|| संपदा वागळे

एक झोपडी बोलघेवडी, पांथस्थाचा पाय अडे.. ना. धों. महानोर यांची ही ओळ वाचल्यावर डोळ्यांसमोर जसं चित्र उभ राहतं, अगदी तसंच घर बघण्याचं भाग्य मला अलीकडे लाभलं. जाणाऱ्याच्या मनात परतून येण्यासाठी ओढ निर्माण करणारं हे घर आहे कोकणातील राजापूर तालुक्यातील ‘भू’ या गावात.

seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
Gutkha worth six and a half lakh seized in Dindori taluka
दिंडोरी तालुक्यात साडेसहा लाखाचा गुटखा जप्त
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

मी आणि माझी मैत्रीण सुलभा पूर्णगडच्या ताम्हणकरांचं समुद्राकाठचं घर पाहून संध्याकाळी पाचच्या सुमारास ‘भू’ ला पाध्येंच्या घरी जायला निघालो. तासाभराचा रस्ता. वाटलं, दिवसाउजेडी पोहचू. पण अंधाराने आपले हातपाय लवकर पसरले अन् ‘भू’मध्ये शिरण्याआधीच मिट्ट काळोख पसरला. गाडीच्या हेडलाइट्सच्या प्रकाशात फक्त वळणं घेत जाणारा रस्ता, बाजूची गर्दझाडी आणि मधूनच मिणमिणणारे दूरदूरच्या घरातील दिवे.. एवढंच दिसत होतं. वाटलं, ‘ही दोघं (पती-पत्नी) कशी राहत असतील या सुनसान जगात? इतक्यात  हातात विजेरी घेऊन बाहेर रस्त्यावर येऊन आमची वाट बघणारे रामचंद्र ऊर्फ आर. डी. पाध्ये (दादा पाध्ये) दिसले आणि आमचा जीव भांडय़ात पडला. घराच्या गेटमधून आत शिरताना ‘या, घर आपलंच आहे,’असे पाध्येवहिनींचे आपुलकीचे शब्द कानी आले आणि पाठोपाठ होममेड चकल्या चिवडा, लाडू यांचं ताट समोर आलं. त्या मोकळ्याढाकळ्या प्रेमळ स्वागताने आम्हाला क्षणार्धात आपलंसं केलं.

पाध्यांच्या या घराचा इतिहास अभिमान वाटावा असा आहे. आर. डी. पाध्ये आणि नीला वहिनी या घरात राहाणारी पाध्यांची अकरावी पिढी. वेदविद्येत पारंगत असे त्यांचे मूळ पुरुष ‘महेश्वर भट पाध्ये – गुर्जर’ (गुजराथहून आले म्हणून गुर्जर) या गावात राहायला आले. पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी सर्वसंगपरीत्याग करून केवळ वेदांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी संस्कृत पाठशाळा काढली. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती ऐकून पेशव्यांनी त्यांना पुण्यात एका यज्ञासाठी आमंत्रित केलं. तेव्हा त्यांनी तिथली वेदकुंडाची रचना कशी सदोष आहे ते सप्रमाण दाखवून दिलं. नंतर त्यांच्या आधिपत्त्याखाली यज्ञ संपन्न झाल्यावर पेशव्यांनी ज्यासाठी यज्ञ केला होता ती इच्छा पूर्ण झाली, म्हणून त्यांनी महेश्वर भट्ट यांना ‘भू’ गावातली दीड एकर आणि त्यांना तालुक्यातील विवली गावातली अकरा एकर जमीन बक्षीस दिली. एवढंच नव्हे तर ‘भू’ गावातील जमिनीवर एक चौसोपी वाडाही बांधून दिला. आता तो वाडा अस्तित्वात नाही. परंतु त्या वाडय़ालगत खोदलेल्या शे-दीडशे फूट खाली जाणाऱ्या भुयाराच्या खुणा आजही आसपास दृष्टीस पडतात.

नोकरीनिमित्ताने डोंबिवलीत राहाणारे पाध्ये आई गेल्यावर घर राहतं ठेवायचं म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन १९९० मध्ये ‘भू’ गावी कायमचे राहायला आले. मुलं रत्नागिरीत राहून शिकू लागली. ही दोघं इथं आली तेव्हा त्यांचं वडिलोपार्जित घर भक्कम होतं, इतकं की भिंतींची जाडी दीड ते दोन फूट. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्येच ठिकठिकाणी फडताळं होती. या फडताळांच्या जागी आता कपाटं उभी आहेत. मूळ घराची रचना आहे तशीच ठेवून पाध्यांनी त्यात काही आवश्यक बदल तेवढे केले. म्हणजे शौचालय नव्हतं, त्याची साये केली. अंगण ऐसपैस करून त्यावर पत्र्याचा कायमस्वरूपी मांडव घातला. (पूर्वी वर झापं असायची, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मांडव उतरावा लागे) या नव्या छताचा सुपाऱ्या वाळवण्यासाठी उत्तम उपयोग होतो.

पाध्यांचं घर एका डोंगरात आहे. त्यामुळे माडीच्या खिडक्या उघडल्या की उतारावरील नारळी-पोफळीच्या आगारात कुणी फिरत असेल किंवा गुर-ढोरं शिरली असतील तर लगेच दिसतं. बाहेरच्या अंगणात उजव्या कोपऱ्यात आल्या आल्या हातपाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था आहे. पायांवर थंडगार पाणी घेऊन ताजतवानं झाल्यावर एकतर तुम्ही अंगणातल्या झोपाळ्यावर झुलू शकता किंवा बाजूच्या आसनावर बैठक जमवू शकता. तिथेच एक पायमशीनही आहे. या शिवणयंत्राच्या मदतीने नीलावहिनींनी आत्तापर्यंत जुन्या साडय़ा / चादरींच्या किती गोधडय़ा येणाऱ्याजाणाऱ्या पांथस्थांना भेट म्हणून दिल्यात याची गणतीच नाही.

अंगणातून चार-पाच पायऱ्या वर चढलं की ओटी येते. त्यानंतर माजघर, मग स्वयंपाकघर, डाव्या बाजूला पडवी, वरती माडी, पडवीच्या बाजूला गोठा आणि पाठच्या परसात गोबर गॅस प्रकल्प. या गोठय़ात नीलावहिनींनी आजवर २२ म्हशींची बाळंतपणं पार पाडलीयत. हे घर जितकं माणसांवर प्रेम करतं, तितकीच- किंबहुना काकणभर अधिक माया मुक्या प्राण्यांवर आणि झाडामाडांवर पाझरते. नीलावहिनींचा दिवस घरातील मांजरांना दूध घातल्यावर सुरू होतो आणि झाडावेलींशी हितगुज करता करता मावळतो.

बोलता बोलता आम्ही माडीवर गेलो आणि बघतच राहिलो. या जागी शे-दीडशे वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा खजिना पाध्यांनी मोठय़ा निगुतीने ठेवलाय. सहाण, खलबत्ता, पानसुपारीचा डबा, दागिन्यांचा डबा, कथली, चिनी मातीच्या मोठाल्या बरण्या, कुळीथ भाजायचे खापर, उभ्याने ताक करायची चार फूट लांबीची रवी, आमसुलं ठेवायचं मातीचं छोटय़ा तोंडाचं मडकं, शेराचं माप, भांडी ठेवायचा पेटारा, गोठय़ाची/बागकामाची हत्यारं ठेवण्याची पेटी.. आजेसासूबाईंच्या सासूबाईंपासून वापरात असलेल्या या सर्व चिजांचा इतिहास नीलावहिनी अत्यंत आत्मीयतेने उलगडत होत्या. तो ऐकताना आपली ‘यूज अ‍ॅन्ड थ्रो’ संस्कृती आठवून आम्ही मनोमन खजील झालो.

मागच्या पडवीतील वायन आणि उखळ ही दोन वैशिष्टय़पूर्ण साधनंही नीलावहिनींनी दाखवली. वायन म्हणजे सारवलेल्या जमिनीत केलेला छोटा गोल खड्डा. याचा उपयोग मुसळाच्या सहाय्याने मसाले, हळद, तिखट इ. कुटण्यासाठी होतो. उखळ हे डमरूसदृश उपकरण अर्ध जमिनीत तर अर्ध वर असतं. त्या म्हणाल्या, ‘यात आम्ही मुख्य़त्वे फणसाचे गरे कुंटतो आणि मग त्या लगद्याची साटं घालून ती वाळवतो.’ मनात आलं, अशाप्रकारे बनलेली स्वकष्टार्जित साटं चविष्ट न लागली तरंच नवल!

दादा पाध्ये म्हणाले की, ‘आत्ता आत्तापर्यंत आमच्याकडे दूध तापवण्यासाठी थाराळंही होतं. थाराळं म्हणजे भिंतीलगतच्या कपाटात अडीच/तीन फूट उंचीवरील उघडय़ा कप्प्यात मांडलेली छोटी चूल, जिला लाकडी गजांचा उघडमिट करता येणारा दरवाजा असतो. अशा रीतीने स्वतंत्रपणे मंद आचेवर तापवलेल्या दुधावर सायही चांगली धरते.’

पाध्यांच्या घराइतकीच त्यांची बागही प्रेक्षणीय आहे. प्रवेशद्वारापासून अंगणापर्यंतच्या वाटेवर दुतर्फा लावलेली नाना प्रकारची फुलझाडं येणाऱ्याचं सुगंधी स्वागत करतात. तसंच नारळी- पोफळी, आंबा, फणस, काजू, रातांबा, लिंबू, आवळा, औदुंबर.. यांच्या आगारातून फिरताना उतारावरून किती अंतर खाली आलो आणि पुन्हा किती चढलो याचं भान उरत नाही.

दारातील सुगंधी फुलांनी देवांची पूजा करणं हा या घरचा एक सोहळाच आहे. माजघरातील शिसवी लाकडाच्या मोठय़ा देव्हाऱ्यात १५ ते २० पिढीजात देवदेवतांनी स्वतंत्र आसनांवर आपलं बस्तान बसवलं आहे. या सर्वाची प्रेमाने विचारपूस करत नीलावहिनींची सागरसंगीत पूजा चालते.

फक्त देवघरच नव्हे, तर स्वयंपाकघरातली भांडय़ांची चकचकीत मांडणी, शेजारच्या फडताळातील अमृतकोकम, आमसुलं, लोणची, थालीपीठाची भाजणी.. यांनी शिगोशिग भरलेल्या बरण्या (ही साठवण खास आल्या-गेल्यांना जाताना भेट देण्यासाठी), पुन:पुन्हा नजर वळावी अशा तऱ्हेने लावलेली कपडय़ांची कपाटं.. हे सर्व नजरेत साठवून परतताना मनात कुसुमाग्रजांची कविता जागी झाली.

माझ्या आनंदलोकात

चंद्र मावळत नाही

दर्या अथांग प्रेमाचा

कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात

केले वसंताने घर

आंब्या आंब्याच्या फांदीला

फुटे कोकिळेचा स्वर।

waglesampada@gmail.com