ठेवतो ते बघितले पाहिजे. कधी कधी उरलेसुरले खिळे, लागेल लागेल करत कशाचे तुटलेले पार्टस् असेही आपण तिथे ठेवून देतो. आपल्यासाठी अशा जागा म्हणजे सुरक्षित जागा असतात. वेगळ्या जागा असतात. समोर चटकन दिसणाऱ्यासुद्धा जागा असतात. आपल्याला वाटतं वस्तू नीट राहील, पण अनेकदा इथली वस्तू इथेच धूळ खात पडून राहते. क्वचित कधी माळे झाडायचा कार्यक्रम झालाच, तर तिथल्या वस्तू उंचावरून जोरात खाली पडतात आणि आहेत त्यापेक्षा खराब होतात. फुटून जातात. ज्या हेतूने घरातल्या वस्तू अशा सुरक्षित जागा शोधून शोधून डांबल्या जातात, तो हेतू क्वचितच सफल होतो. एरवी जे नीटनेटके आणि मोकळे दिसले असते, तिथले सौंदर्यसुद्धा अशा गोष्टींमुळे नाहीसे होते. उगाचच घरात साठत जाणाऱ्या वस्तूही या जागांमुळे वाढत जातात.

शौचालय आणि बाथरूमच्या, स्टोअर रूमच्या खिडक्या हा तर एक वेगळाच विषय आहे. आधीच या जागा चटकन काम उरकून बाहेर पडायच्या जागा.. असे त्यांच्याकडे बघितले जाते. त्यात त्या अंधाऱ्या असतात आणि लहानसुद्धा असतात. अनेकदा शौचालय-बाथरूमची दारं फोिल्डगची बसवावी लागतात, कारण एक दार पूर्ण उघडू शकेल इतकीही जागा तिथे नसते. अशावेळी तिथल्या खिडक्या साफ करणे म्हणजे एक दिव्यच असते. अशा लहान जागांसाठी असलेल्या खिडक्यांचे देखील अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कुठे सिमेंटच्या नक्षीदार खिडक्या असतात. कुठे तिरप्या बसवलेल्या काचा असतात, तर कुठे केवळ ग्रील बसवलेली असते. तिथून आतमध्ये काही किडे, पक्षी, पाली, मांजरी येऊ नये म्हणून जाळ्याही बसवलेल्या असतात. त्यांची फिटिंग व्यवस्थित केलेली नसते. टोकं जास्तीची सोडून दिलेली असतात. त्याच्या खाचाखोचांमध्ये आणि बाहेर आलेल्या तारांमध्येसुद्धा अनेक वस्तू गुंडाळून आणि अडकून ठेवलेल्या असतात. तिरप्या काचा असलेल्या खिडकीच्या काचा फुटल्या की त्यासुद्धा तिथेच काढून ठेवल्या जातात. नव्या अंडरवेअर, कपडय़ांचे स्टिकर्स बाथरूममध्ये चिकटवून ठेवणे, काही धागे-दोरे काढून ठेवणे, सॅनिटरी पॅडचे कागद तिथे खुपसून ठेवणे, एखादे वर्तमानपत्र अडकवून ठेवणे, प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तू खोचून ठेवणे, अशा अक्षरश: कोणत्याही गोष्टींसाठी या जागा वापरल्या जातात. असे सर्व छोटेमोठे भंगार एकदाचे मार्गी लावलेच पाहिजे. नकोशी स्टिकर्स काढून टाकली पाहिजेत. असे स्टिकर्स चिकटवायच्या सवयीलादेखील मोडले पाहिजे. याही जागा घरातल्या स्वच्छतेचा एक भाग बनल्या पाहिजेत. घरातला नीटनेटकेपणा असाच कानांकोपऱ्यापासून दिसला पाहिजे.

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:23 am

Web Title: loksatta vasturang 2
Next Stories
1 माट येथील कुषाणकालीन मंदिर
2 बक्षीसपत्र
3 अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण
Just Now!
X